(कथा क्र ७१)
एका सम्राटाला रात्री येत नव्हती, ते फेरफटका मारत असताना आपल्या कक्षाबाहेर आले तर मंत्री महोदय आपल्या हिशोबाच्या वह्या काढून हिशोब तपासत आहेत असे त्यांच्या लक्षात आले. मंत्र्याच्या चेहऱ्यावर कसली तरी चिंता आहे हे महाराजांच्या अनुभवी नजरेने हेरले. महाराजांनी त्यांना या चिंतेचे कारण विचारले तेंव्हा मंत्री म्हणाले, "महाराज ! मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी कर अधिक जमा झाला आहे. पण त्याचे कारण मला समजले नाही" सम्राट म्हणाले,"अहो! हिशोबात काही चूक असेल." मंत्री म्हणाले,"हिशोब अचूक आहे. मी स्वत:तपासला आहे." सम्राट म्हणाले," रात्र जास्त झाली आहे. हि समस्या उद्या सकाळी सोडवा." परंतु मंत्री म्हणाला," उत्पन्न अशा प्रकारे वाढणे साम्राज्यासाठी चिंतेचे कारण आहे. कराची कमतरता सहन करणे शक्य आहे पण अन्यायाची एक पै तिजोरीत जास्त आली तर तिच्यामुळे साम्राज्याला तळतळाट लागू शकतो. महाराज ! कुणा गरीबाचा तळतळाटाचा पैसा चुकून जरी आपल्या तिजोरीत पडला तर तुम्हाला आणि मला आपल्या दोघांना आवडणार नाही. यामुळे मी तो हिशोब तपासत आहे." आता सम्राटही गंभीर झाला आणि मंत्राच्या समोर बसला. बराच वेळ विचार केल्यावर मंत्री म्हणाला ,"महाराज! उन्हाळा जास्त झाल्याने नदीची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे काठावरच्या जमिनीला शेतकऱ्यांनी कुंपण घातले. शेतकऱ्यांनी पिके कमी घेतली पण सरकारचा कर बुडवायचा कसा? या विचाराने त्यांनी सरकारात धन जमा केले. त्यामुळे जास्त धन गोळा झाले." यावर राजा म्हणाला,"जर दुष्काळाची परिस्थिती असेल तर त्या गरीब शेतकऱ्यांनी जमा केलेला कर आपल्या तिजोरीमध्ये ठेवून मला पापाचा धनी व्हायचे नाही. गरीब शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत म्हणून तोच पैसा परत करा." सम्राटाच्या आज्ञेचे पालन करण्यात आले. पुढील वर्षी त्या राज्यात भरपूर पाऊस झाला. जनतेचे आशीर्वाद फळाला आले.
तात्पर्य-सर्वांचे हित जाणणारा, प्रेम, आत्मीयता व कठीण प्रसंगात योग्य साथ देणारी व्यक्तीच योग्य प्रकारे सत्ता चालवू शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा