बुधवार, २ जानेवारी, २०१३

खोटा पैसा


(कथा क्र. ११)


एकदा दिनदयालजी बाजारात भाजी आणण्यासाठी गेले असता एका वृद्ध बाईकडून त्यांनी भाजी विकत घेतली. नंतर हिशोब लिहिताना त्यांच्या लक्षात आले कि आपल्या खिशातील एक खोटा पैसा त्या म्हाताऱ्या बाईला भाजीचे पैसे देताना चुकून दिला गेला. आपण नकळत का होईना त्या बाईला फसविले. याचे त्यांना अपार दु:ख झाले. ते पुन्हा बाजारात गेले व त्या बाईसमोर जावून उभे राहिले व म्हणाले," बाई, मी नकळत का होईना तुम्हाला फसविले आहे. मी तुम्हाला खोटा पैसा दिला आहे." त्या बाईला त्यांच्याशी बोलायला वेळ नव्हता, ती त्यांना म्हणाली," अहो, राहू दे एका पैशाचे काय? मला इथे भाजी विकू दे" पण दिनदयालजी म्हणाले ," नाही बाई ! मी तुम्हाला फसविले हि गोष्ट माझ्या मनाला लागून राहिली आहे. माझी चूक मला सुधारू द्या." त्या बाईने पण त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस भाव पाहिले व आपला गल्ला असलेली पेटी त्यांच्या समोर ठेवली. बाह्य जग विसरून दिनदयालजिनी एकाग्रपणे तो गल्ला तपासला व त्यातील खोटा पैसा त्या बाईला सांगून परत घेतला व त्या जागी खरा पैसा त्या गल्ल्यात टाकला. त्या वृद्ध बाईने त्यांना तोंड भरून आशीर्वाद दिला. पुढे याच दिनदयालजिनी 'एकात्म मानवतावाद' मांडला.



तात्पर्य- आदर्श आचरणाची सुरुवात आपल्यापासून करणे गरजेचे आहे.

वर्तमानपत्रातून संग्रहित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा