रविवार, ३ फेब्रुवारी, २०१३

(चिलटांचा प्रताप)


(कथा क्र. २९) 

एका गावाजवळ एक मोठा तलाव होता. त्याच्या पलीकडे अरण्य होते. तलावात खूप पाणी होते. तलावात जास्त पाणी झालं तर ते गावात येवू नये म्हणून तलावाला एक बांध घातला होता. तलावाचा गावाला खूप फायदा होता. गावातले लोक अंघोळीला, धुण्याला, जनावरांसाठी हेच पाणी वापरत असत. तलावाच्या पलीकडच्या बाजूला काही झाडं होती. शेराची झाडं होती. त्या झाडाझुडपामध्ये बरेच कीटक होते. तसेच चिलटेहि होती. कधी कधी या चिलटांचा जथाच्या जथा तलावावर येत असे. तलावाच्या दुसऱ्या बाजूला एक साधू राहत असे. तो हि रोज तलावावर येत होता. तो रोजच आपल्या अंगावरील उपरणे काढून या चिलटाना हाकलून लावायचा. एक साधू पलीकडच्या काठावर उभारून चिलटे हाकलतो, हे काही तरुण मुले बघत होती आणि एकमेकात त्याची टिंगल करत होती. साधू मात्र रोज निष्ठेने हे काम करीत असे. एक दिवस साधू आजारी होता. त्याला तलावावर यायला जमले नाही. त्याच दिवशी नेमके जंगलातले दोन हत्ती पाणी पिण्यासाठी तलावापाशी आले. तलावावर भरपूर चिलटे घोंगावत होती. ती त्या दोन हत्तींच्या डोळयापाशी, कानापाशी, सोंडेत जावून घिरट्या घालू लागली. हत्ती यामुळे चिडले, त्यांना ती चिलटे मारता येईनात. हत्ती सैरावैरा पळू लागले. त्यात त्यांच्या पायांनी तलावाचा बांध फुटला. तलाव फुटला, गावात पाणी शिरले, घरं बुडाली, मानसं हवालदिल झाली. चिलटांच्या प्रतापामुळे सगळा गाव संकटात सापडला. तेंव्हा टिंगल करणाऱ्या मुलांना साधूच्या त्या चिलटे हाकलण्याच्या छोट्याशा कृतीचे अपरंपार महत्व समजले. 

तात्पर्य- छोट्याशा कृतीचेसुद्धा काही वेळेला खूप महत्व असते / छोटीशी चूकही मोठ्या संकटाना आमंत्रण देते. 

वर्तमानपत्रातून संग्रहित


२ टिप्पण्या:

  1. सुंदर गोष्ट आहे . एखादी लहानशी कृती न केल्यामुळे किती मोठ्या स्न्क्ताचा सामना करवा लागतो याच अनुभव घेतलाय मी . पण हि गोष्ट तुमच्या पेजवर पूर्वी वाचल्यासारखी का वाटतीये ???

    उत्तर द्याहटवा
  2. वैभव जी, तुम्‍ही म्‍हणता ते खरे आहे. फेसबुकवरील 'मराठी बोधकथा' या पेजवर ही कथा प्रसिद्ध झालेली आहे. प्रतिक्रियेबद्दल धन्‍यवाद

    उत्तर द्याहटवा