रविवार, २ जून, २०१३

(ईश्वरचंद्र विद्यासागर )

(कथा क्र. ८७) 


पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या अंतकरणात प्रत्येक प्राणीमात्राबद्दल असलेली करुणा पाहून लोक त्यांना 'विद्यासागर' च्या ऐवजी करुणा सागर असे म्हणत असत. असहाय्य प्राणीमात्रावर त्यांची करुणा आणि कर्तव्यपरायणता बघण्यासारखी होती. त्यांच्या आयुष्यात ते कोलकत्ताच्या जवळ असणाऱ्या एका छोट्याशा भागात प्राध्यापक पदावर नियुक्त होते. एके दिवशी संध्याकाळी पावसाने सुरुवात केली. पाऊस पडायला लागला तसे वातावरणही थंड होवू लागले. ईश्वरचंद्र विद्यासागर हे आपल्या कामात व्यस्त होते. ते त्यांच्या अभ्यासात मग्न असतानाच अचानक त्यांच्या दारावर कोणीतरी थाप टाकली. पंडितजी उठले व दरवाजा उघडला तर एक अनोळखी माणूस दारात भिजलेला त्यांनी पाहिला. त्यांनी त्या माणसाला घरात घेतले. अंग पुसण्यासाठी कपडे व आपले स्वतःचे नवीन कपडे त्याला घालण्यासाठी दिले. तो अनोळखी पाहुणा या अचानक झालेल्या स्वागताने अचंबित झाला आणि त्याचा त्या प्रेमाने कंठ दाटून आला. तो पाहुणा म्हणाला," मी या भागात नवीन आहे. मी माझ्या मित्राकडे पाहुणा म्हणून आलो होतो पण त्याच्या घरापाशी गेलो तर तिथे चौकशी केल्यावर मला समजले कि तो गावाला गेला आहे. आता या पावसाच्या रात्री मी खूप जणांकडे आसरा मागितला पण कुणीच मला आसरा दिला नाही. सगळ्यांनी मला हाकलून दिले. तुम्ही पहिली अशी व्यक्ती आहात ज्यांनी मला आसरा दिला आणि मला इतके आदरातिथ्य केले. यावर ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणाले,"अरे मित्र! तुम्ही तर माझे अतिथी आहात. आणि आपल्या शास्त्रात तर अतिथीला देव मानले आहे. मी तर फक्त माझे कर्तव्य केले आहे." हे म्हणत असतानाच त्यांनी त्याच्यासाठी गरम कपडे, अन्न आणि झोपायची व्यवस्था करायला सुरुवात केली. पाहुण्याने गरम जेवण केले व झोपी गेला. सकाळी जेंव्हा तो परत निघाला तेंव्हा ईश्वरचंद्र विद्यासागर त्याला म्हणाले," अतिथी देवा ! झोप कशी झाली?" त्यावेळी त्या पाहुण्याने त्यांना मनोमन नमस्कार करत तो म्हणाला," खरे देव तर तुम्ही आहात, ज्याने संकटकाळात माझ्यासारख्या अनोळखी माणसाला घरात घेवून त्याचे एखाद्या जवळच्या माणसाप्रमाणे बडदास्त ठेवली. अशी देवमाणसे आज दुर्मिळ होत चालली आहेत. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी हे तुमच्यासोबत घालविलेले क्षण कधीच विसरणार नाही." 

तात्पर्य- आपल्या हातून एखाद्या प्राणिमात्राला जर काही मदत करता येत असेल तर ते करणे आपले कर्तव्य ठरते.

इंटरनेटवरून संग्रहित 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा