सोमवार, २८ नोव्हेंबर, २०१६

पश्‍चाताप


कथा क्र.२३३


मेहमूद नावाचा एक इराणी व्‍यापारी होता. एकदा त्‍याने मोठी पार्टी दिली. मध्‍यरात्रीपर्यंत खानपान चालू होते. या गर्दीत एक चोर हवेलीत येऊन लपला. मेहमूदने त्‍याला पाहिले होते. परंतु तो त्‍याला काहीच बोलला नाही. जेव्‍हा सगळे पाहुणे गेले तेव्‍हा त्‍याने नोकरास दोन व्‍यक्तिंचे जेवण लावण्‍याचे आदेश दिले. त्‍यानंतर लपून बसलेल्‍या चोराजवळ तो गेला. चोर घाबरला, मेहमूदने त्‍याला प्रेमाने जेवू घातले. त्‍यानंतर चोरी करण्‍याचा उद्देश विचारला. तेव्‍हा चोर म्‍हणाला, माझे नाव रमीझ आहे, मी श्रीमंत होतो पण दारूमुळे मी या अवस्‍थेत आलो आहे. मेहमूदने त्‍याला काही धन दिले आणि काही व्‍यवसाय चालू करण्‍याविषयी सुचविले. चोराने त्‍याचे म्‍हणणे ऐकले. दरम्‍यान काही वर्षे या गोष्‍टीला लोटली. एकदा तो मेहमूदकडे आला, मेहमूदने त्‍याला ओळखले नाही. चोर स्‍वत:च म्‍हणाला,तुम्‍ही चोरी सोडण्‍याविषयी सांगितल्‍यानंतर मी तुम्‍ही दिलेल्‍या पैशातून व्‍यापार सुरु केला. आज माझ्याकडे लाखोंची संपत्ती आहे. फक्त एक मेहरबानी करा. मी ज्‍यांच्‍याकडे चोरी त्‍यांचे पैसे परत करण्‍याची मला इच्‍छा आहे. त्‍यांचे पैसे परत केल्‍याने माझ्या मनावरील ओझे कमी होईल. मेहमूदने त्‍याला कोतवालाकडे नेले. कोतवाल त्‍याचे बोलणे ऐकून प्रभावित झाला. ज्‍यांच्‍याकडे त्‍याने चोरी केली होते त्‍यांची नुकसानभरपाई म्‍हणून दुपटीने पैसे दिले. लोकांनीही त्‍याला मोठ्या मनाने माफी दिली.

तात्‍पर्य :- केलेल्‍या वाईट कृत्‍यांचा पश्‍चाताप होणे ही मनुष्‍य असण्‍याची खूण होय.

वर्तमानपत्रातून संग्रहित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा