रविवार, ३१ मार्च, २०१३

(बुद्धीच सर्वश्रेष्ठ)

(कथा क्र ५२)

दोन व्यक्ती आपसात भांडत होत्या. एकजण धनाला तर दुसरा बुद्धीला सर्वश्रेष्ठ म्हणत होता. काहीच मार्ग निघत नाही हे पाहून दोघेही देशाच्या राजाकडे गेले आणि न्याय मागू लागले. राजाही काही निर्णय घेवू शकला नाही. त्याने एक पत्र देवून त्या दोघांना रोमच्या सम्राटाकडे पाठविले. जेंव्हा दोघांनी ते पत्र रोमच्या सम्राटाला दिले तेंव्हा त्यातील गोम ओळखून त्याने त्या दोघाना फाशी देण्याची आज्ञा केली. हे ऐकताच दोघांनीही एकमत करण्याचे ठरविले. बुद्धीवानाने धनवानास म्हंटले,"तू समजतोस धन मोठे आहे तर धनाने आता आपल्या प्राणांची रक्षा कर बघू." धनवानाचे प्रयत्न कामी आले नाहीत. त्याने हार पत्करत बुद्धीवानास प्राण रक्षण करण्याची विनंती केली. बुद्धिवान म्हणाला फाशीवर चढताना आपण एकमेकास पुढे ढकलायचे, पुढील गोष्ट मी सांभाळून घेतो. त्याप्रमाणे त्यांनी केले. प्रथम फाशी जाण्यासाठी दोघे धक्काबुक्की करू लागले तेंव्हा रोमच्या सम्राटाने कारण विचारले. बुद्धीवान म्हणाला,"आमच्या राजाला ज्योतिष्याने सांगितले आहे, मी जेथे मरेन तेथे भयंकर दुष्काळ पडेल आणि माझा मित्र जेथे मरेल तेथे महामारी पसरेल. त्यामुळे मी मरण्याचा विचार करतो कारण लाखो लोक महामारीपासून बचावतील. आम्हाला फाशी तर आमच्या देशातही देता आली असती पण आमच्या राजाने देशावरचे संकट तुमच्या पदरात टाकले आहे. आता कुणाला फाशी देता ते सांगा?" त्या बरोबर रोमच्या सम्राटाने दोघांची सजा माफ केली. अशा प्रकारे बुद्धीवानाने धनवानाचा जीव स्वतः बरोबर वाचविला.

तात्पर्य-बुद्धी हि सर्वश्रेष्ठ आहे. 

वर्तमानपत्रातून संग्रहित 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा