शुक्रवार, ९ मे, २०१४

जीवनाचे रहस्य

  कथा क्र.204  

एकदा एका कसायाकडे त्‍याचा एक मित्र त्‍याला भेटण्‍यासाठी गेला होता. तिथे त्‍याने असे पाहिले की, एका मोठ्या पिंज-यात खूप असे बोकड, मेंढ्या कैद आहेत आणि एकमेकांशी मस्‍ती करत आहेत. मोठ्या आनंदात ते प्राणी आहेत. दुसरीकडे त्‍याने असे पाहिले की त्‍याच पिंज-यातून एकेक बोकड काढून तो कसाई कापत आहे आणि त्‍याचे मांस विकत आहे. कसायाच्‍या मित्राला ही गोष्‍ट पाहून कसेतरी वाटले. तो त्रस्‍त झाला कारण ज्‍यावेळी प्रत्‍येक बोकडाला कसाई बाहेर काढून कापत असे हे जाळीतून पिंज-यातल्‍या प्रत्‍येक बोकडाला दिसत होते पण तरीसुद्धा ते बोकड आपला कुणीतरी मित्र मरतो आहे याची जाणीव न ठेवता आनंदात कसे राहत होते याचे त्‍या मित्राला राहून राहून आश्‍चर्य वाटत होते. ते बोकड आपल्‍याच मस्‍तीत खेळत, बागडत, आनंदात त्‍या पिंज-यात राहतात कसे याचे त्‍या मित्राला कोडे पडले होते. शेवटी न राहवून त्‍याने त्‍या कसाई मित्राला याचे कारण विचारले असता कसाई म्‍हणाला,’’ अरे मित्रा, फार सोपे कारण आहे. मी त्‍या प्रत्‍येक बोकडाच्‍या कानात असे सांगितले आहे की, सगळे बोकड मेले तरी हरकत नाही पण मी तुला काही कापणार नाही. त्‍यामुळे तू आनंदात राहा. तू एकमेव बोकड असा असशील की जो शेवटपर्यंत जिवंत राहशील. त्‍यामुळे ते प्रत्‍येक बोकड हे आपण जिवंत राहणार या आनंदात आहे आणि हे त्‍याचमागचे रहस्‍य आहे.

तात्‍पर्य :- या पिंज-यातल्‍या बोकडासारखीच माणसाची अवस्‍था आहे. प्रत्‍येकालाच असे वाटत राहते की, मी शेवटपर्यंत जिवंत राहणार आहे पण कधी ना कधी आपला नंबर हा येणारच आहे. जीवन जगताना आपण याची निश्चितच जाणीव ठेवली पाहिजे की आपणही कधीतरी मरणार आहोत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा