कथा क्र.207
श्रीपूर येथील राजा यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा राजवीरसिंह याला राज्यपदी
बसविण्यात आले. राजवीर वडिलांसारखाच साहसी होता पण अनुभव पाठीशी कमी असल्यामुळे
अनेकदा संकटात तो घाबरत असे. अशावेळी त्याची माता त्याला हिंमत देत असे व योग्य
मार्गदर्शन करून संकटातून बाहेर काढत असे. शेजारच्या राज्यातील गंगानगरमधील राजा
भीमसेन याची श्रीपूरवर नजर होती. एके दिवशी भीमसेनने श्रीपूरवर आक्रमण केले. दोन्ही
सैन्ये एकमेकांना भिडली, तुंबळ युद्ध झाले. भीमसेनकडे सैनिक खूप प्रमाणात होते.
आतापर्यत दिलीपसिंह याने कमी प्रमाणात सैनिक असूनसुद्धा भीमसेनविरोधात केवळ धाडसी
व कल्पक वृत्तीने युद्धे जिंकली होती. परंतु राजवीरसिंह यात आपले सातत्य ठेवू
शकले नाहीत. दोनच दिवसात भीमसेन यांनी चार मैल भागावर आपला ताबा मिळविला. राजवीरच्या
तोंडून कमी सैनिकांमुळे आपल्याला हार पत्करावी लागली हे ऐकले तेव्हा राजमातेने
मनातल्या मनात काही ठरवले. राजवीर झोपण्याआधी राजमातेचे दर्शन घेण्यासाठी आला
तेव्हा राजमाता लहान लहान सहा लाकडाच्या काड्या एकत्र बांधून लोखंडाच्या मोठ्या
तुकड्याला तोडण्याचा प्रयत्न करीत असलेली पाहिली. राजवीरने मातेला विचारले,’’आई, सहा लाकडाच्या काड्या एकत्र करूनही लोखंडाला तोडू शकत नाही’’ राजमाता म्हणाली,’’खरं बोललास, संख्येने मजबुतीला पराजित
केले जाऊ शकत नाही त्याप्रमाणे आपले वीर सैनिक आणि तू या लोखंडासारखे मजबूत व्हा.
शत्रूची कितीही संख्या तुम्हाला तोडू शकणार नाही अशी ताकद तुमच्यात आहे ती
जागृत करा. तुमच्या मजबुतीसमोर शत्रू गुडघे टेकेल.’’ राजवीरने
याप्रमाणे केले व त्याने भीमसेनाला हरवून युद्धात विजय संपादन केला.
तात्पर्य :दृढ मनोबलाने हारलेले युद्धही जिंकता
येते. काही काही वेळेला दृढनिश्चय, ठाम मनोबल हेच यशाचे इंगित ठरते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा