सोमवार, ४ मार्च, २०१३

(कर्म आणि धर्म)

(कथा क्र. ४०)


          भगवान गौतम बुद्ध यांना एका गावी प्रवचनासाठी निमंत्रण दिले होते. ज्या शेतकऱ्याने निमंत्रण दिले होते तो अत्यंत भाविक होता. आपणाबरोबर आपल्या गावातील लोकांना याचा लाभ व्हावा हि त्याची इच्छा होती. गावाबाहेरच्या एका विस्तीर्ण अशा मोकळ्या पटांगणात एक वृक्ष होता. त्याला पार होता. तेथे प्रवचन घेण्याचे ठरले. ज्या दिवशी प्रवचन सुरु होणार त्यादिवशीच त्या शेतकऱ्याला चिंतेने ग्रासले, त्याचा सर्वात लाडका बैल हरवला. शेतात बांधून ठेवला असता दावं तोडून बैल निघून गेला. शेतकरी बैलाला शोधायला बाहेर पडला. कोस-दोन कोस चालला. गावापलीकडच्या डोंगराशी कुरण होते. तिथे त्याने बैलाला शोधलं मात्र डोक्यात विचार प्रवचनाचे चालू होते. खूप वेळ निघून गेला होता. शेतकऱ्याला प्रवचनाला जाता आले नाही. तोपर्यंत प्रवचन संपले होते. गावकरी घरी निघून गेले होते. बैल मिळाल्याचा आनंद आणि प्रवचन हुकल्याच दुख असे दोन्ही भाव त्याच्या मनात होते.
         दुसऱ्या दिवशी मात्र शेतकरी वेळेत प्रवचनाला हजर राहिला. प्रवचन संपल्यावर विनम्रपणे गौतम बुद्धांच्या पाया पडून तो म्हणाला," महाराज, मी काल प्रवचनाला येवू शकलो नाही. क्षमा करा. माझा बैल हरवला होता. पण बैलाला शोधतानासुद्धा माझे प्रवचन हुकले व चांगले विचार ऐकण्यापासून वंचित राहिलो याचे दुख मनाला डाचत होते." यावर बुद्ध मंदस्मित करीत म्हणाले," चांगल्या गोष्टी ऐकण्यापासून वंचित राहिल्याचे दु:ख तुला झाले यातच तुझे भले आहे. आणि बैलाला शोधणे हे तुझे कर्तव्य आहे. तू बैलाला शोधात असताना सुद्धा प्रवचनाचा विचार करत होता म्हणजेच तू कर्म करत असताना धर्माचा विचार करत होता, कर्म करणे हेच धर्माचे मुख्य सार आहे."


तात्पर्य- कर्माचे पालन म्हणजे धर्माचे पालन होय. 


वर्तमानपत्रातून संग्रहित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा