बुधवार, ११ डिसेंबर, २०१३

जशी दृष्टी तशी सृष्टी

कथा क्र.152

भगवान श्रीकृष्णाने एकदा एका मोठ्या यज्ञाचे आयोजन केले. त्यांनी युध्दिष्ठराला बोलावून सांगितले, "या यज्ञात आपल्याला एका माणसाचा बळी द्यावयाचा आहे. त्यासाठी एखादा दुष्ट-दुर्जन माणूस शोधून काढ. आपण त्याचा बळी देवू. त्यानंतर त्यांनी दुर्योधनाला बोलावले. श्रीकृष्ण त्याला म्हणाले, "मी एक यज्ञ करू घातला आहे. या यज्ञात आपल्याला एका सज्जनाचा सत्कार करावयाचा आहे. तेव्हा शक्यतो एखादा पवित्र-सज्जन माणूस शोध, आपण त्याचा यथोचित सत्कार करू.' युध्दिष्ठिर एका दुष्ट माणसाच्या शोधात निघाला आणि दुर्योधन एका सज्जन माणसाच्या शोधासाठी निघाला. युध्दिष्ठराला एकही दुष्ट माणूस सापडला नाही. त्याला प्रत्येक मनुष्य चांगलाच वाटत होता. तो श्रीकृष्णाकडे परत आला व म्हणाला, "भगवान! आपल्या राज्यात कोणीही दुष्ट नाही आणि आपल्याला यज्ञात बळी द्यायला माणूस हवा आहे तर तुम्ही मलाच बळीच द्या. तुमचा यज्ञ तरी पार पडेल. थोड्या वेळाने दुर्योधन आला व कृष्णाला म्हणाला, "देवा! मी खूप शोध घेतला पण आपल्या राज्यात मी सोडता एकही सज्जन माणूस आढळला नाही. तेव्हा देवा, एक सज्जन व्यक्ती म्हणून माझा सत्कार करावा. 

तात्पर्य : जशी दृष्टी असेल तसे आपल्याला जग दिसणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा