कथा क्र. 223
एकदा एका राजाने दवंडी पिटवली की जो कोणी
मला सर्वश्रेष्ठ धर्माचे महत्व समजावून सांगेल त्याला मी मोठे बक्षीस देईन व तो
धर्म मी स्वीकारेन. ही वार्ता ऐकताच सगळीकडे मोठमोठे धर्मगुरु, धर्मोपदेशक,
आचार्य राजाला आपल्या धर्माचे महत्व समजावून सांगण्यासाठी येऊ लागले. ते सर्वच
जण एकच गोष्ट आठवणीने करत होते की स्वत:च्या धर्माचे महत्व सांगताना मात्र
दुस-याला धर्माला कमी लेखत होते. दुस-याच्या धर्माची निंदानालस्ती करत होते.
यातून एकच झाले की, राजाला काहीच कळेना की कोणता धर्म सर्वश्रेष्ठ आहे व त्यामुळे
तो दु:खी होत होता. पण त्याने शोध सुरुच ठेवला. वर्षानुवर्षे हाच क्रम चालू
राहिला. राजा वृद्ध होत चालला. शेवटी राजा एका साधूच्या दर्शनास गेला. तेथे गेल्यावर
त्याने साधूला नमस्कार केला व म्हणाला,''साधूमहाराज, मी सर्वश्रेष्ठ धर्माच्या
शोधात आहे पण आजपर्यंत मला सर्वश्रेष्ठ धर्म कोणता हेच कळाले नाही.'' साधूने
राजाकडे पाहिले व म्हणाले,''सर्वश्रेष्ठ धर्म तर जगात अस्तित्वातच नाहीत. जगात
एकच धर्म आहे आणि बाकी सगळे हे त्या धर्माला फुटलेले अहंकार आहेत. धर्म तर तोच
असतो जिथे व्यक्ती निष्पक्ष असतो, पक्षपात करणा-या मनात धर्म राहूच शकत नाही.''
साधूचे हे बोलणे ऐकून राजा प्रभावित झाला. साधू पुढे जाऊन राजाला म्हणाला,''राजन,
चला आपण नदी पार करून पलीकडे जाऊया'' नदीतीरावर दोघे पोहोचले, त्यांनी तिथे अनेक
सुंदर नावा (होडया) पाहिल्या. साधू राजाला म्हणाले,'' राजे, चला आपण एका
सर्वश्रेष्ठ नावेतून पैलतीर गाठूया'' प्रत्येक नावेपाशी जाताच साधू त्या
नावेबद्दल काही ना काही चुक दाखवित असे व पुढे जात असे. असे करता करता दुपार झाली.
राजाला भूक लागली व त्रासून राजाने साधूला म्हटले,''महाराज आपल्याला नावेतून
फक्त पलीकडे जायचे आहे, अहो इतकी छोटी नदी आहे की पोहूनसुद्धा आपण पटकन पलीकडे
पोहोचून जाऊ मग त्याची इतकी चर्चा कशाला'' साधूने राजाकडे पाहिले व म्हणाले,''
राजन, हेच तर मला तुम्हाला सांगायचे आहे. धर्माला नाव नसतेच, धर्म आपल्याला स्वत:ला
पोहून पार करायचा असतो. दुसरा कोणी आपल्याला धर्मापलिकडे पोहोचवू शकत नाही. आपल्यालाच
जावे लागते.'' राजा सर्व काही समजून चुकला.