कथा क्र.२३५
पंडीत रामप्रसाद गरीब होते. परंतु आतिथ्य करण्यात अग्रेसर होते. पंडीतजींची कमाई स्वत:वर कमी आणि दुस-यावर जास्त खर्च होत होती. एकदा पंडीतजींच्या घरी काही पाहुणे आले. जेवणानंतर त्या लोकांनी पंडीतजींना संध्याकाळच्या गाडीची तिकिटे काढण्यास सांगितले. त्यादिवशी पंडीतजींकडे काहीच पैसे नव्हते. याबाबत पाहुण्यांकडे ते काहीच बोलले नाही. त्यांनी आपल्या मित्राकडे चौकशी केली पण हाती काहीच लागले नाही. ते चिंतेत बसले होते. इतक्यात खेडवळ वाटणारा वयस्कर माणूस त्यांच्याकडे आला व म्हणाला,'' रामप्रसाद पंडीत आपणच का,'' रामप्रसाद होय म्हणाले असता, वयस्कर माणसाने त्यांना त्यांच्या वडीलांचे नाव हरिप्रसाद होते का असे विचारले. रामप्रसाद हो म्हणताच त्या माणसाचे डोळे भरून आले व तो म्हणाला,'' बेटा, वीस वर्षापूर्वी तुझे वडील आणि मी एकत्र प्रवास करत होतो. त्यावेळी माझा खिसा कोणीतरी कापला व माझे पैसे लांबविले. त्यावेळी तुझ्या वडीलांनी मला पैसे दिले होते ते परत करण्यास मी आलो आहे. त्यावेळी त्यांनी जर मला मदत केली नसती तर आजचा दिवस मी पाहूच शकलो नसतो. त्यानंतर मी गावी गेलो, पै-पै साठवून त्यांचे पैसे एकत्र केले पण त्यांच्या निधनाची वार्ता मला समजली म्हणून तेव्हा जमले नाही तर आज स्वत: ते पैसे परत करण्यास मी आलो आहे.'' असे म्हणून त्याने ते पैसे पंडीतजींना दिले व एकहीक्षण न थांबता तो माणूस निघून गेला. पंडीतजींनी त्या पैशातून पाहुण्यांची व्यवस्था केली व ईश्वराचे आभार मानले.
तात्पर्य :- परोपकारी वृत्ती माणसाच्या कामी येते. कधी काळी उपयोगी केलेले उपकारसुद्धा या ना त्या रूपाने परतफेड करण्यासाठी कोणी ना तयार होऊन आपले कामी येतो.
वर्तमानपत्रातून संग्रहित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा