बुधवार, २९ जुलै, २०१५

स्‍वावलंबन

कथा क्र.228

एक माणूस कामासाठी दुस-या शहरात गेला. प्रवासात त्‍याची काही लोकांशी ओळख झाली. तेही कामानिमित्ताने त्‍याच शहरात चालले होते. त्‍यांच्‍यापैकी काहीजण पायी तर काही घोड्यावर स्‍वार होते. बोलत चालले असताना एका घोडेस्‍वाराच्‍या हातून चाबूक खाली पडला. त्‍या व्‍यक्तिने त्‍या घोडेस्‍वारास खाली उतरू न देता, चाबूक देण्‍याची तयारी दर्शविली पण त्‍या सहका-यास नम्रपणे नकार देत स्‍वत: खाली उतरून त्‍या घोडेस्‍वाराने चाबूक स्‍वत:च हातात घेतला.
खालून मदत करणा-या व्‍यक्तिने याचे कारण घोडेस्‍वारास विचारले असता घोडेस्‍वार उत्तरला,''आपण ज्‍यावेळी घोड्यावर बसतो तेव्‍हा चाबूक आपणच सांभाळावा लागतो. आपण प्रत्‍येक गोष्‍टीत स्‍वयंपूर्ण राहिलो तरच आपल्‍याला यशाची खात्री आहे असे समजावे.''

तात्‍पर्य :- कुणावरही विसंबून न राहता स्‍वावलंबनाचा स्‍वीकार केल्‍याने यश मिळतेच.

बुधवार, २२ जुलै, २०१५

सवय

कथा क्र.227

एका माणसाने त्‍याच्‍या घरी एक पोपट पाळला होता. पिंज-यात ठेवलेल्‍या पोपटाला चांगले खायलाप्‍यायला मिळत असे व पोपट बोलका असल्‍याने घरातील लोकांकडून त्‍याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्‍या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्‍य दाटून येई. अखेर एकेदिवशी पोपटाला संधी चालून आली. त्‍या माणसाने पोपटाला खाणे देण्‍यासाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्‍याच्‍याहातून ते तसेच उघडे राहिले होते. माणसाला अचानक काही काम आल्‍याने तो ते
दार उघडे टाकून निघून गेला असता
पोपट पिंज-याच्‍या बाहेर निघून गेला. पण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्‍याने त्‍याला फारसे नीट उडताच येत नव्‍हते. एका झाडावर गेला असता त्‍याला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्‍याने त्‍याला पोपटांची भाषा येत नव्‍हती म्‍हणून इतर पोपटही त्‍याला सहकारी मानत नव्‍हते. पिंज-यात आयते खायची सवय असल्‍याने त्‍याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्‍याने तो आजारी पडला व
मरून गेला.

तात्‍पर्य : - जास्‍त काळ पारतंत्र्यात(गुलामगिरीत) राहिल्‍याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते. मग परक्याची भाषा, संस्‍कृतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्‍वातंत्र्य टिकवण्‍यासाठीची जिद्द अंगी राहत नाही. परक्‍या संस्‍कृतीचे चांगले काही घेताना आपल्‍या संस्‍कृतीचे विस्‍मरण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा.

सोमवार, ६ जुलै, २०१५

वक्ता आणि श्रोते


कथा क्र.226

एक विद्वान वक्ता एका अतिशय महत्‍वाच्‍या विषयावर तळमळीने भाषण देत होता. मात्र श्रोत्‍यांची चुळ‍बुळ सुरु होती. काहीजण इकडे बघ तर काहीजण रस्त्‍यावर खेळणा-या लहानमुलांकडे बघत होते. तेव्‍हा श्रोत्‍यांचे आपल्‍या व्‍याख्‍यानाकडे अवधान खेचून आणण्‍यासाठी वक्त्याने एक गोष्‍ट सांगायला सुरुवात केली. कथेची सुरुवात होताच जादूची कांडी फिरल्‍याप्रमाणे सर्व श्रोते अतिशय सावधपणे गोष्‍ट ऐकू लागले. वक्ता म्‍हणाला,'एकदा एक देव, एक पाणसर्प आणि एक चिमणी हे तिघे एकत्रितरित्‍या प्रवासाला निघाले. चालता चालता त्‍यांना वाटेत एक नदी लागली. चि‍मणीने उडून पैलतीर गाठला. पाणसर्प पाण्‍यातून पोहत पोहत पलीकडे पोहोचला.'' बस्‍स इतकेच असे सांगून वक्‍त्याने आपले अर्धवट राहिलेले भाषण चालू केले. श्रोते आता जोरजोराने ओरडू लागले,'' अहो वक्तेमहाशय, देवाचे पुढे काय झाले, त्‍याने कशी काय नदी पार केली. त्‍या तिघांचे पुढे काय झाले.'' वक्‍त्‍याने शांतपणे उत्तर दिले,''देवच तो; तेव्‍हा ती नदी पार करून जाण्‍याचे सामर्थ्‍य त्‍याच्‍याठायी असणे सहाजिकच आहे. तो पाण्‍यावरूनही चालत गेला असेल किंवा पाण्‍याला बाजूला सारून जाण्‍याचीही
त्‍याच्‍यात होती पण तो अलिकडच्याच
तीरावर थांबला.'' श्रोत्‍यांनी मोठ्या उत्‍कंठेने विचारले की देवाने असे अलिकडेच थांबण्‍याचे कारण काय. यावर वक्ता म्‍हणाला,'' ज्‍या मूर्खाना महत्‍वाच्‍या विषयावरचे असणारे व्‍याख्‍यान न आवडता मनोरंजक गोष्‍टी आवडतात त्‍या मुर्खांचा विचार करत देव नदीकिनारी बसून आहे. जर तुम्‍ही या महत्‍वाच्या विषयाबद्दल माझे विचार ऐकून त्‍यावर काही उपाय केले व आपल्‍या राज्‍याला वाचविले तर देव निश्र्चित पलीकडच्‍या तीरावर निघून जाईल'' वक्‍त्‍याचा चतुरपणा कामी आला व श्रोत्‍यांनी पुढील व्याख्‍यान शांतपणे ऐकून घेतले.

तात्‍पर्य :- काहीवेळेस आपल्‍या चांगल्या व देशहिताच्‍या योजना लोकांच्‍या गळी उतरविण्‍यासाठी युक्तीप्रयु‍क्तीचा वापर करावाच लागतो. वर्तमानपत्रातून संग्रहित