मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०१६

पश्‍चाताप


कथा क्र.256

एका विद्यालयातील प्रसंग आहे. विज्ञानाच्‍या विद्यार्थ्‍यांना दररोज प्रयोगशाळेत प्रयोग करावे लागतात. काही विद्यार्थ्‍यांना असे प्रयोग करायला आवडायचे. शाळेने काही सामग्री प्रयोगासाठी घरी देण्‍यात यावी अशी विद्यार्थ्‍यांची इच्‍छा असायची. परंतु मुख्‍याध्‍यापक कडक शिस्‍तीचे होते त्‍यांनी कोणतीही सामुग्री घरी देण्‍यास विद्यार्थ्‍यांना नकार दिला. एकदा एका विद्यार्थ्‍यांने प्रयोगशाळेतील रसायनाची बाटली चोरली. प्रयोगशाळेत शोधाशोध झाली पण ती बाटली काही सापडली नाही. एक महिन्याने तो विद्यार्थी मुख्‍याध्‍यापकांकडे गेला आणि त्‍यांच्‍यासमोर टेबलावर ती चोरलेली बाटली ठेवली. मुख्‍याध्‍यापकांनी सूचक नजरेने त्‍याच्‍याकडे पाहिले तेव्‍हा त्‍या मुलाने आपण केलेल्‍या चोरीची माहिती दिली. प्राचार्यांनी त्‍याला विचारले,'' जर तुला याची गरज होती तर प्रयोग का केला नाही'' विद्यार्थ्‍यांने सांगितले,''मी जेव्‍हाही याचा वापर करण्‍याचा प्रयत्‍न करायचो तेव्‍हा माझा थरकाप उडायचा. मला असे वाटत होते की आपण चोरी करण्‍याचे वाईट काम केले आहे. त्‍यामुळे बाटली उघडत होतो व पुन्‍हा ठेवून देत होतो. शेवटी माझ्या आत्‍म्याने मला ही वस्‍तू परत ठेवण्‍यास सांगितले म्‍हणून ही बाटली मी तुम्‍हाला देत आहे.'' यावर मुख्‍याध्‍यापक म्‍हणाले,''तू जशी कपाटात ती बाटली जशीच्‍या तशी ठेवू शकला असतास मग माझ्याकडेच कशाला आणून दिली.'' विद्यार्थी तात्‍काळ म्‍हणाला,''सर जशी बाटली घरी नेली ती एक चोरी होती तशीच ती गुपचुपपणे ठेवून दिली असती तर ती दुसरी चोरी ठरली असती माझी'' त्‍याच्‍या उत्तराने मुख्‍याध्‍यापक खूपच खुश झाले.त्‍यांनी त्‍याला वर्गात बसण्‍यास सांगितले पण विद्यार्थ्‍याने सरांना शिक्षा सुनावण्‍यास सांगितले. मुख्‍याध्‍यापक म्‍हणाले,''अरे बेटा, तू महिनाभर केलेल्‍या चोरीमुळे पश्‍चात्तापाच्‍या आगीत जळत होतास हीच तुझी शिक्षा होती. पश्‍चात्ताप हा मोठा मार्गदर्शक बनून तुला मार्ग दाखवित होता. त्‍यामुळे तुला वेगळी शिक्षा देणे उचित नाही. तु वर्गात जा, अभ्‍यास कर आणि चांगला माणूस बन'' विद्यार्थी मुख्‍याध्‍यापकांच्‍या पाया पडून वर्गात गेला.

वर्तमानपत्रातून संग्रहित

मराठी बोधकथा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा