बुधवार, ३० ऑक्टोबर, २०१३
अनुकरण
कथा क्र.143
भगवान बुद्ध आपल्या सर्व शिष्यांवर फार प्रेम करत असत. एकदा त्यांचा वक्कली
नावाचा शिष्य आजारी पडला. काही दिवस इतर भिख्खूंनी त्याची देखभाल केली परंतु तो
ठीक झाला नाही. एक दिवस वक्कली आपल्या एका भिख्खू मित्राला म्हणाला,''भगवान बुद्धांचे दर्शन
करायचे आहे. त्यातून माझ्या मनाला शांतता लाभेल आणि मन सुखी होईल. तसेच शरीरालाही
ठीक व्हायला वेळ लागणार नाही.'' बुद्धांपर्यंत वक्कलीच्या अवस्थेचा आणि इच्छेचा संदेश पोहोचला, तेव्हा ते ताबडतोब त्याला
भेटायला आले. भगवान बुद्ध येत असताना दुरुनच वक्कलीने पाहिले आणि त्यांच्या सन्मानार्थ
तो पलंगावरून उठण्याचा प्रयत्न करू लागला. बुद्धांनी त्याला उठू न देता
प्रेमाने म्हटले,'' मला खाली बसण्यासाठी आसन आहे, तुम्ही उठण्याची गरज नाही.'' वक्कलीने गहिवरून म्हटले,''
मला तुमचे दर्शन करण्याची मोठी आस लागून राहिली होती. ती इच्छा आज पूर्ण
झाली.'' बुद्ध म्हणाले,''वक्कली, जशी वेगवेगळ्या अशुद्धीने
भरलेली तुझा देह आहे, तसाच माझाही देह अशुद्धीने भरलेलाच आहे. देहाकडे लक्ष देऊ नका, धर्माकडे लक्ष द्या. आपण
समाजासाठी काय करू शकतो याचा विचार करा'' बुद्धांनी यातून व्यक्तिपूजेपेक्षा सिद्धांताला महत्व
दिले आहे.
तात्पर्य-व्यक्तिपूजनात
केवळ व्यक्तिचेच महत्व वाढत जाते, विचारांचे नाही. व्यक्ति कितीही मोठी असली तरी तिचे आचार, विचारसरणी यांचे अनुकरण
व्हावयास हवे. व्यक्ती ही कालबद्ध असते, तिच्या मृत्युनंतरही विचार आचरणात आणणे हेच गरजेचे
आहे.
वर्तमानपत्रातून संग्रहित
दोन मित्र
कथा क्र.142
दोन मित्र होते. एक फारच धार्मिक वृत्तीचा होता. तो नेहमी देवपूजा, जप यात मग्न असायचा तर
दुसरा त्याचे विरूद्ध टोक होता. तो कधीच मंदिरात जात नसे, घरीही पूजाअर्चा करत नसे.
दान-पुण्यपाप यावर त्याचा विश्वास नव्हता. त्याने जीवनात अधिक पैसे मिळविण्याचे
ठरविले होते. तो रात्रंदिवस पैसे कमावण्यात गुंग झाला होता. भौतिक सुविधांनी त्याने
आपले जीवन संपन्न बनविले होते. पण त्याच्या जीवनात
सुख व संतोष हे नावाला सुद्धा नव्हते. याउलट आस्तिक मित्र आपल्या गरीबीतच सुखी,समाधानी होता. तो तुटपुंज्या साधनातच समाधानी राहत असे. नेहमी ईश्र्वरभक्तीत
रममाण होता. एके दिवशी नास्तिक मित्र त्याला भेटायला त्याच्या घरी आला व त्याचे
साधे घर पाहून तो म्हणाला,''तुझ्या त्यागाची जितकी प्रशंसा करावी तितकी कमीच आहे. तू तर ईश्र्वरभक्तीमध्ये
सा-या जगाला सोडून दिलेस मात्र तरीही खुश आहेस'' हे ऐकून आस्तिक मित्र म्हणाला,''मित्रा, मी आपल्या गरीबीत फार
आनंदी आहे, पण तुझा त्याग तर
माझ्यापेक्षाही मोठा आहे कारण तू तर पैशासाठी, सुखसोयीसाठी ईश्र्वरालाच त्यागले आहेस, तूच सांग तू खुश आहेस ना'' आपल्या मित्राचे हे
बोलणे नास्तिक मित्राच्या जिव्हारी लागले. त्याने विचार केला की आपण हे सर्व धन
मिळवतो पण आपल्याला सुख का लागत नाहीये, समाधान का मिळत नाही. पण गरीब असणारा आस्तिक मित्र
मात्र सुखात आहे, आनंदात आहे याचे कारण त्याला कळाले. त्या दिवसापासून त्याच्या जीवनाची
दिशाच बदलून गेली.
तात्पर्य- जीवनात अनेक
गोष्टी अनुकुल प्रतिकुल बनविणारी कोणीतरी सत्ता ही मानवाला मानावीच लागते. त्याची
आठवणसुद्धा काहीवेळा मनाला सूचक अशा सूचना देऊन आपले वर्तन बदलण्यास मदत करते.
__________________
वर्तमानपत्रातून संग्रहित
सोमवार, २८ ऑक्टोबर, २०१३
सुभाषचंद्र बोस
कथा क्र.141
कटकमध्ये जानकीनाथ बोस हे एक वकील होते. एका रात्री ते, त्यांची पत्नी व मुलगा
सुभाष आपल्या घरात झोपले असता काही वेळाने त्यांच्या पत्नीला जाग आली व तिने
पाहिले आपला मुलगा सुभाष जमिनीवर झोपला आहे. त्याला थंडी वाजेल अशी तिला भिती
वाटू लागली. पत्नीने मुलाला जागे केले व विचारले,'' बेटा सुभाष, तुला असे जमिनीवर का झोपावेसे वाटले'' सुभाषने उत्तर दिले,''आई, आपले पूर्वज असणारे
साधु-संत,महात्मे, ऋषीमुनी हे सारेच जमिनीवर
झोपत असत म्हणून मी ही जमिनीवर झोपणार आहे.'' आई म्हणाली,'' बेटा, ते महान होते आणि वयानेही मोठे होते. तुझे वय जमिनीची कठोरता सहन करणार नाही
तू बाजेवर येऊन झोप.'' आई आणि मुलाच्या या चर्चेने जानकीनाथ बोस जागे झाले आणि त्यांनीही सुभाषला
विचारले,'' सुभाष तुला जमिनीवर
झोपायला कुणी शिकविले.'' सुभाष म्हणाला,''बाबा, गुरुजी सांगत होते
साधु-संत,महात्मे, ऋषीमुनी हे सारेच
महापुरुष होते. तसेच ते जमिनीवर झोपत असत म्हणून मी ही जमिनीवर झोपणार आहे. मला
महापुरुष व्हायचे आहे.'' जानकीनाथ बोस यांनी सुभाषला समजावले की,'' बेटा, जमिनीवर झोपून कुणी महान होत नसते तर कठोर तप, साधना आणि पीडीत मानवतेच्या सेवेतून व्यक्ती महान
होते. आचरणात शुद्धता ठेवली तर मनुष्य महान होतो.'' सुभाषला वडीलांचे म्हणणे पटले व त्याने त्याचप्रमाणे
वर्तन ठेवले व एक महान क्रांतीकारी हिंदूस्थानला मिळाला त्याचे नाव सुभाषचंद्र
बोस. राष्ट्रासाठी संपूर्ण जीवन व्यतीत करून, समर्पण कसे असावे याचा संदेश देणारे जीवन त्यांनी
जगले व वडीलांची शिकवण आचरणात आणली.
तात्पर्य- त्याग आणि
समर्पणातूनच देशहित जपले जात असते.
कटकमध्ये जानकीनाथ बोस हे एक वकील होते. एका रात्री ते, त्यांची पत्नी व मुलगा सुभाष आपल्या घरात झोपले असता काही वेळाने त्यांच्या पत्नीला जाग आली व तिने पाहिले आपला मुलगा सुभाष जमिनीवर झोपला आहे. त्याला थंडी वाजेल अशी तिला भिती वाटू लागली. पत्नीने मुलाला जागे केले व विचारले,'' बेटा सुभाष, तुला असे जमिनीवर का झोपावेसे वाटले'' सुभाषने उत्तर दिले,''आई, आपले पूर्वज असणारे साधु-संत,महात्मे, ऋषीमुनी हे सारेच जमिनीवर झोपत असत म्हणून मी ही जमिनीवर झोपणार आहे.'' आई म्हणाली,'' बेटा, ते महान होते आणि वयानेही मोठे होते. तुझे वय जमिनीची कठोरता सहन करणार नाही तू बाजेवर येऊन झोप.'' आई आणि मुलाच्या या चर्चेने जानकीनाथ बोस जागे झाले आणि त्यांनीही सुभाषला विचारले,'' सुभाष तुला जमिनीवर झोपायला कुणी शिकविले.'' सुभाष म्हणाला,''बाबा, गुरुजी सांगत होते साधु-संत,महात्मे, ऋषीमुनी हे सारेच महापुरुष होते. तसेच ते जमिनीवर झोपत असत म्हणून मी ही जमिनीवर झोपणार आहे. मला महापुरुष व्हायचे आहे.'' जानकीनाथ बोस यांनी सुभाषला समजावले की,'' बेटा, जमिनीवर झोपून कुणी महान होत नसते तर कठोर तप, साधना आणि पीडीत मानवतेच्या सेवेतून व्यक्ती महान होते. आचरणात शुद्धता ठेवली तर मनुष्य महान होतो.'' सुभाषला वडीलांचे म्हणणे पटले व त्याने त्याचप्रमाणे वर्तन ठेवले व एक महान क्रांतीकारी हिंदूस्थानला मिळाला त्याचे नाव सुभाषचंद्र बोस. राष्ट्रासाठी संपूर्ण जीवन व्यतीत करून, समर्पण कसे असावे याचा संदेश देणारे जीवन त्यांनी जगले व वडीलांची शिकवण आचरणात आणली.
बुधवार, २३ ऑक्टोबर, २०१३
स्वामी अखिलानंद
कथा क्र.140
स्वामी अखिलानंद हरिद्वारमध्ये गंगेकाठी आश्रमात रोज रामायणावर प्रवचन देत
असत. एकेदिवशी ते शिष्यांसोबत गंगेकाठी चालत होते. तेव्हा त्यांना आश्रमाच्या
शेजारी असलेल्या झाडांवर दोन माणसे बसलेली दिसली. शिष्यांना विचारल्यावर शिष्य
म्हणाले, ते दोघे ग्रामीण भक्त
असून ते कथा ऐकायला येत असल्याचे सांगितले. त्यांचे फाटलेले कपडे पाहून स्वामीजी विचार करू लागले, ह्या अडाणी लोकांना काय रामायणाचे अन भक्तीचे मर्म समजणार? प्रसादाच्या आशेने येत
असतील दोघे दुसरे काय? त्यांनी त्या दोघांना बोलावले आणि रामभक्तीचे महत्व विचारले, दोघेही अडाणी आणि अचानक
बोलावणे आल्याने भांबावले, त्यामुळे ते दोघेही एक शब्द स्वामीजींपुढे बोलूच शकले नाही. स्वामीजी
रागवत म्हणाले, तुम्हाला रामायण कळत नसेल तर येत जाऊ नका, उगाच गर्दी वाढवू नका, रामायण संपल्यावर या तुम्हाला प्रसाद द्यायची व्यवस्था
मी करतो.'' दोघेही बिचारे
मान-अपमानाची पर्वा न करता स्वामीजींना नमस्कार करून निघून गेले. दुसरे दिवशी
मात्र स्वामीजींना खरी भक्ती काय असते हे पुरेपुर समजले, कारण रात्रभर मुसळधार
पाऊस पडला आणि नदी भरून वाहू लागली, यायला वाटही नाही, स्वामींच्या आश्रमातही पाय ठेवायला जागा उरली नाही
इतके पाणी झाले. रामायण कथन करण्यासाठी स्वामीजी आले पण समोर कुणीच श्रोता नाही
इतक्यात स्वामीजींचे लक्ष समोरच्या झाडाकडे गेले तर कालचेच दोघे ग्रामीण भक्त
त्यांच्या रोजच्या जागेवर झाडावर भिजलेल्या अवस्थेत रामायण ऐकण्यासाठी येऊन
बसलेले दिसले. स्वामीजींना राहवले नाही व त्यांनी त्या दोघांच्या समोर लोटांगण
घातले व त्यांच्या रामभक्तीला नमस्कार केला.
तात्पर्य -कुणालाही कमी
समजू नये. कोण कुठल्या अधिकाराचा असेल ते सांगता येत नाही.
__________________
वर्तमानपत्रातून संग्रहित
संतुलन
कथा क्र.139
गौतम बुद्धाकडून राजकुमार श्रोणने दीक्षा घेतली होती. एकेदिवशी बुद्धांच्या
अन्य शिष्यांनी श्रोणची तक्रार करत म्हणाले की ''श्रोण तपाच्या उच्च सीमेपर्यंत पोहोचला आहे पण चिंता वाटते की सारे भिक्षू
दिवसातून एकदाच भोजन करतात पण श्रोण मात्र दोन दिवसातून एकदा भोजन करतो आहे.
अन्नपाणी ग्रहण न केल्यामुळे तो फारच अशक्त झाला आहे. हाडांचा सापळा दिसायला
लागला आहे.'' हे ऐकून बुद्धांनी श्रोणला बोलावले आणि म्हणाले,'' श्रोण, तू पूर्वी सितार चांगले वाजवित होता हे
खरे काय? आता वाजवून दाखवू का?'' श्रोण म्हणाला,''होय मी आपल्याला सितार वाजवून दाखवू
शकतो. परंतु आपण आता सितार का ऐकू इच्छित आहेत हे मला समजले नाही?'' बुद्ध म्हणाले,'' मी असे ऐकलंय की, सितारच्या जर तारा ढिल्या झाल्या असतील तर ते नीट वाजत नाही.किंवा जास्त
घट्ट झाल्या तरी त्यातून चांगले संगीत निर्माण होत नाही.'' श्रोण म्हणाला,'' होय ते खरे आहे तारा ढिल्या झाल्या तर
सूर बिघडणार आणि तारा घट्ट झाल्या तर तारा तुटणार तेव्हा तारा मध्यम असाव्यात'' बुद्ध म्हणाले,'' सितारप्रमाणेच मानवाचे जीवन आहे, तप करावे पण अन्नही योग्य प्रमाणात भक्षण करावे. भोग अति घेणे वाईट आहे.''
तात्पर्य-'अति सर्वत्रं वर्जयेत' जीवनात नियम आणि तप आवश्यक आहे पण एका
विशिष्ट संतुलनाने. कारण अति तेथे माती हा नियम सगळीकडेच लागू होतो.
__________________
वर्तमानपत्रातून संग्रहित
______________
गेलेला ऋतूच बरा
कथा क्र.138
हिवाळ्याचे दिवस होते. एक गाढव थंडीने कुडकुडत होते व खायला शिळे गवत मिळत
होतं तेव्हा त्याला वाटले, उन्हाळ्याचेच दिवस बरे
होते. आपल्याला उन्हाळा आवडत नव्हता पण या हिवाळ्यापेक्षा तेच दिवस बरे होते.
हवाही उबदार होती व गवतही ताजे मिळत होते. गाढवाच्या मनात असे विचार आले, त्याच दिवशी त्याच्या मालकाने त्याला गोठ्यात बांधले व ताजे गवत खायला घातले.
असे बरेच दिवस त्याला जागेवरच ताजे गवत मिळू लागले, त्या बदल्यात मालक त्याच्याकडूनच बरेच काम करून घेई. आता हिवाळ्याचाही त्याला
कंटाळा आला व तो पावसाळा येण्याची वाट पाहू लागला. लवकरच पावसाळा तोंडावर आला.
मृगाचा पहिला पाऊस पडला आणि त्याचा मालक चार महिने शेतीची कष्टाची कामे गाढवाकडून
करून घेऊ लागला. तेव्हा त्या गाढवाला वाटले, हिवाळाच बरा होता, म्हणजे येणाऱ्या ऋतुपेक्षा गेलेलाच ऋतू
बरा असे त्याला वाटू लागले.
तात्पर्य : कुठलेही कसेही
दिवस आले तरी अतृप्त मनाच्या माणसांचे कधीही समाधान होत नाही.
.................................................................................
वर्तमानपत्रातून संग्रहित
........................................................................
(पद्माने फेडले कर्ज)
कथा क्र.137
पद्माचा जन्म सामान्य राजपूत घरात झाला होता, जेव्हा ती अडीच वर्षाची होती तेव्हा तिच्या आईवडीलांचा मृत्यू झाला होता.
मात्र पद्माचा भाऊ जोरावरसिंह सोळा वर्षाचा होता. वडीलांना कमाविलेल्या धनातून
पद्माचे पालनपोषण करत असे. त्याने पद्माला घोड्यावर बसणे, तलवार चालविणे, बाण चालविणे याचे प्रशिक्षण
दिले होते. पद्मा नेहमीच सैनिकांचे कपडे घालत असे.
जोरावरसिंह याच्याजवळील वडीलांनी मिळविलेले धन संपले तेव्हा त्याने काम शोधण्याचा
प्रयत्न केला पण त्याला काम मिळाले नाही. खर्च चालविण्यासाठी त्याने
सावकाराकडून पैसे उसने घेतले व वायदा केला की काम मिळताच पैसे परत करीन पण त्याला
काम मिळत नाही हे पाहून सावकाराने जोरावरसिंहाला कैद केले. अशा परिस्थितीत पद्मा
एकटी पडली. पण तिने न डगमगता धाडसाने राजपूत सैनिकीरूपात आपले युद्धकौशल्य ग्वाल्हेरच्या
तत्कालिन महाराजांसमोर प्रदर्शित केले. प्रभावित होऊन राजांनी तिला सैनिकाची
नोकरी दिली. पद्माने युद्धात इतकी वीरता सिद्ध केली की तिला हवालदार हे पद मिळाले
ती आपल्या वेतनातून सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी थोडे थोडे पैसे जमा करू लागली.
परंतु एके दिवशी सेनापतीने तिचे हे रहस्य जाणून घेतले आणि महाराजांना सांगितले.
महाराजांनी कारण विचारल्यानंतर तिने आपली कथा सांगितली हे ऐकून महाराजांनी
जोरावरसिंह याची सावकाराच्या कैदेतून सुटका केली व त्याला आपल्या सैन्यात भरती
केले व पद्माचा विवाह सैन्यातील एका वरिष्ठ अधिका-याशी करून दिला.
तात्पर्य-विपरीत
परिस्थितीतसुद्धा आपल्याला पूर्ण ताकदीने संघर्ष करता आला पाहिजे.
.......................................................................
वर्तमानपत्रातून संग्रहित
मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१३
(ज्ञानाचा दिवा तेवत ठेवा.)
कथा क्र.136
प्रसंग महाभारतातला आहे. द्रोण जेंव्हा गुरुकुलामध्ये वर्गात कौरव आणि
पांडवांना शिकविण्यासाठी तेंव्हा ते अत्यंत प्रसन्न होते. द्रोण स्वतः परम गुरु
होते. मात्र त्या एका दिव्य ज्ञानाचा अनुभव आला होता आणि तोच त्यांच्या सर्व
अस्तित्वातून अभिव्यक्त होत होता. वर्गात गुरुदेव आल्याबरोबर त्यांनी तोच अनुभव
विद्यार्थ्यांना सांगितला. त्यांनी सांगितले कि काळ रात्री एक अशी घटना घडली कि, अर्जुन आश्रमात भोजन करीत होता. बाकी विद्यार्थ्यांचे
भोजन आटोपले होते. रात्र बरीच झाली होती. अर्जुन एका दिव्याच्या भोजन करत होता.
अचानक हवेची झुळूक आली आणि दिवा विझला. मात्र त्यानंतरहि अर्जुन भोजन करत राहिला
अंधारातही त्याला भोजन करण्यास बाधा वाटली नाही. भोजन पूर्ण झाले आणि अर्जुन उठला
आणि धनुर्भ्यास करू लागला. गुरुनी पुढे सांगितले, बाणांचा आवाज ऐकून मी बाहेर आलो तेंव्हा अर्जुनाने मला
सांगितले कि भोजनादरम्यान मला अंधाराचे काही वाटले नाही तसेच बाण चालवितानाही मला
अंधाराचा अडसर आला नाही. बघा गुरुवर्य ! आपल्या कृपेमुळे मला अंधारातही बाण
लक्ष्यापर्यंत पोहोचविता येत आहेत. गुरुजी म्हणाले,"अर्जुनाचा हा प्रयत्न अनुकरणीय आहे. दिवा फक्त उजेडाचा
प्रसार करतो पण अंधारात मात्र ज्ञानाच्या दिव्याने, हृदयातील आत्मज्योतीने जर सराव केला तर कोणतेच काम
अशक्य नाही."
तात्पर्य- सरावानेच माणूस
लक्ष्य प्राप्त करू शकतो. एक विशिष्ट उंची गाठण्यासाठी, यश प्राप्तीसाठी
अंतरीच्या ज्ञान ज्योतीला जागृत करणे गरजेचे आहे.
==============
वर्तमानपत्रातून संग्रहित
==============
मातेचा उपदेश
कथा क्र.135
एका बाईला एक मुलगा व एक मुलगी होती. देवाने मुलाला रूप, तर मुलीला गुण दिले होते. आईचे दोन्ही मुलांवर खूप प्रेम होते. एकदा भाऊ
आरशासमोर उभा राहून गर्वाने आपल्या बहिणीला म्हणाला, "ताई गं मी बघ किती सुंदर, नाही तर तू!' भावाचे हे बोलणे बहिणीच्या मनाला लागले. ती आपल्या आईकडे गेली व भावाची तक्रार
केली. यावर आईने दोघांनाही जवळ बोलावले, प्रेमाने समजूत काढली. आई पहिल्यांदा मुलाला
म्हणाली, अरे बाळा, नुसते रूप काय कामाचे? नुसत्या रूपाला या जगात किंमत नाही.
तेव्हा तू जसा दिसायला सुंदर आहेस, तसा गुणानेही सुंदर हो' त्यानंतर आई आपल्या मुलीला म्हणाली, हे बघ बाळे, तू गुणी तर आहेसच. देवाने तुला रूप दिले नाही म्हणून वाईट वाटू नकोस. छान
नीटनेटकी रहा, सर्वांशी इतकी चांगली वाग की तुझ्या
रूपाकडे कुणाचेच लक्ष जाणार नाही.
तात्पर्य : जगात पुढे
जाण्यासाठी नुसते चांगले रूप असून चालत नाही, तर त्याला सद्गुणांची जोड द्यावी लागते.
==============
वर्तमानपत्रातून संग्रहित
==============
सोमवार, २१ ऑक्टोबर, २०१३
महाराजा सत्यशील
कथा क्र.134
विजयगडचा राजा सत्यशील याला आपल्या उत्तराधिका-याचा शोध होता. मंत्र्याशी
चर्चा केल्यावर त्याने म्हंटले,"आपले ४ पुत्र दयाशील, धर्मशील, कर्मशील आणि विवेकशील हे आहेत ना! मग आपण चिंता का करता?"
राजा म्हटले," आमच्या कुळात केवळ
योग्यतेनुसार राजा निवडला जातो." तेंव्हा मंत्र्याने त्याची योग्यता
पारखण्याचा आग्रह केला राजाला ती गोष्ट योग्य वाटली. त्याने आपल्या चारही मुलांना अशा गावात पाठविले जिथे लोक
दरोडेखोरांपासून त्रस्त होते. चौघेही तेथे गेले. विवेकशील सोडून इतर तिघेही
गावातील मुख्य व्यक्तीच्या घरी थांबले. दयाशील गावात फिरायला निघाला तेंव्हा
त्याने गावात दरोडेखोरांनी केलेली गावाची दुर्दशा पाहून त्याला दुःख झाले. त्याने
त्या मुख्य व्यक्तीला बोलावून एका घरात आश्रम बनविला व सर्व त्रस्त लोकांना
बोलावून त्यांची तेथे सेवा करू लागला. एके दिवशी दरोडेखोरांनी तो आश्रमही नष्ट
करून टाकला. तेंव्हा तेथील लोकांनी तेथून जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी
धैर्यशील याने त्या लोकांना धैर्याने थांबविले आणि तो आश्रम पुन्हा बांधला. एके
रात्री परत दरोडेखोर आले तेंव्हा कर्मशीलच्या नेतृत्वाखाली लोक दरोडेखोरांशी लढले
आणि दरोडेखोरांना पळवून लावले. त्या मुख्य व्यक्तीने आता हि शुभ वार्ता महाराजांना
कळवण्याचा राजकुमारांकडे आग्रह धरला पण विवेकशील याचा कुठेच पत्ता नव्हता.
तितक्यात विवेकशील तेथे आला आणि म्हणाला,"माझा उद्देश समस्येच्या मुळापर्यंत
जाण्याचा होता.दरोडेखोराच्या आईवडिलांची हत्या मुख्य व्यक्तीने केली होती त्याचा
बदला हे दरोडेखोर या गावाशी घेत होते. चूक त्यांची नाही तर मुख्य व्यक्तीची आहे.
त्याला आधी तुरुंगात टाका." राजाने तशीच कारवाई केली व विवेकशील यालाच वारस
नेमले.
तात्पर्य-विवेक सदगुणाच्या
उपयोगाचे ज्ञान देत आहे. ते अन्य गुणांपेक्षा श्रेष्ठ आहे.
==============
वर्तमानपत्रातून संग्रहित
==============
शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१३
(अन राजाचे डोळे उघडले)
कथा क्र.133
रामगडचा राजा अतिशय सणकी होता. एके रात्री त्याच्या डोक्यात अशी सनक शिरली. त्याने आपल्या दरबारातील मंत्र्याला बोलावून घेतले आणि सांगितले कि," आम्ही हे जाणून घेवू इच्छितो कि राज्यात कुणी प्रामाणिक व्यक्ती आहे कि नाही?" राजा आणि मंत्री रात्रभर आणि पूर्ण दिवस नगरात फिरत होते. शहराबाहेर त्यांना एक झोपडी दिसली, राजाने त्याच्याजवळील १०० सुवर्णमुद्रांची एक थैली त्या झोपडीत टाकली व ते दोघेजण राजवाड्याच्या दिशेने निघाले. राजाने वाटेल त्याची कल्पना मंत्र्याला सांगितली,"या झोपडीत राहणारा प्रामाणिक असेल तर तो सुवर्णमुद्रा परत करण्यासाठी आपल्याकडे परत येईल तेंव्हा आम्ही त्याला बक्षीस देवू आणि त्याने त्या परत केल्या नाहीत तर त्याला शिक्षा करू." ती झोपडी श्याम नावाच्या एका गरीब व्यक्तीची होती. त्याने राजाला आणि मंत्र्याला झोपडीकडे येताना पहिले होते. राजा सणकी आहे हे त्याला माहित होते. त्याने राजाला त्या मुद्रा परत केल्या आणि या मुद्रा माझ्या नाहीत त्यावर माझा अधिकार नाही म्हणून परत घ्या असे राजाला त्याने सांगितले. राजाने खुश होवून त्याला २०० सुवर्णमुद्रा भेट दिल्या. नंतर हाच क्रम चालू राहिला. दर पाचव्या दिवशी कुणीतरी सुवर्णमुद्रा घेवून दरबारात येत असे व राजा त्याला दुप्पट मुद्रा देत असे.मंत्र्याने याला विरोध केला कारण यातून तिजोरी खाली होत चालली होती. प्रामाणिकतेच्या नावाखाली चालू असलेला हा बनाव आहे हे मंत्र्याला समजत होते पण त्याचा नाईलाज होता.हे सगळे सहन न झाल्याने त्याने अखेर एक दिवस धाडस करून मंत्री राजाला घेवून श्यामच्या घरी गेला तर पाहतो काय? श्याम आणि भेटी मिळवणारा प्रत्येकजण तेथे हजर होता. झोपडी आता झोपडी राहिली नव्हती तर एक अलिशान वाडा झाला होता. सर्वजण ऐषारामात राहत होते. सर्व प्रकार राजाच्या लक्षात आला. त्याचे डोळे उघडले, त्याने श्यामला तुरुंगात टाकले व सुवर्णमुद्रा राजकोशात जमा करण्याचे आदेश दिले.
तात्पर्य-मदत करतानाही ती योग्य पद्धतीने योग्य माणसाला मिळते आहे कि नाही याचाही विचार व्हायला हवा.
==============
वर्तमानपत्रातून संग्रहित
==============
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)