मंगळवार, २९ जानेवारी, २०१३

(सेवा)


(कथा क्र. २७)  

गंगेच्या काठी गुरु अभेंद्र यांचा आश्रम होता. एकदा देशात भीषण दुष्काळ पडला, गुरु अभेंद्र यांनी संकटग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्या तीन शिष्यांना बोलावून घेतले. व सांगितले," अशा संकटाच्या वेळी आपण पीडितांची सेवा करायला पाहिजे. तुम्ही तिघे वेगवेगळे जावून उपाशी लोकांना अन्नदान करावे." यावर शिष्य म्हणाले,"गुरुजी! आपण इतक्या लोकांना भोजन कसे काय देवू शकतो? आपल्याजवळ न अन्नाचा साठा आहे ना अन्न खरेदी करण्यासाठी धन." तेंव्हा गुरु अभेंद्र यांनी त्या तिघांना एक थाळी देत म्हणाले," हि दिव्य थाळी आहे. या थाळीजवळ तुम्ही जितके अन्न मागाल तितके ती देईल. तिन्ही शिष्य ती थाळी घेवून निघाले. दोन शिष्य एका ठिकाणी बसले, तिथून जो कोणी जाईल त्याला भोजन देत असत. परंतु तिसरा शिष्य मात्र गप्प बसला नाही तर उपाशी लोकांना शोधून शोधून भोजन नेवून देत राहिला. काही दिवसांनी तिघेही जेंव्हा आश्रमात परतले तेव्हा गुरुनी तिसऱ्या शिष्याची खूप स्तुती केली. पहिल्या दोघांना याचे आश्चर्य वाटले. ते म्हणाले,"गुरुजी! दुष्काळपीडितांची सेवा तर आम्हीपण केली आहे. मग तुम्ही तिसऱ्या शिष्याची विशेष स्तुती का करता आहात?" गुरु म्हणाले," तुम्ही दोघेहि एका जागी बसून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अन्नदान करीत होता. असे केल्याने जे लोक तुमच्यापर्यंत पोहोचण्यास असमर्थ होते त्यांना तुमची सेवा मिळाली नाही. मात्र तिसऱ्याने लोकांना जागेवर जावून भोजन दिले त्याची सेवा किंवा मदत हि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली. त्यामुळे त्याची सेवा हि स्तुतीलायक आहे."



तात्पर्य- खरी सेवा तीच असते जी पुढे होवून केली जाते व सर्व लोकांपर्यंत पोहोचते. 
वर्तमानपत्रातून संग्रहित

सोमवार, २८ जानेवारी, २०१३

(सेनापती आणि मार्गदर्शक)


(कथा क्र.२६) 

एका गावात एक मार्गदर्शक समस्यांचे अत्यंत समाधानकारक निरसन करीत असे. एकदा त्या देशाचा सेनापती त्याच्याकडे गेला व म्हणाला,"महाराज! मला स्वर्ग व नरक यातील फरक समजावून घ्यायचा आहे. आपण कृपया समजावून सांगाल का?" मार्गदर्शकाने त्याच्याकडे पाहिले व त्याला त्याचा परिचय विचारला. सेनापतीने त्याच्या वीरतापूर्ण कार्याच्याबाबतीत सविस्तर सांगितले. त्याची सर्वमाहिती ऐकून मार्गदर्शक म्हणाला,"चेहऱ्याने तर तुम्ही सेनापती नाही तर भिकारी दिसता. माझा विश्वास बसत नाहीये कि तुमच्याकडून तलवारसुद्धा उचलत असेल." हे ऐकून सेनापतीने रागाने म्यानातून तलवार उपसली. सेनापतीच्या या कृतीकडे पाहत मार्गदर्शक म्हणाला,"अरे वा ! तुम्ही तर तलवारही बाळगता, लोखंडाची असती तर तुमच्या हातून गळून पडली असती." हे उद्गार ऐकताच सेनापतीच्या तळपायाची आग मस्तकात गेली, त्याने तीच तलवार घेवून मार्गदर्शकाच्या दिशेने हल्ला करण्यास सुरुवात केली, हातातील तलवारीने तो आता मार्गदर्शकावर घाव घालणार इतक्यात मार्गदर्शक म्हणाले," हे सेनापती ! बस हाच तो नरक! क्रोधाने उन्मत्त होवून आपण विवेक घालवून माझ्यावर हल्ला केला आणि माझी हत्या करण्यास तयार झालात यालाच नरक असे म्हणतात." हे ऐकून सेनापतीने तलवार म्यानात ठेवली. तेंव्हा मार्गदर्शक म्हणाले,"विवेक जागृत झाल्यावर व्यक्तीला आपल्या चुकांची जाणीव होते. विवेक गमावून कोणतेही कार्य केल्यास नाशाला कारणीभूत व्हावे लागते. " सेनापतीला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.



तात्पर्य- आत्मनियंत्रणातून विवेक उपजतो. विवेक जागृत ठेवल्यास अनेक वाईट प्रसंगातून सुटका करून घेता येते. 

वर्तमानपत्रातून संग्रहित

शनिवार, २६ जानेवारी, २०१३

(दुसरी बाजू )

(कथा क्र.२५) 


एकदा बिरबलाला पर्शिया देशात भेटीसाठी पाठविण्यात आले होते. बिरबलाने त्या देशातील सर्व ठिकाणांना भेटी दिल्या. सगळी स्थाने पाहिली. थोर मोठ्यांच्या गाठीभेटी घेतल्या व सर्वात शेवटी राजाच्या भेटीसाठी दरबारात गेला. बराच वेळ सर्व विषयांवर चर्चा झाल्यावर कुणीतरी अचानकच बिरबलाला विचारले,"महाशय! आपले देशाचे बादशहा आणि पर्शियाचे बादशहा यांच्यात तुम्हाला काय फरक जाणवला? किंवा यांची कशी तुलना तुम्ही कराल? " बिरबलाने तात्काळ त्याचे उत्तर दिले,"अहो! तुमचे बादशहा म्हणजे अगदी पौर्णिमेच्या चंद्रासारखे तेजस्वी आहेत आणि आमचे बादशहा हे प्रतिपदेच्या चंद्राइतके तेजस्वी आहेत." या उत्तरावर त्या दरबारातील सर्वचजण खुश झाले. त्या बादशाहाने तर बिरबलाचा खूप मोठा सन्मान केला. आपल्या देशी जेंव्हा बिरबल परतला तेंव्हा त्याच्या त्या विधानाची कीर्ती अगोदरच पोहोचली होती. बादशहा व सर्व दरबारी यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. आपल्या बादशहाला परदेशात जावून कमी लेखणे हे अनेकांच्या जिव्हारी झोंबले. बादशाहालाहि हे आवडले नाही त्याने बिरबलाला विचारले,"तू परदेशी गेला असता आपल्या बादशहाबद्दल असे उदगार का काढले?" यावर बिरबल म्हणाला,"महाराज! तुम्हाला प्रतिपदेचा चंद्र म्हणजे दिवसेंदिवस समृद्ध होत जाणारा चंद्र अशी उपमा दिली. तर पर्शियाच्या बादशाहाला पौर्णिमेच्या चंद्र म्हणजे कलेकलेने कमी होत जाणारा अशी उपमा दिली आहे. मला माझे बादशहा हे दिवसेंदिवस समृद्ध होत गेलेले पाहायचे आहेत. त्यामुळे मी असा फरक केला." बादशहाचे या उत्तराने समाधान झाले.

तात्पर्य- कोणत्याही गोष्टीत नेहमी सकारात्मक बाजू पहावी. एखाद्या गोष्टीला दुसरी पण बाजू असू शकते तेंव्हा दुसरी बाजू समजून घ्यावी.

वर्तमानपत्रातून संग्रहित




शुक्रवार, २५ जानेवारी, २०१३

(समाधान)


(कथा क्र.२४) 




कोणे एके काळी एक अतिशय आनंदाने व समाधानाने जगणारा कावळा होता. एके दिवशी त्याने एका शुभ्र अशा हंसाला पाहिले. तो त्या हंसाकडे गेला व म्हणाला," तू किती शुभ्र व सुंदर आहेस. मी मात्र काळा, कुरूप आहे. तूच या जगातील सर्वात आनंदी पक्षी असला पाहिजे." हंस म्हणाला," एका पोपटाला पाहीपर्यंत मलाही असेच वाटत होते. पण त्याच्याकडे सुंदर असे दोन रंग आहेत. मला मात्र एकच पांढरा रंग मिळाला आहे. तू पोपटाची भेट घे, त्याची ऐट बघ, त्याचे सौंदर्य बघ मग तोच कसा आनंदी पक्षी आहे हे तुला पटेल." हे ऐकून कावळा पोपटाकडे गेला. पोपटाला त्याने हंसाप्रमाणे विचारले असता पोपट म्हणाला," काय सांगू मित्रा! मला हि माझ्या सौंदर्याचा अभिमान होता पण मोरापेक्षा या जगात कुणीच सौंदर्यवान पक्षी नाही. त्याच्याकडे कितीतरी रंग आहेत. तो किती सुंदर आहे." पोपटाचे हे बोलणे ऐकून कावळा मोराच्या शोधात निघाला. खूप शोधल्यानंतर एका प्राणीसंग्रहालयात एका बंद पिंजऱ्यात मोर ठेवलेला दिसला. त्याच्याभोवती अनेक लोक त्याला पाहण्यासाठी गोळा झाले होते. कावळा तेथे गेला आणि म्हणाला," प्रिय मोरा! तू फारच सुंदर आहेस. लोक तुझ्या जवळ येवून तुझे गुणगान करतात आणि मला मात्र बघितले हाकलून देतात. मला खात्री आहे कि पृथ्वीवरचा सर्वात आनंदी पक्षी तूच आहेस." मोर म्हणाला,"मलाहि असेच वाटत होते. मी आनंदी का नसावे? सौंदर्यात माझी तोड नाही, पण हेच सौंदर्य माझ्या दुखा:चे कारण ठरले आहे. मी सुंदर असल्यानेच मला कैद करून पिंजऱ्यात टाकले आहे. तुझ्यासारख्या कावळ्यांना कोणीही पिंजऱ्यात ठेवत नाही.ते केंव्हाही मुक्त संचार करू शकतात. त्यामुळे काकराज! तूच या जगातला सर्वात आनंदी पक्षी असावास!"



तात्पर्य- प्रत्येकाला आपल्यापेक्षा दुसऱ्याची स्थिती चांगली वाटत असते. हे टाळण्यासाठी आपल्याला स्व-समाधानाच्या स्थितीपर्यंत पोहोचले पाहिजे. ज्याठिकाणी आपल्याला आनंद मिळू शकेल. 

वर्तमानपत्रातून संग्रहित

मंगळवार, २२ जानेवारी, २०१३

(झोपडी)


(कथा क्र २३) 



मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर गावात बाजारपेठेत भोजराज लेखवाणी या सिंधी व्यापाऱ्याच मोठा कापडाचा दुकान होतं. त्याचा कापडाचा धंदा उत्तमप्रकारे चाललं होतं. लोक कापड खरेदीसाठी इतर कुठेही न जाता फक्त त्याच्याकडेच कपडे खरेदी करत. एकदा एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मोठमोठे कलाकार बऱ्हाणपूरला गेले होते. कार्यक्रम संपल्यावर भोजराजानी या सगळ्या कलाकारांना जेवणासाठी नेलं होतं. जेवणाची व्यवस्था एका चंद्रमौळी टपरीत केली होती. हि टपरी बाहेरून एखादी झोपडीच वाटत होती. त्याची उंचीही खूपच कमी होती. झोपडीच्या छताला मध्येमध्ये भोके पडली होती. त्यातून आभाळातील चांदण्या दिसत होत्या. भोजन मात्र उत्तम होते. झोपडीच्या शेजारीच भोजराजाचा आलिशान बंगला दिसत होता. पण जेवण मात्र या टपरीत का? असा प्रश्न एका कलाकाराने भोजराजाला विचारला, तेंव्हा ते म्हणाले," सिंधमधून आम्हाला हाकलून दिल्यावर घर ना दार या अवस्थेत आमचे कुटुंब पहिल्यांदा इथे आलं. तेंव्हा या झोपडीने, जमिनीने आधार दिला. या झोपडीने आम्हाला सावली दिली. ऊन-वाऱ्यापासून आमचा संरक्षण केलं. हि जमीन आणि झोपडी नसती तर आमचा काय झाला असता नंतर आम्ही उद्योग धंदा करून पैसा मिळविला, बंगला बांधला पण या झोपडीच्या शेजारी. हि झोपडी आमच्या सुखाचं, वैभवाच उगमस्थान आहे. आमच्या वाईट दिवसात हिने आम्हाला दिलेली साथ -आसरा याचा विसर आम्हालाच काय भविष्यातील आमच्या पिढ्यांनासुद्धा पडू नये अशी आमची भावना म्हणून हि झोपडी दाखविण्याचा निमित्त ! या झोपडीच्या निमित्ताने आम्हाला आमच्या वाईट दिवसांचे स्मरण होते व वाईट वागण्यापासून आम्ही दूर राहतो.



तात्पर्य - आपण आपल्या मूळ गोष्टीना विसरू नये. ज्यांनी संकटकाळात आपली मदत केली त्यांना कधीच विसरू नये. 

वर्तमानपत्रातून संग्रहित

रविवार, २० जानेवारी, २०१३

(मन सदैव शुद्ध ठेवा !)

(कथा क्र. २२) 


एक राजा आणि नगरशेठ यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. नगरशेठ चंदनाचा व्यापार करीत होता. एक दिवस नगरशेठला माहित झाले कि, लाकडाची विक्री कमी झाली आहे. हे ऐकताच शेठच्या मनात विचार आला कि राजाचा मृत्यू झाला तर त्याचे नातेवाईक चंदनाची लाकडे त्याच्याकडून खरेदी करतील. यातून त्याला नफा होईल. संध्याकाळी राजाकडे भेटायला नगरशेठ गेला. त्याला पाहून राजाच्या मना विचाआला कि, नगरशेठने माझ्याशी मैत्री करून अपार धन मिळविले आहे. एखादा असा नियम बनविला पाहिजे कि ज्यामुळे याचे सारे धन राज्याच्या तिजोरीमध्ये जमा व्हायला पाहिजे. एक दिवस नगरशेठला राहवले नाही, त्याने राजाला विचारले, "मागील काही दिवसांपासून आपल्या मैत्रीत अंतर पडले आहे असे का?" राजाने म्हंटले,"मलाही असेच वाटते! चला नगराच्या बाहेर एक साधू राहत आहे. त्यांना याचे कारण विचारू." दोघे साधूकडे गेले, त्यांना आपली समस्या सांगितली आणि विचारले," आमच्या मनात एकमेकांबद्दल वाईट विचार का येत आहेत? कृपया याचे कारण सांगावे" साधू म्हणाले," राजा आणि नगरशेठ !! तुम्ही दोघे पाहिलं शुद्ध भावनेतून भेटत होता. पण आता तुमच्या मनात वाईट विचार आले असतील " शेठ्ला साधू म्हणाले," तूम्ही असा का विचार केला नाही कि, राजा चंदनाच्या लाकडाची माडी बांधेल. तू राजाविषयी चुकीचा विचार केला. त्यामुळे राजाच्या बद्दल तुझ्या मनात वाईट विचार आला. तुझ्या लाकडाची तेंव्हाही विक्री होणारच होती." राजाला साधू म्हणाले," नगरशेठच्या धनाची तू अशा धरलीस त्यामुळे तुझ्या मनात त्याच्याबद्दल वाईट विचार आले." त्यानंतर त्यांनी दोघांना मनातील वाईट विचार काढून टाकण्यास सांगितले. चुकीच्या विचाराने मैत्रीत अंतर वाढविले गेले असल्याची जाणीव करून दिली. त्यानंतर राजा आणि नगरशेठ दोघे परत पाहिल्यासारखे वागू लागले. 



तात्पर्य- विचाराच्या पावित्र्यातुनच संबंधात गोडी निर्माण होते. मन शुद्ध असल्यास दुसऱ्याबद्दल कधी वाईट विचार येत नाहीत. 

वर्तमानपत्रातून संग्रहित

बुधवार, १६ जानेवारी, २०१३

(कष्टाची कमाई )


(कथा क्र. २० ) 

वाराणसीत एका पंडिताचा मोठा आश्रम होता. तेथे ते आपल्या शिष्यांना शिक्षण देत असत. त्यांच्या या आश्रमासमोर एक सुतार काम करत असे. तो आपले काम करीत असताना मधुर भजनही गात असे. पंडितजी मात्र भजनाकडे लक्ष देत नसत. काही दिवसानंतर पंडितजी खूप आजारी पडले. हळूहळू त्यांचे अर्ध्यापेक्षा शिष्य आश्रम सोडून गेले. काही सेवाभावी शिष्य पंडितजींचे काम चालवत होते आणि पंडितजी अंथरुणावर पडल्या पडल्या सुताराचे भजन ऐकत असत आणि त्यांना ते आवडायचेही. हळूहळू त्यांचे लक्ष भजनावर केंद्रित होवू लागले. एके दिवशी त्यांनी त्या सुताराला प्रथमच आपल्या शिष्याकरवी आश्रमात येण्याचे आमंत्रण दिले. सुतार आश्रमात आला. पंडितजींनी त्याला आपल्या जवळ बसविले व म्हणाले,"अरे मित्रा! तू किती सुंदर भजन गातोस! साक्षात देवाने तुला वरदहस्त दिला आहे असे वाटते, तुझ्या या सुंदर भजन गाण्याने माझा आजार आता खुपसा कमी झाला आहे. यासाठी मी तुला काही देवू इच्छितो." असे म्हणून त्यांनी त्याला शंभर रुपये दिले व सांगितले कि तू असाच दैवी आवाजात भजने गा. सुतार पैसे बघून खूप खुश झाला. त्याचे त्या पैशांमुळे कामावरून लक्ष उडाले. सारखे त्या पैशांची काळजी घेण्यात त्याचा वेळ जावू लागला. पर्यायाने त्याचे भजन गाण्याकडे हि दुर्लक्ष झाले. तो रात्रंदिवस याच चिंतेत होता कि, "हे एवढे पैसे मी कोठे ठेवू ?" अश्याने त्याचे ग्राहक कमी कमी होत गेले. एके दिवशी तो परत पंडितजींकडे गेला व त्यांना शंभर रुपये परत करत म्हणाला ,"पंडितजी! हे परक्याचे धन आहे. त्यात ते विनाकष्टाचे आणि बक्षीस स्वरूपातील आहे. त्याला कष्टाच्या कमाईची गोडी नाही. तेंव्हा हे परत घ्या." असे बोलून तो तेथून निघून गेला. दुसरे दिवशी पंडितजींना सुताराचे सुरेल भजन ऐकू आले. 



तात्पर्य- विनाकष्टाचे धन अशांततेचे कारण असते. कष्टाची कमाई मनाला सुख देते आणि आनंदही ! खरेय ना! 

वर्तमानपत्रातून संग्रहित

मंगळवार, १५ जानेवारी, २०१३

(पुनर्वापराचे महत्व)

(कथा क्र.१९) 

एक प्राध्यापक होते. ते गावोगावी फिरून प्रबोधन करायचे. ते एका प्रदेशात गेले. तो प्रदेश इतका सुपीक नव्हता. त्यामुळे ते जेथे जातील तेथे त्यांना गरीबीचेच दर्शन होत होते. असेच एका दिवशी ते एका गावी गेले होते. तिथे त्यांनी एका शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेट दिली. पावसाचे दिवस चालू होते. त्यामुळे तो शेतकरी जमिनीच्या मशागतीची तयारी करत होता. घरापुढील अंगणात त्याची पत्नी , मुले व तो बियाणे साफ करीत होते. प्राध्यापकांनी ते बियाणे पाहिले त्यात खूपच खडे, कचरा होता. शेतकर्याचे कुटुंब हाताने तो कचरा, खडे काढून बियाणे स्वच्छ करीत होते. हे पाहून प्राध्यापक म्हणाले ," अरे मित्र! तुम्ही हे सर्व हाताने स्वच्छ करण्यासाठी खूप वेळ घालावीत आहात. तुमच्याकडे मोठी चाळण नाही का?" तेंव्हा शेतकरी म्हणाला,"साहेब ! आम्ही गरीब माणसे! आमच्याकडे कोठून इतके पैसे असणार चाळण विकत आणण्यासाठी !" ते ऐकून प्राध्यापक फक्त हसले, आणि त्यांनी सर्व घराभोवती एक फेरफटका मारला. त्यांना घराच्या मागे एक गंजलेला पत्रा सापडला, तेथे एके ठिकाणी ते बसले, आपल्या पिशवीतून एक टोच्या काढला. जवळच पडलेल्या एका जड दगडाच्या साह्याने त्यांनी त्या पत्र्यावर छिद्रे पाडली, बाजूला पडलेल्या लाकडाच्या ढलप्या काढल्या. पिशवीतून ४ खिळे काढले. लाकडाला पत्रा ठोकून छानपैकी चाळण तयार केली व शेतकऱ्याच्या हातात देt प्राध्यापक म्हणाले," जुन्या गोष्टी न टाकता त्याचा पुन्हा कसा वापर करता येईल याचा विचार जर केला तर प्रत्येक गोष्ट शक्य आहे." शेतकऱ्याने त्यांचे खूप आभार मानले. 


तात्पर्य- टाकावूमधून निश्चितपणे टिकावू व उपयोगी निर्माण करता येते. त्याने आपले पैसे वाचतील. 

वर्तमानपत्रातून संग्रहित

सोमवार, १४ जानेवारी, २०१३

(परीक्षा )

(कथा क्र.१८) 

एकदा एका गुरूच्या आश्रमात तीन शिष्य अध्यात्माचे शिक्षण घेत होते. गुरुनी त्यांना अनेक उत्तोमोत्तम विद्या शिकविल्या, अनेक प्रकारचे शिक्षण दिले. जेंव्हा त्यांचे शिक्षण पूर्ण झाले तेंव्हा ते तीनही शिष्य गुरूंची आज्ञा घेवून घरी परत निघाले. थोडे अंतर चालून गेल्यावर त्यांच्या असे लक्षात आले कि, आपण चालत असलेल्या रस्त्यावर भरपूर प्रमाणात काटे पसरले आहेत. पहिला शिष्य मनात म्हणाला, " आपल्याला या काट्यानपासून बचाव करून मग घरी परतावे लागेल." तो हळूहळू काट्यानपासून वाचत घरी परतला. दुसरा शिष्य खिलाडू वृत्तीचा होता. त्याने उद्या मारत ते काटे पार केले व घरी जावून पोहोचला. तिसऱ्या शिष्याने मात्र असे न करता ते काटे उचलले व रस्त्याच्या एका बाजूने जमवून त्यांचा ढीग केला. असे करताना त्याचा हाताला पायाला खूप काटे टोचले, ओरखडले, रक्त आले पण त्याने आपले काम सोडले नाही. त्याने तो रस्ता स्वच्छ केला. तेवढ्यात त्या रस्त्याने त्यांचे गुरुजी आले. त्यांनी शिष्याचे हे काम पाहिले व पहिल्या दोन शिष्यांना बोलावणे पाठविले. काही वेळातच ते दोघेही तेथे परत आले. तेंव्हा गुरुजी म्हणाले," पहिल्या दोघांचे अजून शिक्षण पूर्ण करावयास हवे कारण ज्यांना दुसऱ्याच्या उपयोगी आपले शिक्षण लावता येत नाही त्यांना शिक्षणाचा खरा अर्थ कळत नाही. तुम्ही लोंकांसाठी काय करू शकता हे पाहण्यासाठी मीच या रस्त्यात काटे पसरून ठेवले होते. जो इतरांचे जीवन सुसह्य करतो तोच आयुष्यात मोठा होतो." एवढे बोलून त्यांनी तिसऱ्या शिष्याला आशीर्वाद दिले व घरी परतण्याची आज्ञा दिली 

तात्पर्य - शिक्षणातून समाजोपयोगी कामे झाल्यासच शिक्षणाचा फायदा आहे. 

वर्तमानपत्रातून संग्रहित

शुक्रवार, ११ जानेवारी, २०१३

(सत्कर्माच्या मार्गाने चला)


(कथा क्र. १७) 



एका गावात राम नि श्याम असे दोन कुबडे मित्र राहत होते. राम गरीब तर श्याम श्रीमंत होता. परंतु दोघात चांगली मैत्री होती. एके दिवशी राम श्यामला म्हणाला," मी कुठवर तुझ्यावर ओझे बनून राहू?" हे ऐकून श्याम म्हणाला," तू मला माझ्या कामात मदत कर, म्हणजे तुझ्या मनाला दोषी वाटणार नाही." दुसऱ्या दिवसापासून राम श्यामला कामात मदत करू लागला. काही दिवसांपर्यंत सर्व काही व्यवस्थित चालले परंतु श्याम हळूहळू रामकडून जास्त काम करून घेवू लागला आणि त्याचा अपमानही करू लागला. त्याच्या ह्या वर्तनाने राम दु:खी झाला. रामने श्यामचे घर सोडले आणि जंगलात गेला. तेथे त्याची भेट एका साधुशी झाली. त्याची दु:खमय कथा ऐकून त्या साधूला त्याची दया आली, त्याने त्याच्या कुबदावरून मायेचा हात फिरविला आणि काय आश्चर्य ! रामचे कुबड नाहीसे झाले. त्याबरोबरच साधूने रामच्या हातात एक पिशवी दिली व सांगितले," हि पिशवी सत्कर्माची पिशवी आहे, ह्यात सोन्याचा मोहोरा आहेत. तू सत्कर्माने वागला आणि सत्कर्मासाठी जर यातील धन खर्च केले तर ह्या पिशवीतील धन कधीच नष्ट होणार नाही." राम गावी परत आला. त्याने सत्कर्मासाठी म्हणजे लोंकाच्या भल्यासाठी अनेक उत्तम कामे केली. त्यासाठी त्याने जितका पैसा खर्च केला तितका आजवर कोणीच केला नव्हता. हे पाहून श्यामच्या मनात असूया निर्माण झाली. त्याने राम ला हे सर्व कसे झाले हे विचारले. तेंव्हा रामने खरे ते सांगितले. श्याम जंगलात गेला व साधू महाराजांना आपले कुबड दाखवीत म्हणाला माझ्या मित्रासारखे मला नीट करून द्या व मलाही पैश्याची पिशवी द्या. श्यामचा हा स्वार्थी स्वभाव पाहून साधू महाराजांनी त्याला बरे तर केले नाहीच पण त्याला तेथून हाकलून दिले व सांगितले कि सत्कर्म करणाऱ्याला देव सहकार्य करतो. 


तात्पर्य - लोभ, मत्सर बाजूला ठेवून मन सत्कर्मात गुंतविले तर आपला भविष्यकाळ हा अतिशय चांगला असतो. सत्कर्माच्या वाटेने नेहमी चालले पाहिजे. 

वर्तमानपत्रातून संग्रहित


बुधवार, ९ जानेवारी, २०१३

(कष्टाशिवाय फळ नाही)


(कथा क्र. १६) 

एका गावात एक गरीब पंडित राहत होता. सर्व काही नशिबानेच मिळते असा त्याचा समज होता. जेंव्हा त्याचा मुलगा त्याला गरीबीबद्दल विचारायचा तेंव्हा तो त्याला सांगायचा कि, "बाबारे ! हा सर्व नशिबाचा खेळ आहे." एके दिवशी हाच प्रश्न त्याच्या मुलाने गावाच्या मंदिरातील पुजाऱ्याला विचारला. पुजाऱ्याने त्याला दुसऱ्या दिवशी आपल्या वडिलांसोबत येण्यास सांगितले. जेंव्हा दोघेही पुजाऱ्याकडे गेले तेंव्हा पुजाऱ्याने मुलाच्या हातावरील रेषा पाहून म्हंटले, "पंडितजी! आपला पुत्र फारच भाग्यशाली आहे. परंतु याच्यावर एका ग्रहाचा कोप आहे. एक अनुष्ठान करण्याने तो कुप्रभाव नष्ट होईल." यावर पंडितजींनी विचारले,''आम्हाला काय करावे लागेल.?" पुजारी म्हणाला,"तुम्ही दोघांनी मिळून आश्रमाच्या अंगणात एक विहीर खोदा म्हणजे ग्रहाचा वाईट प्रभाव कमी होईल." पिता-पुत्र विहीर खोदण्याच्या कामाला लागले. अनेक दिवसांच्या परिश्रमानंतर त्यांना त्या खड्ड्यात एक घागर दिसू लागली. त्यांनी ती घागर पुजाऱ्याकडे नेली. पुजाऱ्याने घागरीवर बांधलेला कपडा काढला. तेंव्हा त्यात सोन्याच्या मुद्रा दिसू लागल्या आणि त्यात एक चिठीही दिसू लागली. ती चिट्ठी हातात घेवून त्या मुद्रा पंडितजींना देत पुजारी म्हणाला,"हे आपल्या भाग्यात नाही." हे ऐकून पुत्राने पंडितजींना विचारले,"भाग्य काय असते? हे आपण सांगितले नाही." पुजाऱ्याने ती चिट्ठी त्याला दिली, त्यात लिहिले होते,"भाग्याचेच दुसरे नाव कर्म आहे. आता पंडितजींच्या लक्षात आले कि, आपोआप काही घडत नाही तर कर्म केल्याने भाग्य साथ देते. 



तात्पर्य - अकर्मण्यता दुर्भाग्याला आमंत्रण देत असते आणि कर्मातुनच भाग्य खुलते. (थोडक्यात काय कष्टाशिवाय फळ मिळत नाही हेच खरे!!) 



वर्तमानपत्रातून संग्रहित

मंगळवार, ८ जानेवारी, २०१३

(अंतरात्म्याचे गाणे)


 (कथा क्र. १५) 

एके दिवशी अकबर बादशहाने संगीत सम्राट तानसेन यांना बोलावणे पाठविले. तानसेन दरबारात आले. बादशहा गायक तानसेन यांना म्हणाला," तानसेन ! तुम्ही तर खूप सुंदर गाता. खुदाची तुमच्यावर असीम कृपा आहे. पण मला तुमच्या गुरूंचे गाणे ऐकायची इच्छा आहे. कारण तुम्ही इतके सुंदर गाता तर तुमचे गुरु हे तुमच्यापेक्षा कधीही वरचढ गाणे गात असतील. त्यांना तुम्ही इथे दरबारात गायनकरण्यासाठी बोलवा. आपण त्यांना ते जे मागतील ते देवू पण मला त्यांचे गाणे ऐकवा." यावर तानसेन म्हणाला," महाराज! आपण कितीही मोठी रक्कम दिली किंवा इनाम दिले तरी ते इथे येणार नाहीत किंवा त्यांचे गाणे इथे म्हणणार नाहीत. कारण त्यांचा आपल्याशी काहीच देणं घेणं नाही." हे ऐकून बादशाहाला थोडा राग आला, पण त्याची गाणे ऐकण्याची प्रबळ इच्छा होती. बादशाहने मग तानसेनाला सांगितले कि ते आपल्याकडे येत नाहीत तर आपण त्यांच्या इथे वेश बदलून जावू आणि त्यांचे गाणे ऐकू. गुरु हरिदास हे तानसेन यांचे गुरु होत. बादशहा आणि तानसेन गुरूंच्या घरी गेले. एका साध्या झोपडीमध्ये गुरु बसलेले होते. बादशहा झोपडीबाहेरच उभा राहिला. तानसेन आत गेला, गुरुणा वंदन केले आणि त्याने गुरुंसमोर चुकीचा राग आळवायला सुरुवात केली. गुरुंना हे आवडले नाही, ते म्हणाले," थांब! तुला राग म्हणता येत नसेल तर तंबोरा माझ्याकडे दे." असे म्हणून त्यांनी गायला सुरुवात केली. बादशहा व तानसेन त्या स्वर्गीय गाण्यात रंगून गेले. बादशाहाला आपल्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. परत येत असताना बादशहा म्हणाला,"तानसेन! तुझ्यापेक्षा तुझ्या गुरूंचे गाणे हे जास्त आत्म्याला भिडले याचे कारण काय?" तानसेन म्हणाला,"महाराज ! मी तर केवळ तुम्हाला खुश करण्यासाठी गातो पण माझे गुरु परमेश्वरासाठी गातात. ते त्यांच्या अंतरात्म्यातून केवळ प्रार्थना म्हणून गातात. म्हणून त्यांचे गाणे हे सर्वश्रेष्ठ आहे." बादशहाचे या उत्तराने समाधान झाले.


तात्पर्य :- ईश्वराच्या भक्तीत म्हटले जाणारे गाणे, शब्द हे जर आपल्या अंतकरणापासून निघत असतील तर ते निश्चित परमेश्वरापर्यंत पोहोचतात.

वर्तमानपत्रातून संग्रहित

सोमवार, ७ जानेवारी, २०१३

परिश्रम


 (कथा क्र. १४)

एका गावात एक शेतकरी राहत होता. संसारात येणाऱ्या अडचणीमुळे तो खूपच त्रस्त झाला. अखेर एके दिवशी या सर्वाला कंटाळून त्याने आपले घर सोडले व साधूचा वेश धारण केला. साधूच्या वेशात तो सर्वत्र संचार करू लागला. त्याच्या या वेषाला पाहून लोक त्याला नमस्कार करीत. त्याला फळे, दुध, मिठाई, सुग्रास अन्न, दक्षिणा देत असत. तो जाईल तेथे त्याचा आदरसत्कार होत असे. देवाचे नामस्मरण आणि विरक्त संन्याशी वेश या एवढ्या भांडवलावर त्याचे जीवन अगदी मस्त चालले होते. साधू पण यात अगदी आनंदात होता. असाच एकदा एका तीर्थक्षेत्राच्या दिशेने वाटचाल करीत असताना या साधूला एक हिरवागार मळा दिसला. त्यात तरारलेल्या पिकांनी, वाऱ्यावर डोलणाऱ्या वेगवेगळ्या वेलींनी भरलेली शेते होती. त्या मळ्यामध्ये एक शेतकरी काम करीत असताना साधूने पाहिला. साधू त्याच्याजवळ गेला आणि त्याला म्हणाला," देवाने तुला या सुंदर शेताचे वरदान दिले आहे. त्याबद्दल तू देवाचे आभार मानले पाहिजेस." शेतकरी यावर हसून म्हणाला,'' साधुबुवा ! तुमचे म्हणणे खरे आहे. देवाचे आभार तर मानलेच पाहिजेत. देवाने मला इतके सुंदर, हिरवेगार शेत दिले आणि त्याबद्दल मी देवाचा ऋणी आहे. पण मी या शेतात काम करण्याच्या आधी फक्त देवाच्या हाती हि जमीन होती तेंव्हा तुम्ही ते पाहायला हवं होत."


तात्पर्य- यशस्वी होण्यासाठी अविरत परिश्रमांची गरज असते नाहीतर यशस्वी होता येत नाही.

वर्तमानपत्रातून संग्रहित


रविवार, ६ जानेवारी, २०१३

(संत आणि राजा)


(कथा क्र. १३) 

       एक दानशूर राजा होता. राजाची ख्याती ऐकून एक संत त्याच्या दरबारात आला. तो राजाला भेटायला राजमहालात गेला आणि याचकांच्या रांगेत बसला. राजाने दान देण्यासाठी दोन सेवक ठेवले होते. जेंव्हा संताची वेळ आली तेंव्हा तो सेवकाला म्हणाला,''मित्रा! मी तुझ्या हाताने नाही तर राजाच्या हाताने दान घेईन. नाहीतर मला दान नको." राजाचा सक्त आदेश होता कि कोणीही रिक्त हस्ते जाता कामा नये. शेवटी सेवकांनी राजाची व संताची गाठ घालून दिली. राजाने संतांच्या पायाचे दर्शन घेतले व म्हणाला,"महाराज ! बोला आपली काय इच्छा आहे?" संत म्हणाले," मला इतके धन पाहिजे कि मी त्याद्वारे स्वर्गात जावू शकेन." राजा या उत्तराने हैराण झाला. त्याने विचारले," महाराज, धनाद्वारे आपण कसे काय स्वर्गात जावू शकता?, कृपया स्पष्ट करा!" तेंव्हा संताने सांगितले," राजन! मी आपल्याला हे सांगू इच्छितो कि, केवळ दान देण्याने आपण सुखी व्हाल आणि भिक्षा मागणारयांच्या जीवनात परिवर्तन येईल पण आपण असेच जर दान करीत राहिलात तर मात्र एक दिवस राज्याची तिजोरी मात्र खाली होवून जाईल." त्या क्षणी राजाचे डोळे उघडले, त्याने संताना यावरील उपाय विचारला असता ते म्हणाले, " आपण जे धन दान म्हणून देत आहात तेच रोजगाराच्या स्वरुपात द्या. यातून लोकांना काम मिळेल आणि फुकट खायची यांची सवय कमी होईल. आपल्या या सेवा वृत्तीने ते माजखोर आणि आळशी झाले आहेत. त्यांना परिश्रम करायला शिकवा तेच खरे पुण्याचे आणि सत्पात्री दान ठरेल. 




तात्पर्य- स्वावलंबन आत्मविश्वासाची अनिवार्य अट आहे. त्यावरच राष्ट्राचा विकास अवलंबून असतो. 


वर्तमानपत्रातून संग्रहित


शुक्रवार, ४ जानेवारी, २०१३

पापाचा जनक

  (कथा क्र. १२)

एका राजाने आपल्या दरबारात सभासदांना विचारले कि पापाचा जनक कोण असतो? पण उत्तर मिळाले नाही. राजाने आपल्या राजगुरुंकडे मान वळविली. ते परमज्ञानी होते. पण तत्काळ त्यानाही काही उत्तर सुचले नाही. राजाने त्यांना उत्तर देण्यासाठी एका आठवड्याचा काळ दिला. बऱ्याच चिंतन-मननानंतर राजगुरुना उत्तर मिळाले नाही. अशाप्रकारे सहा दिवस गेले. राजगुरू घाबरले त्यांनी भीतीपोटी राजधानी सोडली. चालत चालत एका गावात पोहोचले. तेथे एका घराच्या कट्ट्यावर विश्रांतीसाठी बसले. ते घर एका गणिकेचे (वैश्येचे) होते. राजगुरुंची हि दमलेली अवस्था पाहून तिने त्यांच्याशी चर्चा सुरु केली. राजगुरूने तिला आपली सर्व कथा ऐकवली. गणिका म्हणाली," तुमच्या प्रश्नांचे उत्तर माझ्याकडे आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला माझ्याकडे यावे लागेल. " हे ऐकताच राजगुरू म्हणाले, "तुझ्या सावलीतही पाप वाटते तेंव्हा तुझ्या घरी कसा येवू?" गणिका म्हणाली, " आपली इच्छा! परंतु ब्राह्मणाला दक्षिणा देणे हे मोठे पुण्याचे काम आहे आणि दारी आलेल्याला तर दक्षिणा दिल्याशिवाय मी जावू देणार नाही!" असे म्हणून तिने राजगुरुना सोन्याच्या दोन मोहोरा दिल्या. मोहोरा पाहून राजगुरू नरम झाले. तिच्या घरी आले, जेंव्हा तिने पाणी दिले तेंव्हा त्यांनी ते नाकारले पण तिने चार मोहोरा दिल्या तेंव्हा त्यांनी पाणीही पिले आणि अश्याच रीतीने जेवणही केले. तेंव्हा गणीकेने राजगुरुना सुनावले, "पापाचा जनक कोण असतो याचे उत्तर आता तुम्हाला मिळाले का?, तर पापाचा जनक आहे लोभ." राजगुरू निरुत्तर झाले पण त्यांना राजाच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. 


तात्पर्य- कर्म आणि भाग्य यापेक्षा अधिक मिळवण्याची लालसा (लोभ) सदैव पापकर्म घडवीत असते. 

वर्तमानपत्रातून संग्रहित

बुधवार, २ जानेवारी, २०१३

खोटा पैसा


(कथा क्र. ११)


एकदा दिनदयालजी बाजारात भाजी आणण्यासाठी गेले असता एका वृद्ध बाईकडून त्यांनी भाजी विकत घेतली. नंतर हिशोब लिहिताना त्यांच्या लक्षात आले कि आपल्या खिशातील एक खोटा पैसा त्या म्हाताऱ्या बाईला भाजीचे पैसे देताना चुकून दिला गेला. आपण नकळत का होईना त्या बाईला फसविले. याचे त्यांना अपार दु:ख झाले. ते पुन्हा बाजारात गेले व त्या बाईसमोर जावून उभे राहिले व म्हणाले," बाई, मी नकळत का होईना तुम्हाला फसविले आहे. मी तुम्हाला खोटा पैसा दिला आहे." त्या बाईला त्यांच्याशी बोलायला वेळ नव्हता, ती त्यांना म्हणाली," अहो, राहू दे एका पैशाचे काय? मला इथे भाजी विकू दे" पण दिनदयालजी म्हणाले ," नाही बाई ! मी तुम्हाला फसविले हि गोष्ट माझ्या मनाला लागून राहिली आहे. माझी चूक मला सुधारू द्या." त्या बाईने पण त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस भाव पाहिले व आपला गल्ला असलेली पेटी त्यांच्या समोर ठेवली. बाह्य जग विसरून दिनदयालजिनी एकाग्रपणे तो गल्ला तपासला व त्यातील खोटा पैसा त्या बाईला सांगून परत घेतला व त्या जागी खरा पैसा त्या गल्ल्यात टाकला. त्या वृद्ध बाईने त्यांना तोंड भरून आशीर्वाद दिला. पुढे याच दिनदयालजिनी 'एकात्म मानवतावाद' मांडला.



तात्पर्य- आदर्श आचरणाची सुरुवात आपल्यापासून करणे गरजेचे आहे.

वर्तमानपत्रातून संग्रहित