मराठीत ऐकलेल्या, वाचलेल्या काही निवडक बोधकथांचा एक संग्रह.
शुक्रवार, २१ जून, २०१३
(चांगला श्रोता)
(कथा क्र.९७)
मैथिलीशरण गुप्त आधुनिक हिंदीच्या महान कवींपैकी एक होते. त्यांच्या रचना अमर असून त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले होते. एवढ्या मोठ्या यशानंतर ही गुप्त अत्यंत नम्र होते. ते आपल्यापासून लहान व नवोदित साहित्यिकांना मान देत असत. त्यांचा उत्साह वाढवीत असत. एक वेळची गोष्ट आहे. पाटणा महाविद्यालयाच्या प्रांगणात एक कविसंमेलन आयोजित केले होते. मैथिलीशरण गुप्त यांनाही या संमेलनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. देशातील अनेक विद्वान आणि कवि या समेलनाला उपस्थित होते. मंचावर काव्यवाचन सुरू होते आणि महाविद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी याचा आनंद घेत होते. अनेक कवींचे कविता वाचन झाल्यावर एका नवीन कवीला मंचावर बोलविण्यात आले. त्याने कविता वाचन सुरू केले. विद्यार्थी आरडाओरडा करून त्याला विरोध करत होते. हे पाहून मैथिलीशरण गुप्त उठले आणि विद्यार्थ्यांना संबोधित करत म्हणाले,"आपण सर्वांनी अनेक वर्षे इंग्रजांची गुलामी सहन केली.आज आपण आपल्याच राष्ट्राच्या काव्यप्रतिभेची रचना आपण सहन करू शकत नाही का? चांगले ऐकणे हे आपल्या हातात आहे." हे ऐकताच सर्व विद्यार्थी शांत झाले. काव्यवाचन पुन्हा सुरू झाले.
तात्पर्य- इतरांचे ऐकणे सन्मानजनक आहे. परंतु अनेकदा श्रवणज्ञान, अनुभव, शिकवण हे प्रेरणेचे माध्यमहि बनते. तसेच चांगला श्रोता असणे हा एक गुण आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा