शनिवार, २८ डिसेंबर, २०१३
सत्कृत्य
कथा क्र.159
एका वनात एक पारधी राहत होता. त्याने खूप वन्य
प्राण्यांची हत्या केली होती. त्यामुळे तो खूप पापी झाला होता. त्याची चाहूल
लागली तरी वन्यप्राणी भीतीने प्राणी थरथर कापत असत. एकेदिवशी तो आपल्या शिकारीच्या
शोधात असताना एका बेलपत्राच्या झाडावर चढला. खूप वेळ झाला तरी एकही शिकार त्याच्या
हाती लागली नाही. तो खूप चिडला व बेलपत्राच्या झाडाचे एक एक पान खाली टाकू लागला. बराच वेळ हा त्याचा उद्योग चालू
होता. झाडाच्या बुंध्याशी बेलपत्राचा हा मोठा ढीग तयार झाला पण हे पारध्याला
माहित नव्हते. त्या झाडाखाली एक महादेवाची पिंड होती. त्या पिंडीवर बेलाच्या
पानांचा ढीग पाहून महादेव प्रसन्न झाले व ते पारध्याच्या समोर प्रकट झाले. त्यांना
समोर पाहून पारधी आश्चर्यचकित झाला व म्हणाला,''महादेवा, मी खूप क्रूर आहे, अनेक वन्यप्राणी मारले
आहेत, खूप हिंसा केली आहे, पाप खूप केले पण पुण्याचे
एकही काम केलेले मला तरी आठवत नाही तरी पण आपण मला कसे बरे प्रसन्न झालात?" यावर
महादेव म्हणाले,''तू हिंसक आहेस, तुझ्या नकळत का होईना तू
माझी पूजा केली आहेस. पूजा-प्रार्थना हे असे काम आहे की ते चुकून जरी घडले तरी त्याचे
चांगलेच फळ मिळते. जर चुकून प्रार्थनेचे फळ इतके चांगले मिळत असेल तर नेहमी तर सत्कार्य
केलेस तर किती फळ मिळेल? पारध्याला आपली चूक समजली व त्याने आयुष्यभर कष्ट
करून जीवन जगला.
तात्पर्य :- एका सत्कृत्यामुळेदेखील
आपले आयुष्य बदलून जाऊ शकते.
स्वामी श्रद्धानंद
कथा क्र.158
घटना 1919 ची आहे. इंग्रजाविरोधात
संपूर्ण दिल्ली बंदची घोषणा करण्यात आली होती. लोक घरांच्या आत होते आणि रस्ते
मोकळे पडले. पोलीसांची गाडी चोहीकडे फिरत होती आणि कुठे एखदे दुकान उघडे तर नाही
ना याचा तपास करीत होती. संपूर्ण बाजार बंद होता परंतु एका ठेकेदाराने आपले
कार्यालय उघडे ठेवले होते. पोलीसांनी त्याला ते बंद करण्याचा आदेश दिला. मात्र त्याने तो पाळला नाही. त्यामुळे जास्तच वादविवाद झाला
आणि पोलीसांनी दोन स्वयंसेवकांना पकडले. या धरपकडीमुळे जनतेत क्रोधाची लाट पसरली.
बघता बघता 20 हजार लोक चांदणी चौकात
एकत्र जमा झाले. तेव्हा तेथे स्वामी श्रद्धानंद आले आणि त्यांनी परिस्थिती
आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यांनी त्या जनसमुदायाला शांत करण्यासाठी
भाषण केले. त्यामुळे जनसमुदायात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. जेव्हा स्वामीजी
परत येऊ लागले तेव्हा चांदणी चौकात गोळी झाडली गेली. त्यामुळे जनतेचा राग अनावर
झाला. स्वामींनी पुन्हा जनतेला शांत केले व पोलीसांना विचारले,''तुम्ही गोळी का चालवली?'' पोलीसांनी त्यांच्यावर
बंदूक रोखली व म्हटले,''बाजूला व्हा, नाहीतर तुमच्यावरच गोळी
झाडू'' हे ऐकताच स्वामीजी पुढे झाले व त्या पोलीसासमोर
जाऊन उभे राहून मोठ्या आवाजात म्हणाले,''मारा गोळी, मरणाला आम्ही भीत नाही'' हे त्यांचे धाडस पाहून
एक इंग्रज अधिकारी पुढे आला म्हणाला,''गोळी चुकून चालली'' स्वामीजी जनतेला घेऊन
शांततेने पुढे सरकले.
तात्पर्य :- जनताही त्यालाच
नेता मानते जो प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी त्याग करण्यास तयार असतो. नेता हा
धाडसी व आत्मविश्वासाने भरलेला तसेच स्वच्छ चारित्र्याचा असावा अशी जनतेची
अपेक्षा असते.
त्यागाचे महत्व
कथा क्र.157
फार वर्षापूर्वी एक स्वाभिमानी राजा होऊन गेला. त्याचे राज्य मोठे होते आणि
अपार संपत्तीने खजिना भरलेला होता. त्याचे महाल सोन्यापासून बनलेले होते.
नोकरचाकरांची रेलचेल होती. मात्र त्याचे सल्लागार त्याच्या अहंकाराला प्रोत्साहन
देत होते. एकदा त्याच्या दरबारात एक तेज:पुंज साधू आला. राजाला पाहूनच त्याने
ओळखले की राजाला फार गर्व चढला आहे. राजाने मोठ्या
तो-यात विचारले,''तुला काय पाहिजे?'' साधू म्हणाला,'' राजन, मला तुझ्याकडून काहीच नको आहे. उलट मीच तुला काहीतरी देण्यास आलो आहे.'' राजाचा अहंकार दुखावला व राजा मोठ्याने ओरडला,''लहान तोंडी मोठा घास घेतोस. लाज वाटते का नाही. तुझ्याजवळ फुटकी कवडी नाही अन
तू मला काय देणार?'' साधू मंद स्मित करत म्हणाला,''राजन, त्यागाशिवाय भोगाला चव येत नाही. वैभवात
जेव्हा त्याग समाविष्ट होते तेव्हा तो वंदनीय आणि प्रशंसनीय ठरतो. त्याग
येताच अहंकार दूर होतो. आसक्ती दूर होते आणि मन परमात्म्याकडे पोहोचण्यासाठी
तयार होते.'' फकीराच्या राजा खजील आला आणि त्याचे
डोळे उघडले. त्याने गर्वाचा त्याग केला.
तात्पर्य :- त्यागाने
अहंकाराचा नाश होतो. अहंकार हा मनुष्याचे नुकसान करतो.
मंगळवार, २४ डिसेंबर, २०१३
महत्व मानवसेवेचे
कथा क्र. 156
एक प्रसिद्ध संत होते. त्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी दूरदूरवरून शिष्यगण
येत असत. त्यांच्या शिष्य परिवारातील दोन शिष्य त्यांना खूप प्रिय होते. कारण
ते दोघेही धार्मिक वृत्तीचे होते. दोघेही पहाटे लवकर उठून स्नान करून पूजापाठ
करण्यात मग्न होते. चार तासांच्या पूजेनंतर ते दोघे थेट गुरुजवळ जात व आश्रमात
येणा-या रूग्णांची सेवा करण्यास ते गुरुला मदत करत.
त्या संतमहात्म्याने तर मानव सेवेचे व्रतच घेतले होते त्यामुळे स्वत: पुढाकार
घेऊन पीडित,दीनदुबळ्यांची सेवा करत असत. गरीब मुलांना
नि:शुल्क शिक्षण देत असत. गरीब कुटुंबाला ते अन्न,वस्त्र, निवारा उपलब्ध करून देत. असहाय, अनाथ व आजारी नागरिकांना आश्रय देऊन त्यांच्या उपचारांची व्यवस्था करत असत.
एकेदिवशी त्यांचे दोन्ही शिष्य त्यांच्या दीर्घपूजेत व्यग्र होते. त्याचवेळी
गुरुजींचे बोलावणे आले. कारण त्यादिवशी आश्रमात रुग्णांची संख्या जास्त होती.
परंतु दोन्ही शिष्य पूजा अर्धवट सोडून गेले नाहीत. गुरुजींनी थोडा वेळ वाट पाहून
पुन्हा निरोप धाडला. त्यावर त्या दोघांनी नाराजी व्यक्त केली व तेथे येऊन ते
गुरुजींशी वाद घलू लागले. तेव्हा गुरुजींनी त्यांना पुढील शब्दात मार्गदर्शन
केले,''वत्सांनो, मी तर व्यक्तिपूजेसाठी बोलावणे धाडले होते. पूजा, प्रार्थना तर देवतादेखील करतात. परंतु सेवा ही केवळ मनुष्यच करतो. सेवा ही
प्रार्थनेच्या बरोबरीची असते. कारण ती नि:स्वार्थी आणि परोपकारी असते.'' यानंतर त्या दोन्ही शिष्यांचे डोळे उघडले.
तात्पर्य :- ईश्वराची
जिवंत कलाकृती म्हणजे माणूस त्याची सेवा म्हणजे साक्षात ईश्वराची पूजा असते व
त्या सेवेपेक्षा अन्य कोणतीही पूजा ही मोठी नाही.
गुरुवार, १९ डिसेंबर, २०१३
जीवनाचे रहस्य
कथा क्र.155
एक माणूस जीवनाला कंटाळला होता. त्याला असे वाटत
होते की, इतक्या मोठया जगात आपण एकाकी आहोत. त्याला कोणी जवळ
करत नाही, तो कोणाच्या प्रेमास पात्र नाही, असा विचार करून दु:खी
राहायचा. वसंत ऋतु आला आणि चहूकडे सुगंधी फुले उमलल्याने सुवासाचा दरवळ पसरला
होता. सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असताना त्या व्यक्तिने स्वत:ला घरात
कोंडून घेतले होते. अचानक एक छोटी मुलगी दरवाजा उघडून
घरात आली व म्हणाली,'' तुम्ही उदास आहात असे
दिसते. याचे कारण काय?''
तो म्हणाला,'' माझ्यावर कोणी प्रेम करत
नाही.'' ती मुलगी म्हणाली,'' तुम्ही कोणावर प्रेम
करता?'' त्याच्याकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. तेव्हा
ती मुलगी त्याला म्हणाली,''
बाहेर येऊन पहा! तुमच्या दारासमोरच प्रेमाचा किती
दरवळ आहे.'' तिने त्याचा हात धरून बाहेर पसरलेल्या फुलांच्या
ताटव्यात उभे केले. तुम्ही ज्या फुलांवर जितके प्रेम कराल तितके करा! ते तितकेच
प्रेम तुम्हाला देतील.'' त्या मुलीच्या बोलण्याने त्याचा भ्रम दूर झाला
आणि त्याचे जीवन आनंदी झाले.
तात्पर्य:- जीवनाकडे
पाहाण्याचा दृष्टीकोन बदलला की जीवन आनंदी होण्यास मदत होते.
मंगळवार, १७ डिसेंबर, २०१३
सिंहाची गुणज्ञता
कथा क्र.154
एका सिंहाने एक हरिण मारले व त्यांस तो फाडून खाणार, इतक्यात त्या वाटेने एक चोर जात होता, तो त्यास म्हणतो, "अरे सिंहा,
"या हरिणाचे अर्धे मांस तुझे व अर्धे माझे' हे ऐकून सिंह म्हणाला, "अरे निगरगट्ट माणसा,
"तुझा येथे कोणत्याही प्रकारचा संबंध नसता, एकाकी पुढे होऊन, मी मारलेल्या सावजाचे अर्धे
मांस तू मागतोस, या तुझ्या निर्लजपणाबद्दल
मी तुला शिक्षा करण्यापूर्वी तू येथून चालता हो, नाही तर फुकट मरशील मात्र.' हे ऐकताच चोर भयाने पळून गेला. इतक्यात
दुसरा एक भला माणूस त्या वाटेने आला व सिंहास पाहून, त्यास टाळण्यासाठी दुसऱ्या वाटेने जाऊ लागला. ते पाहून सिंह त्यास आदराने हाक
मारुन म्हणाला, "अरे भल्या माणसा, भिऊ नकोस, तुझ्या चांगुलपणामुळे, या सावजाच्या मासांचा अर्धा भाग घेण्यास तू अगदी योग्य आहेस, इकडे ये आणि आपला वाटा घेऊन जा.' इतके बोलून सिंहाने त्या सावजाचे दोन भाग
करुन एक भाग आपण खाल्ला व दुसरा त्या माणसाकरिता ठेवून तो अरण्यात गेला.
तात्पर्य : लोचटपणा करुन
डोके उठविणाऱ्या माणसाचा लोकास कंटाळा येतो. पण जे सभ्य आणि भिडस्त आहेत, त्यांचा परामर्श लोक आपण होऊन घेतात.
बुधवार, ११ डिसेंबर, २०१३
(निर्णय)
कथा क्र.153
एक राजा होता. तो वेगवेगळे वेश परिधान करून राज्यात
फेरफटका मारत असे. त्या निमित्ताने त्याचा जनतेशी होत असे. जनतेचे दुःख, वेदना, गरजा यांची तो माहिती
करून घेत असे. एके दिवशी अचानक त्याच्या मनात विचार आला कि आपण सर्व देशात फिरून
जनतेचे दुःख, गरजा यांची माहिती करून घ्यावी व त्यावर उपाय करावे.
त्याच्या प्रवासाला त्याने सुरुवात केली आणि पूर्ण देशात फिरून तो परत आला. परत आल्यावर तो महालातून बाहेरच पडेन. शेवटी
सगळे मंत्रीगण त्याच्या भेटीला महालात गेले तेंव्हा राजाने त्यांना त्याची कहाणी
ऐकवली व मंत्र्यांकडे त्याने त्याचे पाय खूप दुखत असल्याची तक्रार केली. राजाचे
असे म्हणणे होते कि रस्त्यात जे दगड धोंडे, गोटे पडले आहेत त्यामुले त्याचे पाय खूप दुखत आहेत.
यावर काही उपाय लवकरात लवकर केला पाहिजे. मंत्रीगण विचार करू लागले कि काय उपाय
करावा? पण राजाच तत्काळ म्हणाला कि या देशात कुणाला सुद्धा
दगडगोटे टोचू नयेत यासाठी सर्व रस्त्यांवर एक चामडे अंथरले जावे व त्याने संपूर्ण
रस्ता आच्छादित करावा. राजाचे हे बोलणे ऐकून सगळे मंत्रीगण आता मात्र कोड्यात पडले
कि या मूर्खपणाच्या निर्णयावर बोलावे तरी कसे आणि काय? कारण जो उलट बोलेल त्याला
राजा शिक्षा करेल. म्हणून कोणीच काही बोलले नाही. शेवटी मध्ये बराच वेळ गेला कोणीच
काही बोलेन तेंव्हा एक बुद्धिमान मंत्री उठला व राजाला म्हणाला कि महाराज मी एक
उपाय सुचवितो ज्याने चामडे अंथरण्यासाठी लागणारा अतिरिक्त पैसा वाचेल आणि
तुम्हालाही दगडगोटे टोचणार नाहीत. राजा म्हणाला सांग कि लवकर! मंत्री म्हणाला,"सगळ्या
देशातील रस्त्यांवर चामडे अंथरण्यापेक्षा महाराज तुम्हीच चांगल्या प्रतीचे जोडे का
बनवून घेत नाहीत? यातून खर्च हि कमी होईल आणि तुम्हाला पण कष्ट होणार
नाहीत." राजा आश्चर्य चकित होवून मंत्र्याकडे पाहत राहिला आणि दुसऱ्याच क्षणी
त्याने जोडे बनविण्यासाठी कारागिराला बोलावणे धाडले.
तात्पर्य- कायम अशा
उत्तराबद्दल विचार केला पाहिजे कि ज्यामुळे आपले कमीत कमी नुकसान होइल. भावनेच्या
भरात घेतलेले निर्णय कधीकधी चुकूही शकतात. दुसऱ्यांबरोबर चर्चा करूनही कधी कधी
उत्तर मिळते. .
जशी दृष्टी तशी सृष्टी
कथा क्र.152
भगवान श्रीकृष्णाने एकदा एका मोठ्या यज्ञाचे आयोजन
केले. त्यांनी युध्दिष्ठराला बोलावून सांगितले, "या यज्ञात आपल्याला एका
माणसाचा बळी द्यावयाचा आहे. त्यासाठी एखादा दुष्ट-दुर्जन माणूस शोधून काढ. आपण
त्याचा बळी देवू. त्यानंतर त्यांनी दुर्योधनाला बोलावले. श्रीकृष्ण त्याला म्हणाले, "मी एक
यज्ञ करू घातला आहे. या यज्ञात आपल्याला एका सज्जनाचा सत्कार करावयाचा आहे. तेव्हा शक्यतो एखादा पवित्र-सज्जन
माणूस शोध, आपण त्याचा यथोचित सत्कार
करू.' युध्दिष्ठिर एका दुष्ट माणसाच्या शोधात निघाला आणि
दुर्योधन एका सज्जन माणसाच्या शोधासाठी निघाला. युध्दिष्ठराला एकही दुष्ट माणूस
सापडला नाही. त्याला प्रत्येक मनुष्य चांगलाच वाटत होता. तो श्रीकृष्णाकडे परत आला
व म्हणाला, "भगवान! आपल्या राज्यात कोणीही दुष्ट नाही आणि
आपल्याला यज्ञात बळी द्यायला माणूस हवा आहे तर तुम्ही मलाच बळीच द्या. तुमचा यज्ञ
तरी पार पडेल. थोड्या वेळाने दुर्योधन आला व कृष्णाला म्हणाला, "देवा!
मी खूप शोध घेतला पण आपल्या राज्यात मी सोडता एकही सज्जन माणूस आढळला नाही. तेव्हा
देवा, एक सज्जन व्यक्ती म्हणून माझा सत्कार करावा.
तात्पर्य : जशी दृष्टी
असेल तसे आपल्याला जग दिसणार आहे.
सोमवार, २ डिसेंबर, २०१३
ओळखा पाहू
कथा क्र.151
एक फकीर रस्त्याने चालले होते. रस्त्यात त्यांना एक व्यापारी गाठ पडला, व्यापा-याबरोबर पाच गाढवे होती आणि पाचही गाढवांवर पाच मोठमोठी गाठोडी
लादलेली होती. गाढवे त्या गाठोड्यांच्या ओझ्याने अगदी दबून गेली होती. फकीराने
व्यापा-याला विचारले,'' या गाठोड्यात असे तुम्ही
काय नेत आहात की ज्याच्या वजनाने तुमची गाढवे अगदी दमून, दबून गेलेली दिसत आहेत'' व्यापा-याने उत्तर दिले,'' यात माणसाच्या वापराच्या अनमोल गोष्टी
आहेत. मी त्या गोष्टी बाजारात विकण्यास निघालो आहे.'' फकीराने विचारले,'' अच्छा, अशा कोणकोणत्या गोष्टी तुम्ही विकता ते तरी सांगा'' व्यापारी म्हणाला, '' पहिल्या गाढवाकडे जाऊ, त्याच्या पाठीवर ठेवलेल्या गाठोडयात अत्याचार भरलेले आहेत. ज्यांची खरेदी
ही राजा-सत्ताधारी लोक, वरीष्ठ लोक करतात. खूप मोठ्या भावाने हे
विकले जातात.'' मग व्यापारी दुस-या गाठोड्याकडे वळाला
आणि सांगू लागला,'' या गाठोड्यात अहंकार भरला आहे. याची खरेदी
ही उच्चशिक्षित, उच्चभ्रु, विद्वान माणसे करतात.'' तिस-या गाठोड्याला हात लावून व्यापारी म्हणाला,'' यात ईर्षा भरली आहे. याचे ग्राहक आहेत ते म्हणजे धनवान लोक जे दुस-याची
प्रगती कधीच पाहू शकत नाहीत. याच्या खरेदीसाठी अक्षरश: लोकांच्या उड्या पडतात.'' फकीर म्हणाला,'' चौथ्या गाठोडयात काय आहे'' व्यापारी म्हणाला,'' यात बेईमानी भरून आणली आहे आणि याचे
गि-हाईक म्हणजे धंदेवाईक लोक, उद्योगपती लोक जे आपल्या फायद्यासाठी
ग्राहकांच्या जीवाशी खेळतात आणि भेसळ करून लहानमोठ्यांना प्राण गमाविण्यास भाग
पाडतात. यालासुद्धा बाजारात प्रचंड मागणी आहे.'' फकीर अचंबित होऊन पाहत असतानाच व्यापारी शेवटच्या गाढवाकडे जाऊन म्हणाला,'' या शेवटच्या गाढवावर मी कट-कारस्थान भरून आणले आहे. आजकाल सर्वच जण कटकारस्थान
करून दुस-याला कसा त्रास देता येईल याचा विचार करत असतो म्हणून यालाही मागणी
भरपूर आहे.'' एवढे बोलून व्यापारी काही अंतर निघून
पुढे गेला व फकीर त्याच्या जाणा-या आकृतीकडे पाहतच राहिला
तात्पर्य- कथेचे आता वेगळे
तात्पर्य काय सांगावे, तुम्ही ते जाणले असालच. तुमचे मत कृपया
कॉमेंट मध्ये नोंदवा.
संघर्षच खरे जीवन
कथा क्र 150
एका गावात एक म्हातारी राहत होती. तिला मुलेबाळे नव्हती. ती आणि तिचा नवरा
दोघेच होती. पती कसल्यातरी आजाराने ग्रस्त होता. ती रात्रंदिवस मोलमजुरी करून
दिवस काढत होती. या म्हातारीबद्दल संपूर्ण गावात सहानुभूती होती. पण म्हातारी स्वाभिमानी
असल्याने ती कोणाकडून कसलीच मदत घेत नसे. एकेदिवशी ती जंगलात लाकडे तोडण्यासाठी
गेली होती. दिवसभर लाकडे तोडून ती दमली होती.
लाकडांची मोळी बांधली पण ती मोळी झालेल्या श्रमामुळे तिला काही उचलली जाईना. त्याने
ती वैतागली व मोठमोठ्याने बडबडू लागली,''देवा, आता या उतारवयात ही मोळी जर माझ्याचने उचलली जात नसेल तर मला तरी उचल बाबा.'' तिने तसे म्हणायला आणि मृत्युदेव तिकडून जायला एकच गाठ पडली. त्यांनी ते
ऐकले व लगेच तेथे येवून ते म्हणाले, मी तुझा आवाज ऐकला आहे मी तुला घेऊन जायला
तयार आहे.'' साक्षात मृत्यु समोर पाहून म्हातारी
घाबरली आणि म्हणू लागली,'' मला आताच मरायचे नाही, मी जर मेले तर माझ्या आजारी पतीची सेवा कोण करील?. मी काही इतकीच काही म्हातारी नाही की मला ही मोळी उचलता येत नाही. मी उगीच
गंमत करत होते. पण मला काय माहिती लगेच मला उचलायला तू लगेच येशील देवा. मला सोड
बाबा एकटीला, जा तुझा तू.'' हे ऐकताच मृत्यूदेव निघून गेले आणि म्हातारीने पूर्ण ताकतीने लाकडाचा भारा
उचलला व घरी गेली.
तात्पर्य- जीवनापासून पळ
काढणे म्हणजे समस्येचे निरसन नाही. संघर्षाला सामोरे जाणे, संघर्ष करत राहणे, आपले नित्यकर्म करत राहणे यातच मानवी
जीवनाचे सूत्र बांधले आहे.
______________वर्तमानपत्रातून संग्रहित _______________
रविवार, १ डिसेंबर, २०१३
ससा आणि शिकारी कुत्रा
कथा क्र.149
एक ससा शेतात शिरला. तेथील कुत्रा त्याच्यामागे धावला. ससा पुढे व कुत्रा मागे
अशी शर्यत बराच वेळ चालली. शेवटी कुत्रा थांबला व मागे परतला.ते पाहून बाजूला चरत असलेल्या काही बकऱ्या म्हणाल्या,
"कुत्रा केवढा मोठा आणि ससा किती लहान. पण
शेवटी ससा जिंकला आणि कुत्रा हरला.'ते ऐकून कुत्रा त्यांना म्हणाला, "बायांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मी रोजीरोटीसाठी धावत होतो, तर ससा प्राणासाठी धावत होता. मी नोकरी बजावायची म्हणून धावत होतो, तर ससा जिवाच्या आकांताने धावत होता. धन्यासाठी काम करणे आणि स्वत:साठी काम
करणे हयात फरक असणारच.'
तात्पर्य : प्रत्येकाने
आपापली कामगिरी व्यवस्थित-पणे पार पाडली पाहिजे.
______________वर्तमानपत्रातून संग्रहित _______________
(ध्यान, प्रेम, शांतता)
कथा क्र.148
एकदा एक गुरु शिष्य जंगलातून गावाकडे जात असतात. जंगलात अनेक हिंस्त्र प्राणी
राहत असतात. जंगलातून जाताना त्यांच्या अचानक लक्षात येते कि कुणीतरी त्यांचा
पाठलाग करीत आहे. शिष्य मागे वळून पाहतो त्याची तर बोबडीच वळते. त्यांच्या मागे एक
भलामोठा वाघ असतो. तो विचार करतो आपण पळून जावे का? पण त्याचा आपल्या गुरुवर विश्वास असतो. गुरु जे करतील ते आपणही करावे या विचाराने तो शांत बसतो.तो गुरुना विचारतो आता
आपण काय करायचे. गुरु शांत आणि प्रसन्न मुद्रेने त्याला उत्तर देतात कि आपण जर आता
पळालो तर त्या वाघाचा वेग आपल्यापेक्षाही जास्त आहे.आपण त्याचा प्रतिकार करायचा
प्रयत्न केला तर त्याची शक्ती आपल्या दसपट जास्त आहे मग आपण विरोध करून तरी काय
उपयोग? आपण केवळ त्याला सामोरे जावू. शिष्य अजूनच
घाबरतो. गुरु मात्र निश्चिंत असतात. ते ध्यान करण्यास सुरुवात करतात. वाघ त्या
दोघांच्या आणखी जवळ येतो. शिष्याची दातखीळ बसते त्याचे पाय थरथरु लागतात. तो चक्कर
येवून पडतो. नंतर त्याला जाग येते तेंव्हा त्याचे गुरु त्याच्या डोक्याशी ध्यान
लावून बसलेले त्याला दिसून येतात. तो विचारतो आपण दोघेही जिवंत कसे? गुरु त्याला म्हणतात, आपल्या मनात जर शांतता आणि प्रेम असेल तर
ध्यानाच्या माध्यमातून आपण तो परिणाम वातावरणातही निर्माण करू शकतो. वाघाला पाहून
तू घाबरलास पण मी माझ्या मनातील शांतता आणि प्रेम ध्यानाच्या माध्यमातून वाघाच्या
मनात प्रसारित केले तो जवळ पण त्याला माझ्या मनातले प्रेम जाणवले व आपल्याला धोका
नाही हे जाणवून तो दूर निघून गेला.
तात्पर्य- प्रेम आणि शांतता
हे सहज उपलब्ध असणारे मानवी गुण आहेत. याचा वापर केला गेला पाहिजे.
______________वर्तमानपत्रातून संग्रहित ______
सिंह व बुध्दिमान माणूस
कथा क्र.147
एका जंगलात एके दिवशी एक पारधी शिकारीसाठी आला. त्याला पाहून जंगलातील प्राणी
घाबरून सैरावैरा पळू लागले. एका सिंहाने ते पाहिले, तो पळणाऱ्या प्राण्यांना म्हणाला, "अरे माझ्यासारखा शक्तिमान प्राणी तुमचा राजा असताना तुम्हाला घाबरण्याचे काहीच
कारण नाही."सिंह असे बोलतो न बोलतो तोच सूं सूं करत एक बाण आला व सिंहाच्या
पंजात घुसला. सिंह तसाच विव्हळला. तीन पायावर पळत
सुटला, एका कोल्ह्याने पाहिले व म्हणाला, "वनराज आताच तर आपण शौर्याच्या, शक्तीच्या गप्पा मारत होता, मग आता का घाबरून पळता आहात.' यावर सिंह कोल्ह्याला
म्हणाला, अरे बाबा, मी शक्तीने सर्व प्राण्यांत श्रेष्ठ असलो तरी माणूस हा प्राणी बुध्दीने
सामर्थ्यशाली आहे त्याची बरोबरी करणारा दुसरा प्राणी नाही.'
तात्पर्य : बुध्दीच्या
सामर्थ्यापुढे शारीरिक सामर्थ्य कमी पडते.
______________वर्तमानपत्रातून संग्रहित ___
मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०१३
बैल आणि चिलट
कथा क्र.146
एक बैल एका झाडाखाली स्वस्थपणे रवंथ करीत बसला होता.इतक्यात एक चिलट येऊन
त्याच्या शिंगावर बसले. चिलट जरा आगाऊ होते. चिलट बैलाला म्हणाले, मी तुझ्या शिंगावर बसलोय. पण तुला जड वाटत नाही ना! तुला माझं वजन पेलवत नसलं
तर तसं सांग— मी आपलं दुसरीकडे जाऊन बसेन. त्यावर बैल
डोळे मिटूनच म्हणाला, मूर्खा, तुला हवं तर बैस किंवा उडून जा. तुझं हे आगाऊपणाने बोलणं ऐकलं तेव्हा कुठे मला समजलं, तू माझ्या शिंगावर आहेस ते!
तात्पर्य : काहीजणांना आपण
फार मोठे आहोत असं वाटतं. पण त्यांना लोक काडीची किंमत देत नाहीत।
______________वर्तमानपत्रातून संग्रहित _______________
(ससा आणि त्याचे मित्र)
कथा क्र.145
एक जंगल होते. गाय, घोड़ा, गाढव, आणि बकरी तेथे चरायला येत असत. त्या चौघांमध्ये मैत्री झाली. ते जेथे चरायला जात असत तेथे एका झाडाखाली सशाचे बीळ होते. एक दिवस सशाने त्या चौघांना एकत्र फिरताना पाहिले त्यांची मैत्री पाहिली आणि त्याला वाटले आपणही त्यांच्याशी मैत्री करावी. ससा त्यांच्यापाशी गेला व म्हणाला," तुम्ही चौघे जसे मित्र आहात तसेच मलाही तुमचा मित्र करून घ्या. त्यांनी सर्वांनी या गोष्टीला मान्यता दिली व त्याला मित्र करून घेतले. सशाला मोठा आनंद झाला. ससापण त्यांच्यासोबत फिरू लागला. एके दिवशी ससा त्यांच्याजवळ बसला होता. अचानक शिकारी कुत्रे जवळ आल्याची त्यांना सर्वाना जाणीव झाली, ससा गाईला म्हणाला,"तू मला तुझ्या पाठीवर बसव जेंव्हा शिकारी कुत्रे जवळ येतील त्यांना तू तुझ्या शिंगांनी मारून पळवून लाव." गाय म्हणाली,"आता तर माझी घरी परतण्याची वेळ झाली आहे." तेंव्हा ससा घोडयाकडे गेला आणि म्हणाला," तू मला तुझ्या पाठीवर बसव आणि माझा जीव वाचव" घोडा म्हणाला,"मित्र मी तुला पाठीवर घेतले असते पण मला खाली बसताच येत नाही मी तुला कसे पाठीवर घेवू?" तेंव्हा ससा गाढवाला म्हणाला,"मित्रा तू तरी मला मदत कर" गाढव म्हणाले" मी तर आता घरी चाललो तू बघ" मग शेवटी ससा बकरी कडे गेला व म्हणाला,"बकरीताई तू तुझ्या पाठीवर मला घेतेस काय?" बकरी म्हणाली,"अरे सशा, मीच शिकारी कुत्र्यांना घाबरते आणि तुला वाचावयाच्या नादात त्यांनी मलाच फाडून खातील. तेंव्हा तू तुझे बघ" एवढ्यात कुत्रे तेथे पोहोचले, ससा जीवाचा आकांत करून पळाला आणि एका झाडाच्या पाठीमागे जाऊन लपला. कुत्रे निघून गेले आणि ससा मरणापासून वाचला. त्याने मनात विचार केला,"असे मित्र असण्यापेक्षा मित्र नसलेले बरे!!"
तात्पर्य- मित्राची खरी ओळख संकटात होते. आपले म्हणणारे संकटात सोडून जातात याचा अनुभव नेहमी येतोच.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)