शनिवार, २६ जानेवारी, २०१३

(दुसरी बाजू )

(कथा क्र.२५) 


एकदा बिरबलाला पर्शिया देशात भेटीसाठी पाठविण्यात आले होते. बिरबलाने त्या देशातील सर्व ठिकाणांना भेटी दिल्या. सगळी स्थाने पाहिली. थोर मोठ्यांच्या गाठीभेटी घेतल्या व सर्वात शेवटी राजाच्या भेटीसाठी दरबारात गेला. बराच वेळ सर्व विषयांवर चर्चा झाल्यावर कुणीतरी अचानकच बिरबलाला विचारले,"महाशय! आपले देशाचे बादशहा आणि पर्शियाचे बादशहा यांच्यात तुम्हाला काय फरक जाणवला? किंवा यांची कशी तुलना तुम्ही कराल? " बिरबलाने तात्काळ त्याचे उत्तर दिले,"अहो! तुमचे बादशहा म्हणजे अगदी पौर्णिमेच्या चंद्रासारखे तेजस्वी आहेत आणि आमचे बादशहा हे प्रतिपदेच्या चंद्राइतके तेजस्वी आहेत." या उत्तरावर त्या दरबारातील सर्वचजण खुश झाले. त्या बादशाहाने तर बिरबलाचा खूप मोठा सन्मान केला. आपल्या देशी जेंव्हा बिरबल परतला तेंव्हा त्याच्या त्या विधानाची कीर्ती अगोदरच पोहोचली होती. बादशहा व सर्व दरबारी यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. आपल्या बादशहाला परदेशात जावून कमी लेखणे हे अनेकांच्या जिव्हारी झोंबले. बादशाहालाहि हे आवडले नाही त्याने बिरबलाला विचारले,"तू परदेशी गेला असता आपल्या बादशहाबद्दल असे उदगार का काढले?" यावर बिरबल म्हणाला,"महाराज! तुम्हाला प्रतिपदेचा चंद्र म्हणजे दिवसेंदिवस समृद्ध होत जाणारा चंद्र अशी उपमा दिली. तर पर्शियाच्या बादशाहाला पौर्णिमेच्या चंद्र म्हणजे कलेकलेने कमी होत जाणारा अशी उपमा दिली आहे. मला माझे बादशहा हे दिवसेंदिवस समृद्ध होत गेलेले पाहायचे आहेत. त्यामुळे मी असा फरक केला." बादशहाचे या उत्तराने समाधान झाले.

तात्पर्य- कोणत्याही गोष्टीत नेहमी सकारात्मक बाजू पहावी. एखाद्या गोष्टीला दुसरी पण बाजू असू शकते तेंव्हा दुसरी बाजू समजून घ्यावी.

वर्तमानपत्रातून संग्रहित




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा