सोमवार, २४ जून, २०१३

(हे ही दिवस जातील)

कथा क्र. ९९ 

एकदा एक राजा आपल्‍या महालात बसला होता. तेवढ्यात त्‍याला प्रधान येताना दिसला. प्रधान राजाजवळ आला, त्‍याने राजाला प्रणाम केला व राज्‍याच्‍या कारभाराविषयी दोघेही चर्चा करू लागले. थोड्यावेळाने एक द्वारपाल तेथे आला व म्‍हणाला,’’महाराज, द्वारावर एक संन्‍याशी आला आहे व तो आपल्‍या भेटीची वेळमागत आहे.’’ राजा संत, महात्‍मे, फकीर यांची कदर करणारा होता. राजाने द्वारपालाला संन्‍याशीमहाराजांना घेवून येण्‍यास सांगितले. द्वारपाल संन्‍याशी महात्‍म्‍याला घेऊन राजाकडे आला. महात्‍मा येताच राजाने स्‍वत: उठून त्‍यांना नमस्‍कार केला. आस्‍थेने विचारपूस केली. त्‍यांचा यथायोग्‍य सत्‍कार केला व त्‍यांना उपदेश करण्‍याविषयी सांगितले. संन्‍याशी महाराज म्‍हणाले,’’राजन, तुम्‍ही तुमचे राज्‍य अतिशय उत्तम पद्धतीने चालवित आहात, सर्व प्रजा सुस्थितीत आहे, सुखी आहे, कोणाचे कोणाशी भांडणतंटा नाही, सर्वधर्माचे लोक आनंदाने राहत आहेत, अन्नधान्‍य, पशूपक्षी सगळयात बरकत आहे. हे पाहून मला आनंद वाटतो’’ राजा म्‍हणाला,’’ महाराज ही स्‍तुती माझी एकटयाची नसून माझ्या सर्व सहका-यांची पण आहे. महाराज, ही स्‍तुती बाजूला ठेवून आपण मला भविष्‍यकाळासाठी काही उपदेश करावा अशी विनंती आहे.’’ संन्‍याशी महाराज म्‍हणाले,’’राजा, सदासर्वकाळ एकच परिस्थिती राहत नसते, त्‍यामुळे तुला फक्त एकच वाक्याचा मी उपदेश करतो. तो म्‍हणजे ‘’ हे ही दिवस जातील’’ एवढेच तु लक्षात ठेव’’ एवढे बोलून ते तेथून निघून गेले. राजा विचारात पडला, प्रधानाने हे पाहिले व तो म्‍हणाला,’’ महाराज, अहो संन्‍याशीमहाराजांनी केलेला उपदेश आपण फक्त लक्षात ठेवा म्‍हणजे झाले.’’ पण राजाची तगमग काही थांबेना, कारण एवढी सुबत्ता, समृद्धी असताना संन्‍याशाने आपल्‍याला हे ही दिवस जातील असे का म्‍हटले याचा त्‍याला उलगडा होईना. राजा रात्रंदिवस याच विचारात गढून गेला. काही दिवसातच दुस-या राजाने या राजाच्‍या राज्‍यावर स्‍वारी केली. राजा युद्धाच्‍या तयारीत कमी पडल्‍याने व परक्या राजाचे सैन्‍य आक्रमणावर आक्रमणे करीत राहिल्‍याने हा राजा हरला व त्‍याला बंदीवान करून त्‍या राजापुढे नेण्‍यात आले. तेथील राजाने या राजाला कारागृहात टाकले. कारागृहात अंधार कोठडीत कोणीच नसे. राजा एकटा निराश, हताश बसून राहत असे व आपल्‍या पूर्वीचे वैभव आठवित असे. त्‍यातच त्‍याला एक दिवशी संन्‍यासी बाबाबरोबर झालेली भेट आठविली व उपदेशही. झाले, त्‍या उपदेशाने राजाला आशा दाखविली, हे ही दिवस जातील, राजा निराशेकडून आशेकडे वळला आणि त्‍या दिवसापासून तो आनंदी राहू लागला. कारागृहाच्‍या सैनिकांना याचे कारण कळेना की कारागृहात कैदी म्‍हणून राहणारा राजा आनंदी कसा काय राहतो, त्‍यांनी त्‍यांच्‍या राजाला कळविले, तो राजाही विचारात पडला हे कसे काय साध्‍य झाले. त्‍याने या राजाला विचारले असता या राजाने संन्‍याशी महाराजांशी झालेली भेट व ‘हे ही दिवस जातील हा उपदेश सांगितला. त्‍याने हा उपदेश ऐकताच त्‍याला ही जाणीव झाली की आपणही एक राजा आहोत व आपल्‍यावरही ही वेळ येऊ शकते. हे जाणून त्‍याने राजाची मुक्तता केली, तसेच त्‍याचे राज्‍य त्‍याला परत दिले व मोठ्या सन्‍मानाने त्‍याला परत पाठविले.


तात्‍पर्य- विचारांमध्‍ये ताकद असते, एखादा विचार मानवाचे आयुष्‍य बदलून टाकू शकतो. 


माहित असलेली कथा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा