गुरुवार, २ मे, २०१३

(कु-हाड आणि दांडा)

(कथा क्र ७०)


एकदा कु-हाड आणि लाकडाचा दांडा यांच्यामध्ये वादविवाद सुरु झाला. दोघेही स्वत:ला अतिशय शक्तिशाली असल्याचे सांगत होते लाकडाचा दांडा नंतर शांत झाला. मात्र कु-हाडीची बडबड मात्र अखंडपणे चालूच होती. कु-हाडीला प्रचंड अहंकार होता.ती रागाच्या भरात काय वाटेल ते बोलत सुटली होती,"अरे लाकडाच्या दांडक्या ! तू स्वत:ला काय समजतोस? तुझी शक्ती माझ्यापुढे पाणी भरते, मी ठरवले तर मोठमोठे वृक्ष मी सहज कापून काढते, तुझ्यासारख्या दांड्याने माझ्याशी वैर घेणे चांगले नाही. तू माझी बरोबरी करू नको." लाकडाचा दांडा कु-हाडीचे अहंकारी सुरातील बोलणे मन लावून ऐकत होता. काही काळ बडबड केल्यावर कु-हाड शांत झाली मग लाकडाचा दांडा बोलू लागला,"तू जे म्हणते आहेस ते सर्व खरे आहे. तू झाडे तोडू शकतेस, तुझी शक्ती माझ्यापेक्षा जास्त आहे. हे सगळे खरे आहे पण तू एका गोष्टीकडे लक्ष दिले नाहीस ते म्हणजे तू वरीलपैकी कोणतेच काम एकट्याने करू शकत नाहीस. तुला प्रत्येक गोष्टीत माझ्या सहकार्याची गरज हि लागतेच. तू कोणतेच काम एकटीच्या जीवावर कधीच करू शकणार नाही हे तुला माहित असतानासुद्धा तू नको त्या शक्तीचा गर्व बाळगून आहेस. तेंव्हा स्वत:ला यापासून वेळीच सावर अन्यथा तुला कुणी किंमत देणार नाही." कु-हाडीला तिची चूक समजली व तिने दांड्याची माफी मागितली.

तात्पर्य-सहकार्य भावना महत्वाची असते. अहंकारातून सहकार्य भावनेला जर तडा गेला तर काम करता येणे अशक्य आहे. परस्परसंबधी आदरभाव ठेवणे गरजेचे आहे.

वर्तमानपत्रातून संग्रहित 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा