मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१३

(कष्टाची कमाई)


(कथा क्र. ३७) 

ग्रीसमध्ये हेलाक नावाचा एक धनवान आणि लोभी माणूस राहत होता. आपल्या दुकानावर येणाऱ्या प्रत्येक माणसाला ठकवणे त्याचे नित्याचे काम झाले होते. त्यातून तो भरपूर धन जमा करायचा. मात्र ते धन त्याच्याकडे टिकत नसे. कधी आजारात खर्च होत असे तर दुकानदारीत कधी खोट येत असे. हे पाहून त्याची सून त्याला समजवायची कि बेइमानीचे पैसे कधीच टिकत नसतात. परंतु हेलाक तिचे कधीच ऐकत नसे. एके दिवशी त्याच्या मनात विचार आला कि सून जे म्हणते आहे त्याची परिक्षा घेवून बघू. त्याने इमानदारीने धन जमा करून त्याचे एक सोन्याचे गंठण बनवले व ते एका कपड्यात बांधले व त्यावर स्वत:चे नाव टाकून चौकात ठेवून आला. बरेच लोक येत जाता त्या कपड्याकडे बघत पण कोणीही उचलून नेले नाही. सर्वांच्या पायात लागत होते म्हणून एका माणसाने ते तसेच उचलले आणि तळ्यात फेकून दिले. तळ्यातील एका मगरीने ते गिळले. काही दिवसांनी एका मच्छिमाराला जाळ्यात ती मगर सापडली. त्यांनी तिचे पोट फाडले तेंव्हा तिच्या पोटात कापडात बांधलेले सोन्याचे गंठण निघाले, मच्छीमारांनी हेलाकचे नाव त्यावर पाहिले व बक्षिसाच्या आशेने गंठण त्याला आणून दिले. अनेक महिन्यांनी आपले सोन्याचे गंठण मिळालेले पाहून तो खुश झाला. आता त्याचा सूनबाईच्या बोलण्यावर विश्वास बसला कि इमानदारीने मिळवलेले धन कुठेच जात नाही आणि बेइमानिचा पैसा कधीच टिकत नाही. त्याने खुश होवून त्या मच्छिमारांना चांगले बक्षीस दिले व सुनेला शाबासकी दिली. तात्पर्य- कष्टाने कमावलेल्या धनाने मानसिक शांतता, सुख मिळते तर   बेइमानीने मिळवलेल्या धनाने अनेक वाईट गोष्टी घडून येतात.
वर्तमानपत्रातून संग्रहित

२ टिप्पण्या: