बुधवार, ९ जानेवारी, २०१३

(कष्टाशिवाय फळ नाही)


(कथा क्र. १६) 

एका गावात एक गरीब पंडित राहत होता. सर्व काही नशिबानेच मिळते असा त्याचा समज होता. जेंव्हा त्याचा मुलगा त्याला गरीबीबद्दल विचारायचा तेंव्हा तो त्याला सांगायचा कि, "बाबारे ! हा सर्व नशिबाचा खेळ आहे." एके दिवशी हाच प्रश्न त्याच्या मुलाने गावाच्या मंदिरातील पुजाऱ्याला विचारला. पुजाऱ्याने त्याला दुसऱ्या दिवशी आपल्या वडिलांसोबत येण्यास सांगितले. जेंव्हा दोघेही पुजाऱ्याकडे गेले तेंव्हा पुजाऱ्याने मुलाच्या हातावरील रेषा पाहून म्हंटले, "पंडितजी! आपला पुत्र फारच भाग्यशाली आहे. परंतु याच्यावर एका ग्रहाचा कोप आहे. एक अनुष्ठान करण्याने तो कुप्रभाव नष्ट होईल." यावर पंडितजींनी विचारले,''आम्हाला काय करावे लागेल.?" पुजारी म्हणाला,"तुम्ही दोघांनी मिळून आश्रमाच्या अंगणात एक विहीर खोदा म्हणजे ग्रहाचा वाईट प्रभाव कमी होईल." पिता-पुत्र विहीर खोदण्याच्या कामाला लागले. अनेक दिवसांच्या परिश्रमानंतर त्यांना त्या खड्ड्यात एक घागर दिसू लागली. त्यांनी ती घागर पुजाऱ्याकडे नेली. पुजाऱ्याने घागरीवर बांधलेला कपडा काढला. तेंव्हा त्यात सोन्याच्या मुद्रा दिसू लागल्या आणि त्यात एक चिठीही दिसू लागली. ती चिट्ठी हातात घेवून त्या मुद्रा पंडितजींना देत पुजारी म्हणाला,"हे आपल्या भाग्यात नाही." हे ऐकून पुत्राने पंडितजींना विचारले,"भाग्य काय असते? हे आपण सांगितले नाही." पुजाऱ्याने ती चिट्ठी त्याला दिली, त्यात लिहिले होते,"भाग्याचेच दुसरे नाव कर्म आहे. आता पंडितजींच्या लक्षात आले कि, आपोआप काही घडत नाही तर कर्म केल्याने भाग्य साथ देते. 



तात्पर्य - अकर्मण्यता दुर्भाग्याला आमंत्रण देत असते आणि कर्मातुनच भाग्य खुलते. (थोडक्यात काय कष्टाशिवाय फळ मिळत नाही हेच खरे!!) 



वर्तमानपत्रातून संग्रहित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा