सोमवार, २७ मे, २०१३

(साधू आणि गवळण)

(कथा क्र ८३) 

एका गावात एक साधू राहत होता लोक त्याचा फार आदर करत असत. त्या गावात दुसऱ्या गावातून दुध विकण्यासाठी एक गरीब गवळण येत असे. सर्वात प्रथम ती साधूला दुध आणून देत असे. त्यानंतर ती गावातील इतर लोकांकडे दुध वाढत असे. एके दिवशी तिला येण्यास उशीर झाला. साधूने तिला कारण विचारले तेंव्हा तिने उत्तर दिले,"आज नदी पार करायला नाव उशिरा मिळाली, त्यामुळे येण्यास उशीर झाला." साधू हसत म्हणाला"लोक तर ईश्वराच्या नावावर संसारसागर पार करतात आणि तुला नदी पार करायला नाव लागते. असे वाटते कि तुला ईश्वरावर विश्वास नाही." त्या भोळ्या गवळणीवर या बोलण्याचा खूपच परिणाम झाला. दुसऱ्या दिवशी पहाटेच ती गवळण साधूच्या आश्रमाच्या दारात साधूला हाक मारू लागली. साधू त्यावेळी अजून झोपलेले होते. तिच्या हाकेने साधू जागा झाला. दार उघडताच तिला पाहून साधू हैराण झाला. त्याने विचारले,"रोजच्या वेळेपेक्षा आज तुम्ही लवकर कशा काय आलात?" गवळण म्हणाली,"महाराज! तुमच्या उपदेशाने माझे काम झाले, नावेची समस्या कायमची संपली. रोजचे भाडे वाचले, आपल्या सांगण्यानुसार ईश्वराचे नाव घेतले आणि नदी पार करून आले" साधूचा या गोष्टीवर विश्वास बसला नाही. जेंव्हा ती नदीच्या रस्त्याने जाऊ लागली, तेंव्हा साधूही तिच्यापाठोपाठ नदीत गेला. जेंव्हा पाण्याची पातळी वाढली तेंव्हा साधू घाबरून पाण्यात पडला आणि वाचविण्यासाठी आवाज देवू लागला, तेंव्हा गवळणीने त्यांना पाण्यातून बाहेर काढले आणि विचारले," तुम्ही आपलाच उपदेश अंमलात आणून जर ईश्वराकडे प्रार्थना केली असती तर तुम्ही नदी पार करू शकला असता." गवळणीचा ईश्वरावरील गाढ विश्वास पाहून शरमिंदा झाला.

तात्पर्य- संदेश लक्ष्यापासून भरकटत असतो आणि विश्वास फळ देत असतो. दृढ निश्चयाने सर्व काही साध्य होते.

वर्तमानपत्रातून संग्रहित 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा