शनिवार, ८ जून, २०१३

(इ-मेल)

  (कथा क्र ९० )   

एका तरुणाने शिक्षण पूर्ण झाल्यावर अनेक ठिकाणी अर्ज दाखल केले. काही ठिकाणी बोलावण्यात येवून नकार मिळाला तर काही ठिकाणी नुसताच नकार!. असेच एकदा त्याला एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्युसाठी बोलावण्यात आले. नेहमीप्रमाणे हा तरुण मुलाखतीस गेला, मुलाखत घेणाऱ्याने त्याला प्रश्न विचारले याने त्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिली, आता याची निवड पक्की असे वाटत असतानाच कंपनीच्या प्रमुखाने त्याला सांगितले,"तुम्हाला आमच्या कंपनीत घेण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत. तुम्ही बाहेर जा आणि तुमचा इ-मेल आयडी द्या. आम्ही तुम्हाला मेल करू." तरुणाने काही सेकंद विचार केला आणि उत्तर दिले,"साहेब! मी तुम्हाला इ-मेल आयडी देवू शकत नाही कारण माझ्याकडे कॉम्प्युटर नाही त्यामुळे माझा इ-मेल आयडी पण नाही." प्रमुख म्हणाले,"अरे आजकालच्या या तंत्रज्ञानाच्या युगात तुमच्याकडे इ-मेल आयडी नाही म्हणजे तुम्ही नोकरीला लायक नाही. आमची कंपनी फक्त इ-मेल आयडी धारकांना नोकरी देते." तो तरुण तिथे काही उलटे उत्तर न देताच बाहेर पडला. त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरु झाले. खिशात फक्त १० रुपये होते, पोटात भूक होती, हातात काही काम नव्हते, चल मंडईत जावू आणि काही भाजी घेवू असा विचार करून तो मंडईत गेला. तिथे त्याने १० रुपयाचे बटाटे विकत घेतले आणि त्याच्या मनात काय आले कुणास ठाऊक पण ते विकायला तो तिथेच बसला.त्याच्या अंगी विक्रीची कला होती. काही वेळातच त्याने बोलून १० रुपयाचे २० रुपये मिळवले. सगळे बटाटे संपविले. मग त्याच्या लक्षात आले कि अरे आपण व्यापार करू शकतो. त्याने त्या २० रुपयाचे दुसऱ्या दिवशी अजून दुप्पट केले आणि भाजी घरोघर जावून विकू लागला. असे करता करता त्याने एक दुकान, एक ट्रक खरेदी केले व खूप श्रीमंत झाला. ५ वर्षात तो त्या गावातील मोठा श्रीमंत व्यक्तींमध्ये गणला जावू लागला. त्याचे लग्न झाले, मुलेबाळे झाली. आता त्यांच्या भविष्याची चिंता त्याला सतावू लागली. त्यासाठी त्याने एका पॉलीसी एजंटला बोलावले. तो एजंटही मोठी पॉलीसी मिळणार म्हणून आनंदाने आला. फॉर्म भरताना एके ठिकाणी एजंटाने त्याला त्याचा इ-मेल आयडी विचारला आणि तो व्यापारी मोठ्याने हसू लागला.एजंटला काहीच कळेना, तो म्हणाला ,"तुमच्याजवळ इ-मेल आयडी नाही का? तुमच्यासारख्या गावातील मोठ्या माणसाकडे इ-मेल आयडी नाही हि मोठी मजेची गोष्ट आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का कि इ-मेल आयडी नसतानासुद्धा तुम्ही इतके श्रीमंत आहात आणि जर का तुमच्याकडे इ-मेल आयडी असता तर?" तो व्यापारी (तरुण) उत्तरला," जर माझ्याकडे इ-मेल आयडी असता तर.................................................मी एका कंपनीचा कारकून राहिलो असतो. इतका श्रीमंत कधीच होवू शकलो नसतो."

तात्पर्य-आत्मविश्वासाने कोणतीही गोष्ट केल्यास आपले कुठल्याच गोष्टीत अडत नाही. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा