रविवार, ३१ मार्च, २०१३

(बुद्धीच सर्वश्रेष्ठ)

(कथा क्र ५२)

दोन व्यक्ती आपसात भांडत होत्या. एकजण धनाला तर दुसरा बुद्धीला सर्वश्रेष्ठ म्हणत होता. काहीच मार्ग निघत नाही हे पाहून दोघेही देशाच्या राजाकडे गेले आणि न्याय मागू लागले. राजाही काही निर्णय घेवू शकला नाही. त्याने एक पत्र देवून त्या दोघांना रोमच्या सम्राटाकडे पाठविले. जेंव्हा दोघांनी ते पत्र रोमच्या सम्राटाला दिले तेंव्हा त्यातील गोम ओळखून त्याने त्या दोघाना फाशी देण्याची आज्ञा केली. हे ऐकताच दोघांनीही एकमत करण्याचे ठरविले. बुद्धीवानाने धनवानास म्हंटले,"तू समजतोस धन मोठे आहे तर धनाने आता आपल्या प्राणांची रक्षा कर बघू." धनवानाचे प्रयत्न कामी आले नाहीत. त्याने हार पत्करत बुद्धीवानास प्राण रक्षण करण्याची विनंती केली. बुद्धिवान म्हणाला फाशीवर चढताना आपण एकमेकास पुढे ढकलायचे, पुढील गोष्ट मी सांभाळून घेतो. त्याप्रमाणे त्यांनी केले. प्रथम फाशी जाण्यासाठी दोघे धक्काबुक्की करू लागले तेंव्हा रोमच्या सम्राटाने कारण विचारले. बुद्धीवान म्हणाला,"आमच्या राजाला ज्योतिष्याने सांगितले आहे, मी जेथे मरेन तेथे भयंकर दुष्काळ पडेल आणि माझा मित्र जेथे मरेल तेथे महामारी पसरेल. त्यामुळे मी मरण्याचा विचार करतो कारण लाखो लोक महामारीपासून बचावतील. आम्हाला फाशी तर आमच्या देशातही देता आली असती पण आमच्या राजाने देशावरचे संकट तुमच्या पदरात टाकले आहे. आता कुणाला फाशी देता ते सांगा?" त्या बरोबर रोमच्या सम्राटाने दोघांची सजा माफ केली. अशा प्रकारे बुद्धीवानाने धनवानाचा जीव स्वतः बरोबर वाचविला.

तात्पर्य-बुद्धी हि सर्वश्रेष्ठ आहे. 

वर्तमानपत्रातून संग्रहित 

शनिवार, ३० मार्च, २०१३

(विवेक आणि उपकार)


(कथा क्र.५१)




मुल्ला नसिरुद्दीन रात्री जंगलातून जात होते. अचानक गूढ आवाज त्यांच्या कानी पडला. हा भूताखेताचा प्रकार असावा असे वाटून ते घाबरले. त्यांनी हळूच मागे पाहिले तर गुहेत बसलेला एक मनुष्य त्यांना दिसला, मुल्लांनी विचारले ,"कोण आहेस तू?" तो म्हणाला," मी एक फकीर आहे. इथे बसून साधना करतोय." घाबरलेल्या मुल्लांनी रात्र गुहेत घालविण्यासाठी फकिराकडे परवानगी मागितली व ती त्यांनी दिली. थोड्या वेळाने मुल्लांनी फकिराकडे पिण्यासाठी पाणी मागितले, फकिराने एक भांडे देवून नदीवरून पाणी आणण्यास सांगितले. मुल्ला म्हणाले,"मी खूप घाबरलोय! " तेंव्हा फकिराने स्वतः पाणी आणण्यास जातो म्हणाला. तर मुल्ला पुन्हा म्हणाले,"तुम्ही गेल्यावर मला येथे भीती वाटेल." हे ऐकताच फकिराने कट्यार काढून दिली. फकीर पाणी घेवून परतला तर मुल्ला मोठ्यानी ओरडू लागले,"खबरदार! जर पुढे आलास तर मारून टाकीन !" फकिराने आपली ओळख सांगितली. तर मुल्ला म्हणाला,"कशावरून तू भूत पिशाच्च नाहीस !फकिराचे रूप घेवून भूत पिशाच्च येवू शकते." वैतागून फकीर म्हणाला,"अरे मीच तुला माझ्या गुहेत आश्रय दिला आणि मलाच तू आत येवू देत नाहीस. असली कसली रे बाबा तुझी भीती !" मुल्लाने काही त्या फकिराला रात्रभर गुहेत येऊ दिले नाही. फकीर बिचारा रात्रभर गुहेबाहेर थांबला. सकाळी मुल्ला उठले व जाऊ लागले. जाताना फकिराला म्हणाले,"भाई ! मला माफ करा ! पण भीती अनेकदा माणसाला विवेक सोडायला भाग पाडते. त्यावेळी तो उपकारकर्त्यालासुद्धा विसरतो."

तात्पर्य- भीतीमुळे माणूस काही वेळेला विवेक गमावतो आणि उपकारकर्त्याला विसरतो, त्याचे उपकार विसरून जातो.

वर्तमानपत्रातून संग्रहित 


गुरुवार, २८ मार्च, २०१३

(निवड)


(कथा क्र.५० )




दुर्गम भागात फिरताना तीन साधुना एक झोपडी दिसते, ते झोपडीचा दरवाजा वाजवतात. घरातील महिला त्यांच्याकडे विचारणा करते,"आपण कोण आहात? आणि आपल्याला काय हवे आहे?" ते म्हणतात,"आम्ही तिघे भुकेले आहोत, अन्नाची काही व्यवस्था करा." झोपडी बाहेरील झाडाखाली विश्रांती करण्याची विनंती करत महिला पुन्हा घरात गेली, काही काळानंतर बाहेर येत ती तिन्ही साधूना जेवणासाठी आमंत्रित करते. तेंव्हा साधू म्हणतात," आमच्यापैकी केवळ एकचजण फक्त तुझ्या घरात प्रवेश करू शकतो." महिला आश्चर्यचकित होते व विचारते," असे का? भूक तिघानाही लागली आहे. पण येणार मात्र एकचजण?" साधू म्हणतात," हा आमच्यातील करार आहे. आमच्यातील एक "वैभव" आहे. तर दुसरा "यश" आणि तिसरा "प्रेम". आता तू ठरव कि आमच्यातील कोणाला आत बोलवायचे?" महिला गोंधळून जाते. ती पुन्हा घरात जाते, नवऱ्याशी चर्चा करते आणि बाहेर येते व "प्रेम" नावाच्या साधूला जेवणासाठी निमंत्रण देते. प्रेम घरात येताच त्याच्या पाठोपाठ "वैभव" आणि "यश" साधू पण जेवणासाठी घरात येतात. महिला पुन्हा गोंधळून जाते, तेंव्हा साधू म्हणतात," मुली ! तू प्रेम मागितले, त्या पाठोपाठ यश आणि वैभव तुझ्या घरात प्रवेशकर्ते झाले, पण तू वैभव किंवाप्रेम यांना जर पाचारण केले असते तर आमच्यातील दोघे उपाशी राहिले असते." महिलेने तिघांचे यथायोग्य स्वागत करून त्यांचे आदरातिथ्य केले.


तात्पर्य -जगात प्रेमापाठोपाठ यश आणि वैभव हि आयुष्यात,घरात येते. 

वर्तमानपत्रातून संग्रहित 



मंगळवार, २६ मार्च, २०१३

(राजाचा अंत)

(कथा क्र.४९)

एका देशाचा राजा हा लालची होता. तो आपली तिजोरी भरण्यासाठी प्रजेवर वेगवेगळे कर लादीत असे. एकदा राजा खूप आजारी पडला, अंतिम घटिका जवळ आली, यमाचे दूत नेण्यासाठी समोर उभे ठाकले असता, यमदूतांना समोर पाहून घाबरून राजाने विनवणी केली,"हे यमदूत!मला आणखी काही दिवस जगू दे, मी प्रजेच्या भल्यासाठी काही नवीन योजना तयार केल्या आहेत. त्यांना साकार करण्यासाठी मला आणखी काही दिवस वाढवून दे." यमदुताने त्याला म्हटले,"राजन!प्रत्येक मनुष्य अमर होवू इच्छितो, पण ते शक्य नाही." हे ऐकूनही राजाचा अजूनही आग्रह सुरूच होता. तेंव्हा यमदुताने राजाच्या हातात एक कलश देत सांगितले, " ह्या कलशात तुझे जीवनजल भरले आहे. जोपर्यंत तू हे पीत राहशील तोपर्यंत तू जिवंत राहशील." राजाने विचारले," परंतु हे जल संपले तर?" यमदूत म्हणाले," तू थोडे थोडे पीत राहा ते दीर्घकाळ पर्यंत जाईल आणि तू जिवंत राहशील, एकदाच पिण्याचा प्रयत्न केलास तर तुझा मृत्यू अटळ आहे." राजाने काही दिवसांपर्यंत थोडे थोडे जीवन जल पिणे पसंत केलं आणि त्यानुसार दीर्घकाळ जीवन जगण्याचा प्रयत्न करीत गेला. पण एकेदिवशी त्याच्यातील लालची माणसाने त्याच्या संयमावर मात केली आणि त्याच्या मनात सर्व जल पिवून अमर होण्याचा विचार आला. त्याने तो अंमलात आणला आणि त्याचबरोबर यमदूतानी सांगितलेले पण खरे झाले. राजाचे मरण त्याचवेळी आले.


तात्पर्य - लोभाचा अंत कष्ट,संकट, विफलतेशी असतो. त्यामुळे मनावर संयम असणे हेच चांगले असते.

वर्तमानपत्रातून संग्रहित 

रविवार, २४ मार्च, २०१३

(मुल्यांकन)


(कथा क्र.४८)

एका महात्म्याच्या शिष्यांमध्ये एक राजकुमार आणि एक शेतकऱ्याचा मुलगा होता. राजकुमाराला राजपुत्र असण्याचा अहंकार होता.मात्र शेतकऱ्याचा मुलगा विनम्र आणि कर्मठ होता.राजकुमाराचे वडील अर्थात तेथील राजा दरवर्षी एका स्पर्धेचे आयोजन करीत असत. त्यात बुद्धिमत्ता आणि दृष्टीची पारख केली जात असे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दूरदूरचे राजकुमार येत असत. अध्ययन पूर्ण झाल्यावर राजकुमाराने शेतकऱ्याच्या मुलालाही या स्पर्धेत सामील होण्याचे आमंत्रण दिले. कारण त्याला तेथे बोलावून त्याचा अपमान करण्याचे त्याच्या मनात होते. जेंव्हा शेतकऱ्याचा मुलगा स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचला तेंव्हा त्याला राजकुमार आणि राजपुत्रांमध्ये बसण्यास मनाई केली. शेवटी शेतकऱ्याचा मुलगा वेगळा बसला. राजाने प्रश्न विचारला,"तुमच्यासमोर जर जखमी वाघ आला तर तुम्ही त्याच्यावर उपचार कराल का त्याला तसेच सोडून निघून जाल ?" सर्व राजपुत्रांचे उत्तर हे एकच होते. "आम्ही आमचा जीव धोक्यात घालून वाघावर उपचार करणार नाही." मात्र शेतकऱ्याचा मुलगा म्हणाला," मी जखमी वाघावर उपचार करेन कारण जखमीचा जीव वाचविणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे. माणूस होण्याच्या नात्याने माझे हे कर्म आहे. मांस खाणे हे जर वाघाचे कर्म असेल तर तो बरा झाल्यावर माझा जीव का घेईना ? त्यात त्याचा दोष नाही. माणूस म्हणून मी त्याच्यावर उपचार करणे हे माझे आद्यकर्तव्य आहे." हे उत्तर ऐकताच राजाने त्या मुलाला विजयी घोषित करून राज्याचे मंत्रिपद दिले.

तात्पर्य-व्यक्तीचे मुल्यांकन हे त्याच्या विचारातून होत असते. त्याच्या राहणीमानावरून कि त्याच्या दिसण्यावरून होत नसते. कधी कधी साधारण दिसणारी माणसे असाधारण कार्य करतात. 

वर्तमानपत्रातून संग्रहित 


शुक्रवार, २२ मार्च, २०१३

(पती-पत्नी आणि त्यांचा मुलगा)


(कथा क्र. ४७)

एक भक्त कुटुंब होतं. त्यात पती-पत्नीव्यतीरिक्त त्यांचा मुलगाही होता. तिघेही ईश्वरावर विश्वास ठेवत नसत. एकदा त्यांचा मुलगा आजारी पडला. त्यांनी खूप उपचार केले. पण तो ठीक झाला नाही. त्याचवेळी पतीला एका कामासाठी दुसऱ्या शहरात कामासाठी जावे लागले, त्याने पत्नीकडे चिंता व्यक्त केली. मात्र पत्नीने त्याला आश्वासन दिले कि ती मुलाची यथायोग्य काळजी घेईल. पती गावाला निघून गेला. दुर्दैवाने तो जाताच मुलगा मरण पावला. पत्नीने मोठ्या धैर्याने मुलाचे प्रेत झाकून ठेवले आणि संध्याकाळी पती येण्याच्या वेळेत स्वयंपाक करू लागली, पतीने येताच विचारले, मुलाची तब्येत कशी आहे? पत्नी म्हणाली, आज तो विश्रांती घेत आहे. तुम्ही आधी जेवण करून घ्या. त्यानंतर त्याच्याकडे जा. पती जेवण करू लागला. तेव्हा पत्नी म्हणाली, "शेजारणीने माझ्याकडे भांड्यात पाणी मागितले होते, मी तिला दिले, आता जेंव्हा मी माझे भांडे मागत आहे, तेंव्हा ती माझ्यावरच चिडत आहे. भांडत आहे व भांडे माझेच म्हणून हट्ट धरून रडत बसली आहे." पती म्हणाला,"मूर्ख बाई आहे ती ! दुसऱ्याची वस्तू परत करण्यासाठी कुठे रडत बसायचे असते का?" तोपर्यंत पतीचे भोजन झाले होते. तेंव्हा पत्नी म्हणाली, "आपला मुलगा हे पण ईश्वराचे देणे होते, ती वस्तू आज ईश्वराने परत मागून घेतली आहे. मग आपणही शेजारणी सारखे रडत बसायचे का?" पतीने पत्नीच्या तोंडाकडे पाहिले आणि त्याला सगळा मामला समजून आला, तो म्हणाला,तू ठीक म्हणतेस. मग त्या दोघांनी मिळून आपल्या मुलाचे पुढील अंतिम संस्कार मोठ्या धैर्याने पूर्ण केले.

तात्पर्य- मानवी जीवन परमेश्वराची देणगी आहे. ते संपल्यावर आपले काहीच चालत नाही.

वर्तमानपत्रातून संग्रहित 
 

गुरुवार, २१ मार्च, २०१३

(भाऊबीज)


(भाऊबीज)

एका गावात एक बहिण भाऊ राहत होते. बहिणीचे आणि भावाचे दोघांचीही लग्ने झाली होती. बहिण तिच्या घरी सुखाने नांदत होती. भावाच्या सुखातसुद्धा काही कमी नव्हती. भाऊबीजेचा सण होता. आज माझा भाऊ जेवायला येणार म्हणून बहिणीने सगळी तयारी केलेली होती. स्वैपाकपाणी आवरून दारात उभी राहून ती भावाची वाट पाहत होती. बराच वेळ झाला तरी भाऊ आला नाही, तेवढ्यात दारी दोन याचक भिक्षा मागण्यास आले. बहिणीने सणाच्या दिवशी याचक न जेवता जाणार म्हणून तिने त्या दोघांना जेवायला वाढले, दोघे याचक पोटभर जेवले. बहिणीला त्यांनी सांगितले,"ताई !आज सणाचा दिवस! तू आम्हाला जेवण दिले. आम्ही याचक नसून यमाचे दूत आहोत आणि यमआज्ञा अशी आहे कि आजपर्यंत ज्या पुरुषाला कुणी शिव्या दिल्या नाहीत, त्याला घेवून ये असे यमराज म्हणाले आहेत. तू आमचा आत्मा तृप्त केला म्हणून आम्ही तुला हे गुपित सांगत आहोत." एवढे बोलून ते निघून गेले. दुतांचे बोलणे ऐकताच बहिण मनातून खूपच घाबरली कारण ती व तिचा भाऊ हे गावात अजातशत्रू म्हणून ओळखले जात. त्यामुळे या दोघांना कुणी शिव्या देण्याचा प्रसंगच उद्भवला नाही. आपल्या भावावर आज मरणाची छाया दिसताच तिने घराबाहेर धाव घेतली व तिला जितक्या म्हणून शिव्या येत होत्या त्या भावाच्या नावाने देण्यास सुरुवात केली.गावातील लोक चकित झाले, ज्या बहिणी भावाच्या मायेची उदाहरणे साऱ्या पंचक्रोशीत दिली जात होती त्या भावाची बहिण आज त्याला रस्त्याने शिव्या देत सुटली होती. हि बातमी भावापर्यंत पोहोचली, भावाला ज्याने हि बातमी दिली त्याला भाऊ म्हणाला," मित्र ! माझी बहिण मला शिव्या देते आहे यातसुद्धा माझे काहीतरी हित तिने पाहिले आहे." शिव्या देत देत बहिण भावाच्या दाराशी आली, तो यमाचे दूत भावाच्या दारात उभे होते. त्यांना पाहताच बहिणीने भावाच्या नावाने शिव्यांचा शिमगा केला. हे ऐकताच यमाचे दूत त्यांच्या नियमानुसार निघून गेले. बहिण भावाकडे गेली व भावाला शिव्या देण्याचे गुपित सांगितले. एका बहिणीने शिव्या देवून भावाचा अपमृत्यू टाळला होता.


तात्पर्य- (या कथेचे तात्पर्य कृपया तुम्हीच कॉमेंट मध्ये सांगावे हि विनंती)

बुधवार, २० मार्च, २०१३

(सेठ आणि गरीब व्यक्ती)


(कथा क्र. ४६)

एक धनिक सेठ आपल्या अडचणीतून मुक्त होण्यासाठी दररोज मंदिरात जात असे आणि सोन्याचे ताटात पुजेची सामग्री ईश्वराला समर्पित करत असे. ईश्वर प्रसन्न होईल या आशेने त्याने हे दीर्घकाळ केले. मात्र तसे झाले नाही, एके दिवशी त्याला मंदिरात जीर्ण कपड्यामध्ये एक व्यक्ती दिसली, ती ईश्वराला म्हणत होती,"हे ईश्वरा! तुझे लाख लाख आभार ! मी तुझ्या कृपेने सुखी झोपत आहे माझा कोणी शत्रू नाही आणि मला कसला त्रास नाही. माझ्यावर सदैव अशीच कृपा असू दे." घरी आल्यावर हि सेठला त्या व्यक्तीची गोष्ट आठवत होती कि ईश्वराला दररोज बहुमूल्य उपहार अर्पण करून त्याचे कष्ट कमी होत नव्हते मग तो गरीब ईश्वराला काहीही न देता इतका सुखी कसा? बराच विचार करून सेठ आपल्या दु:खाचे आणि गरीब माणसाच्या सुखाचे कारण शोधण्यासाठी संतांकडे गेला संत त्याची गोष्ट ऐकून म्हणाले, "सेठजी! आपण ज्या प्रमाणे सामान्य माणसाला प्रसन्न करतो त्याप्रमाणे देवाला सुद्धा प्रसन्न करायचे बघत आहात. मात्र गरीब माणसाने आपल्या हृदयात त्या ईश्वराला साठवून ठेवले आहे. तो ईश्वराकडे काही अपेक्षा घेवून जात नाही. तर निरपेक्ष भावनेने देवाचे आभार मानत आहे. ज्यादिवशी आपला ईश्वराबाबतचा भाव बदलेल त्यादिवशी तुला ईश्वराचे दर्शन होईल. 

तात्पर्य-ईश्वराशी सदैव नि:स्वार्थी भक्तीभाव असावा; सुख आणि मनशांती निश्चित मिळते 

वर्तमानपत्रातून संग्रहित

मंगळवार, १९ मार्च, २०१३

(बुद्धीचा योग्य वापर)


(कथा क्र. ४५)

एक राजा कुशल प्रशासक होता. प्रजेचे सुख- दु:ख जाणून घेण्यासाठी तो साधारण वेशभूषा करून फिरत होता. एक दिवस जेंव्हा तो नगरातून जात होता तेंव्हा त्याला काही घोडेस्वार आपल्याकडे येताना दिसले, ते चोर असून आपल्याला लुटण्यासाठी येत आहेत असे राजाने हेरले. धाडसी राजा आता घाबरून जाण्याऐवजी लढण्यासाठी तयार झाला. त्याचवेळी त्याच्या घोड्याचा पाय खड्ड्यात अडकला. घोडा थोडासाही इकडे तिकडे हळू शकत नव्हता आणि चोर तर जवळ आले होते. तेवढ्यात तेथे काही तरुण आले. परिस्थिती ओळखून त्यांनी चोरांवर प्रतिहल्ला केला व हाकलून लावले. राजा यामुळे खुश झाला. त्याने त्या तरुणांना आपली ओळख दिली व बक्षीस म्हणून काही ना काही मागण्यास सांगितले. एका तरुणाने धन मागितले, दुसऱ्याने घर, तिसऱ्याने शेती, चौथ्याने सरपंचपद, पाचव्याने गावापर्यंत रस्ता बनवून मागितला आणि सहाव्याने म्हंटले, "महाराज ! मला काही देण्यापेक्षा तुम्हीच माझ्या घराचा पाहुणचार स्वीकारण्यासाठी माझ्या घरी वर्षातून दोन वेळा यावे." राजाने सर्वांच्या इच्छा पूर्ण केल्या व सहाव्या तरुणाला घरी येण्याचे वचन दिले. राजा त्याच्या घरी गेला तेंव्हा त्याचे घर खूप जीर्ण झाले होते. राजाला ते पाहवले नाही ते त्याने बांधून देण्याची आज्ञा केली. तसेच येण्याजाण्यासाठी चांगला रस्ता करून दिला. राजा हा पाहुणा म्हणून येत असल्याने त्याचा गावातील गावातील सन्मान वाढला. प्रतिष्ठा वाढली, राजाच्या जवळचा असल्याने राजदरबारी त्याचे म्हणणे मांडता येवू लागले. राजाने प्रत्येक वेळी त्याला काही ना काही वस्तू भेट दिल्याने त्याची श्रीमंती वाढत गेली. त्याच्या अक्कल हुशारीने तो गावातील प्रतिष्ठित नागरिक बनला. 


तात्पर्य- योग्य संधी मिळेल तेंव्हा बुद्धीचा वापर योग्य पद्धतीने केल्यास चांगले लाभ पदरात पडून घेता येतात. 
वर्तमानपत्रातून संग्रहित

बुधवार, १३ मार्च, २०१३

(यक्ष आणि यक्षिणी)


 (कथा क्र. ४४)

एका चंदन व्यापाऱ्याला २ मुले होती. एकदा व्यापाऱ्याने व्यापाराच्या निमित्ताने दोघांना अरब देशात पाठवले, दोघेही जहाजाने गेले. दुर्दैवाने वादळात अडकल्याने जहाज भरकटले आणि दोघेही भाऊ एका बेटावर आले. तेथे एका यक्षिणीची भेट झाली. ती अत्यंत सुंदर होती. यक्षिणीने तिचा सुंदर असा महाल पाहण्यास त्यांना नेले. तेथे गेल्यावर त्यांचा दोघांचा सत्कार केला. दोघेही खूप खुश झाले. दुसऱ्या दिवशी ते बेटावर फिरायला निघाले, तेंव्हा एका व्यापाऱ्याला गंभीर अवस्थेत पहिले, त्याला विचारल्यावर त्याचेही जहाज भरकटल्याचे त्याने सांगितले, येथे एका यक्षिणीने त्याचे स्वागत केले, परंतु एका गोष्टीवरून नाराज होवून तिने त्याचे हाल केले. व्यापाऱ्याने पुढे सांगितले, एका निश्चित तिथीला येथे एक यक्ष घोड्याचे रूप धारण करून येतो आणि प्रार्थना केल्यानंतर समुद्राच्या पलीकडे नेवून सोडतो परंतु त्या घोड्यावर सवार झालेल्या व्यक्तीने मागे पळत येणाऱ्या यक्षिणीकडे वळून पाहिल्यानंतर तो यक्ष त्या व्यक्तीला समुद्रात फेकून देतो. दोन्ही भावांनीहि त्या यक्षाला समुद्राच्या पलीकडे नेवून सोडण्याची विनंती केली. यक्षाने ती मान्य केली. दोघेही यक्ष बरोबर घोड्यावर स्वार झाले. त्याबरोबर मागे थांबण्यासाठी आवाज दिला. लहान भाऊ स्वत:वर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि त्याने मागे वळून यक्षिणीकडे पाहिले त्याबरोबर यक्षाने त्याला समुद्रात फेकून दिले. त्याक्षणी यक्ष म्हणाला , हे मूर्ख मनुष्या!तू स्वत:वर नियंत्रण न केल्याने तुला मृत्यू हा स्वीकारावा लागेल." लहान भावाने ऐकले पण खूप उशीर झाला होता. खोल समुद्रात बुडून तो मरण पावला.

तात्पर्य- एखादी गोष्टीचे दुष्परिणाम माहित असताना सुद्धा जर मानवाने स्व: नियंत्रण केले नाही त्याचे फळ भोगावे लागते.

वर्तमानपत्रातून संग्रहित



मंगळवार, १२ मार्च, २०१३

(संत फरीद आणि व्यापारी)


(कथा क्र. ४३)

एका व्यापाऱ्याला वाईट सवयी होत्या. त्याला या सवयींपासून सुटका करून घ्यावयाची होती. मात्र अनेक प्रयत्नानंतरही तसे होवू शकले नाही. त्याला कुणीतरी संत फरीद यांचे नाव सुचविले, तो तत्काळ त्यांच्याकडे गेला. आणि आपल्याविषयीची सर्व माहिती सांगून विचारू लागला, "माझ्या वाईट सवयी कशा सुटतील?" संतानी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तरी तो व्यापारी हट्टाला पोहोचला. त्याने रोजच येवून संताना विचारणे चालू केले. संत फरीद यांनीही त्याला रोजच टाळले. एके दिवशी व्यापारी अटटहासाला पेटला तेंव्हा फरीद म्हणाले,"मी तुला काय मार्ग दाखवू? तुझे जीवन आता ४० दिवसांचे उरले आहे. इतक्या कमी दिवसात तू कसा सुधारशील? तुझ्या वाईट सवयी कशा काय सुटतील?" हे ऐकताच व्यापारी तणावात आला. त्यानंतर त्याच्या वागण्यात फरक पडू लागला. इतके दिवस केलेल्या वाईट कर्मांची त्याला लाज वाटू लागली, सारखा पश्चाताप करू लागला. संत सहवासात राहणे, भजन पूजन करणे, सात्विक खाणे पिणे, शुद्ध आचरण करणे इत्यादी क्रिया तो करू लागला. शेवटी ४० वा दिवस उजाडला, व्यापारी मरणाची वाट पाहत होता. अचानक त्याला संत फरीद यांनी बोलावले व सांगितले," मुला, या ३९ दिवसांचा विचार करता तूच मला सांग कि या ३९ दिवसात तू किती वेळेला दुष्टपणे वागला, खोटे बोलला, वाईट कर्म केले?" व्यापारी म्हणाला," हे जे तुम्ही म्हणता ते एकदाही केले नाही. पण त्याचा माझ्या मरणाशी काय संबंध?" संत म्हणाले, " यालाच मरणाची भीती म्हणतात, कि रोजचा दिवस हाच जर आयुष्याचा शेवटचा दिवस म्हणून घालविला तर वाईट कृत्ये माणसाकडून होत नाहीत. माणसाने असे काम केले पाहिजे कि त्याच्या मागेसुद्धा त्याचे नाव निघाले पाहिजे." यानंतर व्यापारी सुधारला व त्याच्यातील वाईट सवयी निघून गेल्या. त्याच्यातील चांगल्या गुणांना संतानी वेगळ्या पद्धतीने जागृत केले. 

तात्पर्य- मानवी जीवनाचा भरवसा नाही. तेंव्हा आता मिळालेल्या क्षणातुनच सदवर्तन आणि सत्कर्म केले जावू शकते. 
वर्तमानपत्रातून संग्रहित

सोमवार, ११ मार्च, २०१३

(पैसा कसा वाचवाल?)


(कथा क्र. ४२)

हि गोष्ट आहे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांची. राजेंद्रबाबूंची राहणी खूपच साधी होती. एकदा चालताना राष्ट्रपती राजेन्द्रबाबुना त्रास होवू लागला. लक्षात असं आलं कि त्यांच्या चपला झिजल्या आहेत आणि त्याला मारलेला खिळा त्यांच्या पायाला टोचू लागला आहे. मग राष्ट्रपतींनी आपल्या स्वीय सहाय्यकाला नवीन चप्पल आणण्यास सांगितले. त्याने सेवकासोबत जावून नवीन चपलांचा जोड आणला. राष्ट्रपतींनी विचारले," या चपलेची किंमत किती?" "सोळा रुपये" सहाय्यकाने सांगितले. "सोळा रुपये? गतवर्षी मी माझ्या चपला बारा रुपयांना घेतल्या होत्या.तुम्ही खात्री करा."राष्ट्रपती म्हणाले. यावर स्वीय सहाय्यक म्हणाले,"साहेब त्या दुकानात बारा रुपयांच्या पण चपला आहेत.पण त्यापेक्षा या चपला मऊ आणि चांगल्या आहेत. आणि मुख्य म्हणजे मऊ असल्याने टोचणार नाहीत. म्हणून सोळा रुपये देवून मीच आणल्या. आपल्या सेवकाचेही या चपलाबाबत मत चांगले वाटले. " राष्ट्रपती म्हणाले, "अहो मऊ चपला आहेत आणि चांगल्या दिसतील म्हणून तुम्ही चार रुपये जास्त मोजले कि. नको त्यापेक्षा असे करा कि या चपला दुकानात परत करा आणि मला बारा रुपयांच्याच चपला आणून द्या. आणि महत्वाचे म्हणजे त्यासाठी वेगळा असा हेलपाटा घालू नका. त्या बाजूला येणाऱ्या जाणाऱ्या कोणाकडून तरी हे काम करून घ्या. अन्यथा असे व्हायचे कि चपलेत चार रुपये वाचविण्यासाठी तुम्ही पाच रुपयांचे पेट्रोल खर्च करून गाडीने जाताल." स्वीय सहाय्यक हे सर्व ऐकतच राहिले. देशाच्या सर्वोच्च पदी बसणाऱ्या व्यक्तीबद्दल त्यांचा आदर आणखी वाढला. 


तात्पर्य- पैशांची अकारण उधळपट्टी करू नये. 


वर्तमानपत्रातून संग्रहित

बुधवार, ६ मार्च, २०१३

(इंद्र आणि मुनी मार्कंडेय)


(कथा क्र. ४१) 

मुनी मार्कंडेय यांच्या कठोर तपस्येने देवराज इंद्र भयभीत झाला होता. त्याला वाटायचे कि आपल्या सिहांसनावर मुनी अधिकार तर दाखवणार नाहीत. त्यामुळे त्याने मुनींची तपस्या खंडित करायचे ठरवले. एके दिवशी इंद्राने मुनींच्या अनुपस्थितीत आश्रमात भरपूर धन आणून ठेवले. जेंव्हा मुनी आश्रमात परत आले तेंव्हा ते धन पाहून हैराण झाले. आपल्या शिष्यांना मार्कंडेय म्हणाले, " हे धन माझे नाही. त्यामुळे हे धन गरीबात वाटून टाका." हे बघून इंद्राच्या लक्षात आले कि मुनिना धनाचा लोभ नाही. त्यावेळी इंद्र राजाच्या वेशात आश्रमात आला आणि मुनींना म्हणाला,"मुनिवर! माझी एक इच्छा आहे कि मी एक राजा आहे आणि माझ्याकडे भरपूर धन आहे. परंतु संतती नाही. माझी अशी इच्छा आहे, कि आपल्याला दत्तक घेवून बसवावे आणि राजगादीवर बसवून संन्यास घ्यावा." मुनी म्हणाले," राजन एकदा ईश्वराशी नाते जोडल्यावर तो धन आणि सिंहासनाशी कधीही लोभ ठेवत नाही. मला त्याचा कधीही लोभ नाही, नव्हता आणि नसणार. तेंव्हा तुम्हालाच संन्यास घ्यावयाचा असेल माझ्या शेजारीच तुमच्यासाठी एक कुटी बनवतो. यापेक्षा मी आपली काय सेवा करू शकतो.? " मुनींचे हे उत्तर ऐकून इंद्र आपल्या खऱ्या रुपात प्रकट झाला आणि म्हणाला मला आपल्या कठोर तपस्येमुळे भीती वाटत होती कि आपण माझ्या सिंहासनावर अधिकार तर सांगणार नाहीत ना? त्यामुळे मी आपली तपस्या भंग करण्यासाठी हे सारे केले. मला क्षमा करा." मुनी म्हणाले"देवेंद्र! आपल्याला स्वत:वरच विश्वास नाही तर राज्य कारभार कसे चालवणार. संन्याशाला राज्याची काय गरज?" इंद्र लाजीरवाणा होवून तेथून परत गेला. 

तात्पर्य - मनावर संयम असणारेच सत्तेपासून दूर राहू शकतात. भौतिक आकर्षण ज्यांना नसते तेच खरे साधू होत.
वर्तमानपत्रातून संग्रहित


सोमवार, ४ मार्च, २०१३

(कर्म आणि धर्म)

(कथा क्र. ४०)


          भगवान गौतम बुद्ध यांना एका गावी प्रवचनासाठी निमंत्रण दिले होते. ज्या शेतकऱ्याने निमंत्रण दिले होते तो अत्यंत भाविक होता. आपणाबरोबर आपल्या गावातील लोकांना याचा लाभ व्हावा हि त्याची इच्छा होती. गावाबाहेरच्या एका विस्तीर्ण अशा मोकळ्या पटांगणात एक वृक्ष होता. त्याला पार होता. तेथे प्रवचन घेण्याचे ठरले. ज्या दिवशी प्रवचन सुरु होणार त्यादिवशीच त्या शेतकऱ्याला चिंतेने ग्रासले, त्याचा सर्वात लाडका बैल हरवला. शेतात बांधून ठेवला असता दावं तोडून बैल निघून गेला. शेतकरी बैलाला शोधायला बाहेर पडला. कोस-दोन कोस चालला. गावापलीकडच्या डोंगराशी कुरण होते. तिथे त्याने बैलाला शोधलं मात्र डोक्यात विचार प्रवचनाचे चालू होते. खूप वेळ निघून गेला होता. शेतकऱ्याला प्रवचनाला जाता आले नाही. तोपर्यंत प्रवचन संपले होते. गावकरी घरी निघून गेले होते. बैल मिळाल्याचा आनंद आणि प्रवचन हुकल्याच दुख असे दोन्ही भाव त्याच्या मनात होते.
         दुसऱ्या दिवशी मात्र शेतकरी वेळेत प्रवचनाला हजर राहिला. प्रवचन संपल्यावर विनम्रपणे गौतम बुद्धांच्या पाया पडून तो म्हणाला," महाराज, मी काल प्रवचनाला येवू शकलो नाही. क्षमा करा. माझा बैल हरवला होता. पण बैलाला शोधतानासुद्धा माझे प्रवचन हुकले व चांगले विचार ऐकण्यापासून वंचित राहिलो याचे दुख मनाला डाचत होते." यावर बुद्ध मंदस्मित करीत म्हणाले," चांगल्या गोष्टी ऐकण्यापासून वंचित राहिल्याचे दु:ख तुला झाले यातच तुझे भले आहे. आणि बैलाला शोधणे हे तुझे कर्तव्य आहे. तू बैलाला शोधात असताना सुद्धा प्रवचनाचा विचार करत होता म्हणजेच तू कर्म करत असताना धर्माचा विचार करत होता, कर्म करणे हेच धर्माचे मुख्य सार आहे."


तात्पर्य- कर्माचे पालन म्हणजे धर्माचे पालन होय. 


वर्तमानपत्रातून संग्रहित

रविवार, ३ मार्च, २०१३

(खरा कवी)

(कथा क्र.३८)


एका राजाला त्याच्या खऱ्या कवीची नियुक्ती करायची होती. त्यासाठी त्याने दवंडी पिटवली. दवंडी ऐकताच राज्यभरातून हौशे-नौशे कवींची ही मोठी गर्दी राजाच्या महालात जमा झाली. महाल त्यामुळे भरून गेला. त्यातून खरा कवी कसा निवडावा हा एक गहन प्रश्न होता. थोडावेळ विचार केल्यावर राजाला एक युक्ती सुचली. त्याने प्रधानाला आज्ञा केली कि या सर्व कवींना चाबकाचे फटके मारा. राजाची आज्ञा ऐकताच निम्मे अधिक कवी तिथून पसार झाले. तरीही शेकडो कवी तेथे उरलेच होते. राजाने पुन्हा आज्ञा केली,"या सर्व कवींना अन्न पाण्याविना आठवडाभर उपाशी ठेवा." तरीही १०-२० उरलेच. त्यातून खऱ्या कवीची निवड करण्यासाठी राजाने आज्ञा दिली कि या उरलेल्या कवींना तेलाच्या काहिलीत टाका. राजाची ती जीवघेणी आज्ञा ऐकताच एका कवीखेरीज बाकीचे सर्व कवी तेथून पसार झाले. उरलेला कवी मात्र त्याच्या काव्यलेखनात मग्न होता. तो इतका रममाण झाला होता कि त्याला या आज्ञाच मुळी ऐकू गेल्या नाहीत. राजाने त्याला राजकवी म्हणून घोषित केल्यावर विनयपूर्वक तो राजाला म्हणाला,"महाराज ! राजकवी व्हायला माझी काही हरकत नाही पण मी कुणाच्या मर्जीचा गुलाम असणार नाही. मला वाटेल तेंव्हा मी दरबारात येईन आणि वाटेल तेंव्हा दरबारातून निसर्गाच्या सान्निध्यात निघून जाईन. माझी ही अट मंजूर असेल तरच मी राजकवी होतो नाहीतर हे इतके लोक निघून गेले तसा मी पण जातो." राजाला कवीची ओळख पटली. त्याने त्याच्या कविता ऐकल्या व खुश होवून त्याच्या मर्जीनुसार सगळे मान्य करून त्याला 'राजकवी' म्हणून घोषित केले. 



तात्पर्य- खरा कलाकार हा कुणाच्या मर्जीचा गुलाम नसतो.
वर्तमानपत्रातून संग्रहित

शुक्रवार, १ मार्च, २०१३

(सावकाराचे खोटे)


(कथा क्र.३८) 

एका शेतकऱ्याच्या पिकांचे खूप नुकसान झाले होते. त्याच्या घरात अन्नाचा कणही शिल्लक नव्हता. गावात त्याला मदत पण करीत नव्हते काय करावे म्हणून शेतकरी विचार करीत राहिला. काहीच उपाय सुचला नाही तेंव्हा त्याने गावातील सावकाराची गाय चोरली. सकाळी त्या गायीचे दुध आपल्या मुलांना पाजले व त्यांची भूक भागविली. सावकाराच्या नोकरांना गाय चोरल्याचे कळल्यावर त्यांनी चोरीची तक्रार केली. सावकाराने पंचायतीमध्ये शेतकऱ्याला बोलावले व विचारले,"हि गाय तू कुठून आणली आहे? " शेतकरी म्हणाला," हि गाय मी खरेदी केली आहे." पंचानी कसून चौकशी केल्यावर सुद्धा शेतकरी त्याच उत्तरावर ठाम राहिला. त्यानंतर पंचानी सावकाराला विचारले, हि गाय खरेच आपली आहे का? सावकाराने क्षणभरच शेतकऱ्याकडे पाहिले आणि शेतकऱ्याने आपली नजर खाली झुकविली, सावकाराने पंचांना सांगितले," हि गाय माझी नाही, माझ्याकडून गायीला ओळखण्यात चूक झाली आहे." पंचानी शेतकऱ्याला दोषमुक्त केले. घरी पोहोचल्यावर सावकाराच्या नोकरांनी सावकाराला खोटे बोलण्याचे कारण विचारले तेंव्हा सावकार म्हणाला,'' ती गाय आपली आहे हे मला व त्या शेतकऱ्याला दोघानाही माहित आहे. पण त्या क्षणी मला शेतकऱ्याचा डोळ्यात विवशता, भुकेची जाणीव आणि केलेल्या चोरीचा पश्चाताप असे एकत्रित भाव दिसले. मी त्याच्यावर आलेल्या संकटाचे गांभीर्य ओळखून खोटे बोललो. मी जर खरे बोललो असतो तर त्याला शिक्षा होवून त्याचे कुटुंब उघड्यावर आले असते त्यापेक्षा मी त्याला खोटे बोलून वाचविले. 


तात्पर्य- एखादा संकटात असेल तर त्याला वाचविण्यासाठी आपण प्रत्येक शक्य ते प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

वर्तमानपत्रातून संग्रहित