सोमवार, ११ मार्च, २०१३

(पैसा कसा वाचवाल?)


(कथा क्र. ४२)

हि गोष्ट आहे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांची. राजेंद्रबाबूंची राहणी खूपच साधी होती. एकदा चालताना राष्ट्रपती राजेन्द्रबाबुना त्रास होवू लागला. लक्षात असं आलं कि त्यांच्या चपला झिजल्या आहेत आणि त्याला मारलेला खिळा त्यांच्या पायाला टोचू लागला आहे. मग राष्ट्रपतींनी आपल्या स्वीय सहाय्यकाला नवीन चप्पल आणण्यास सांगितले. त्याने सेवकासोबत जावून नवीन चपलांचा जोड आणला. राष्ट्रपतींनी विचारले," या चपलेची किंमत किती?" "सोळा रुपये" सहाय्यकाने सांगितले. "सोळा रुपये? गतवर्षी मी माझ्या चपला बारा रुपयांना घेतल्या होत्या.तुम्ही खात्री करा."राष्ट्रपती म्हणाले. यावर स्वीय सहाय्यक म्हणाले,"साहेब त्या दुकानात बारा रुपयांच्या पण चपला आहेत.पण त्यापेक्षा या चपला मऊ आणि चांगल्या आहेत. आणि मुख्य म्हणजे मऊ असल्याने टोचणार नाहीत. म्हणून सोळा रुपये देवून मीच आणल्या. आपल्या सेवकाचेही या चपलाबाबत मत चांगले वाटले. " राष्ट्रपती म्हणाले, "अहो मऊ चपला आहेत आणि चांगल्या दिसतील म्हणून तुम्ही चार रुपये जास्त मोजले कि. नको त्यापेक्षा असे करा कि या चपला दुकानात परत करा आणि मला बारा रुपयांच्याच चपला आणून द्या. आणि महत्वाचे म्हणजे त्यासाठी वेगळा असा हेलपाटा घालू नका. त्या बाजूला येणाऱ्या जाणाऱ्या कोणाकडून तरी हे काम करून घ्या. अन्यथा असे व्हायचे कि चपलेत चार रुपये वाचविण्यासाठी तुम्ही पाच रुपयांचे पेट्रोल खर्च करून गाडीने जाताल." स्वीय सहाय्यक हे सर्व ऐकतच राहिले. देशाच्या सर्वोच्च पदी बसणाऱ्या व्यक्तीबद्दल त्यांचा आदर आणखी वाढला. 


तात्पर्य- पैशांची अकारण उधळपट्टी करू नये. 


वर्तमानपत्रातून संग्रहित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा