सोमवार, १० जून, २०१३

(कृती)

(कथा क्र.९१)
 
एका गावात एक गरीब माणूस राहत होता शिक्षण नाही त्यामुळे कोणते चांगले कामही मिळत नव्हते, तो भिक्षा मागून आपले पोट भरत होता. एके दिवशी त्याला भिक्षेच्या रुपात तांदूळ मिळाले, तांदूळ त्याला फार दिवसांनी मिळाले होते. तो फार आनंदी होता. दुसऱ्या एका घरातून त्याला भाकरी आणि भाजी मिळाली. त्याने ती भाजीभाकरी खाल्ली आणि तांदूळ एका मडक्यात भरून भिंतीला असलेल्या खुंटीला अडकवून ठेवले. तो खाटेवर पडून आराम करू लागला.मडक्याला पाहून तो विचार करू लागला, त्यात आज तांदूळ आहेत. उद्याही तांदूळ मिळाले तर मडके अर्धे भरून जाईल, आणि असे जर तांदूळ मिळताच राहिले तर काही दिवसातच मडके तांदळाने भरून जाईल.मग आपण तांदळासाठी अशी ४-५ मडकी करू. २-३ महिन्यानंतर एक लहान पोतेभर तांदूळ जमा झाले कि ते तांदूळ आपण विकून टाकू. त्यातून पैसा मिळेल मग आपण अजून तांदूळ खरेदी करू ते जास्त भावाने विकू त्यात पैसा मिळेल असे करता करता आपल्याला भरपूर पैसा मिळू लागेल. पैसा जमा झाला कि आपण लग्न करू, मग मुले होतील, ती सुंदर आणि खोडकर असतील. मुलांना मी चांगले संस्कार करेन, त्यांनी जर ऐकले नाही तर तर त्यांना लाथ मारेन, असे विचार करत असताना त्याने खरोखरीच एक लाथ हवेत मारली आणि त्याच्या दुर्दैवाने ती लाथ तांदळाच्या मडक्याला बसली. त्याबरोबर ते मडके लाथेने हवेत भिरकावले गेले आणि मडके खाली पडून फुटले. त्यातील सगळे तांदूळ घरात साचलेल्या घाणेरड्या जागेत पडले. त्यासोबतच त्याचे स्वप्न भंग पावले.

तात्पर्य-कृती महत्वाची आहे. कृती आणि विचार यात जर साम्य नसेल तर हानी होते. जे विचारात आहे तेच कृतीत असायला हवे. 

वर्तमानपत्रातून संग्रहित 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा