शुक्रवार, १७ मे, २०१३

(व्यवस्थापन)

(कथा क्र ७८)

एकदा धर्मपुर नगराचा राजा सोमसेन शिकारीवरून परतत असताना काही कारणाने आपल्या सर्व साथीदारापासून रस्ता चुकला आणि वेगळ्याच रस्त्याला लागला. जंगलातून रस्ता काढत काढत तो नगराच्या दिशेने वाटचाल करू लागला. रस्त्याने चालत असताना त्याला एक माणूस खांद्यावर कु-हाड घेवून व तोंडाने बासरी वाजवत चाललेला दिसून आला. तो माणूस हि नगराच्या दिशेने चाललेला होता तेंव्हा राजाने त्याच्यासोबत जाण्याचे ठरविले. दोघांनी एकमेकांशी संभाषण सुरु केले. राजाने त्या माणसाला विचारले,"तू कोण आहे?, तुझा व्यवसाय काय? आणि तू जे काही मिळवतो त्यात तू खुश आहे आहे काय?" त्या माणसाने उत्तर दिले,"महाराज! मी एक लाकुडतोड्या असून लाकडे तोडण्याचे काम करतो. रोज मला चार रुपये मिळतात. त्यापैकी पहिला रुपया मी पाण्यात टाकून देतो, दुसरा रुपया मी कर्ज चुकविण्यासाठी वापरतो, तिसरा रुपया मी उधार देण्यासाठी उपयोग करतो तर चौथा रुपया मी जमिनीत गाडून टाकतो." या म्हणण्याचा अर्थ राजाला काही समजण्याच्या आतच राजाचे सैनिक शोधत तेथे आले व राजा त्यांच्यासोबत निघून गेला. राजाला त्या लाकुडतोड्याचे म्हणणे शांत बसू देईना, त्याने भर दरबारात हा प्रश्न उपस्थित केला,"तो लाकुडतोड्या जे चार रुपये खर्च करतो, ते कसे ते मला सांगा?" कोणालाच या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. मग राजाने निर्णय घेतला कि त्या लाकुडतोड्याला दरबारात बोलवायचे. राजाने तसा आदेश दिला व दुसऱ्या दिवशी लाकुडतोड्याला घेवून सैनिक हजर झाले. लाकुडतोड्या आलेला दिसताच राजा सोमसेन त्याला म्हणाला,"तुझ्या धनाचे तू जे व्यवस्थापन करतो ते कसे ते मला सांग? मला काल काहीच कळले नाही." लाकुडतोड्या हसून म्हणाला, "महाराज! पहिला रुपया मी पाण्यात टाकून देतो म्हणजे मी माझ्या परिवाराचे पोषण करतो., दुसरा रुपया मी कर्ज चुकविण्यासाठी वापरतो म्हणजे म्हाताऱ्या आईवडिलांच्यासाठी खर्च करतो., तिसरा रुपया मी उधार देण्यासाठी उपयोग करतो म्हणजे म्हणजे मी माझ्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करतो जेणे करून ते शिकून माझ्या म्हातारपणी मला सांभाळतील.तर चौथा रुपया मी जमिनीत गाडून टाकतो म्हणजे धर्म, दक्षिणा, दान यात खर्च करतो म्हणजे जेंव्हा मी मरेन त्याचे पुण्य मला मिळेल." राजाने हे उत्तर ऐकताच आनंदित होवून लाकुडतोड्याचा मोठा सन्मान केला आणि मोठे इनाम देवून त्याला त्याच्या घरी पाठविले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा