रविवार, २६ मे, २०१३

(दानवीर कर्ण)

      (कथा क्र.८२)      

कुंतीचा जेष्ठ पुत्र अंगराज कर्ण प्रत्येक दिवशी सुवर्ण दान करत असे. त्यामुळे त्याची ख्याती दानवीर अशी झाली होती. महाभारताच्या युद्धात त्याला वीरगती प्राप्त होऊन जेंव्हा तो स्वर्गात गेला तेंव्हा त्याला तिथे आदराची वागणूक मिळाली, सत्कारपूर्वक वागविण्यात आले. देवराज इंद्राने त्याचे स्वागत केले. सुवर्णजडीत महालात त्याची राहण्याची व्यवस्था केली. त्या महालात सर्व वस्तू सोन्यापासून बनविलेल्या होत्या. हे पाहून राजा कर्णाला आपण जीवनभर केलेल्या सुवर्ण दानाचा गर्व झाला. काही वेळ सोन्याच्या पलंगावर विश्रांती घेतल्यावर कर्णाला तहान लागली. त्याने सेवकाला पाणी आणण्यास सांगितले. सेवकाने सोन्याच्या पेल्यात पातळ झालेले सोन्याचे पाणी आणून दिले. कर्णाला मनातल्या मनात खूप राग आला. परंतु तो काहीच न म्हणता तहानलेलाच झोपला. संध्याकाळी भोजनाच्या वेळी सेवक सोन्याच्या ताटात सोन्याची पोळी, सोन्याची भाजी घेवून आला तेंव्हा मात्र ते पाहून कर्ण संतापला. तो तातडीने देवराज इंद्राकडे गेला. त्याने त्रस्त होवून इंद्राकडे तक्रार केली कि इथे पाणी मागितले तर सोन्याचे आणि अन्न हि सोन्याचे असे का?. देवराज इंद्राने उत्तर दिले,"अंगराज! स्वर्गलोकामध्ये प्राणी त्या वस्तूंचा उपयोग करू शकतात ज्याने आपल्या जीवनकाळात कुणाला सुख संतोष दिला असेल. कारण कि आपण आपण अन्न व पाण्याचे दान न करता सदैव सोन्याचे दान केले त्यामुळे तेच आपल्याला इथे मिळेल" कर्णाला आपली चूक समजून आली. 'अन्न व पाण्याला मी विशेष महत्व दानामध्ये दिले त्यामुळे त्याचे दान करण्याचा मी विचारच नाही. आता तुम्ही मला जीवनभराच्या पुण्याच्या मोबदल्यात केवळ १६ दिवसांसाठी मला पृथ्वीलोकात पाठविण्यात यावे." अशी विनंती त्याने इंद्राकडे केली. इंद्रानेही त्याची ती विनंती मान्य केली. १६ दिवस कर्णाने पृथ्वीवर राहून अन्न,पाणी व वस्त्राचे दान केले आणि पुन्हा स्वर्गात आला. आता स्वर्गात त्याला कोणतेही कष्ट नव्हते.

तात्पर्य-अन्न,पाणी,वस्त्र या मुलभूत गरजा आहेत. ज्यांना त्याची गरज आहे अशा लोकांना ते दान केल्याने आपल्याला समाधान मिळते. सुखापेक्षा संतोष मोठा असतो आणि धनापेक्षा मोठी शक्ती असते.

वर्तमानपत्रातून संग्रहित 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा