कथा क्र.203
सऊदी अरब मध्ये बुखारी नामक एक विद्वान राहत होते. ते
आपल्या प्रामाणिकपणासाठी खूप प्रसिद्ध होते. एकदा त्यांनी दूरचा समुद्रप्रवास
करण्याचे ठरविले व त्याप्रमाणे ते प्रवासाला निघाले. त्यांनी प्रवासात आपल्यासोबत
खर्चासाठी म्हणून एक हजार दिनार एका थैलीत बांधून घेतले होते. प्रवासाला सुरुवात
झाली, या प्रवासाला निघालेल्या अन्य काही जणांबरोबर बुखारी यांची ओळख
यानिमित्ताने झाली. बुखारी त्यांनी जीवनदर्शनाबद्दल सांगत असत. एक प्रवासी मात्र
बुखारीजींच्या जास्त सहवासात राहिल्याने तो त्यांचा जवळचा माणूस बनला.
बुखारीजी जिकडे जात, खात, हिंडतफिरत तिथे तो माणूस त्यांच्यासोबत असे. असेच एकदा
बुखारीजींनी स्वत:जवळची दिनारांची थैली उघडली व त्यातील रक्कम काढून ते मोजू
लागले. त्यावेळीही तो माणूस तिथेच होता. त्याने ती पैशांची थैली पाहिली व त्याला
त्या पैशांचा मोह झाला. त्याने ती थैली चोरायचा कट मनातल्या मनात शिजवला.
एकेदिवशी सकाळी तो जोरजोराने ओरडू लागला,’’ या अल्ला, या खुदा, मी
पुरता लुटलो गेलो, माझे एक हजार दिनार चोरीला गेले. चांगले थैलीत बांधून आणलेले
माझे पैसे कुणी हरामखोराने पळविले कुणास ठाऊक मला या संकटात कसे काय अडकावले आहे’’ जहाजावर असणा-या कर्मचा-यांनी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला, त्याला
समजावले की बाबा तुझे पैसे कुठेही जाणार नाहीत या लोकांपैकी जर कुणी घेतले असतील
तर आपण त्यांना ते परत देण्यास सांगू या. जहाजाच्या कर्मचा-यांनी सर्वाची झडती
घेण्यास सुरुवात केली. सर्वात शेवटी नंबर आला तो बुखारीजींचा. त्यांच्यापाशी
जाताच कर्मचारी म्हणाले,’’ अरे तुमची कशी बरे आम्ही झडती घ्यावी.
तुमची झडती घेणे म्हणजे सुद्धा देवाचा गुन्हा ठरेल. इतक्या प्रामाणिक आणि सच्च्या
माणसाला आम्ही कसे तपासू.’’ हे ऐकून बुखारी म्हणाले,’’ नाही, ज्याचे पैसे चोरीला गेले आहेत त्याच्या मनात माझ्याबद्दल शंका
राहिल, संशय बळावेल तेव्हा तुम्ही माझी व माझ्या सर्व सामानाची झडती घ्या’’ बुखारींची झडती झाली त्यात त्यांच्याकडे एक दमडासुद्धा मिळाला नाही. हा
प्रसंग इथेच संपला. मात्र दोन दिवसांनी न राहवून तो चोरीची बोंब ठोकणारा प्रवासी
बुखारींकडे आला व म्हणाला,’’ महाराज, तुमच्याकडे तर एक हजार दिनार
होते हे मला माहित आहे. मी स्वत: ते पाहिले आहेत मग ते कुठे गेले’’ बुखारी हसून म्हणाले,’’ मित्रा, मी आयुष्यात कधीच धनाची चिंता
केली नाही. मी फक्त प्रामाणिकपणा जपला. माझ्यावर ज्यावेळी झडतीची वेळ आली त्याच्याआधीच
काही क्षण मी ते पैसे समुद्रात फेकून दिले होते. जर माझेच पैसे माझ्याजवळ सापडले
असते तर कुठेतरी संशयाची सुई माझ्याभोवती फिरली असती म्हणून मी स्वत:च्या
हाताने धन समुद्रात टाकले. तुला खरे वाटणार नाही पण ही गोष्ट जहाजावरील
ब-याचजणांना माहिती आहे त्यामुळे तेच माझा आता खर्च करत आहेत. मी या हाताने धन
जरी टाकले असले तरी माझ्या प्रामाणिकपणामुळे मला अनेक हातांनी मदत केली आहे.
लोकांचा कायमच प्रामाणिक माणसांवर विश्वास बसतो.’’
तात्पर्य :- जगात
प्रामाणिकपणासारखा चांगला गुण नाही. प्रामाणिक माणसेच जगाला पुढे नेत आहेत हे ही
शाश्वत सत्य आहे.