कथा क्र.171
बुधवार, २९ जानेवारी, २०१४
माणसातील देव
कथा क्र.170
एका गावात एक चर्च होते. एक दिवस नदीला पूर आला. पाणी गावात गुडघ्यापर्यंत
आले. चर्चच्या फादरना न्यायला एक जीप आली. माणसे म्हणाली, फादर चला. बहुतेक पाण्याने सगळे वाहून जाईल. फादर म्हणाले, 'मला माझा येशूच येऊन वाचवेल.' जीप निघून गेली.
नंतर पाणी वाढल्यानंतर एक बोट आली. बोटीतील लोक फादरना न्यायला आले. फादरनी नकार दिला. पाणी इतके वाढले की फादरना चर्चच्या छप्परावर जावे लागले. मग एक हेलिकॉप्टर वरतून घिरट्या
घालू लागले. त्यातून एक दोर आला. हेलिकॉप्टरमधले लोक म्हणाले, 'फादर आता तरी दोर पकडा आणि जीव वाचवा.' फादर म्हणाले, 'माझा येशूच मला येऊन वाचवेल.' यानंतर एकच मोठी लाट आली आणि फादर मृत्यमुखी पडले. स्वर्गात गेल्यावर त्यांनी
येशूला विचारले, 'मी इतकी प्रार्थना केली, पण तू मला वाचवले नाहीस.' येशू म्हणाले, 'मी प्रथम जीप घेऊन आलो होतो. नंतर बोट आणि नंतर हेलिकॉप्टर. पण तूच मला काही
ओळखले नाहीस.'
तात्पर्य: देव काही
प्रत्यक्ष येऊन मदत करत नाही. तो माणसातच शोधावा लागतो.
लेखक- संजय दोबाडे, त्र्यंबकेश्वर.
मूळ कथालेखकाचे आभार
शनिवार, २५ जानेवारी, २०१४
व्यवहारज्ञानाचे धडे
कथा क्र.169
एका शहरात दररोज संध्याकाळी एक महात्मा प्रवचन देत असे. त्यांची ख्याती एका धान्याच्या व्यापा-यानेही ऐकली होती. तो आपल्या मुलासोबत प्रवचन ऐकण्यास आला. प्रवचन सुरु झाल्यानंतर दोघेही लक्षपूर्वक ऐकत होते. काही ज्ञानाच्या गोष्टी सांगत असताना ते म्हणाले,’’या जगात जितके प्राणी आहेत. त्या सर्वांमध्ये आत्मा वावरत असतो.’’ ही गोष्ट व्यापा-याच्या मुलाला हृदयस्पर्शी वाटली. त्याने मनोमन हा विचार आचरणात आणण्याचा संकल्प केला. दुस-या दिवशी तो एका दुकानावर गेला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला काही वेळ दुकान सांभाळण्यास सांगितले. ते स्वत: दुस-या कामासाठी बाहेर निघून गेले. त्यानंतर काही वेळाने तेथे एक गाय आली. दुकानासमोर ठेवलेले धान्य खाऊ लागली. मुलाने त्या गायीला हाकलण्यासाठी लाकूड उचलले पण त्याच्या मनात विचार आला. गाय आणि माणूस दोघांनाही जीव आहे.मग भेदभाव का मानायचा? ती धान्य खात असेल तर खाऊ दे. तेवढयात व्यापारी तेथे आले त्याने गायीला धान्य खाताना पाहून मुलाला म्हणाले,’’ अरे तुझ्यासमोर ती गाय धान्य खाते आहे? आणि तू आंधळा झाल्यासारखा गप्प बसून का आहेस? आपले किती नुकसान होते आहे याची काही कल्पना आहे की नाही? तिला हाकलून का दिले नाहीस?’’ मुलगा म्हणाला,’’ बाबा, काल तर महाराज म्हणाले की, सगळे जीव एकसारखे आहेत, मी गायीमध्ये पण एक जीव पाहिला’’ तेव्हा व्यापारी म्हणाले,’’मूर्खा, अध्यात्म आणि व्यापार यात गल्लत एकसारखे करायची नसते.’’
तात्पर्य :- सारासार बुद्धीचा वापर करून जीवन जगल्यास जीवन सुखदायी होते.
संकटसमयीचे धैर्य
कथा क्र.168
अरब देशात पूर्वी एक बादशहा होऊन गेला. तो अत्यंत थाटात राहायचा. एकदा शेजारच्या देशाने त्याला युद्धाचे आव्हान दिले. बादशहा आपले सैन्य घेऊन सीमेवर निघाला. दुर्दैवाने त्याला शत्रूकडून हार पत्करावी लागली. त्याला बंदी बनवून आणण्यात आले. त्याला त्या जेलमध्ये ठेवण्यात आले होते. तेथे स्वयंपाक्यांनाही ठेवण्यात आले होते. त्याने आपल्या स्वयंपाक्यास जेवण बनवण्यास सांगितले. तेव्हा त्यांच्याकडे एकच मांसाचा तुकडा उरला होता. त्यांनी तोच तुकडा उकळण्यासाठी ठेवला. तेवढयात एक कुत्रा तेथे आला. मांसाच्या तुकड्याचा वास आल्याने त्याने भांड्यात तोंड घातले. पण त्याचे तोंड त्या भांडयात अडकले. आपले तोंड भांड्यातून सोडवू न शकलेले ते कुत्रे पळून गेले. ते पाहून बादशहाला हसू आवरले नाही व तो हसू लागला. बादशहा हसतो आहे हे पाहून पहा-यावरील सैनिकाने त्याला विचारले, तुम्ही इतक्या अडचणीत असूनसुद्धा हसता कसे? दुसरा कोणी असता तर शरमेने मान खाली घालून बसला असता. तेव्हा बादशहा म्हणाला,’’ तोंड लपवून कोणती समस्या सुटते काय? वेळ फिरली की काय काय करावे लागते हे आता कुत्र्यापासून पहायला मिळाले याचे मला हसू आले आणि शिकायलाही. खरा माणूस दु:खही हसून पचवतो. संकटसमयी आशावादी राहून संकटाशी मुकाबला करणारे धैर्यशील म्हणवले जातात.’’
तात्पर्य :- संकटाशी सामना करणे हेच पुरुषार्थाचे लक्षण आहे.
______________वर्तमानपत्रातून संग्रहित _______________
रविवार, १९ जानेवारी, २०१४
गुरु गोविंदसिंह
कथा क्र.167
शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंह लहानपणापासूनच वैराग्याचा
भाव बाळगून होते. सर्वसामान्य मुलासारखे ते कोणत्याही वस्तूची मागणी करत नसत.
अध्ययन आणि ईश्वराच्या स्मरणात त्यांचा संपूर्ण दिवस जात होता. बालकांचा
खोडकरपणाही त्यांच्या स्वभावात नव्हता. त्यांची आई त्यांचे हे आचरण पाहून
हैराण होत असे. परंतु त्यांच्यावर ती प्रेमही फार करत असे. एके दिवशी त्यांच्या आईच्या मनात त्यांना सोन्याचे
कडे घालण्याचा विचार आला. त्यांनी एक सोन्याचे कडे बनविले आणि गोविंदसिंह यांना
मोठ्या प्रेमाने घातले. मात्र काही वेळातच बालक गोविंदच्या हातातले कडे गायब
झालेले आईला दिसले. आई त्रस्त झाली. बालक गोविंदला विचारले तर त्याने नदीकाठी
नेले व कडे नदीत टाकून दिल्याचे सांगितले. आईने असे करण्याचे कारण विचारले असता
गुरु गोविंदसिंह म्हणाले,''मला गुरुनानकांनी
चालविलेल्या मार्गाने चालावयाचे असताना तू मला संसाराच्या मोहमायेत अडकावू नये, या बेडीत जर मी बांधलो
गेलो तर मला गुरुनानकांच्या मार्गावर चालता येणार नाही.'' बालक गोविंदसिंह यांचे
विचार विरक्त जीवनाचे संकेत देत होते.
तात्पर्य:-थोरांचे जीवन
हे प्रेरणादायी असते. महान लोक हे मोह-मायेपासून दूर रहाण्याचा प्रयत्न करतात
खुनी सेनापती
कथा क्र.166
कुशलगडचा राजा वीरभद्रला एके दिवशी सेनापतीने सूचना दिली,''महाराज, काल रात्री आपल्या महालात आपल्या
सैनिकाची हत्या झाली आणि त्याच्या मृतदेहाजवळ हे पत्र मिळाले आहे'' राजाने ते पत्र वाचले, त्यात राजाला धमकी देण्यात
आली होती की,'लवकरच कुशलगडचे सिंहासन खाली केल नाही तर
रोज एक सैनिक मारला जाईल' राजाने खुन्याचा शोध घेण्याचा
आदेश दिला, या दरम्यान
वीरभद्रचा मुलगा बलभद्र हा शिक्षण पूर्ण करून राज्यात परत आला होता. राजकुमार
बलभद्रने महालाच्या सुरक्षेच्या कारभार स्वत:कडे घेतला होता. त्याने सैनिकांना
आज्ञा केली चार-चार सैनिकांची तुकडी बनवून पहारा द्या. योगायोगाने त्या रात्री
कोणत्याही सैनिकाची हत्या झाली नाही. तेव्हा राजकुमाराने सेनापतीला म्हटले,'' असे वाटते की हत्या करणारा घाबरला आहे. आता ही सुरक्षा व्यवस्था भंग करा.'' सेनापतीने विरोध केला. परंतु राजकुमाराने आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी
राजमहालाच्या पाठीमागील बुरुजावर एक सैनिक तैनात करण्यास सांगितले. खुनी त्याला
मारण्यासाठी गेला. त्याने सैनिकावर वार केला. परंतु लपुन बसलेल्या राजकुमाराने
त्याला पकडले. तो खुनी सेनापती निघाला. त्याने कबुल केले की की शेजारील राज्याच्या
राजाने त्याला कुशलगडला जिंकल्यावर अर्ध्या राजाचा राजा बनविण्याचे आमिष
दाखविले होते. राजाने सेनापतीला कैद करून देहदंडाची शिक्षा दिली.
तात्पर्य :- कधी कधी
बाहेरच्या लोकांपेक्षा आपल्या जवळचे लोकच आपल्याला दगा देत असतात. तेव्हा
बाहेरच्या दगाफटका तपासताना जवळच्या लोकांनाही तपासले पाहिजे. अति लोभापायी विश्वासपात्र
लोकही दगा देतात.
______________वर्तमानपत्रातून संग्रहित _______________
शुक्रवार, १० जानेवारी, २०१४
कावळा आणि त्याचा मुलगा
कथा क्र.165
एक दिवस एक कावळा आणि त्याचा मुलगा झाडावर बसले होते.
कावळ्याच्या मुलगा वडिलांना म्हणाला,"बाबा, मी आजपर्यंत सगळ्या
प्रकारचे मांस खाल्ले पण दोन पायाच्या माणसाचे मांस कधीच खाल्ले नाही. बाबा कसा
स्वाद असतो हो या दोन पायाच्या जीवाच्या मांसाचा?" वडील कावळा म्हणाला,"आजपर्यंत
मी जीवनात ३ वेळा माणसाचे मांस खाल्ले आहे. खूपच चविष्ट असते ते!" मुलगा कावळा लगेच हट्ट करू लागला कि त्याला पण माणसाचे मांस
खायचे आहे. वडील कावळा म्हणाले," ठीक
आहे पण थोडा वेळ वाट पहावी लागेल आणि मी जसे सांगेन तसे तुला करावे लागेल. माझ्या
वाडवडिलांनी मला हि चतुराई शिकवून ठेवली आहे ज्यामुळे आपल्याला खाणे मिळू
शकेल." मुलगा कावळा होय म्हणाला. त्यानंतर वडील कावळ्याने मुलाला एका जागी
बसवले व तो उडून निघून गेला आणि परत येताना मांसाचे २ तुकडे तोंडात घेवून आला. एक
तुकडा स्वतःच्या तोंडात धरला व दुसरा तुकडा मुलाच्या तोंडात दिला, तुकडा तोंडात घेताक्षणी
मुलगा म्हणाला,"शी बाबा, तुम्ही कसल्या घाणेरड्या
चवीचे मांस आणले आहे. असले खाणे मला नको" वडील कावळा म्हणाला,"थांब
तो तुकडा खाण्यासाठी नसून फेकण्यासाठी आहे. हा एक तुकडा टाकून आपण आता मांसाचे ढीग
तयार करणार आहोत. उद्या पर्यंत वाट बघ तुला मांसच मांस खायला मिळेल आणि ते सुद्धा
माणसाचे." मुलाला हे काही कळले नाही कि एका मांसाच्या तुकड्यावर मांसाचे ढीग
कसे काय निर्माण होणार ते? पण त्याचा त्याच्या वडिलावर विश्वास होता. थोड्या
वेळाने कावळा वडील एक तुकडा घेवून आकाशात उडाला आणि त्याने तो तुकडा एका मंदिरात
टाकला आणि परत येवून दुसरा तुकडा उचलला व तो दुसरा तुकडा एका मशिदीच्या आत टाकला.
मग तो झाडावर येवून बसला. कावळा मुलाला म्हणाला,"आता बघ उद्या सकाळपर्यंत
मांस खायला मिळते कि नाही ते?"
थोड्याच वेळात सगळीकडे गलका झाला, ना कुणाला कुणाचे ऐकू येत
होते ना कोणी कोणाचे ऐकून घेत होते. फक्त धर्म भावना विखारी झाली होती. धर्माच्या
नावाखाली रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या, आई, मुलगा, बहिण, भाऊ, वडील, काका, शेजारी, मित्र असे कोणतेच नाते
लक्षात न घेत फक्त धर्म बघून एकमेकांवर वार चालू होते. आमच्या धर्माचा अपमान झाला
त्याचा बदला घेतलाच पाहिजे असे दोघेही म्हणत होते आणि यात निरपराधहि मारले जात
होते. खूप वेळ यातच निघून गेला आताशा गाव शांत होवू लागले होते कारण रस्त्यावर
फक्त आणि फक्त रक्तच सांडलेले दिसत होते. विशेष म्हणजे ते रक्त लाल रंगाचे होते
त्यात कुठल्याच धर्माची छटा नव्हती. ते एकच धर्म पाळत होते ते म्हणजे
प्रवाहीपणाचा. गाव निर्मनुष्य भकास झाले होते, सर्वत्र भयाण शांतता
पसरली होती या धुमश्चक्रीतून फक्त २ जीव सुटले होते ते म्हणजे झाडावरचे कावळे. आता
कावळ्याचे पोर माणसाची शिकार करायला शिकले होते. कावळ्याच्या पोराने बापाला प्रश्न
विचारला,"बाबा, हे असेच नेहमी होते का? आपण भांडणे लावतो आणि
माणसाच्या लक्षात कसे येत नाही?"
कावळा म्हणाला," अरे, या मुर्ख माणसाना कधीच
आपला धर्म कळला नाही. माणुसकी हा धर्म सोडून ते नको त्या गोष्टी करत बसले आणि
आपल्यासारखे कावळे त्यांचा फायदा घेवून जातात हे त्यांच्या लक्षात हि येत नाही.
माणूस म्हणून जगण्यापेक्षा यांनी जात आणि धर्म यांचीच जास्त प्रस्थ माजविले आहे
आणि त्याचा गैरफायदा इतर तिसरे कोणी तरी घेवून जातात.कुठला तरी कोणी तरी येतो आणि
भडकावू भाषणे देतो आणि हे त्याचे ऐकतात आणि एकमेकांशी भांडतात. मासाचा एक तुकडा
यांच्या वर्षानुवर्षाच्या मैत्रीत खंड पाडतो आणि ते एकमेकांच्या जीवावर उठतात आणि
यांना इतकी बुद्धी येईल असे मला तरी वाटत नाही."इतके बोलून दोघे बाप-लेक
मांस खाण्यासाठी उडून गेले.
तात्पर्य-मित्र-मैत्रिणिनो, आता वेगळे काय सांगायचे? तुम्ही सर्वच जण याचा
विचार करा.
मंगळवार, ७ जानेवारी, २०१४
राम आणि भरत
कथा क्र.164
रावणाचा वध करून राम अयोध्येला परत आले आणि त्यांचा
राज्याभिषेक झाला तेव्हा एक दिवस एका सभासदाने भरताला विचारले की आपण रामासाठी
इतका मोठा त्याग केला आणि रामही आपल्याला प्राणप्रिय समजतात मग असे काय कारण आहे
की आपल्याला सर्वात मागे स्थान देण्यात आले आहे? भरत म्हणाले,'' जे झाड कडू असेल त्याची
सर्व पाने, फळे व फुले कडू असतात, माझ्या मातेने रामाला वनवासाला पाठवून
पाप केले होते. तिचा पुत्र असल्यामुळे त्या पापाच्या कडवटपणातून मी कसा अलिप्त
राहू शकतो? त्यामुळे मला मागचे स्थन देण्यात आले आहे.'' जेव्हा सभासदाने रामाला
भरताचे हे विचार सांगितले तेव्हा रामचंद्र म्हणाले,''भरताचे हे विचार ठीक
नाहीत, अयोध्येला परतल्यावर मी भरताला म्हटले होते की, उद्यापासून तू माझे छत्र
घेऊन माझ्या मागे उभा राहा. कोणीही राजा तोपर्यत राजा राहू शकतो जोपर्यत त्याचे
छत्र सुरक्षित आहे.'' सभासद आता विचारात पडला की कोणाचे विचार खरे मानावे? त्याने परत जाऊन भरताला
रामाचे विचार ऐकवले. भरत म्हणाले,''रामचंद्र तर आपल्या लहानातल्या लहान सेवकाचीही
प्रशंसा करत असतात. खरे तेच आहे जे मी तुम्हाला सांगितले.'' सभासद गोंधळला त्याने
रामाला पुन्हा जाऊन भरताचे विचार सांगितले तेव्हा रामचंद्र म्हणाले,'' प्रेम आणि त्यागाच्या
युद्धात मी भरताकडून हरलो, मी आपला पराभव स्वीकारून त्याला पाठ दाखविली, त्यामुळे तो पाठीमागे
आहे. त्याचे मागे होणे हे त्याच्या महानतेचे लक्षण आहे.
तात्पर्य :- त्याग, सेवा आणि भक्ती हे तीन
सूत्रे धरतीवर रामराज्य साकार करू शकतात. धन्य ते प्रभू रामचंद्र आणि त्यांचे
बंधू
कावळा आणि मैना
कथा क्र.163
पावसाळ्याचे दिवस होते, आकाशात ढग भरून आले होते.
एका निंबाच्या झाडावर खूप सारे कावळे बसले होते. ते सारे कावळे झाडावर बसून
काव-काव करत होते आणि एकमेकांशी भांडत होते. तितक्यात तिथे एक मैना आली आणि त्याच
झाडाच्या एका फांदीवर जावून बसली. मैनेला झाडावर बसलेले पाहताच सगळे कावळे आपले
भांडण विसरून एकत्र झाले व मैनेवर धावून आले. बिचारी मैना त्यांना म्हणाली,"आज
खूपच अंधारून आलंय, त्यातच मी माझ्या घरट्याचा रस्ता पण विसरले आहे मला
कृपा करून इथे राहू द्या." सगळे कावळे एकसुरात ओरडले,"नाही, नाही, हि आमची बसायची जागा आहे
तू इथे राहू शकत नाही." मैना म्हणाली," झाडे तर ईश्वराने
सर्वासाठी बनविलेली आहेत. मी खूप छोटी आहे, तुमच्या बहिणीसारखी आहे
मला कृपा करून इथे राहू द्या.'' कावळे म्हणाले,'' आम्हाला तुझ्यासारखी
बहिण नको, तु देवाचे नाव घेतेस ना, मग जा त्या ईश्वराकडे
आसरा मागायला, इथे कशाला तडमडायला आलीस, तू जा नाहीतर आम्ही
तुझ्यावर तुटून पडू आणि तुझा जीव घेऊ.'' कावळे हे आपआपसात नेहमीच
भांडणे करताना आपणास नेहमी पाहावयास मिळतात. नेहमी कावकाव करत एकमेकांशी भांडणे
करताना रोज संध्याकाळी आपणास ते पाहावयास मिळू शकेल.मात्र दुस-या कोणत्या पक्ष्याविरूद्ध
मात्र ते एकत्र होऊन ते लढतात हे पण खरे आहे. मैनेच्याबाबतीतही तसेच झाले. मैनेला
कावळ्यांनी जाण्यास सांगितल्यावर ती बिचारी तिथूनच जवळच असणा-या एका आंब्याच्या
झाडाकडे उडत गेली व तिथे एका फांदीवर बसली. थोड्याच वेळात मोठा पाऊस पडू लागला.
पावसाचे मोठमोठाले थेंब व त्याच्याबरोबरच गाराही पडू लागल्या. गारा देखील
मोठमोठाल्या पडू लागल्या. गारा पडू लागल्या व त्या कावळ्यांना कळेना की कोठे
जावे. कारण निंबाच्या झाडावर फारसा आडोसा होत नाही. त्यांना गारांचा मार बसू
लागला. बाहेरही पडता येईना की झाडावरही बसता येईना. बंदूकीतून सोडलेल्या
गोळीसारखा गारांचा मार त्यांना बसू लागला. इकडे मैना ज्या झाडावर बसली होती त्या
आंब्याच्या झाडाची एक फांदी तुटून खाली पडली व नैसर्गिकपणे तेथे एक आडोसा(खोपा)
तयार झाला. छोटीशी मैना त्या खोप्यात सहजपणे बसू शकत होती. मैना आत गेली आणि
तिला त्या पावसाचा व गारांचा काहीच मार बसला नाही. रात्रभर मुसळधार पाऊस पडला.
सकाळ झाली आणि मैना त्या खोप्यातून बाहेर पडली आणि तिने जे पाहिले ते आश्चर्यचकित
व दु:खद होते. रात्रीच्या गारांच्या माराने बहुतांश कावळे मृत्युमुखी पडले
होते. तिला त्याचे खूप दु:ख झाले. तिला उडताना पाहून त्यात मरणोन्मुख असणा-या
कावळ्याने विचारले की मैना तू जिवंत कशी यावर मैनेने उत्तर दिले,'' मी ज्या झाडावर बसले
होते तेथे बसून मी ईश्वराची प्रार्थना केली व त्यानेच मला या संकटातून वाचविले.
दु:खात परमेश्वरच आपली सुटका करू शकतो.
तात्पर्य :- ईश्वर
संकटातून सुटका करतो किंवा संकटकाळात ईश्वर आपल्याला सुबुद्धी देऊन संकटात मार्ग
सुचवितो.
बुधवार, १ जानेवारी, २०१४
शेळी, करडू आणि लांडगा
कथा क्र.162
एक शेळी सकाळी उठून चरण्यासाठी रानात जाण्यास निघाली. त्यावेळी ती आपल्या
करडास म्हणाली, "बाळ, आपल्या खोपटाचे दार आतून लावून घे.' सगळ्या लांडग्याचा सत्यानाश होवो' असे शब्द जो उच्चारील त्यासच आत घे, इतरांस दार उघडू नको.' हे भाषण एका लांडग्याने
आडून ऐकले आणि शेळी बाहेर जाताच, खोपट्याच्या
दारापाशी येऊन तो म्हणाला, "सगळ्या लांडग्यांचा
सत्यानाश होवो' शेळीने सांगितलेले शब्द उच्चारताच करडू दार उघडील असे त्यास वाटले होते, पण त्या करडास त्याचा शब्द ऐकून संशय आल्यामुळे, त्याने दार उघडले नाही. ते लांडग्यास म्हणाले, "तू जर बोकड आहेस, तर तुला दाढी कशी नाही?' हा प्रश्न ऐकून लांडगा ओशाळला आणि
निमूटपणे चालता झाला.
तात्पर्य : फसवेगिरी करणाऱ्या
माणसासंबंधात शक्य तितकी सावधगिरी ठेवावी.
______________वर्तमानपत्रातून संग्रहित _______________
यशोविजय पंडित
कथा क्र.161
आजपासून तीन शतकांपूर्वी यशोविजय नावाचा एक विख्यात प्रकांड पंडित होऊन गेला.
तो अनेक विषयांत निपुण होता. त्याच्या बाबतीत असे सांगण्यात येते की एकदा त्याला
पंडीतांमार्फत एक विषय देण्यात आला होता. त्या विषयानुसार तो संस्कृतमध्ये
बोलत राहिला. मात्र हळूहळू त्याला आपल्या पांडित्याचा गर्व होऊ लागला. व्याख्यानाच्यावेळी
त्याच्या सांगण्यावरून त्याचे शिष्य चारही
बाजूंनी झेंडे लावत असत. याचा अर्थ असा की, चारही दिशांमध्ये त्याचे नाव झाले आहे. विद्वत्ता आणि सफलता याचे प्रदर्शन
अन्य शिष्यांना योग्य वाटत नव्हते. पण त्याला विचारण्याचे कोणीच धाडस करत
नव्हते. एकेदिवशी एका शिष्याने त्याला मोठ्या हुशारीने विचारले, ''गुरुदेव, आपले पांडित्य धन्य आहे, मी मोठा भाग्यवान आहे की आपल्यासारख्या महापुरुषाचे दर्शन मला झाले, आपल्या सत्संगाचा लाभ झाला. एक प्रश्न मला बरेच दिवसापासून पडतो आहे पण
धाडस करून हे विचारतो की, आपण जर इतके विद्वान आहात तर आपले गुरु व
गुरुंचे गुरु किती मोठे विद्वान होते?'' पंडीत म्हणाले,''मी तर त्या दोघांपुढे काहीच नाही. त्यांच्या चरणाच्या धुळीइतकेसुद्धा मला
ज्ञान नाही'' शिष्य म्हणाला,'' ते इतके विद्वान होते तर तेसुद्धा आपल्यासारखेच चारी बाजूंना झेंडे लावत असत
का?'' पंडीताला आपली चूक समजली व त्याचे हृदय
अहंकाररहित झाले.
तात्पर्य:-ज्ञानाचे महत्व
तेव्हाच असते जेव्हा ते ज्ञान अभिमानमुक्त असेल. अहंकाररहित ज्ञानच खरे
मार्गदर्शक असते. अहंकाराने बाधित ज्ञान सर्वनाशाला कारणीभूत ठरते.
______________वर्तमानपत्रातून संग्रहित _______________
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)