मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७

जंगल चा राजा

कथा क्र. २७०

एका अरण्यात एक सिंह राहात होता. त्या अरण्यात तो एकटाच शक्तीशाली असल्यामुळे वाटेल तसा वागत असे व तेच योग्य असे म्हणत असे. एकदा सर्व प्राण्यांना एकत्र बोलावून तो म्हणाला, 'प्रत्येकाने मला आपल्या शक्तीप्रमाणे खाद्य पुरवावं म्हणजे रोज शिकार करण्याचा माझा त्रास वाचेल.' सगळ्यांनी ही गोष्ट मान्य केली. पण हा कर कोणत्या धोरणाने बसवावा याबद्दल निश्चित पद्धति ठरे ना. वाघ उभा राहून म्हणाला, 'मला वाटतं, कोणी किती पाप केलं ते पाहून त्या मानाने त्याच्यावर कराची आकारणी करावी, प्रत्येकाने आपल्या शेजार्‍यावरील कराची आकारणी करावी म्हणजे फसवेगिरीला जागा राहणार नाही.' त्यावर हत्ती लगेच म्हणाला, 'छे, छे, वाघोबाची ही युक्ती निरुपयोगी आहे. त्यामुळे द्वेष, जुलूम वाढतील. माझ्या मते प्रत्येकाचे सद्‌गुणावर कर बसवावा व तो ज्याचा त्यानेच द्यावा. अशा योजनेने सरकारी तिजोरीत पुष्कळ भर पडेल.'

तात्पर्य

- आपले दुर्गुण असतील तर ते झाकून ठेवायचे व थोड्याशा सद्‍गुणाचे मोठे प्रदर्शन करायचे असा प्रत्येकाचा स्वभाव असतो.

युक्तिच सर्वश्रेष्ठ

कथा क्र २६९

नदीच्या तिरावर एक कोळी मासे धरायला गेला. फार मोठे मासे नदीत सापडतील असे त्याला वाटले नाही म्हणून त्याने मोठे जाळे बरोबर घेतले नाही. एका काठीच्या टोकाला एक बारीक दोरी बांधून गळ वर ओढू लागला, पण मासा बराच मोठा असल्याने गळ लवकर ओढला जाईना. कोळ्याने विचार केला की, गळ लवकर ओढला तर मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी तोडून पळून जाईल तेव्हा त्याने बराच वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगदी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर काढला. तोपर्यंत मासा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता. त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती त्यात उरली नव्हती.

तात्पर्य

- युक्तीने सर्व प्रकारच्या अडचणीतून पार पडता येते.

भगवंताचा जन्मदिन

कथा क्र २६८

एका फकिराला एकदा स्वप्न पडले. स्वप्नात तो स्वर्गात गेला. तेथे रस्त्यावर मोठी गर्दी झालेली त्याला दिसली. त्या गर्दीतील एकाला त्याने विचारले, एवढे लोक का जमले आहेत ? त्या व्यक्तीने सांगितले, आज भगवानांचा जन्मदिन आहे. ते येथून जाणार आहेत. फकिराला आपल्या भाग्याचा हेवा वाटला. साक्षात भगवानाचे दर्शन घडणार. थोड्या वेळाने एका उमद्या घोड्यावरुन एक राजबिंडा तरुण आला. त्याच्यामागे हजारो लोक होते. त्याला पाहून फकिराने विचारले, हेच का ते भगवान ? ती व्यक्ती म्हणाली, नाही हे भगवान नाहीत. हे राम आहेत. त्यांना मानणारे लोक त्यांच्यामागून जात आहेत... याच पद्धतीने येशू, बुद्ध, महावीर... सर्वजण येऊन गेले. भगवानांची वाट पाहता पाहता मध्यरात्र झाली. सारे लोक कंटाळून निघून गेले. आणि त्या निर्मनुष्य रस्त्यावरुन एक म्हातारा एकटाच आला. फकिराने त्याला विचारले, आपणच भगवान ? म्हातारा म्हणाला, हो. फकिराने विचारले, मग आपल्यामागून कोणीच कसे येत नाही ? डोळ्यात अश्रू आणत तो म्हातारा म्हणाला, सारे राम, महावीर, बुद्ध, येशूबरोबर गेले. जो कोणाबरोबर जात नाही, तोच माझ्याबरोबर येऊ शकतो.

लोभी माणूस

कथा क्र २६७


एका लोभी माणसाने आपला सगळा पैसा शेतात पुरून ठेवला होता. तेथे दिवसातून दोन वेळा जाऊन त्या पुरलेल्या जागेकडे पाहून तो मोठे समाधान मानीत असे. ते त्याचे वागणे त्याच्या नोकराने पाहिले व त्याने तर्क केला की, आपला मालक या जागेकडे नेहमी पाहतो, तेव्हा तेथे काहीतरी पुरलेले असावे. रात्री त्याने तेथे जाऊन खणून पाहिले तर आत बरेच धन त्याला दिसले. ते घेऊन तो पळून गेला. दुसर्‍या दिवशी तो लोभी माणूस नेहमीप्रमाणे तेथे येऊन पाहतो तर सगळे धन चोरीला गेलेले त्याला दिसले. मग तो डोके बडवून घेत रडू लागला. तेव्हा त्याचा शेजारी त्याच्याजवळ येऊन रडण्याचे कारण विचारू लागला. लोभी माणसाने घडलेली हकीकत त्याला सांगितली. ते ऐकून शेजारी म्हणाला, 'अरे मला वाटतं की तसं तुझं काहीच गेलं नाही. आपला पैसा येथेच आहे, असं समजून तू पूर्वीप्रमाणेच या जागेकडे पहात जा म्हणजे झालं.'

तात्पर्य

- लोभी माणसे पैसे असून दरिद्री व अशांना पैशाचा उपयोग न होता दुसरेच कोणीतरी त्याचा उपयोग करून घेतात. जवळ असलेला पैसा वापरायचा नाही तर तो चोरीला गेल्यावर शोक करण्यात काय अर्थ ?

बढाई नको रे बाबा

कथा क्र २६६

एक माणूस फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्‍यापाजार्‍यांना तिखट मीठ लावून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, 'मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.' ऐकणार्‍या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, 'अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या कंकणाला आरसा कशाला ? या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं.' हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले.

तात्पर्य - आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही.

जगण्याचे भान

कथा क्र-२६५


एक तरुण माणूस फार छान्दिष्ट व उधळ्या होत्या. त्याने आपली सगळी मिळकत दारू, जुगार सारख्या व्यसनात घालविली. मग तो दरिद्री होऊन भिकार्‍यासारखा अरण्यात फिरू लागला. हिवाळ्यात एके दिवशी चांगले कडक उन्ह पडले होते. अशा वेळी तो माणूस नदीकाठी फिरत असता जवळच्या एका आंब्याच्या झाडावर एक कोकिळा बसलेली त्याने पाहिली. कडक उन्ह व कोकिळा पाहून त्याला वाटले की, खरंच उन्हाळा आला व आता पांघरुणाची काही गरज नाही, असा विचार करून त्याने आपले काही कपडे गहाण ठेवले व पैसे काढून तो आपल्या मित्राबरोबर जुगाराचा डाव खेळायला गेला. तेथे त्याने सगळे पैसे जुगारात घालविले. संध्याकाळी थंडी पडली; तेव्हा त्याला थंडीमुळे आजारपण आले. उन्हाळा असून असे कसे झाले याचे आश्चर्य करीत तो पुनः नदीवर गेला तर तेथे तो कोकीळ पक्षी थंडीने गारठून झाडाखाली मरून पडलेला त्याला दिसला. तो प्रकार पाहून तो चांगलाच शुद्धीवर आला व मग त्या पक्ष्याला म्हणाला, 'अरे, मी तुझ्यावर विश्वास ठेवून आपले कपडे गहाण ठेवण्याचा मूर्खपणा केला, तू मला फसवलंस आणि स्वतःचाही नाश करून घेतलास.'

तात्पर्य

- व्यसनी माणूस काही वेळा इतका बेसावध असतो की, त्याला सभोवतालच्या गोष्टीचेही भान रहात नाही.

कोल्हा

कथा क्र-२६३

एका कोल्ह्याचे शेपूट लोखंडी सापळ्यात सापडले असता ते तोडून तो पळाला. प्रथम त्याला आनंद झाला की प्राणांवरचे शेपटीवर निभावले. पण जेव्हा तो आपल्या मंडळीत जाऊ लागला, तेव्हा त्याला आपल्या लांडेपणाचे फार वाईट वाटून तो मनात म्हणाला, 'मी मेलो असतो तर बरं झालं असतं. पण ही अप्रतिष्ठा वाईट, पण जे झाले त्याला उपाय नाही. आता हेच कसं शोभवून नेलं म्हणजे झालं ! यासाठी काय बरं युक्ती करावी ?' याचा तो विचार करीत असता त्याला एक युक्ती सुचली ती अशी की आपण सर्व कोल्हे मंडळींना एकत्र जमवून सांगावे की, 'माझी शेपटी मी तोडून टाकून ही भूषणाची नवी पद्धत काढली आहे. ही चांगली आहे अन् तुम्हीसुद्धा अवश्य करावं.' मग त्याने सगळ्या कोल्ह्यांना आपल्या घरी बोलावले व आपल्या युक्तीप्रमाणे त्यांच्यापुढे भाषण दिले. तो म्हणाला, 'अहो, या शेपटीपासून काहीच फायदा नाही. आपल्याला शेपटी म्हणजे ओझंच. शेपटी तोडून टाकल्यानं एक प्रकारचं सौंदर्य येऊन शिवाय पळण्यातली अडचण दूर होते. मी ह्या गोष्टीचा अनुभव घेतला आहे नि शेपटी तोडल्यापासून सुखी आहे. हे सुख तुम्हाला प्राप्त व्हावं असं मला वाटलं.' इतके बोलून आपले कितीजण ऐकतात हे पाहण्यासाठी तो सगळ्यांकडे पाहू लागला. इतक्यात एक म्हातारा कोल्हा त्याची लबाडी ओळखून मान वाकडी करून म्हणाला, 'अहो, पंडित महाराज, आपली हुषारी पुरे. शेपटी काढल्यामुळे तुमचं कल्याण झालं असेल, यात शंका नाही. अन् आमच्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्हीही आपली शेपटी कापून टाकू. तोपर्यंत तुम्ही आम्हाला आग्रह करू नये हेच बरं.'

तात्पर्य

- आपली अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आपले दोष हे नसून गुण आहेत असे बरेचजण सांगतात पण शहाणे लोक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत.

चांगला राजा

कथा क्र २६२

एकदा एका तळ्यातला बेडकांना वाटले, की आपल्याला एक राजा हवा. म्हणून त्यांनी देवाकडे तशी मागणी केली. तेव्हा देवाला हसूच आले व त्याने 'हा घ्या राजा !' म्हणून एक लाकडी ओंडका तळ्यात टाकला. तो पाण्यावर पडताच पाणी उसळले. ते पाहून सगळे बेडूक घाबरले आणि बाजूला जाऊन बसले. थोड्या वेळाने पाणी शांत झाल्यावर तो ओंडका काही हालचाल करीत नाही असे पाहून त्याच्यावर चढले व उड्या मारू लागले. मग त्यांना वाटले की या राजापेक्षा दुसरा चांगला राजा हवा. तेव्हा त्यांनी देवाची प्रार्थना करून दुसरा चांगला राजा पाठवण्याची विनंती केली. देवाने एक बगळा पाठविला. त्याने बेडकांना मारून खायला सुरुवात केली. म्हणून बेडकांनी देवाकडे अजून चांगल्या राजाची मागणी केली. ते ऐकून देव म्हणाला, 'मी तुम्हांला पहिला राजा पाठवला होता तो तुम्हांला आवडला नाही. आता तुमचं कर्म तुम्हीच भोगा.'

तात्पर्य

- देवाने ज्या स्थितीत ठेवले आहे त्यात समाधानी असावे.

घुबड आणि टोळ

कथा क्र २६२


एक म्हातारे घुबड झाडाच्या ढोलीत झोपले असता एका टोळाने झाडाखाली गाणे म्हणायला सुरुवात केली. त्याने गाणे म्हणू नये म्हणून घुबडाने त्याला विनंती केली, बाबा रे, तू येथून जा, मला विनाकारण त्रास देऊ नकोस. तुझ्या किरकीरीने माझी झोप मोडते.' यावर तो टोळ त्या घुबडाचा धिक्कार करून त्याला शिव्या देऊ लागला. तो म्हणाला, 'तू लबाड, चोर आहेस, रात्रीचा बाहेर जाऊन चोरी करून पोट भरतोस नि दिवसा झाडाच्या ढोलीत लपून बसतोस.' त्यावर घुबड म्हणाले, 'अरे तू आता आपलं तोंड सांभाळ, नाहीतर मग पस्तावशील.' तरीही टोळ ऐकून घेईना. घुबडाची निंदा करून तो पुन्हा गाऊ लागला, मग घुबडाने त्याची खोटी स्तुती करायला सुरुवात केली, 'बाबा रे, क्षमा कर. तुझं गायन अगदी गोड आहे. माझ्या इतका वेळ ते लक्षात आलं नाही. तुझ्यासारखा गाणारा तूच. तुझ्या गाण्यापुढे कोकीळाही लाजेल. तुझा स्वर सारंगीपेक्षा चांगला आहे. बरी आठवण झाली. माझ्याकडे एक अमृताची कुपी आहे. त्यातले थोडेसं मी तुला देतो. फार वेळ गात राहिल्याने तुझा गळा अगदी सुकून गेला असेल नाही का ?' टोळाला खरोखरच तहान लागली होती, तो घुबडाजवळचे अमृत घेण्यासाठी त्याच्याजवळ गेला. लगेच घुबडाने त्याला उचलून आपल्या तोंडात टाकले.

तात्पर्य

- आपल्याला जे आवडते ते सर्वांनाच आवडेल असे नाही, हे लक्षात घेऊन दुसर्‍याच्या आवडीनिवडीचा जे विचार करीत नाहीत ते शेवटी आपला नाश करून घेतात.

-घार व कबुतरे

कथा क्र.२६१

एका खुराड्यात काही कबुतरे होती. त्यांना मारून खावे या उद्देशाने एक घार त्या खुराड्याभोवती फार दिवस घिरट्या घालून कंटाळली, पण एकही कबुतर तिच्या हाती लागले नाही. मग तिने एक युक्ती केली. ती मोठ्या संभावितपणे कबुतरांजवळ गेली व त्यांना म्हणाली, 'अहो, माझ्यासारख्या बळकट व शूर पक्ष्याला जर तुम्ही आपला राजा कराल तर ससाणे नि तुमचे शत्रू यांच्यापासून मी तुमचे रक्षण करीन.' ससाण्याकडून होणार्‍या त्रासाला कबुतरे इतकी कंटाळली होती की त्यांनी घारीचे म्हणणे लगेच मान्य केले व तिला आपल्या खुराड्यात राहायला जागा दिली. पण दररोज ही घार खुराड्यातल्या एका कबुतराला मारून खाते, असे त्यांच्या लवकरच लक्षात आले व विचार न करता ह्या दुष्ट पक्ष्याला घरात जागा दिल्याबद्दल त्यांना फार पश्चात्ताप झाला.

तात्पर्य

- एका शत्रूपासून रक्षण व्हावे म्हणून दुसर्‍या शत्रूचे साहाय्य घेणे मूर्खपणाचे होय.

सोमवार, २७ नोव्हेंबर, २०१७

गरीबाची हेटाळणी

कथा क्र २६०

एक बोधकथा
प्रयाग (गया) येथे एक खूप चांगले पंडित राहत होते. एकदा नेपाळचे राजे सामान्य वेशात पंडीतामागे फिरू लागले,"माझ्या आजोबांचे पिंडदान करून द्या, माझ्याजवल  काहीच पैसे नाहीत थोडेसे लाडू भरून आणलेत तेच दक्षिणा  स्वीकार करून घ्या." जे लोभी पंडित होते त्यांना पैशाची हाव होती त्यांनी या सामान्य वेशातील राजांना नकार दिला. अशा वेळेस राजांना तेथील  एक पंडित गाठ पडला. त्याला महाराजांनी पिंडदान करण्याची विनंती केली. त्याने ती कबूल केली. तो म्हणाला ," भाऊ ! पैशाची काही बाब नाही. मी पिंडदान करून देतो." त्या पंडिताने फाटक्या  तुटक्या कपड्यात आलेल्या राजांचे पिंडदान पूर्ण करून दिले. यावर महाराज खुश झाले. त्या वेळेस ते त्याला म्हणाले,"पंडितजी! या कार्यानंतर काही न काही दक्षिणा मी तुम्हास देणे लागतो. मी घरून काही लाडू आणले आहेत त्याचा तुम्ही स्वीकार करावा.मात्र या लाडूचे गाठोडे तुम्ही घरी जाऊन उघडावे." पंडित म्हणाले ," बर भाऊ तुम्ही गरीब दिसत पण तुम्ही प्रेमाने दिलेल्या लाडूचा मी स्वीकार करतो." या नंतर पंडितास ते गाठोडे देऊन राजे निघून गेले. पंडिताने घरी जाऊन जेवायला बसायची तयारी केली. अचानक त्याला लाडूची आठवण झाली त्यावर त्याने ते गाठोडे सोडून पहिले असता तो चकित झाला कारण त्या गाठोड्यात वीस सोन्याचे लाडू होते.

तात्पर्य:- लोभी पंडितांनी लाडू नको म्हणून गरीबाची हेटाळणी केली मात्र त्याच गरिबाने वीस सोन्याचे लाडू दिले.

कथासंग्रहातून साभार
संदीप जोशी

विचार करा

कथा क्र.२५९

एक ब्राह्मण दुपारी भिक्षा मागण्याकरीता एका दारात उभा राहीला , ''ॐभवती भिक्षांदेहि " अशी गर्जना केली.

घरात एकटीच म्हातारी होती, ती म्हणाली, "महाराज ! मी एकटीच आहे, घरात आमटी भात तयार आहे, चार घरात भिक्षा मागण्या पेक्षा आज इथेच जेवा."

ब्राह्मण "हो" म्हणाला

 ब्राम्हणाचे पोटभर जेवण झाले ब्राम्हणाने ताक मागीतले.

*भोजनांते तक्रं पिबेत* अस म्हणतात.

नेमकं म्हातारीच्या घरात त्या दिवशी ताक नव्हते.

ती म्हणाली, "थांबा महाराज मी आत्ता शेजारणी कडून ताक घेवुन येते."

तिने शेजारणीला ताक मागीतले , शेजारणीने भांडभर ताक दिले,

आजीने ब्राम्हणाच्या भातावर ताक घातले , ब्राम्हणाने भुरका मारला तो शेवटचाच.
ब्राह्मण तडकाफडकी मेला.

चित्रगुप्त आणि यमधर्माला प्रश्न पडला की, या कर्माचा भागीदार कोण?

 कारण ब्राम्हणाने आत्महत्या केली नव्हती.

म्हातारीने अतिथीधर्म पाळला होता तिने ब्राम्हणाला मारले नव्हते,दारात आलेल्या अतिथ्याला पोटभर जेवण दिले होते.

शेजारणीने शेजारधर्म पाळला होता कोणी दारात मागायला आले तर नाही म्हणू नये म्हणून तिने ताक दिले होते. आणि ताक पिवुन ब्राह्मण मेला होता कारण त्या ताकात विष होते आणि हे विष एका नागाच्या तोंडातून ताकात पडले होते.

यमधर्माने नागाला जाब विचारला, नाग म्हणाला यात माझा काय दोष ? घार मला पकडून आकाशमार्गे चालली होती,माझे तोंड खाली झाले होते त्यामुळे माझ्या तोंडातील गरळ त्या ताकात पडली म्हणून ब्राह्मण मेला.

यमाने घारीला जाब विचारला , घार म्हणाली यात माझा काय दोष ? सापाला पकडून खाणं हा माझा धर्म आहे.

प्रत्येकाने आपला धर्म पाळला होता मग आता कर्माचा भागीदार कोण ? कोणाच्या माथी मारायचे हे कर्म ?

चित्रगुप्त यमाला म्हणाला, "चला माझ्याबरोबर या कर्माचे भागीदार मी तुम्हाला दाखवतो."

 दोघेही गुप्तरूपाने ब्राम्हण मरून पडला होता तिथे आले.

 हा!हा! म्हणता संपूर्ण गावात बातमी पसरली की, म्हातारीच्या घरी ब्राह्मण जेवता जेवता मेला.

हळुहळु आळीतल्या बायका तिथं जमल्या.

 शांताबाई उज्वला ताईना म्हणाल्या, "काय हो उज्वलाताई ब्राम्हण कसा मेला कळले का हो ?"

 उज्वलाताई म्हणाल्या, "नाही हो"

 तेंव्हा शांताबाई म्हणाल्या, "आहो कसं सांगु s s s तुम्हाला , या ब्राम्हणाकडे भरपूर द्रव्य होते , म्हातारीने भोजनात विष घालून त्याला ठार मारले व त्याचे द्रव्य हडप केले."

 चित्रगुप्त यमाला म्हणाला पहिल्या क्रमांकावर हिचे नाव लिहा.

आणि तिथे जे जे या घटनेबद्दल बोलत होते त्यांची नावे रजिस्टर मधे लिहुन त्यांच्या माथी मारले गेले.

 थोडक्यात कर्माचा इतका सूक्ष्म विचार केला आहे. एखाद्या घटने बद्दल सत्य माहीत नसताना बोलणे हे सुद्धा पाप आहे.

म्हणून आजचा सुबोध दिला आहे.
प्रत्येकाच्या कानात आणि डोळ्यात देवाने चार बोटाचे अंतर ठेवले आहे.

 त्याचे कारण *जोपर्यंत एखादी घटना तुम्ही प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही तो पर्यंत कोणाच्या तरी तोंडून निघालेली बातमी कानाने ऐकून तुमच्या तोंडाने बोलू नका हे सुद्धा एक प्रकारचे पापच आहे.*

*" आयुष्य खुप सुंदर आहे "*.

मुंगी व कोशातला किडा

कथा क्र.२५८

कथेचे नाव-

एकदा एक मुंगी आपले खाद्य शोधत फिरत असता कोशातून नुकताच एक किडा बाहेर पडलेला तिला दिसला. कोशातून बाहेर पडलेले त्याचे पाय तो हळूहळू हालवीत होता. ते पाहून मुंगी म्हणाली, 'अरेरे, काय ही तुझी स्थिती ? मला वाटेल तिकडे फिरता येतं. पण तुला या कोशात बंदीवान होऊन दिवस काढावे लागतात. तेव्हा तुझ्या व माझ्या स्थितीत फारच अंतर आहे असं म्हटले पाहिजे.' यावर किडा काहीच बोलला नाही. पुढे काही दिवसांनी ती मुंगी पुनः तेथे गेली असता त्या किड्याचे फक्त कवच मात्र तेथे पडले असून तो किडा कोठेतरी निघून गेला आहे असे तिला दिसते. ती इकडे तिकडे फिरत आहे तोच एक सुंदर पतंग आपल्या पंखांनी तिला वारा घालत असताना तिला दिसला. तो तिला म्हणाला, 'अग, त्या दिवशी बंदिवान म्हणून तू माझी कीव करीत होतीस, माझ्यापेक्षा तुझी स्वतःची स्थिती बरी असं म्हणत होतीस, तोच कोशातला किडा मी आहे हे लक्षात घे. आपल्याला वाटेल तिकडे फिरता येतं अशी बढाई मारायची असेल तर खुशाल मार. तोपर्यंत मी सहज थोडा आकाशात फिरून येतो.' इतके बोलून त्याने एक भरारी मारली व उंच आकाशात गेला.

तात्पर्य

- संकटात असलेला माणूस पुनः कधीही वर डोके काढणार नाही अशा समजुतीने त्याचा उपहास करून त्याच्याजवळ स्वतःच्या वैभवाबद्दल बढाई मारणे हा मूर्खपणा होय.

बळी तो कान पिळी

कथा क्रः २५७


एकदा प्राण्यांमध्ये रोगाची साथ सुरू होऊन हजारो प्राणी मरू लागले. आपण फार पाप केल्यामुळे देवाने हा कोप केला आहे असे सर्व प्राण्यांना वाटून त्यांनी आपली वाईट कृत्ये कबूल करायचे ठरविले व जो सर्वात मोठा अपराधी ठरेल त्याने देवाच्या कोपाला शांत करण्यासाठी बळी जावे असे ठरले. ठरल्या वेळी सगळेजण हजर झाले व न्यायाधीशाच्या जागी एकमताने कोल्ह्याची निवड केली गेली. प्रथम सिंहाने पुढे होऊन कबुली दिली, 'मी फार गरीब कोकरांना ठार मारलं, एवढंच नव्हे तर फार भूक लागल्याने एका धनगरालाही ठार मारून खाल्लं.' त्यावर न्यायाधीश म्हाराज मोठ्या गंभीरतेने म्हणाले, 'एखाद्या सामान्य प्राण्याने अशा गोष्टी केल्या असत्या तर नक्कीच मोठा अपराध ठरला असता. पण महाराजांना इतरांपेक्षा जास्त सवलती असतात. मूर्ख बकर्‍या नि एकच धनगर खाणं हा काही मोठा अपराध नाही.' या निकालामुळे हिंस्त्र प्राण्यांनी कोल्ह्याची तारीफ केली. यानंतर वाघ, चित्ता, अस्वल वगैरे प्राण्यांनी आपापल्या कबूली दिल्या व कोल्ह्याने वरीलप्रमाणेच निकाल दिला. शेवटी एक गरीब गाढव पुढे येऊन म्हणाले, 'एका शेतकर्‍याच्या इनाम जमिनीतलं मूठभर हिरवं गवत मी खाल्लं. आणि त्याबद्दल मला पश्चात्ताप' काय पश्चात्ताप ?' न्यायाधीश झालेले कोल्होबा ओरडले. 'अरे पाप्या नक्कीच तुझ्या पापामुळे सध्या हा देवाचा कोप झालेला आहे. यालाच मरणाची शिक्षा योग्य आहे !' असा निकाल कोल्होबांनी देताच सगळ्यांनी मिळून त्या बिचार्‍या गाढवाला ठार मारले.

तात्पर्य

- बळी तो कान पिळी.

मराठी बोधकथा

समाधान

कथा क्र २५६
         
एक श्रीमंत सावकार होते , अलोट संपत्ती होती , पुढील सातपिढ्या जरी बसून खाल्या तरी संपणार नाही एवढी संपत्ती मिळवली होती, तरी पण हा श्रीमंत सुखी नव्हता . मनात काहीतरी विवंचना होती त्यामुळे रात्रभर झोप यायची नाही त्यामुळे खऱ्या सुखाला तो वंचित झाला होता.

त्याने प्रत्येकाला विचारावे मी काय करू म्हणजे या विवंचनेतून मी सुटेन आणि मला सुखाची झोप लागेल ! त्याला कोणीतरी सांगितले तू संताना शरण जा म्हणजे संतचं यातून तुला सोडवतील .

श्रीमंत संतांच्या शोधार्थ निघाला  वाटेत एका झाडाखाली एक साधु महाराज बसले होते त्याना नमस्कार करून श्रीमंत म्हणाला महाराज मला काहीही कमी नाही पुढील सात पिढ्या बसुन खातील एवढं मिळवलं आहे तरी मी सुखी नाही,  एक विवंचना मला झोप येवु देत नाही त्यामुळे मी सुखी नाही.

साधु महाराज म्हणाले आधि विवंचना काय आहे ते सांग म्हणजे त्यातून कसे सुटायचे ते सांगतो , श्रीमंत म्हणाला महाराज तसं म्हणाल तर मला काहीही विवंचना नाही पण एकच विवंना आहे आणि ती म्हणजे माझ्या आठव्या पिढीचे काय होईल ? कारण सात पिढ्याचे कमवून ठेवले आहे चिंता आहे ती आठव्या पिढिची !
साधु महाराज हसले आणि म्हणाले काळजी करु नकोस मी तुला यातून सोडवतो .

साधुनि त्याला एक किलोभर तांदळाची पिशवी दिली आणि सांगितले की त्या डोंगरावर एक म्हातारी एका झोपडीत राहते तिला हे तांदूळ देवून ये म्हणजे मी तुला तुझ्या विवंचनेतून मुक्त करतो .

तांदूळ घेऊन श्रीमंत म्हातारीच्या झोपडीत आला ज्या झोपडीला दार सुद्धा नव्हते. ती भगवंताच्या भजनात दंग होती, तिची भावसमाधी लागली होती, श्रीमंताच्या पायाच्या आवाजाने आजीची भावसमाधी भंग पावली , तिने वर बघितले आणि म्हणाली का आलास बाबा ईथे ? तो म्हणाला म्हातारे तुला तांदूळ द्यायला आलो आहे हे घे मग मी जातो . ती म्हणाली कारे तुला मागीतले होते का ? तुझ्या समोर हात पसरला होता का ? नाही ना ? मग का आणलेस तांदूळ ? ही पिशवी उचल आणि चालायला लाग तो म्हणाला मला त्या झाडाखाली बसलेल्या साधुने पाठवले आहे म्हणून मी आलोय, ती म्हणाली त्या साधुला जाऊन सांग की अजून दोन दिवस पुरतील एवढे तांदूळ माझ्या झोपडीत आहेत .

श्रीमंताने आपली अक्कल चालवली तो म्हणाला म्हातारे तिसर्‍या दिवसाला होतील राहू दे.ती म्हणाली माझ्या तिसऱ्या दिवसाची चिंता तुलाही नको आणि त्या साधुलाही नको त्याला सांग माझ्या तिसर्‍या दिवसाच्या तांदळाची चिंता मी ज्याच्यावर सर्वस्वाचा भार टाकून या निर्जन स्थळी भजन करत बसलेय त्याला आहे.
हे ऐकून श्रीमंत पिशवी घेऊन परत आला आणि साधु समोर पिशवी ठेवून निघाला. साधुने त्याला हाक मारली अरे ! विवंचना घेऊन आला होतास ना ? मी तुला त्यातुन सोडवणार आहे.  श्रीमंत खाली मान घालून म्हणाला महाराज मला उत्तर मिळाले तिसऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता न करणारी म्हातारी जेवढी सुखी आहे तेवढा मी महामूर्ख दुःखी आहे.

☆★☆★अर्थात ★☆★☆

या कथेचा आशय हा आहे की,  सुख कशात आहे हेच आम्हाला कळत नाही. तर सुख समाधानात आहे. आणि हे समाधान बाजारात विकत मिळत नाही. ते भगवंताच्या भजनानेच मिळते .

भोजनात सुख नसून भजनात सुख आहे. आमच्या जीवनातील भजन नाहीसे झाले आणि आम्ही भोजनाला प्राधान्य दिले म्हणून आम्ही दुःखी आहोत.