मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०१६

मृत्‍युदंड

फेसबुक.कॉम/मराठी बोधकथा

कथा क्र.२४७

एक लोककथा आहे. एका राजाकडे विशाल राज्‍य आणि अगणित संपत्‍ती होती. अचानक राजाला एका आजाराने घेरले. दूरदूरवरून वैद्य, हकीम बोलावण्‍यात आले पण कुणाचीच मात्रा चालली नाही. त्‍यावेळी भारतातून महादेव नावाचा एक वैद्य तेथे गेला. त्‍याने राजाची प्रकृती तपासली व तो म्‍हणाला की महाराज, मी तुम्‍हाला एका महिन्‍यात बरे करतो. राजाने त्‍याचे म्‍हणणे ऐकले व त्‍याच्‍या उपचारपद्धतीचा वापर करून औषधे घेण्‍यास सुरुवात केली. काही दिवसातच राजा ठणठणीत बरा झाला. प्रसन्‍न होऊन राजाने त्‍याला राजवैद्य म्‍हणून नेमले. राजा आणि वैद्य यांच्‍यातील स्‍नेहसंबंध वाढत चालले. प्रधानास ते बघवले नाही त्‍याने राजाला महादेव हा भारताचा गुप्तहेर असल्‍याचे समजावून व पटवून दिले. राजाही हलक्‍या कानाचा होता. त्‍याने प्रधानाच्‍या बोलण्‍यात येऊन राजवैद्याला मृत्‍युदंड ठोठावला. फाशी दिले जाण्‍यापूर्वी महादेवने राजाला एक पुस्‍तक भेट दिले व सांगितले, ''महाराज या पुस्‍तकात शंभर वर्षे व त्‍यापुढे कसे जगायचे याबद्दल काही उपाय दिले आहेत. ते माझ्याकडून आपल्‍यासाठी शेवटची भेट म्‍हणून समजा'' राजाला वाटले याची शेवटची इच्‍छा म्‍हणून त्‍याने ते पुस्‍तक उघडून पाहिले तर पहिले पान कोरे होते. राजाचे पुस्‍तक पाहणे चालू असताना मात्र फाशी थांबविली गेली होती. महादेव फाशीच्‍या तक्‍तावरून राजाचे पुस्‍तक उघडणे पाहत होता. पहिले पान कोरे असेल म्‍हणून राजाने दुसरे पान उघडण्‍याचा प्रयत्‍न केला पण बरेच दिवसात जर पुस्‍तक उघडले नाही तर पाने घट्ट चिकटून बसतात तशी सर्वच पाने चिकटून बसली होती.(मराठी बोधकथा) राजाने मग बोटाला थुंकी लावून पाने उघडण्‍याचा प्रयत्‍न केला पण काहीच क्षणात राजाला चक्कर येऊ लागल्‍याचे जाणवले व काही बोलण्‍याच्‍या प्रयत्‍नात असतानाच त्‍याच्‍या तोंडातून फेस येऊन राजा त्‍याच्‍या सिंहासनावरच मृत्‍यू पडला. कारण महादेवने भेट दिलेले पुस्‍तक हे साधेसुधे नव्‍हते तर त्‍याच्‍या प्रत्‍येक पानावर जहाल विष लावले होते व राजाने बोटाला थुंकी लावून पान उलटण्‍याच्‍या नादात ते जहाल विष आपल्‍या जिभेवर ठेवून स्‍वत:चे मरण स्‍व:च्‍या हाताने ओढावून घेतले होते. त्‍यानंतर महादेवलाही फाशी देण्‍यात आली.

तात्‍पर्य : मोठ्या पदावर असणा-या माणसांनी शक्यतो हाताखालच्‍या माणसांची योग्‍य पारख करून मगच निर्णय घ्‍यावेत/ नि:पक्ष न्‍यायदान हे सर्व घटनांचे पैलू तपासूनच होऊ शकते.

वर्तमानपत्रातून संग्रहित

मराठी बोधकथा

निर्धनाकडून भगवंताची भेट

फेसबुक.कॉम/मराठी बोधकथा

कथा क्र.२४६

एक पंडीत दररोज प्रार्थना करायचे, भगवंता, मला सत्‍याचा मार्ग दाखविणारा मार्गदर्शक भेटू दे, त्‍यांची प्रार्थना ऐकून एका संताने त्‍यांना जवळच असलेल्‍या मंदिरात जाण्‍यास सांगितले, तेथे तुम्‍हाला खरा मार्गदर्शक मिळेल. पंडीतजी तात्‍काळ तिकडे पोहोचले. तेथे फाटक्‍या अवस्‍थेत एक माणूस बसलेला होता. पंडीतजी त्‍याला पाहून म्‍हणाले, देवाने तुला चांगले दिवस दाखवले आहेत. तो म्‍हणाला, मला तर वाईट दिवस कधी आलेच नाहीत. पंडीतजी म्‍हणाले, देवाने तुझ्या नशिबावर पडलेली धूळ हटवली पाहिजे. तो म्‍हणाला, माझ्या नशिबावर धूळ साचलेलीच नाहीये. पंडीतजींनी विचारले, मी तुला हरप्रकारे सुखी राहावे म्‍हणून चांगले बोलतो आहे, तर त्‍यावर तू मला उलट उत्‍तरे देतो आहेस. तो पुन्‍हा म्‍हणाला, चांगले-वाईट मला माहित नाही. पण इतकेच जाणतो की, वाईट घटना माझ्या आयुष्‍यात घडलीच नाही. पंडीतजी म्‍हणाले, तुझा अवतारच सांगतोय की तू किती दु:खीकष्‍टी आहेस, त्‍याने खुलासा केला, तुम्‍ही म्‍हणालात, मला देवाने चांगले दिवस दाखवले, परंतु मी नेहमी ईश्‍वराचे स्‍मरण करण्‍यातच तल्‍लीन राहतो. यामुळे दु:खाची अनुभूती झालेली नाही मग म्‍हणालात, माझ्या नशीबावर धूळ साचली आहे पण चांगली-वाईट परिस्थिती असणे हे देवाचे देणे आहे. परिस्थिती चांगली असो की वाईट असो त्‍यातच खरे सुख आहे. 

ओळख

फेसबुक.कॉम/मराठी बोधकथा

कथा क्र.२४५

खूप दिवसांपूर्वीची गोष्‍ट आहे, दहा मुलांची एकमेकांशी अतिशय चांगली मैत्री होती. ते सर्वजण एकत्र राहत होते व एकत्रच खात, पित व बहुतांश वेळ सोबतच राहत होते. एकदा त्‍यांनी सर्वांनी मिळून एकत्र प्रवासाचा बेत ठरविला. ठिकाणही ठरले, सगळेजण आपापल्‍या वेगाने प्रवास करत होते. कोणी वेगाने पुढे जात होता तर कोणी संथ गतीने पुढे जात होता. मागे-पुढे जात होते पण ठिकाण ठरलेले असल्‍याने सगळे जण मुक्कामी पोहोचले. सगळे तेथे पोहोचल्‍यावर तेव्‍हा त्‍यांनी विचार केला आपला ग्रुप तरी मोजून घ्‍यावा. न जाणो कोणी तरी मागे तर राहिला नसेल. एका मुलाने सगळ्यांना रांगेमध्‍ये उभे करून मोजण्‍यास सुरुवात केली. त्‍याने मोजले व म्‍हणाला,''आपण तर नऊच जण आहोत. मग दहावा जण कुठे गेला'' दुसरा मुलगा म्‍हणाला थांब मी मोजतो. त्‍यानेही मोजले तर नऊच जण निघाले. सगळ्यांच्‍या चेह-यावर उदासी निर्माण झाली. कारण एकजण कुणीतरी त्‍यांच्‍यातून हरवला गेला होता व आता तो त्‍यांना कधीच भेटणार नव्‍हता. सगळे मलूल चेहरा करून शांतपणे बसून राहिले. त्‍यांना अन्नपाणी घेण्‍याचेही सुचेना इतक्‍यात तेथून एक महात्‍मा जात होते. त्‍याने या उदास बसलेल्‍या मुलांना पाहिले व त्‍यांना त्‍यांची दया आली. त्‍यांनी मुलांना उदासीचे कारण विचारले असता मुलांनी एकजण हरवला असल्‍याचे सांगितले. त्‍या महात्‍म्याला त्‍यांची अडचण समजली व ते म्‍हणाले, मी तुम्‍हाला तुमचा हरवलेला मित्र शोधून देतो. त्‍याने सर्वांना रांगेत उभे करून मोजले तेव्‍हा ते दहाजण होते. त्‍या मुलांना त्‍यांचा दहावा मित्र सापडला होता. त्‍यांनी त्‍या महात्‍म्‍याचे आभार मानले व दहावा मित्र कसा काय शोधला हे विचारले असता महात्‍मा म्‍हणाले,'' अरे मित्रांनो तुम्‍ही तुमच्‍यापासून कधी मोजायची सुरुवातच केली नाही. तुम्‍ही कायम दुस-यापासून मोजायची सुरुवात करत असल्‍याने तुम्‍हाला तुमचे अस्तित्‍वच कधी जाणवले नाही व यामुळे तुमचा एक मित्र म्‍हणजे तुम्‍ही स्‍वत:लाच मुकत गेलात. हा हिशेब तुमच्‍या लक्षात न आल्‍याने तुम्‍ही जगातला एक सर्वोच्‍च मित्र गमावित होता.''

तात्‍पर्य : आपणही स्‍वत:ला विसरून दुस-याकडेच लक्ष देतो. याच कारणामुळे जग स्‍पष्‍ट दिसत नाही. प्रथमत: आपण स्‍वत:ला ओळखले पाहिजे मग जगाची आपोआपच ओळख होते.

वर्तमानपत्रातून संग्रहित

मराठी बोधकथा

चहाड्या केल्‍याची सजा

फेसबुक.कॉम/मराठी बोधकथा

कथा क्र.२४४

नसिरूद्दीन हैदर अयोध्‍येचे नवाब होते. अत्‍यंत उदार व्‍यक्तिमत्‍व म्‍हणून त्‍यांची ख्‍याती होती. परंतु त्‍यांच्‍यात एक अवगुण होता. ते लोकांच्‍या सांगण्‍यावर चटकन विश्‍वास ठेवत असत. त्‍यांच्‍या या स्‍वभावाचा फायदा त्‍यांचा हुसेनी नावाचा नोकर उचलत असे. तो नवाबाचे पाय रात्री दाबत असताना ज्‍यांच्‍यावर तो नाराज असे त्‍या लोकांच्‍या खोट्या तक्रारी करत असे. हुसेनीच्‍या अशा सवयीमुळे नवाबाचे दिवाण व अन्‍य लोक त्‍याच्‍यावर नाराज होते. नवाबाच्‍या दिवाणांचे नाव होते फैजल खान. एकदा त्‍यांनी हुसेनीला कानपूरला पाठविले व त्‍याला तेथे अटकही केली. दुस-या दिवशी नवाबसाहेबांना हुसेनीचे निधन साथरोगाने झाल्‍याचा निरोप पाठविला. काही महिन्‍यानंतर हुसेनी जेलमधून पळाला त्‍याने नवाबसाहेबांना भेटून सर्व कहाणी सांगितली. तिकडे दिवाणांना हुसेनी भेटल्‍याची माहिती मिळाली होती. त्‍यांनी सर्व कर्मचा-यांना एक युक्ती सांगितली. जेव्‍हा नवाबसाहेबांनी पहारेक-यास विचारले,याला ओळखतोस काय. पहारेक-याने ते एक भूत असल्‍याचे सांगितले. इतर कर्मचा-यांनीही त्‍याचीच री ओढली व हुसेनीला जिवंतपणीच भूत ठरवून त्‍याच्‍या खोटेपणाला खोटेपणाचेच प्रत्‍युत्तर दिवाणसाहेबांनी दिले.

तात्‍पर्य : चहाडी करणे, लोकांच्‍या मनात किंतू निर्माण करणे किंवा अफवा पसरवणे या वाईट गोष्‍टी आहेत. यापासून मानवाने दूरच राहिले पाहिजे.

वर्तमानपत्रातून संग्रहित

मराठी बोधकथा

आईची ममता


कथा क्र.257

 एका स्‍त्रीचा पती तरूणपणीच वारला. तिला एकच मुलगा होता. तिने मजुरी करून मुलाला शिकविले. ज्‍यादिवशी मुलाला नोकरी लागल्‍याचे तिला समजले तेव्‍हा समजले तेव्‍हा तिच्‍या आनंदाला पारावार उरला नाही. तिच्‍या परिश्रमांचे चीज झाले असे तिला वाटले. पण पुढे जाऊन मुलगा तिला विचारेनासा झाला. एकदा तर आई आणि मुलामध्‍ये प्रचंड वादावादी झाली. मुलाने टोकाचा निर्णय घेतला व आईच्‍या डोक्‍यात दगड घातला. बिचारी आई रक्तबंबाळ अवस्‍थेत रस्‍त्यावर पडली. रस्‍त्यावरून जाणा-या एका वाटसरूने दुस-या एकाला विचारले,''का हो बुवा, या म्‍हातारीला असे काय झाले की रस्‍त्यावर रक्तबंबाळ अवस्‍थेत पडली आहे.'' दुसरा माणूस त्‍या वाटसरूला म्‍हणाला,'' अहो महाराज या बाईच्‍या पोटच्‍या मुलाने भांडण केले व भांडणाभांडणात त्‍याने हिच्‍या डोक्‍यात दगड घातला व मुलगा निघून गेला.'' वाटसरू हळहळला व म्‍हणाला,'' काय पण बिचारीवर दिवस आले, पोटच्‍या मुलगा इतका कसा वाईट निघू शकतो, दुष्‍ट, दुराचारी, नराधम मुलाला तर खरे म्‍हणजे फासावरच द्यायला पाहिजे आहे.'' त्‍याचे हे बोलणे ऐकताच इतकेवेळ आडवे पडून असणारी आई जागेवरच उठून बसली व म्‍हणाली,'' बाबा रे तू तुझ्या रस्‍त्याने निघून जा. माझा मुलगा हा माझ्यासाठी अनमोल ठेवा आहे. आत्ता तो रागात आहे. राग शांत झाल्‍यावर त्‍याला त्‍याची चूक समजून येईल व तो पुन्‍हा आईच्‍या मायेसाठी माझ्या मांडीवर विसावण्‍यासाठी परत येईल. बाबा रे, मला जर मुलगाच झाला नसता तर मला कोणी आई म्‍हणून हाक मारली असती. त्‍याच्‍यामुळे मी आई झाले आहे. तो चुकीचा वागला असेल तर माफ मीच करणार आहे.''

 तात्‍पर्य – मुलाने कितीही चूक केली तरी माफ करणारी ती एकमेव अशी ....................................आई

वर्तमानपत्रातून संग्रहित

मराठी बोधकथा

पश्‍चाताप


कथा क्र.256

एका विद्यालयातील प्रसंग आहे. विज्ञानाच्‍या विद्यार्थ्‍यांना दररोज प्रयोगशाळेत प्रयोग करावे लागतात. काही विद्यार्थ्‍यांना असे प्रयोग करायला आवडायचे. शाळेने काही सामग्री प्रयोगासाठी घरी देण्‍यात यावी अशी विद्यार्थ्‍यांची इच्‍छा असायची. परंतु मुख्‍याध्‍यापक कडक शिस्‍तीचे होते त्‍यांनी कोणतीही सामुग्री घरी देण्‍यास विद्यार्थ्‍यांना नकार दिला. एकदा एका विद्यार्थ्‍यांने प्रयोगशाळेतील रसायनाची बाटली चोरली. प्रयोगशाळेत शोधाशोध झाली पण ती बाटली काही सापडली नाही. एक महिन्याने तो विद्यार्थी मुख्‍याध्‍यापकांकडे गेला आणि त्‍यांच्‍यासमोर टेबलावर ती चोरलेली बाटली ठेवली. मुख्‍याध्‍यापकांनी सूचक नजरेने त्‍याच्‍याकडे पाहिले तेव्‍हा त्‍या मुलाने आपण केलेल्‍या चोरीची माहिती दिली. प्राचार्यांनी त्‍याला विचारले,'' जर तुला याची गरज होती तर प्रयोग का केला नाही'' विद्यार्थ्‍यांने सांगितले,''मी जेव्‍हाही याचा वापर करण्‍याचा प्रयत्‍न करायचो तेव्‍हा माझा थरकाप उडायचा. मला असे वाटत होते की आपण चोरी करण्‍याचे वाईट काम केले आहे. त्‍यामुळे बाटली उघडत होतो व पुन्‍हा ठेवून देत होतो. शेवटी माझ्या आत्‍म्याने मला ही वस्‍तू परत ठेवण्‍यास सांगितले म्‍हणून ही बाटली मी तुम्‍हाला देत आहे.'' यावर मुख्‍याध्‍यापक म्‍हणाले,''तू जशी कपाटात ती बाटली जशीच्‍या तशी ठेवू शकला असतास मग माझ्याकडेच कशाला आणून दिली.'' विद्यार्थी तात्‍काळ म्‍हणाला,''सर जशी बाटली घरी नेली ती एक चोरी होती तशीच ती गुपचुपपणे ठेवून दिली असती तर ती दुसरी चोरी ठरली असती माझी'' त्‍याच्‍या उत्तराने मुख्‍याध्‍यापक खूपच खुश झाले.त्‍यांनी त्‍याला वर्गात बसण्‍यास सांगितले पण विद्यार्थ्‍याने सरांना शिक्षा सुनावण्‍यास सांगितले. मुख्‍याध्‍यापक म्‍हणाले,''अरे बेटा, तू महिनाभर केलेल्‍या चोरीमुळे पश्‍चात्तापाच्‍या आगीत जळत होतास हीच तुझी शिक्षा होती. पश्‍चात्ताप हा मोठा मार्गदर्शक बनून तुला मार्ग दाखवित होता. त्‍यामुळे तुला वेगळी शिक्षा देणे उचित नाही. तु वर्गात जा, अभ्‍यास कर आणि चांगला माणूस बन'' विद्यार्थी मुख्‍याध्‍यापकांच्‍या पाया पडून वर्गात गेला.

वर्तमानपत्रातून संग्रहित

मराठी बोधकथा

भिकारी आणि तरूण मुलगा


कथा क्र.241

एक भिकारी होता. तो आंधळा व पांगळा होता. सतत एका जागी बसून असायचा. कधी त्‍याला खायला मिळे तर कधी उपाशीपोटी झोपून जाई. त्‍यामुळे त्‍याची अवस्‍था हाडाच्‍या सापळ्यासारखी झाली होती. जन्‍माने तो अंध नव्‍हता तर वृद्धत्‍वामुळे त्‍याला अंधपणा आला होता. त्‍यातच त्‍याला कुष्‍ठरोगही झाला होता. त्‍यामुळे लोक जरासे त्‍याच्‍यापासून लांबच राहत. बिचारा भिकारी रस्‍त्‍यावर बसून लोकांकडे कळवळून भीक मागत असे. पण त्‍याच्‍या त्‍या कुरुप रुपामुळे तो कुणालाही आवडत नसे.  त्‍याच रस्‍त्‍यावरून एक कॉलेजवयीन तरूण जात असे. त्‍याचा जाण्‍यायेण्‍याचा रस्‍ताच तो होता त्‍यामुळे त्‍या तरूणाला हा भिकारी रोजच दिसत असे. भिका-याची अशी अवस्‍था पाहून तरूणाला खूप वाईट वाटे. कधीकधी तो दोनपाच रूपये त्‍या भिका-याला देतही असे पण मनातून मात्र तो खूप दु:खी होत असे. तरूणाला वाटे की आंधळा, पांगळा, कुष्‍ठरोग झालेला देह घेऊन जगताना या जीवाला किती यातना होत असतील. देवसुद्धा अशा जीवांना पटकन का बरे उचलत नाही. एकेदिवशी तो भिका-याजवळ थांबला व म्‍हणाला,''बाबा, देवाने अशी अवस्‍था केली असतानासुद्धा तुम्‍ही देवाचेच नाव घेऊन का जगत आहात. तुम्‍ही भीक मागून पोट भरता, पण देवाला मरण मागण्‍याची तुम्‍ही का प्रार्थना करत नाही.'' तरूणाच्‍या या बोलण्‍यावर भिकारी हसला व म्‍हणाला,'' मुला, मरण मागून या यातनांपासून दूर जावे ही गोष्‍ट मला किंवा परमेश्‍वराला दोघांनाही कळते पण कितीही जरी मी प्रार्थना केली तरी या जन्‍माचे भोग भोगल्‍याशिवाय माझी सुटका नाही हे त्‍या परमेश्‍वराला जास्‍त कळते आणि मी रोजच झोपण्‍यापूर्वी प्रार्थना करतो की देवा यातून सुटका कर पण देवाला वाटते की, मला जास्‍तीत जास्‍त लोकांनी बघावे आणि विचार करावा की पूर्वी मी ही तुमच्‍यासारखाच हातीपायी धड होतो, सुंदर दिसत होतो पण अपघातात पाय गेले, म्‍हातारपणाने डोळे गेले आणि अचानक कुष्‍ठ उदभवले. यातून परमेश्‍वर सुचवू पाहतो आहे की सगळे दिवस सारखे नसतात त्‍यामुळे कोणत्‍याही गोष्‍टीचा अहंकार बाळगू नये.'' भिका-याचे हे बोल ऐकताच तरूण मुलगा अचंबित झाला, त्‍याच्‍या सहज बोलण्‍यात त्‍याने फार मोठे तत्‍वज्ञान शिकविले होते.

तात्‍पर्य :- सर्व दिवस सारखे नसतात, त्‍यामुळे प्राप्त परिस्थितीमध्‍ये अहंकार न बाळगणे हेच बरे.

वर्तमानपत्रातून संग्रहित

मराठी बोधकथा

भीतीमुळेच मरण आले


कथा क्र.240

एका गावातील चार मित्र व्‍यापार करण्‍यासाठी शहराकडे चालले होते. वाटेत मोठे जंगल लागले. चालून चालून दमल्‍यावर विश्रांतीसाठी आसरा शोधू लागले. त्‍यांना भूकसुद्धा लागली होती. त्‍यांना एक झोपडी दिसली. त्‍याचे दार वाजवल्‍यावर एक म्‍हातारी बाहेर आली. त्‍यांनी तिला जेवण मिळेल का असे विचारले असता. म्‍हातारीने त्‍यांना भाकरी आणि ताक मोठ्या प्रेमाने खाऊ घातले. जेवण करून तृप्‍त झालेले ते मित्र काही वेळाने मार्गस्‍थ झाले. ते निघून गेल्‍यानंतर म्‍हातारीने ताकाच्‍या भांड्यात वाकून पाहिले असता त्‍यात साप मरून पडलेला दिसला. ती म्‍हातारी अस्‍वस्‍थ झाली. आपण त्‍या वाटसरूंना विष खायला घातले असे तिला वाटले. तिकडे त्‍या चौघांनी शहरात चांगला जम बसवला. बरेचसे पैसे मिळवून ते गावाकडे परतत होते. वाटेत त्‍या म्‍हातारीकडे पुन्‍हा थांबले. तिला म्‍हटले, आई तुम्‍ही आम्‍हाला चांगले जेवण दिले होते. आजही तसेच चांगले जेवण पुन्‍हा एकदा द्या. म्‍हातारी म्‍हणाली,'' बाबांनो तुम्‍ही जीवंत आहात याचेच मला समाधान आहे रे बाबांनो, कारण तुम्‍ही चौघे जेवून गेल्‍यावर मी ताकाच्‍या भांड्यात साप मेलेला पाहिला होता मला वाटले की तुम्‍ही चौघेही मेलात की काय'' हे ऐकताक्षणी आपण साप मेलेल्‍या भांड्यातील अन्न खाल्‍ले याची किळस येऊन व विष आपल्‍या पोटात गेले या भीतीने चौघांनाही उलट्या होऊ लागल्‍या व वारंवार उलट्या येऊन चौघेहीजण घाबरून मरण पावले.

तात्‍पर्य :- माणसाला जोपर्यत खरे समजत नाही तोपर्यंत तो‍ निश्चिंत असतो पण सत्‍य समजताच त्‍याच्‍यातील निडरपणा कमी होऊन तो घाबरतो. यासाठीच निडरपणा अंगी बाणवणे गरजेचे आहे.

मराठी बोधकथा

राजाची सुधारणा


कथा क्र.239

एक अत्‍याचारी राजा राज्‍य करत होता. जेव्‍हा प्रजा त्‍याच्‍या अत्‍याचाराने त्रस्‍त झाली होती. तेव्‍हा देवराज इंद्राने त्‍याला धडा शिकवण्‍याचा निर्णय घेतला. त्‍यांनी शिका-याचे रूप धारण करून नगरात प्रवेश केला. शिका-यासोबत एक भयंकर कुत्रा होता. शिकारी आणि कुत्रा राजमहालाजवळ पोहोचले. तेथे पोहचताच आधीच ठरल्‍याप्रमाणे जोरजोरात भुंकण्‍यास सुरुवात केली. राजा दचकून जागा झाला. त्‍याने शिका-याला कुत्र्याच्‍या भुंकण्‍याचे कारण विचारले. शिकारी म्‍हणाला, राजन माझा कुत्रा उपाशी आहे. त्‍याची भूक शमवली पाहिजे. राजाने नोकरांना आज्ञा दिली. खाद्यभंडारामध्‍ये जे काही सर्व त्‍या कुत्र्यास खाण्‍यास दिले. तरीही तो कुत्रा भुंकण्‍याचे काही थांबेना. राजा हतबल झाला. तेव्‍हा शिकारी म्‍हणाला, जोपर्यंत तुझ्या राज्‍यातील लोकांवरील अत्‍याचार थांबणार नाहीत, लोक सुखी असणार नाहीत तोपर्यंत हा कुत्रा भुंकण्‍याचे थांबवणार नाही. हा कुत्रा अन्‍यायाचे प्रतीक आहे. अन्यायाला वाचा फोडण्‍याचे काम हा करत आहे. अत्‍याचार, अनाचार, सावळागोंधळ करणे हे थांबविणे हे राजाच्‍या हातात असते. हे ऐकून राजाच्‍या डोक्‍यात प्रकाश पडला व त्‍याने शिका-याचे पाय धरून क्षमा मागितली व भविष्‍यात नीट वागण्‍याची हमी दिली.

मराठी बोधकथा

इच्‍छांना अंत नसतो


कथा क्र.238

एक राजा प्रजेच्‍या सुखसुविधेकडे लक्ष द्यायचा. तरीही प्रजेकडून दर दिवसाला नवीन मागणी यायची. प्रजेला संतुष्‍ट ठेवण्‍यासाठी राजा रात्रंदिवस झटत होता. परंतु प्रजेच्‍या इच्‍छेला अंत नव्‍हता. अखेरीस राजा आजारी पडला. कारण तो दु:खी कष्‍टी राहत होता. काय केल्‍याने प्रजा सुखी राहिल याचा तो विचार सातत्‍याने करत असे. अनेक वैद्यांनी राजाच्‍या प्रकृतीची तपासणी केली. राजावर उत्तमात उत्तम उपचार करण्‍यात आले, औषधपाणी करण्‍यात आले परंतु फायदा होत नव्‍हता. कारण राजाचे दुखणे हे मानसिक स्‍वरूपाचे होते. योगायोगाने एके दिवशी हिमालयातील साधू त्‍याच्‍याकडे आले. राजाने त्‍यांना आपली व्‍यथा सांगितली. राजा म्‍हणाला, महाराज तुम्‍ही परमज्ञानी आहात, माझ्यावरील संकट दूर करा. साधूंना सर्व परिस्थिती माहिती होती. राजाला शारीरिक नव्‍हे तर मानसिक आजार होता. तो दूर करण्‍याची गरज होती. त्‍यांनी राजाला समजावले, तुझी विचार करण्‍याची पद्धतच तुझी व्‍यथा बनली आहे. तू प्रजेच्‍या इच्‍छा पूर्ण करण्‍यासाठी आटापिटा करतो आहेस, पण तू हे विसरतोस की, मन हे चंचल असते. मनात विविध प्रकारच्‍या इच्‍छा उत्‍पन्न होतच राहतात. त्‍यामुळे तुझी प्रजा काही ना काही इच्‍छा व्‍यक्त करणारच, तू त्‍यांना जितके देत जाशील तितके त्‍यांचा हव्‍यास वाढत जाईल. मनाच्‍या संतुष्‍टीला सीमा नसते. सुख इच्‍छेची नियंत्रित पूर्ती करण्‍यामध्‍ये आहे. तेव्‍हा इच्‍छा नियंत्रणात ठेवण्‍याची गरज असते. तीच सवय जनतेला लावली पाहिजे. यामुळे तू स्‍वत:चे मानसिक स्‍वास्‍थ हरवून बसला आहेस. राजाला आपली चूक लक्षात आली.

तात्‍पर्य :- इच्‍छा या अमरवेलीसारख्‍या असतात, त्‍या अमर्याद असतात, पहिली इच्‍छा किंवा शंभरावी इच्‍छा ही अमर्यादच असते, तिला मरण नाही फक्त मर्यादित ठेवणे किंवा नियंत्रण ठेवणे हेच आपल्‍या हातात आहे.

मराठी बोधकथा

सोमवार, २८ नोव्हेंबर, २०१६

मुक्तीचा मार्ग


कथा क्र.२३६

एकदा एका राजाला त्‍याच्‍या राजपुरोहिताने सांगितले की, श्रीमदभागवताचे पूर्ण पारायण केले तर त्‍याच्‍या श्रवणाने त्‍याला मुक्ती मिळेल. आपल्‍यालाही मुक्ती मिळावी अशी राजाची इच्‍छा होती. त्‍याला हा मार्ग फारच सोपा वाटला, त्‍याने पारायण करविले. पारायण पूर्ण झाल्‍यावर स्‍वत: मुक्त करण्‍यास त्‍याने राजपुरोहितांना सांगितले. राजपुरोहिताची गाळण उडाली, राजाला मुक्ती कशी मिळवून द्यावी, त्‍याने यासाठी आठ दिवसांची मुदत मागून घेतली. त्‍याच्‍या मुलीने त्‍याला काळजीचे कारण विचारले, कारण ऐकून ती म्‍हणाली, ठीक आहे राजाच्‍या या मुक्तीच्‍या प्रश्‍नाचे उत्तर मी देईन. आठव्‍या दिवशी राजपुरोहित आपल्‍या मुलीबरोबर दरबारात गेले. पुरोहितकन्‍येने राजाला बागेत येण्‍याची विनंती केली. बागेत गेल्‍यावर तिने दोघांनाही वेगवेगळ्या झाडांना बांधले. झाडाला बांधलेल्‍या तिच्‍या वडीलांना मोकळे करण्‍याची विनंती तिने राजाला केली. याने राजा रागावला, चिडला व तो म्‍हणाला, मी स्‍वत:च बांधलो गेलो आहे मी काय राजपुरोहिताना मोकळे करणार. राजाचे उत्तर ऐकताच मुलगी म्‍हणाली, महाराज, अशाच प्रकारे प्रत्‍येक जीव हा कर्मबंधनाने बांधला गेला आहे. ते दुस-यांना काय मुक्त करणार, प्रत्‍येक मनुष्‍य आपल्‍या कर्माचा हिशोब करण्‍यात गुंतलेला असतो मग ख-या अर्थाने मुक्त होण्‍यासाठी सदगुरुच वाट दाखवू शकतात.

मराठी बोधकथा

स्‍वातंत्र्य-पारतंत्र्य


कथा क्र.२३६

अमेरिकेत एकेकाळी गुलामगिरीची प्रचलित होती. निग्रो लोकांची शेळ्या मेंढ्यांप्रमाणे खरेदीविक्री होत असे. अब्राहम लिंकन यांनी गुलामगिरीची प्रथा मोडून काढण्‍यासाठी प्रयत्‍न केल्‍यामुळे या प्रथेचा अंत झाला व निग्रो लोकांची गुलामीतून सुटका झाली. मुक्त झाल्‍यानंतर निग्रो लोकांनी रोजगाराचा शोध सुरु केला. एक वृद्ध, अशक्‍त वृद्ध निग्रो माणूस कामाच्‍या शोधात भटकत होता. पण त्‍याला काम काही मिळाले नाही. फिरून फिरून तो थकला व एके जागी बसला. तेथे त्‍याची भेट एका मालक जातीच्‍या ओळखीच्‍या माणसाबरोबर झाली. वृद्ध निग्रोची ती अवस्‍था पाहून तो माणूस म्‍हणाला,''तुझे हे होणारे हाल मला पाहवत नाहीत. तू कशाने इतका त्रस्‍त झाला आहे'' वृद्ध म्‍हणाला,''मला काम मिळत नाही'' तो माणूस म्‍हणाला,''काही दिवसांपूर्वी तर तुझी अवस्‍था चांगली होती.'' निग्रो म्‍हणाला,'' त्‍यावेळी मला बराच आराम होता. माझा मालक खूप दयाळू माणूस होता. मला तो फारसे काम लावत नसे. माझ्यावर अत्‍याचार करत नसे. कठीण कामे करण्‍यास लावित नसे.'' सहानुभूती दाखवून तो माणूस म्‍हणाला,'' अरे मित्रा मग तर ते गुलामीचे दिवसच चांगले म्‍हणायला हवे की, ही मुक्ती काही तुला मानवली नाहीये असेच दिसून येतेय. ती तुझ्या कोणत्‍याच कामी येत नाहीये.'' हे ऐकताच बसलेला तो निग्रो माणूस ताडकन उठून उभा राहिला व उंच स्‍वरात ओरडून बोलला,''मालक, गुलामगिरी स्‍वीकारण्‍यापेक्षा हे मुक्त जीवन हजारपट चांगले आहे. कारण आमच्‍या जीवनावर केवळ आमचाच अधिकार आहे; ते सावरण्‍यासाठी आम्ही स्‍वतंत्र आहोत. मालकाकडून पिंज-यात मिळणा-या पेरूच्‍या फोडी खाण्‍यापेक्षा उंच आकाशात उपाशीपोटी भरारी घेणे पोपटाला खूप आवडते हे लक्षात आहे ना.''

तात्‍पर्य :- मनुष्‍याच्‍या सर्वांगीण विकासासाठी स्‍वातंत्र्य ही पहिली अट आहे, पारतंत्र्य पतनाचे तर मुक्ती प्रगतीचे द्वार आहे.

वर्तमानपत्रातून संग्रहित

वडिलांची पुण्याई


कथा क्र.२३५

पंडीत रामप्रसाद गरीब होते. परंतु आतिथ्‍य करण्‍यात अग्रेसर होते. पंडीतजींची कमाई स्‍वत:वर कमी आणि दुस-यावर जास्‍त खर्च होत होती. एकदा पंडीतजींच्‍या घरी काही पाहुणे आले. जेवणानंतर त्‍या लोकांनी पंडीतजींना संध्‍याकाळच्‍या गाडीची तिकिटे काढण्‍यास सांगितले. त्‍यादिवशी पंडीतजींकडे काहीच पैसे नव्‍हते. याबाबत पाहुण्‍यांकडे ते काहीच बोलले नाही. त्‍यांनी आपल्‍या मित्राकडे चौकशी केली पण हाती काहीच लागले नाही. ते चिंतेत बसले होते. इतक्‍यात खेडवळ वाटणारा वयस्‍कर माणूस त्‍यांच्‍याकडे आला व म्‍हणाला,'' रामप्रसाद पंडीत आपणच का,'' रामप्रसाद होय म्‍हणाले असता, वयस्‍कर माणसाने त्‍यांना त्‍यांच्‍या वडीलांचे नाव हरिप्रसाद होते का असे विचारले. रामप्रसाद हो म्‍हणताच त्‍या माणसाचे डोळे भरून आले व तो म्‍हणाला,'' बेटा, वीस वर्षापूर्वी तुझे वडील आणि मी एकत्र प्रवास करत होतो. त्‍यावेळी माझा खिसा कोणीतरी कापला व माझे पैसे लांबविले. त्‍यावेळी तुझ्या वडीलांनी मला पैसे दिले होते ते परत करण्‍यास मी आलो आहे. त्‍यावेळी त्‍यांनी जर मला मदत केली नसती तर आजचा दिवस मी पा‍हूच शकलो नसतो. त्‍यानंतर मी गावी गेलो, पै-पै साठवून त्‍यांचे पैसे एकत्र केले पण त्‍यांच्‍या निधनाची वार्ता मला समजली म्‍हणून तेव्‍हा जमले नाही तर आज स्‍वत: ते पैसे परत करण्‍यास मी आलो आहे.'' असे म्‍हणून त्‍याने ते पैसे पंडीतजींना दिले व एकहीक्षण न थांबता तो माणूस निघून गेला. पंडीतजींनी त्‍या पैशातून पाहुण्‍यांची व्‍यवस्‍था केली व ईश्‍वराचे आभार मानले.

तात्‍पर्य :- परोपकारी वृत्ती माणसाच्या कामी येते. कधी काळी उपयोगी केलेले उपकारसुद्धा या ना त्‍या रूपाने परतफेड करण्‍यासाठी कोणी ना तयार होऊन आपले कामी येतो.

वर्तमानपत्रातून संग्रहित

वृद्ध महिला आणि चोर


कथा क्र.२३४

एक गरीब वृद्ध महिला आपल्‍या गावातून दुस-या गावाला जाण्‍यास निघाली. तिच्‍या डोक्‍यावर मोठे गाठोडे होते. चालून चालून ती फार थकली. ती विचार करू लागली कि आपल्‍याला आता कोणाचीही जर मदत मिळाली तर किती बरे होईल तेवढ्यात तेथून एक घोडेस्‍वार जाताना तिला दिसला. वृद्ध महिला त्‍याला थांबवत म्‍हणाली,'' मुला मी फार थकले आहे. तू माझ्यावर दया कर आणि ही गाठोडी पुढच्‍या गावात पोहोचवून दे. मी पाठीमागून चालत चालत येईन आणि ते गाठोडे तेथून घेईन'' घोडेस्‍वार घाईत होता, त्‍याने न थांबताच म्‍हटले की मला इतका वेळ नाही की दुस-याचे ओझे मी वहात बसू. इतके बोलून तो पुढे गेला. महिलेला फार वाईट वाटले आणि ती त्‍याला दोष देऊ लागली मग अचानक कोणीतरी तिच्‍या कानात म्‍हणले,'' जे झाले ते चांगले झाले. तुझे गाठोडे घेऊन तो पळून गेला असता तर. तू तर त्‍या माणसाला ओळखतही नव्‍हतीस की मग तू काय केले असते.'' हा विचार मनात येताच तिने सुटकेचा निश्‍वास सोडला. कारण त्‍या गाठोड्यात तिच्‍या आयुष्‍यभराची कमाई होती. तिने तिची जीवनभराची कमाई चांदीच्‍या रूपात साठविली होती. पुढे थोडे दूर गेल्‍यावर घोडेस्‍वाराच्‍या मनात विचार आला की आपण त्‍या गाठोड्यात काय आहे हे न पाहताच संधी सोडून दिली. कदाचित त्‍या गाठोड्यात काही सोनेनाणे असले तर आपण मोठी चूक केली हे लक्षात येऊन तो परत वृद्धेच्‍या दिशेने परत आला आणि तिला म्‍हणाला,''आजीबाई, मी चूक केली तुझे गाठोडे मी घेतले नाही, मला आता चुकीचे परिमार्जन करण्‍याची संधी दे. मी तुझे गाठोडे पुढच्‍या गावात नेऊन पोहोचवितो.'' पण महिला आता सावध होती. तिने घोडेस्‍वाराची मानसिकता अचूक ओळखली व म्‍हणाली,''बेटा, आता काहीही झाले तरी हे गाठोडे मी तुला देणार नाही. ज्‍याने तुला गाठोडे परत मागण्‍याची अक्कल दिली त्‍यानेच मला गाठोडे न देण्‍याचीही अक्कल दिली आहे.'' घोडेस्‍वार रिकाम्‍या हाताने परत गेला.

तात्‍पर्य : बिगर ओळखीच्‍या माणसावर विश्‍वास ठेवल्‍याने धोका होण्‍याची शक्‍यता असते. विश्‍वास अशा माणसावर ठेवा ज्‍याला तुम्‍ही पारखले आहे.

वर्तमानपत्रातून संग्रहित

पश्‍चाताप


कथा क्र.२३३


मेहमूद नावाचा एक इराणी व्‍यापारी होता. एकदा त्‍याने मोठी पार्टी दिली. मध्‍यरात्रीपर्यंत खानपान चालू होते. या गर्दीत एक चोर हवेलीत येऊन लपला. मेहमूदने त्‍याला पाहिले होते. परंतु तो त्‍याला काहीच बोलला नाही. जेव्‍हा सगळे पाहुणे गेले तेव्‍हा त्‍याने नोकरास दोन व्‍यक्तिंचे जेवण लावण्‍याचे आदेश दिले. त्‍यानंतर लपून बसलेल्‍या चोराजवळ तो गेला. चोर घाबरला, मेहमूदने त्‍याला प्रेमाने जेवू घातले. त्‍यानंतर चोरी करण्‍याचा उद्देश विचारला. तेव्‍हा चोर म्‍हणाला, माझे नाव रमीझ आहे, मी श्रीमंत होतो पण दारूमुळे मी या अवस्‍थेत आलो आहे. मेहमूदने त्‍याला काही धन दिले आणि काही व्‍यवसाय चालू करण्‍याविषयी सुचविले. चोराने त्‍याचे म्‍हणणे ऐकले. दरम्‍यान काही वर्षे या गोष्‍टीला लोटली. एकदा तो मेहमूदकडे आला, मेहमूदने त्‍याला ओळखले नाही. चोर स्‍वत:च म्‍हणाला,तुम्‍ही चोरी सोडण्‍याविषयी सांगितल्‍यानंतर मी तुम्‍ही दिलेल्‍या पैशातून व्‍यापार सुरु केला. आज माझ्याकडे लाखोंची संपत्ती आहे. फक्त एक मेहरबानी करा. मी ज्‍यांच्‍याकडे चोरी त्‍यांचे पैसे परत करण्‍याची मला इच्‍छा आहे. त्‍यांचे पैसे परत केल्‍याने माझ्या मनावरील ओझे कमी होईल. मेहमूदने त्‍याला कोतवालाकडे नेले. कोतवाल त्‍याचे बोलणे ऐकून प्रभावित झाला. ज्‍यांच्‍याकडे त्‍याने चोरी केली होते त्‍यांची नुकसानभरपाई म्‍हणून दुपटीने पैसे दिले. लोकांनीही त्‍याला मोठ्या मनाने माफी दिली.

तात्‍पर्य :- केलेल्‍या वाईट कृत्‍यांचा पश्‍चाताप होणे ही मनुष्‍य असण्‍याची खूण होय.

वर्तमानपत्रातून संग्रहित

एकीचे बळ


कथा क्र.२३२

सर्वश्रेष्‍ठ एका जातक कथेतील वर्णनानुसार वाराणसीलगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्‍याने खड्ड्यात पडलेल्‍या जंगली कुत्र्याच्‍या पिलाचा जीव वाचवला तेव्‍हापासून त्‍याला त्‍या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्‍याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्‍याच्‍याजवळ येत असत. परंतु त्‍यांना सर्वांना एका वाघाने फार त्रस्‍त करून सोडले होते. तो रोज त्‍यांच्‍यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्‍या माथ्‍यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्‍याच्‍यावर भुंकु लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्‍या कुत्र्याच्‍या मागे असणा-या एका मोठ्या खड्ड्यात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्‍याच्‍यावर धाव घेतली व त्‍याच्‍यावर हल्‍ला करून त्‍याला ठार केले.

तात्‍पर्य :- एकीचे बळ मोठे असते.

वर्तमानपत्रातून संग्रहित

खरा वेडा कोण

कथा क्र.232



एका वेड्यांच्‍या हॉस्पिटलमध्‍ये वेड्यांना बाहेर पडेपर्यंत म्‍हणजेच पूर्ण बरा झाला आहे की नाही हे पाहण्‍यासाठी अनेक मानसशास्‍त्रीय चाचण्‍यांना तोंड द्यावे लागत असे. त्‍यातील शेवटच्‍या चाचणीमध्‍ये वेड्यासमोर एक नवे कोरे चकचकीत पाच रूपयांचे नाणे आणि एक मळकट पन्‍नास रूपयांची नोट ठेवली जाई. त्‍यातील फक्त एकच गोष्‍ट त्‍याला उचलण्‍यास सांगितली जाई. वेड्याने पन्‍नास रूपये उचचले की त्‍याला डिसचार्ज दिला जाई व तसे न केल्‍यास त्‍याला पुन्‍हा एकदा चाचण्‍या पार करायला सांगितल्‍या जात. गरज पडल्‍यास पुन्‍हा उपचारासाठीही पाठविले जाई. हॉस्‍पीटलमधील एक वेडा शेवटच्‍या चाचणीपर्यंत सगळ्या चाचण्‍या पटापट पार करत असे मात्र शेवटच्‍या चाचणीला मात्र नापास होत असे. अनेकदा असे घडल्‍यावर चाचणी घेणारे डॉक्‍टर कंटाळले व त्‍यांनी एक युक्ती केली पुढच्‍या वेळेला त्‍या वेड्यासमोर एक पाच रूपयांची जुनी नोट व पन्‍नास रूपयांची कोरी करकरीत नवी नोट ठेवली तरीही त्‍या वेड्याने पाच रूपयांचीच नोट उचचली. हे पाहून डॉक्‍टर आश्‍चर्यचकित झाले व ओरडले,'' अरे मूर्खा, सगळ्या चाचण्‍या आरामात पार करतोस आणि शेवटच्‍या चाचणीत मात्र कायम चुकतोस. तुला पाच आणि पन्‍नास यातील फरक कळत नाही काय'' वेडा शांतपणे म्‍हणाला,'' ते मला चांगलं कळतं डॉक्‍टरसाहेब, पण इथून बाहेर पडलो की, मला रोजचा खर्च स्‍वत:लाच करावा लागणार आहे. त्‍यापेक्षा पाच रूपयांचे नाणे उचचले की, मला इथून बाहेर पडावे लागत नाही, पाच रूपयेही मिळतात आणि खाणेपिणेराहणे सगळे काही फुकटात होते. मग मी पन्‍नास रूपयांची नोट उचलून स्‍वत:च्‍या पायावर धोंडा पाडून का म्‍हणून घेऊ''

तात्‍पर्य :- काही नाही.

वर्तमानपत्रातून संग्रहित


शनिवार, २६ नोव्हेंबर, २०१६

धर्म


कथा क्र.231


एकदा एका राजाने दवंडी पिटवली की जो कोणी मला सर्वश्रेष्‍ठ धर्माचे महत्‍व समजावून सांगेल त्‍याला मी मोठे बक्षीस देईन व तो धर्म मी स्‍वीकारेन. ही वार्ता ऐकताच सगळीकडे मोठमोठे धर्मगुरु, धर्मोपदेशक, आचार्य राजाला आपल्‍या धर्माचे महत्‍व समजावून सांगण्‍यासाठी येऊ लागले. ते सर्वच जण एकच गोष्‍ट आठवणीने करत होते की स्‍वत:च्‍या धर्माचे महत्‍व सांगताना मात्र दुस-याला धर्माला कमी लेखत होते. दुस-याच्‍या धर्माची निंदानालस्‍ती करत होते. यातून एकच झाले की, राजाला काहीच कळेना की कोणता धर्म सर्वश्रेष्‍ठ आहे व त्‍यामुळे तो दु:खी होत होता. पण त्‍याने शोध सुरुच ठेवला. वर्षानुवर्षे हाच क्रम चालू राहिला. राजा वृद्ध होत चालला. शेवटी राजा एका साधूच्‍या दर्शनास गेला. तेथे गेल्‍यावर त्‍याने साधूला नमस्‍कार केला व म्‍हणाला,''साधूमहाराज, मी सर्वश्रेष्‍ठ धर्माच्‍या शोधात आहे पण आजपर्यंत मला सर्वश्रेष्‍ठ धर्म कोणता हेच कळाले नाही.'' साधूने राजाकडे पाहिले व म्‍हणाले,''सर्वश्रेष्‍ठ धर्म तर जगात अस्तित्‍वातच नाहीत. जगात एकच धर्म आहे आणि बाकी सगळे हे त्‍या धर्माला फुटलेले अहंकार आहेत. धर्म तर तोच असतो जिथे व्‍यक्ती निष्‍पक्ष असतो, पक्षपात करणा-या मनात धर्म राहूच शकत नाही.'' साधूचे हे बोलणे ऐकून राजा प्रभावित झाला. साधू पुढे जाऊन राजाला म्‍हणाला,''राजन, चला आपण नदी पार करून पलीकडे जाऊया'' नदीतीरावर दोघे पोहोचले, त्‍यांनी तिथे अनेक सुंदर नावा (होडया) पाहिल्‍या. साधू राजाला म्‍हणाले,'' राजे, चला आपण एका सर्वश्रेष्‍ठ नावेतून पैलतीर गाठूया'' प्रत्‍येक नावेपाशी जाताच साधू त्‍या नावेबद्दल काही ना काही चुक दाखवित असे व पुढे जात असे. असे करता करता दुपार झाली. राजाला भूक लागली व त्रासून राजाने साधूला म्‍हटले,''महाराज आपल्‍याला नावेतून फक्त पलीकडे जायचे आहे, अहो इतकी छोटी नदी आहे की पोहूनसुद्धा आपण पटकन पलीकडे पोहोचून जाऊ मग त्‍याची इतकी चर्चा कशाला'' साधूने राजाकडे पाहिले व म्‍हणाले,'' राजन, हेच तर मला तुम्‍हाला सांगायचे आहे. धर्माला नाव नसतेच, धर्म आपल्‍याला स्‍वत:ला पोहून पार करायचा असतो. दुसरा कोणी आपल्‍याला धर्मापलिकडे पोहोचवू शकत नाही. आपल्‍यालाच जावे लागते.'' राजा सर्व काही समजून चुकला.

तात्‍पर्य :- मित्रमैत्रिणीनो आता वेगळे तात्‍पर्य काय सांगू.

साभार :- धार्मिक कथाऍं –फेसबुक पेज

सदर कथा पूर्वप्रकाशित असून मराठी बोधकथा यांनी भाषांतरीत केली आहे.

(मराठीत ऐकलेल्या, वाचलेल्या काही निवडक कथा देण्याचा एक प्रयत्न)