शनिवार, १७ मे, २०१४

दळणाचे जाते आणि खजिना

कथा क्र.205

राजा भीमसेन याला आपल्‍या दौलतीबद्दल प्रचंड घमेंड होती. एके दिवशी त्‍याला त्‍याचा मित्र समशेर भेटण्‍यासाठी म्‍हणून आला. मित्राचे राजाने मनापासून स्‍वागत केले. त्‍याचा यथायोग्‍य पाहुणचार केला. विश्रांतीनंतर राजाने त्‍याला आपला महाल पाहण्‍यासाठी आमंत्रण दिले. दोघेहीजण महालातून फिरत असताना राजाने आपल्‍या श्रीमंतीचा थाट मित्राला दाखविण्‍यास सुरुवात केली. सर्वत्र त्‍याच्‍या श्रीमंतीचे कोंदण कसे आहे याबद्दल राजा मोठ्या गर्वाने सर्व माहिती देत होता. सर्व ठिकाणी फिरून झाल्‍यावर राजाने शेवट त्‍याला आपल्‍या खजिन्‍याच्‍या खोलीकडे नेले. राजाचा प्रचंड मोठा खजिना पाहून समशेरचे डोळे दिपून गेले. तो अचंबित होऊन खजिना पाहतच बसला. राजा खजिन्‍याबद्दल माहिती सांगतच होता की हा खजिना किती किंमती आहे. अनेक दुर्मिळ रत्‍ने, अलंकार, जडजवाहिर, मोती, सोने, चांदी, अनमोल अशा वस्‍तू कशा मी जमा केल्‍या आहेत. या खजिन्‍याच्‍या सुरक्षेसाठी काहीशे सैनिक चोवीस तास पहारा देत असतात. अशी सर्व माहिती राजा देत असतानाच समशेर ऐकत होता पण त्‍याचे राजाच्‍या बोलण्‍याकडे दुर्लक्ष होत होते. काही वेळाने समशेर शेवटी राजाला म्‍हणाला,’’मित्रा हे इतके धन तू जमा केलेले आहेस पण याचा दुस-यांनाही काही फायदा होतो की नाही’’ राजा म्‍हणाला,’’ अरे मित्रा, इतक्‍या बहुमूल्‍य अशा खजिन्‍याचा माझ्याशिवाय दुस-या कोणाला फायदा होणार आहे.’’ यानंतर समशेर राजाला बरोबर घेऊन एका झोपडीकडे गेला. तिथे एक वृद्ध महिला जात्‍यावर धान्‍य दळत बसली होती. समशेरने राजाला ते दळणाचे जाते दाखवून म्‍हणाला,’’ राजा हे जातेही दगडाचे आहे आणि तुझ्या खजिन्‍यात तू जी रत्‍ने ठेवली आहेत ती पण दगडाचीच आहेत. फरक इतकाच आहे की त्‍या रत्‍नांचा तुझ्याशिवाय कुणालाच फायदा नाही आणि या दगडाच्‍या जात्‍याचा मात्र सगळ्या गावाला फायदा होतो. गावकरी मंडळी येथे येतात व धान्‍य दळून घेऊन जातात. तू ज्‍यांना रत्‍नांच्‍या पहा-याला सैनिक उभे केले आहेत त्‍यांच्‍या अंगी शक्ती येते ती सुद्धा या जात्‍यातून निघणा-या पीठामधून. म्‍हणून राजन मला तुझ्या सर्व खजिन्‍यापेक्षा, राज्‍यातील सर्व श्रीमंतीपेक्षा ही दगडाची जाती मला सर्वश्रेष्‍ठ वाटली.’’  राजाला आपली चूक कळाली व त्‍याची घमेंड पूर्ण उतरून गेली.


तात्‍पर्य :- ज्‍या गोष्‍टीने मानव समाजाचे कल्‍याण होत असेल अशा गोष्‍टी करणे हितकर असते. मनुष्‍यजन्‍मात येऊन जर इतरांचे हित पाहता येत नसेल तर असा मनुष्‍यजन्‍म काय कामाचा.

२ टिप्पण्या: