सोमवार, २८ जानेवारी, २०१३

(सेनापती आणि मार्गदर्शक)


(कथा क्र.२६) 

एका गावात एक मार्गदर्शक समस्यांचे अत्यंत समाधानकारक निरसन करीत असे. एकदा त्या देशाचा सेनापती त्याच्याकडे गेला व म्हणाला,"महाराज! मला स्वर्ग व नरक यातील फरक समजावून घ्यायचा आहे. आपण कृपया समजावून सांगाल का?" मार्गदर्शकाने त्याच्याकडे पाहिले व त्याला त्याचा परिचय विचारला. सेनापतीने त्याच्या वीरतापूर्ण कार्याच्याबाबतीत सविस्तर सांगितले. त्याची सर्वमाहिती ऐकून मार्गदर्शक म्हणाला,"चेहऱ्याने तर तुम्ही सेनापती नाही तर भिकारी दिसता. माझा विश्वास बसत नाहीये कि तुमच्याकडून तलवारसुद्धा उचलत असेल." हे ऐकून सेनापतीने रागाने म्यानातून तलवार उपसली. सेनापतीच्या या कृतीकडे पाहत मार्गदर्शक म्हणाला,"अरे वा ! तुम्ही तर तलवारही बाळगता, लोखंडाची असती तर तुमच्या हातून गळून पडली असती." हे उद्गार ऐकताच सेनापतीच्या तळपायाची आग मस्तकात गेली, त्याने तीच तलवार घेवून मार्गदर्शकाच्या दिशेने हल्ला करण्यास सुरुवात केली, हातातील तलवारीने तो आता मार्गदर्शकावर घाव घालणार इतक्यात मार्गदर्शक म्हणाले," हे सेनापती ! बस हाच तो नरक! क्रोधाने उन्मत्त होवून आपण विवेक घालवून माझ्यावर हल्ला केला आणि माझी हत्या करण्यास तयार झालात यालाच नरक असे म्हणतात." हे ऐकून सेनापतीने तलवार म्यानात ठेवली. तेंव्हा मार्गदर्शक म्हणाले,"विवेक जागृत झाल्यावर व्यक्तीला आपल्या चुकांची जाणीव होते. विवेक गमावून कोणतेही कार्य केल्यास नाशाला कारणीभूत व्हावे लागते. " सेनापतीला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.तात्पर्य- आत्मनियंत्रणातून विवेक उपजतो. विवेक जागृत ठेवल्यास अनेक वाईट प्रसंगातून सुटका करून घेता येते. 

वर्तमानपत्रातून संग्रहित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा