रविवार, २४ मार्च, २०१३

(मुल्यांकन)


(कथा क्र.४८)

एका महात्म्याच्या शिष्यांमध्ये एक राजकुमार आणि एक शेतकऱ्याचा मुलगा होता. राजकुमाराला राजपुत्र असण्याचा अहंकार होता.मात्र शेतकऱ्याचा मुलगा विनम्र आणि कर्मठ होता.राजकुमाराचे वडील अर्थात तेथील राजा दरवर्षी एका स्पर्धेचे आयोजन करीत असत. त्यात बुद्धिमत्ता आणि दृष्टीची पारख केली जात असे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दूरदूरचे राजकुमार येत असत. अध्ययन पूर्ण झाल्यावर राजकुमाराने शेतकऱ्याच्या मुलालाही या स्पर्धेत सामील होण्याचे आमंत्रण दिले. कारण त्याला तेथे बोलावून त्याचा अपमान करण्याचे त्याच्या मनात होते. जेंव्हा शेतकऱ्याचा मुलगा स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचला तेंव्हा त्याला राजकुमार आणि राजपुत्रांमध्ये बसण्यास मनाई केली. शेवटी शेतकऱ्याचा मुलगा वेगळा बसला. राजाने प्रश्न विचारला,"तुमच्यासमोर जर जखमी वाघ आला तर तुम्ही त्याच्यावर उपचार कराल का त्याला तसेच सोडून निघून जाल ?" सर्व राजपुत्रांचे उत्तर हे एकच होते. "आम्ही आमचा जीव धोक्यात घालून वाघावर उपचार करणार नाही." मात्र शेतकऱ्याचा मुलगा म्हणाला," मी जखमी वाघावर उपचार करेन कारण जखमीचा जीव वाचविणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे. माणूस होण्याच्या नात्याने माझे हे कर्म आहे. मांस खाणे हे जर वाघाचे कर्म असेल तर तो बरा झाल्यावर माझा जीव का घेईना ? त्यात त्याचा दोष नाही. माणूस म्हणून मी त्याच्यावर उपचार करणे हे माझे आद्यकर्तव्य आहे." हे उत्तर ऐकताच राजाने त्या मुलाला विजयी घोषित करून राज्याचे मंत्रिपद दिले.

तात्पर्य-व्यक्तीचे मुल्यांकन हे त्याच्या विचारातून होत असते. त्याच्या राहणीमानावरून कि त्याच्या दिसण्यावरून होत नसते. कधी कधी साधारण दिसणारी माणसे असाधारण कार्य करतात. 

वर्तमानपत्रातून संग्रहित 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा