मंगळवार, ७ मे, २०१३

(सर्वधर्मसमभाव)


 (कथा क्र.७३) 

एकदा अकबर आणि बिरबल वेषांतर करून राज्यात फेरफटका मारण्यास निघाले, रात्रभर संपूर्ण नगरात भ्रमण करता करता कधी सकाळ झाली ते कळलेच नाही. रात्रभर फिरून दोघेही खूप थकले होते. कोठेतरी विश्रांती घेण्यासाठी ठिकाण बघत होते. तेवढ्यात एका साधूचा आश्रम त्यांच्या नजरेस पडला. थोडावेळ विश्रांती घेण्यासाठी ते आश्रमातील अंगणात असणाऱ्या एका मोठ्या झाडाखाली बसले. काही काळ विश्रांती घेतल्यावर अचानक बिरबलाचे लक्ष साधूच्या घरासमोरील तुळशी वृन्दावनाकडे गेले. ते पाहताच बिरबल झटकन उठला व तुळशी वृन्दावनाकडे गेला.तिथे जावून त्याने तुळशीला नमस्कार केला व प्रदक्षिणा घातल्या. हे अकबर बादशाहाने पाहिले आणि त्याला बिरबलाची चेष्टा करण्याची इच्छा झाली. अकबराने विचारले,"बिरबल! या छोट्याशा रोपट्याला तू नमस्कार काय करतो? त्याला प्रदक्षिणा काय घालतो? काहीतरीच तुझे असते बघ" बिरबल म्हणाला,"महाराज धर्मात तुळशीच्या रोपट्याला मातेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे आम्ही तिला नमस्कार करतो, प्रदक्षिणा करतो. आमच्या श्रीविष्णू देवाला हि प्रिय आहे. म्हणून ती आम्हाला पूज्य आहे. तुम्हीसुद्धा जर सर्वधर्मसमभाव मानत असाल तर तुम्ही पण तुळशीला वंदन करावे अशी माझी इच्छा आहे." पण बादशहाच्या डोक्यात बिरबलाची अजून कशी चेष्टा करता येईल याचा विचार चालू असल्याने त्याने बिरबलाच्या बोलण्याकडे कमी लक्ष दिले व अकबराने उठून चालायला सुरुवात केली. आपल्या छोट्याशा मागण्यासुद्धा बादशहा पूर्ण करत नाही याचे बिरबलाला वाईट वाटले.त्यामुळे बिरबल काहीच न बोलता बादशहाच्या मागे चालू लागला. बिरबल इतका शांतपणे चालताना पाहून बादशहाच्या मनात विचार आले कि याच्या धर्मावर, त्यातील परंपरावर अशी चेष्टा आपण करायला नको होती. म्हणून त्याने इतर विषय काढले पण बिरबल हुंकार भरत चालत होता.बिरबलाने विचार केला कि आता संधी मिळताच बादशाहाला धर्माच्या बाबतीत धडा शिकवायचा. पुढे जाताच अशी एक संधी त्याला लगेच चालून आली. बिरबलाला एक जंगली वनस्पतिचे एक मोठे झुडूप दिसले. बादशाहाला थांबायला सांगून त्याने तुळशीप्रमाणेच सगळे उपचार केले पण अजून एक नवीन गोष्ट केली.ती म्हणजे, त्या झुडपाला मिठी मारण्याचा व त्याची पाने अंगाला चोळण्याचा खोटा अभिनय त्याने केला. हे बादशाहाला कळले नाही. झुडपाला नमस्कार करणे, प्रदक्षिणा करणे, मिठी मारणे आणि त्याची पाने अंगाला चोळणे ह्या क्रिया बादशाहाला हसू आणत होत्या पण त्याने केले नाही. अकबर गप्प राहिलेला पाहून बिरबल म्हणाला,"तुळस हि जशी आमची माता तसे हे जंगली झुडूप म्हणजे आमच्या धर्मानुसार आमचे पिता समान आहेत." अकबर म्हणाला,"वा रे बिरबल! तुळशीला माता म्हणता आणि फक्त नमस्कार,जंगली झुडपाला मात्र आलिंगन देता." बिरबल म्हणाला,"महाराज आई हि देविस्वरूप मानली आहे. तर पित्याला देवत्व दिले आहे. देवाला भेटण्याचा आनंद तुम्हाला काय कळणार म्हणा? तुम्ही लांबूनच नुसत्या चौकशा करता आहात. भेटायचे असेल तर माझ्या पित्याला भेटा त्यांची पाने अंगावर चोळून घ्या." बादशाहाला वाटले कि आपण सारखेच जर याची चेष्टा करीत राहिलो तर हा दरबारात आपण सर्वधर्मसमभाव पाळत नसल्याचे सांगेल आणि आपली त्यामुळे नाचक्की होईल. त्यापेक्षा आपण त्याचे म्हणणे ऐकू." बिरबलाने जे केले तेच बादशाहने केले नमस्कार केला, प्रदक्षिणा केली आणि नको ते केले ते म्हणजे त्या जंगली वनस्पतीला मिठी मारून त्याची पाने अंगावर चोळली, बिरबलाने फक्त नाटक केले होते पण बादशाहने पाने अंगाला चोळताच त्याच्या अंगाला प्रचंड खाज सुटली, आग होऊ लागली. अकबर जोरात बिरबलाला ओरडला,"अरे असले कसले पित्यासमान झुडूप ! माझ्या अंगाची त्याने आग केली. तुला मात्र काहीच केले नाही." बिरबल म्हणाला,"महाराज तुम्ही तुळशी मातेला वंदन केले नाही याचा आमच्या पित्याला राग आलेला दिसतोय. म्हणून त्याने मला काही केले नाही पण तुम्हाला मात्र ते त्रास देत आहे." अकबर मनातून काय समजायचे ते समजला. बिरबलाने अकबराला सर्वधर्मसमभावतेची चांगली अद्दल घडवली.

तात्पर्य-कोणत्याच धर्माची, त्यातील परंपरेची नकळतही थट्टा करू नये. कोणी करत असेल तर त्याला ते न करण्यास सांगावे. सगळे धर्म हे देवाला सारखेच.!

२ टिप्पण्या:

  1. सगळे धर्म देवाला सारखे असतात हे जरी तुम्ही म्हणता म्हणून खरे मानले तरी मुस्लीम , ख्रिस्ती म्हणतात कि त्यांचाच धर्म श्रेष्ठ व तो न मानणारा नरकात जाईल . महमद म्हणतो कि गैर इस्लामी लोकांना तलवारीच्या धाकावर मुस्लीम बनवा नाहीतर त्यांना मारून टाका व त्यांच्या बायका पळवून आणा . खड्ड्यात जावो असला सर्व धर्म समभाव .

    उत्तर द्याहटवा
  2. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! वैभव जी !

    उत्तर द्याहटवा