सोमवार, २ डिसेंबर, २०१३

संघर्षच खरे जीवन

कथा क्र 150

एका गावात एक म्‍हातारी राहत होती. तिला मुलेबाळे नव्‍हती. ती आणि तिचा नवरा दोघेच होती. पती कसल्‍यातरी आजाराने ग्रस्‍त होता. ती रात्रंदिवस मोलमजुरी करून दिवस काढत होती. या म्‍हातारीबद्दल संपूर्ण गावात सहानुभूती होती. पण म्‍हातारी स्‍वाभिमानी असल्‍याने ती कोणाकडून कसलीच मदत घेत नसे. एकेदिवशी ती जंगलात लाकडे तोडण्‍यासाठी गेली होती. दिवसभर लाकडे तोडून ती दमली होती. लाकडांची मोळी बांधली पण ती मोळी झालेल्‍या श्रमामुळे तिला काही उचलली जाईना. त्‍याने ती वैतागली व मोठमोठ्याने बडबडू लागली,''देवा, आता या उतारवयात ही मोळी जर माझ्याचने उचलली जात नसेल तर मला तरी उचल बाबा.'' तिने तसे म्‍हणायला आणि मृत्‍युदेव तिकडून जायला एकच गाठ पडली. त्‍यांनी ते ऐकले व लगेच तेथे येवून ते म्‍हणाले, मी तुझा आवाज ऐकला आहे मी तुला घेऊन जायला तयार आहे.'' साक्षात मृत्‍यु समोर पाहून म्‍हातारी घाबरली आणि म्‍हणू लागली,'' मला आताच मरायचे नाही, मी जर मेले तर माझ्या आजारी पतीची सेवा कोण करील?. मी काही इतकीच काही म्‍हातारी नाही की मला ही मोळी उचलता येत नाही. मी उगीच गंमत करत होते. पण मला काय माहिती लगेच मला उचलायला तू लगेच येशील देवा. मला सोड बाबा एकटीला, जा तुझा तू.'' हे ऐकताच मृत्‍यूदेव निघून गेले आणि म्‍हातारीने पूर्ण ताकतीने लाकडाचा भारा उचलला व घरी गेली.

तात्‍पर्य- जीवनापासून पळ काढणे म्‍हणजे समस्‍येचे निरसन नाही. संघर्षाला सामोरे जाणे, संघर्ष करत रा‍हणे, आपले नित्‍यकर्म करत राहणे यातच मानवी जीवनाचे सूत्र बांधले आहे.

______________
वर्तमानपत्रातून संग्रहित _______________



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा