(कथा क्र.२४)
कोणे एके काळी एक अतिशय आनंदाने व समाधानाने जगणारा कावळा होता. एके दिवशी त्याने एका शुभ्र अशा हंसाला पाहिले. तो त्या हंसाकडे गेला व म्हणाला," तू किती शुभ्र व सुंदर आहेस. मी मात्र काळा, कुरूप आहे. तूच या जगातील सर्वात आनंदी पक्षी असला पाहिजे." हंस म्हणाला," एका पोपटाला पाहीपर्यंत मलाही असेच वाटत होते. पण त्याच्याकडे सुंदर असे दोन रंग आहेत. मला मात्र एकच पांढरा रंग मिळाला आहे. तू पोपटाची भेट घे, त्याची ऐट बघ, त्याचे सौंदर्य बघ मग तोच कसा आनंदी पक्षी आहे हे तुला पटेल." हे ऐकून कावळा पोपटाकडे गेला. पोपटाला त्याने हंसाप्रमाणे विचारले असता पोपट म्हणाला," काय सांगू मित्रा! मला हि माझ्या सौंदर्याचा अभिमान होता पण मोरापेक्षा या जगात कुणीच सौंदर्यवान पक्षी नाही. त्याच्याकडे कितीतरी रंग आहेत. तो किती सुंदर आहे." पोपटाचे हे बोलणे ऐकून कावळा मोराच्या शोधात निघाला. खूप शोधल्यानंतर एका प्राणीसंग्रहालयात एका बंद पिंजऱ्यात मोर ठेवलेला दिसला. त्याच्याभोवती अनेक लोक त्याला पाहण्यासाठी गोळा झाले होते. कावळा तेथे गेला आणि म्हणाला," प्रिय मोरा! तू फारच सुंदर आहेस. लोक तुझ्या जवळ येवून तुझे गुणगान करतात आणि मला मात्र बघितले हाकलून देतात. मला खात्री आहे कि पृथ्वीवरचा सर्वात आनंदी पक्षी तूच आहेस." मोर म्हणाला,"मलाहि असेच वाटत होते. मी आनंदी का नसावे? सौंदर्यात माझी तोड नाही, पण हेच सौंदर्य माझ्या दुखा:चे कारण ठरले आहे. मी सुंदर असल्यानेच मला कैद करून पिंजऱ्यात टाकले आहे. तुझ्यासारख्या कावळ्यांना कोणीही पिंजऱ्यात ठेवत नाही.ते केंव्हाही मुक्त संचार करू शकतात. त्यामुळे काकराज! तूच या जगातला सर्वात आनंदी पक्षी असावास!"
तात्पर्य- प्रत्येकाला आपल्यापेक्षा दुसऱ्याची स्थिती चांगली वाटत असते. हे टाळण्यासाठी आपल्याला स्व-समाधानाच्या स्थितीपर्यंत पोहोचले पाहिजे. ज्याठिकाणी आपल्याला आनंद मिळू शकेल.
वर्तमानपत्रातून संग्रहित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा