रविवार, ३० डिसेंबर, २०१२

विश्वासघात


(कथा क्र. १०) 

जंगलात एक हरिणीचे पाडस चरत होते. अचानक तेथे एक चित्ता आला. पाडस जीव वाचविण्यासाठी दाट वेलीच्या जाळ्यात घुसले. त्याला पकडण्यासाठी चित्ताही त्या जाळीत घुसला. पाडस छोटे होते ते सहजच जाळीतून पळून गेले. मात्र चित्ता अडकून बसला. त्याच वेळी एक शेतकरी तेथून जात होता. चित्त्याने शेतकऱ्याला त्याला जाळीतून काढण्याची विनंती केली. परंतु शेतकरी म्हणाला," तू जंगली प्राणी ! तुझा काय भरवसा ! तुला सोडल्यावर तू मलाच खावून टाकशील." चित्त्याने तसे करणार नाही असे आश्वासन दिले. शेतकर्याने त्याला मुक्त केले. तेंव्हा चित्त्याने आपला मूळ स्वभाव दाखविला आणि शेतकऱ्याला खाण्याची भाषा सुरु केली. शेतकरी म्हणाला मी तुला मुक्त केले हाच का सहकार्याचा मोबदला का?. चित्त्याने भुकेचे कारण सांगितले. तेवढ्यात तेथे एक लांडगा आला. दोघांची चर्चा ऐकून तो शेतकऱ्याला म्हणाला, " हा एवढा मोठा चित्ता! वाऱ्याच्या वेगाने पळणारा! आणि हा एवढ्याश्या जाळीत कसा अडकून पडेल. तू खोटे बोलतो आहेस. तू एवढ्या मोठ्या चित्त्याला वाचवला हे खोटे आहे, हा संकटात फसू शकत नाही. तो जाळीत कसा काय अडकला हे मला दाखव मग तू खरा का चित्ता ? हे पाहू." हे ऐकून चित्ताही घमेंडीत गेला तो परत जाळीत गेला व पुन्हा जाळीत अडकला. त्याच क्षणी लांडगा शेतकऱ्याला म्हणाला, " अरे मित्रा आता तरी पळ! नाहीतर हा पुन्हा तुला फसवेल !

तात्पर्य - जे नेहमी विश्वासघातक राहिले त्यावर कधीच विश्वास ठेवणे चांगले नाही. ते त्यांचा मूळ स्वभाव सोडत नाहीत.

वर्तमानपत्रातून संग्रहित

शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१२

कोळी आणि मासा


 (कथा क्र. ९)


एका गावात एक कोळी राहत होता. रोज समुद्रात जाऊन मासे पकडायचे आणि बाजारात जाऊन विकायचे हाच त्याचा दिनक्रम होता. पण एके दिवशी काही केल्या त्याच्या जाळ्यात काही मासे सापडेनात. तो हैराण झाला. दुसऱ्या दिवशीही तोच प्रकार झाला. तो कंटाळला. त्याला काही सुचेना. तिसऱ्या दिवशीही हाच प्रकार झाला मग मात्र त्याच्या मनाची घालमेल होवू लागली. मनाशी म्हणाला,''आता जर समुद्रात मासे मिळाले नाहीत तर मी काही समुद्रावर येणार नाही." असे ठरवून त्याने जाळे समुद्रात टाकले. यावेळी त्याच्या नशिबाने त्याला साथ दिली. एक छोटा का होईना मासा त्याच्या जाळ्यात सापडला. कोळ्याने जाळे वर ओढताच मासाही वर आला व मनुष्यवाणीत बोलू लागला. काकुळतीला येवून तो मासा म्हणाला,'' मी तुझ्या पाया पडतो पण मला सोडून दे. मी आत्ता खूप लहान आहे. मी मोठा होईन तेंव्हा तू मला पकड. मला परत समुद्रात जावू दे". कोळी म्हणाला," अरे मत्स्या ! काय माहित तू मला परत सापडशील कि नाही, आणि आज तुला जर नेले नाही तर मी आणि माझ्यावर अवलंबून असलेले लोक मात्र उपाशी मारतील. तेंव्हा तुला सोडून देण्याचा प्रश्नच येत नाही."


तात्पर्य= भविष्यात मोठे घबाड मिळेल या आशेवर आता हाती आलेली संधी सोडणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा होय.
वर्तमानपत्रातून संग्रहित

गुरुवार, २७ डिसेंबर, २०१२

म्हातारीची खीर


(कथा क्र ८)


एका गावात एक वृद्ध महिला राहत होती, तिच्या कंजुशीची चर्चा गावभर होती, एका मुलाने तिला याबद्दल अद्दल घडविण्याचे ठरविले. तो त्या महिलेच्या घरी गेला व तिला तिचा दूरचा नातेवाईक असल्याचे सांगू लागला. तिने त्याला नाते असण्याचे नाकारले. कारण तो तिथे राहिला तर तिला खर्च पडला असता ना!. बाहेर खूप पाऊस पडत होता. होय नाही करत किमान पावसाचे कारण सांगत त्या मुलाने तिच्या घरात प्रवेश मिळवला. तिने त्याला घरात प्रवेश तर दिला पण मुलगा काही खायला मागेल म्हणून ती म्हणाली, माझ्याकडे तुला देण्यासारखे काही नाही, तेंव्हा गुपचूप पडून राहा. तेंव्हा तो मुलगा म्हणाला, आजी मी तुला काहीच खायला मागणार नाही कारण माझ्याकडे जादूची छडी आहे. तिच्या सहाय्याने मला काय पाहिजे ते बनविता येते. तू फक्त मला चूल, पातेले आणि पाणी दे, मी छडीच्या सहाय्याने आज खीर खाणार आहे. पाहिजे तर तुला पण खायला देतो. महिलेने पण खूप दिवसात खीर खाल्ली नव्हती. त्याने चुलीवर पातेल्यात पाणी टाकून पाणी गरम करायला ठेवले. काही वेळाने आपल्या जवळची छडी काढून त्याने त्या पाण्यातून फिरवली व त्या पाण्याची चव घेतली व म्हणाला, आजी खीर खूप छान झाली आहे पण यात जर तांदूळ आणि साखर असती तर ना खूप मज्जा आली असती. महिलेने विचार केला थोडे तांदूळ आणि साखर दिली तर काय बिघडते. तिने दिले. त्याने थोड्या वेळाने परत अजून दुध, वेलची आणि सुका मेवा मागितला. महिलेने खिरीच्या लोभापायी तो दिला. खीर तयार झाली. महिलेने व त्या मुलाने एकत्र बसून खाल्ली. महिलेने हा जादूच्या छडीचा चमत्कार मनाला व मुलाने कंजूष महिलेच्या घरी खीर खाल्ली.


तात्पर्य - बुद्धीच्या जोरावर संकटकाळातही आपण आपले काम सध्या करू शकतो.


वर्तमानपत्रातून संग्रहित  



बुधवार, २६ डिसेंबर, २०१२

नियत


 (कथा क्र.७) 


एका ब्राह्मणाने एका शेठकडे एक हजार रुपये ठेवायला दिले. या गोष्टीला काही वर्षे उलटून गेली. एकदा ब्राह्मणाला पैशांची गरज लागली तेंव्हा त्याने ते शेठजीकडे परत मागितले तेंव्हा शेठजीने त्याला ते परत करण्यास नकार दिला. कारण शेठजीची नियत बदलली होती. तसेच पैसे ठेवल्याचा कोणताही पुरावा नव्हता. ब्राह्मण त्रस्त होवून राजाकडे दाद मागण्यास गेला. राजाही हि विचित्र परिस्थिती पाहून संभ्रमात पडला. मात्र शेठजीकडून पैसे परत मिळवण्यासाठी राजाने एक युक्ती आखली. राजाने नगरात शोभायात्रा काढायची घोषणा केली. जेंव्हा शोभायात्रा शेठजीच्या घरासमोरून चालली तेंव्हा राजाने ब्राह्मणाला आपले गुरुदेव म्हणून आपल्याजवळ बसविले. शेठजीने हे पाहून विचार केला कि हा ब्राह्मण तर राजाचा गुरु आहे. राजा याच्या ऐकण्यात असेल तर आणि याने राजाला त्या एक हजार रुपयांबद्दल सांगितले तर राजा मला माझ्या खोटेपणाबद्दल दंड केल्याशिवाय राहणार नाही. यातून वाचण्यासाठी मी ब्राह्मणाचे पैसे परत केलेले बरे. शोभायात्रा संपताच शेठजीने एक हजार रुपये ब्राह्मणाच्या घरी पोहोच केले. यामुळे ब्राह्मणाला खूप आनंद झाला. राजाच्या हुशारीमुळेच त्याला त्याचे पैसेच नाही तर योग्य सन्मानही मिळाला. 


तात्पर्य - जीवनात कधी कधी असेही होते कि आपल्याजवळ खरेपणाचा पुरावा नसतो तेंव्हा हुशारीनेच सत्य जगासमोर आणावे लागते. 

वर्तमानपत्रातून संग्रहित -

रविवार, २३ डिसेंबर, २०१२

कवी


 (कथा क्र.६)
उज्जैन येथे एकदा खूप पाउस पडत होता. सारे शहर झोपले होते. मात्र राजवाड्याचा द्वारपाल मातृगुप्त जागाच होता. तो पहारा देत आपल्या दुर्भाग्याचा विचार करत होता. कारण तो एक असाधारण काव्यप्रतीभेचा धनी होता. राजा विक्रमादित्य गुणीजनांचा सन्मान करतो हे ऐकून तो येथे आला होता. परंतु राजाची त्याची भेट झाली नसल्याने त्याला द्वारपालाचे काम करावे लागत होते. त्याच रात्री भर पावसात राजा विक्रमादित्य गुप्त वेशात राज्यात पाहणी करावयास निघाले होते. द्वारावर येताच त्यांच्या कानी कुणीतरी काहीतरी गुणगुणल्यासारखे वाटले म्हणून त्यांनी थांबून ऐकले तर मातृगुप्त एक कविता म्हणत होता. त्यांनी त्याला विचारले अरे तू आता पहाऱ्यावर आहे ना? मग हि कविता कोणाची म्हणतोस? त्याने उत्तर दिले, हि कविता माझी आहे आणि या कवितेत मी राज्याची परिस्थिती वर्णन केली आहे. राजे तिथून काहीच न बोलता निघून गेले. दुसऱ्या दिवशी त्यांनी मातृगुप्ताला दरबारात बोलावले व त्याच्या हाती एक पत्र देत त्याला काश्मीरला जायला सांगितले. मातृगुप्ताने फारशी चौकशी न करता ते पत्र घेवून काश्मीरला प्रयाण केले. काश्मीरला पोहोचताच तेथील पंतप्रधानांनी ते पत्र वाचून पाहिले व मातृगुप्ताला काश्मीरचा राजा म्हणून घोषित केले. या गोष्टीचे त्याला खूप आश्चर्य वाटले. त्यावर पंतप्रधान म्हणाले, राजांनी तुझ्या कर्तव्य बुद्धी बरोबरच तुझी राष्ट्रनिष्ठा व काव्यप्रतिभा पाहिली म्हणून त्यांनी तुला येथील राजा केले आहे.

तात्पर्य- प्रतिभा आणि योग्य वेळ, योग्य माणूस यांचा संगम झाला तर प्रतिभेचे चीज होण्यास वेळ लागत नाही.

वर्तमानपत्रातून संग्रहित 

सत्संगाचा परिणाम



कथा क्र. ५  

एका गावात एक चोर आणि त्याचा मुलगा राहत होते. वडिलांनी खूप चो-या केल्या होत्या. त्यांचा शेवट जसा जवळ आला तसे त्यांनी मुलाला जवळ बोलावून घेतले आणि ''काय वाटेल ते होऊ दे पण कोणत्याही प्रवचन किंवा कीर्तनाच्या वाटेला चुकूनही जाऊ नको'' असा मुलाला उपदेश केला. त्यांनी मग प्राण सोडले. मुलानेही हा उपदेश मनापासून पाळला पण त्यामागील कारण त्याला कळले नाही. एके दिवशी जंगलातून पळून गावाकडे येत असताना चुकून एका मंदिराच्या पाठीमागे तो आडोश्याला लपला. त्या मंदिरात एका महाराजांचे प्रवचन चालू होते. प्रवचनात त्यांनी एक कथा निवडली होती. त्यातील एकाच वाक्य ह्याचा नकळत कानावर पडले. ते म्हणजे ''देवांची सावली पडत नाही''. ह्याने ते मुद्दाम ऐकले नव्हते तरी त्याच्या डोक्यात ते चांगलेच भिनले. नेमके त्याच वाटेवर राजाचे सैनिक त्याला आडवे आले आणि त्यांनी त्याला पकडले आणि तुरुंगात टाकले. बरेच दिवस खूप त्रास देवूनही, खुप मार खावूनही याने गुन्हा कबूल केला नाही तेंव्हा राजा चिंतीत झाला आणि त्याने सरदारांची सभा बोलावली आणि चोराबद्दल सांगितले व उपाय सुचविण्याबद्दल सांगितले. एका सरदाराने शेवटी एक उपाय सुचविला. तो म्हणाला हा कशाला घाबरत नाही किंवा कशाला बधत नाही तेंव्हा याला देवाची तरी भीती घालू आणि ह्याच्याकडून गुन्हा कबूल करून घेवू. मग एका सुंदर स्त्रीला खुपसे दागदागिने घालून देवीच्या रुपात सजविण्यात आले आणि ह्याच्या समोर पाठविण्यात आले. तुरुंगात सर्वत्र अंधार होता आणि फक्त थोडा उजेड या स्त्री वर पाडण्यात आला. चोराने पाहिले एक देवी आपल्यासमोर उभी आहे आणि ती आपल्याला गुन्हा कबूल करण्यास सांगत आहे. पण ह्याच वेळी त्याला नेमके प्रवचनातील ''देवांची सावली पडत नाही'' हे वाक्य आठवले आणि त्याचा समोरील देवीची सावली पडलेली त्याला दिसली.त्याच बरोबर त्याला कळले कि हि देवी नाही माणूस आहे , तरी त्याला कळून चुकले आपण एकदा प्रवचन चुकून ऐकले तर आपल्याला इतका फायदा झाला. मग हि लुटमार कशाला? चोरी कशाला? त्यापेक्षा चांगला मार्ग पत्करून जीवन जगण्याचा त्याने निश्चय केला.

तात्पर्य- चांगले विचार ऐकल्याने, चांगली संगत केल्याने माणसाला चांगले वागण्याची प्रेरणा मिळते.

वर्तमानपत्रातून संग्रहित.

शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१२

पिंडदान

 कथा क्र ४

प्रयाग (गया) येथे एक खूप चांगले पंडित राहत होते. एकदा नेपाळचे राजे सामान्य वेशात पंडीतामागे फिरू लागले,"माझ्या आजोबांचे पिंडदान करून द्या, माझ्याजवल काहीच पैसे नाहीत थोडेसे लाडू भरून आणलेत तेच दक्षिणा स्वीकार करून घ्या." जे लोभी पंडित होते त्यांना पैशाची हाव होती त्यांनी या सामान्य वेशातील राजांना नकार दिला. अशा वेळेस राजांना तेथील एक पंडित गाठ पडला. त्याला महाराजांनी पिंडदान करण्याची विनंती केली. त्याने ती कबूल केली. तो म्हणाला ," भाऊ ! पैशाची काही बाब नाही. मी पिंडदान करून देतो." त्या पंडिताने फाटक्या तुटक्या कपड्यात आलेल्या राजांचे पिंडदान पूर्ण करून दिले. यावर महाराज खुश झाले. त्या वेळेस ते त्याला म्हणाले,"पंडितजी! या कार्यानंतर काही न काही दक्षिणा मी तुम्हास देणे लागतो. मी घरून काही लाडू आणले आहेत त्याचा तुम्ही स्वीकार करावा.मात्र या लाडूचे गाठोडे तुम्ही घरी जाऊन उघडावे." पंडित म्हणाले ," बर भाऊ तुम्ही गरीब दिसत पण तुम्ही प्रेमाने दिलेल्या लाडूचा मी स्वीकार करतो." या नंतर पंडितास ते गाठोडे देऊन राजे निघून गेले. पंडिताने घरी जाऊन जेवायला बसायची तयारी केली. अचानक त्याला लाडूची आठवण झाली त्यावर त्याने ते गाठोडे सोडून पहिले असता तो चकित झाला कारण त्या गाठोड्यात वीस सोन्याचे लाडू होते.

तात्पर्य- कधीही कुणाला कमी समजू नये कारण कोणत्या रुपात कोण असेल याचा भरवसा नाही.

बुधवार, १९ डिसेंबर, २०१२

फरक

कथा क्र ३

एकदा एक राजा जंगला मध्ये शिकारीला गेला. तेथे तो खूप दमला, त्याला पिण्यास पाणी हवे होते. तो शोधत शोधत एका झोपडीपाशी गेला. तेथे त्या राजाला तेथील माणसाने विचारपूस केली, खायला दिले व पिण्यास पाणी दिले. त्याच्या ह्या आदरातिथ्याने राजा भारावून गेला व त्याने त्या माणसाला खुश होवून त्या जंगलाचा एक विशिष्ट परिसर भेट देवून टाकला. पण ज्याला हे भेट मिळाले त्याला त्या गोष्टीची जाणीव नव्हती किंबहुना तो मूर्ख होता असेच म्हणा की कारण ते जंगल चंदनाचे होते. ह्या माणसाला ते जंगल भेट मिळाल्यावर त्याने तेथील एक एक झाड तोडावयास सुरुवात केली व त्याचा कोळसा बनवून विकण्याचा उद्योग सुरु केला. त्यातून त्याला त्याच्या उदरनिर्वाह पुरते धन मिळू लागले. असे करत करत त्याला भेट मिळालेल्या भागातील २-3 झाडे शिल्लक राहिली. काही काळाने पावसाळा सुरु झाला. पावसाच्या मुळे त्याला झाडे तोडली तरी त्याचा कोळसा बनविता येईना, मग त्याने तशीच लाकडे घेवून बाजाराचे ठिकाण गाठले, तेथे येणाऱ्या हुशार व्यापा-यांनी त्याच्याकडील चंदनाची लाकडे ओळखली व त्याला धन दिले. त्या मूर्ख माणसाला हेच कळेना कि मी ह्याच लाकडाचा कोळसा विकत होतो मला कमी पैसे मिळत होते पण आता मी लाकडे आणली तर इतके का पैसे मिळत आहेत. त्याने त्याचे कारण विचारले त्या वेळेला व्यापा-यांनी त्याला सांगितले '' अरे वेड्या ! चंदन आणि त्याचा कोळसा ह्यात काही तरी फरक आहे कि नाही. तुला जर हे कळत असते तर तू आता आम्हालाही विकत घेतले असते इतका श्रीमंत झाला असता. '' शेवटी त्या मूर्ख माणसाला चंदनाचे जंगले भेट मिळूनही त्याचा लाभ घेता आला नाही.

तात्पर्य-मिळालेल्या संधीचा ज्याला फायदा करून घेता येतो तोच शहाणा ठरतो 
वर्तमानपत्रातून संग्रहित

रविवार, १६ डिसेंबर, २०१२

भविष्य

कथा क्र. २

एका गावात एक ज्योतिषी राहत असे. हुशार पण गरीब होता. त्याचा ज्योतिषाचा अभ्यास इतका दांडगा होता कि त्याच्या गणिताप्रमाणेच जणू नियती घडवलेली असावी. पण नशिब कोणाला कुठे घेवून जाईल त्याचा नेम नाही. एके दिवशी त्याच्या बायकोबरोबर त्याचे जोरात भांडण झाले. बायकोने त्याला सांगितले कि आज तरी खायला घेवून या नाहीतर घरी येवू नका. हा बिचारा कोठे जावे कोणाला मागावे या विचारात होता. तितक्यात त्याला सुचले कि या देशा
च्या राजाकडे जावे आणि त्याला भविष्य सांगावे तो खुश झाला तर आपले दिवस चांगले येतील. किमान काही दक्षिणा तरी पदरी पडेल. या आशेने तो दरबारात गेला. राजाने सगळी विचारपूस केली आणि त्याला भविष्य सांगायला सांगितले. ज्योतिषाने गणित मांडले आणि त्याचा चेहरा एकदम पडला. राजा अचंबित झाला आता हसतमुखाने भविष्याविषयी बोलणारा हा माणूस एकदम का उदास झाला. त्याने आदेश दिला कि जे आहे ते खरे सांग. त्याने सांगितले कि राजा येत्या काही दिवसात तू मरणार आहेस. हे ऐकून राजाची बोबडी वळली आणि त्याने त्या ज्योतिषाला अंधार कोठडीत टाकायला सांगितले. मदत राहिली बाजूला पण नशिबी अंधार कोठडी आली. याला काही दिवस उलटले आणि एका सरदाराला यात ज्योतिषाची काही चूक नाही हे जाणवले आणि तो त्याची मदत करायला गेला. सरदाराने सांगितले कि तू राजाला आता असे भविष्य सांग कि तो खुश होईल. ज्योतिषी राजाच्या परवानगीने पुन्हा दरबारात गेला आणि त्याने गणित मांडले. त्याने राजाला सांगितले कि राजा मला तुझा आणि तुझ्या राज्याचा उज्ज्वल भविष्य काळ दिसत आहे. येणारा नवीन राजा हा खूप दयाळू , पराक्रमी आणि प्रजेचे हित साधणारा आहे. आणि लवकरच तुझा मुलगा हा नवीन राजा होणार आहे. हे आपल्या मुलाचे कौतुक ऐकून राजा खुश झाला आणि त्याने त्या ज्योतिषाचा सन्मान करून त्याला भरपूर दक्षिणा दिली. पण प्रत्यक्षात आपला मृत्यू होणार हे त्याने लक्षात घेतले नाही.

तात्पर्य-शब्दांचा वापर ज्याला चांगल्या पद्धतीने करता येतो तो निश्चित यशस्वी होतो.

संकल्प

कथा क्र.१

एक ऋषी ब-याच काळा पासून यज्ञ करायचा प्रयत्न होते परंतु त्यांच्या यज्ञाला काही यश येत नव्हते. त्यांच्या आश्रमा पासून तेंव्हा राजा विक्रमादित्य चालले होते. त्यांनी त्या ऋषींची हि उदासी पाहिली आणि म्हणाले," ऋषिवर! तुम्ही असे उदास का? माझ्या राज्यात तुम्हाला काही त्रास होतो आहे का? माझ्या राज्यातील कोणी उदास, निराश राहिलेले मला योग्य वाटत नाही." 
त्यावर ऋषी म्हणाले," महाराज! मी ब-याच काळापासून यज्ञाचा प्रयत्न करतो आहे पण जसा अग्नी मला अपेक्षित आहे तसा तो माझ्या यज्ञातून प्रकट होत नाही." त्यावर राजे विक्रमादित्य म्यानातील तलवार काढून म्हणाले," एवढीच गोष्ट आहे ना! मी आता या क्षणी संकल्प करतो कि, जर आज संध्याकाळपर्यंत या यज्ञात अग्निदेव प्रकट झाले नाहीत तर मी माझे शीर या तलवारीने कापून या यज्ञात आहुती देईन." यानंतर राजाने काही आहुत्या दिल्या व काही वेळातच त्या यज्ञात अग्निदेव प्रकट झाले. अग्निदेव राजांना म्हणाले," मी तुझ्या वर प्रसन्न आहे! वर माग! " त्यावर राजा म्हणाले " या ऋषींची इच्छा पूर्ण करा ! त्यांचा यज्ञ संपूर्ण करा! त्यांच्या यज्ञाचे त्यांना मनोवांच्छित फळ त्यांना मिळू दे!" यावर ऋषी म्हणाले " राजा ! तुम्ही एकतर अग्नीस प्रसन्न करून घेतले. पण मी हि खूप प्रयत्न केले होते कि! पण आपण काही आहुत्या दिल्या आणि अग्नीस प्रकट कसे काय केले? " यावर राजा काही बोलण्या आधीच अग्निदेव उत्तरले," ऋषिवर! राजाने जे काही केले त्यात त्यांचा स्वत:चा काहीच हेतू नव्हता आणि त्यांचे कार्य हे दृढ निश्चयाने आणि ध्यासपुर्वक केले होते. त्यामुळे ते कार्य सफल झाले. म्हणून मी त्वरित प्रकट झालो."

तात्पर्य-संकल्पपूर्वक केले जाणारे कोणतेही काम अपेक्षित उद्दिष्ट साध्य करते.

वर्तमानपत्रातून संग्रहित कथा