गुरुवार, ३१ जुलै, २०१४

एकीचे बळ सर्वश्रेष्‍ठ

कथा क्र.225

एका जातक कथेतील वर्णनानुसार वाराणसीलगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्‍याने खड्ड्यात पडलेल्‍या जंगली कुत्र्याच्‍या पिलाचा जीव वाचवला तेव्‍हापासून त्‍याला त्‍या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्‍याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्‍याच्‍याजवळ येत असत. परंतु त्‍यांना सर्वांना एका वाघाने फार त्रस्‍त करून सोडले होते. तो रोज त्‍यांच्‍यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्‍या माथ्‍यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्‍याच्‍यावर भुंकु लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्‍या कुत्र्याच्‍या मागे असणा-या एका मोठ्या खड्ड्यात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्‍याच्‍यावर धाव घेतली व त्‍याच्‍यावर हल्‍ला करून त्‍याला ठार केले.


तात्‍पर्य :- एकीचे बळ मोठे असते. 

शनिवार, २६ जुलै, २०१४

खरा वेडा कोण

कथा क्र, 224

एका वेड्यांच्‍या हॉस्पिटलमध्‍ये वेड्यांना बाहेर पडेपर्यंत म्‍हणजेच पूर्ण बरा झाला आहे की नाही हे पाहण्‍यासाठी अनेक मानसशास्‍त्रीय चाचण्‍यांना तोंड द्यावे लागत असे. त्‍यातील शेवटच्‍या चाचणीमध्‍ये वेड्यासमोर एक नवे कोरे चकचकीत पाच रूपयांचे नाणे आणि एक मळकट पन्‍नास रूपयांची नोट ठेवली जाई. त्‍यातील फक्त एकच गोष्‍ट त्‍याला उचलण्‍यास सांगितली जाई. वेड्याने पन्‍नास रूपये उचचले की त्‍याला डिसचार्ज दिला जाई व तसे न केल्‍यास त्‍याला पुन्‍हा एकदा चाचण्‍या पार करायला सांगितल्‍या जात. गरज पडल्‍यास पुन्‍हा उपचारासाठीही पाठविले जाई. हॉस्‍पीटलमधील एक वेडा शेवटच्‍या चाचणीपर्यंत सगळ्या चाचण्‍या पटापट पार करत असे मात्र शेवटच्‍या चाचणीला मात्र नापास होत असे. अनेकदा असे घडल्‍यावर चाचणी घेणारे डॉक्‍टर कंटाळले व त्‍यांनी एक युक्ती केली पुढच्‍या वेळेला त्‍या वेड्यासमोर एक पाच रूपयांची जुनी नोट व पन्‍नास रूपयांची कोरी करकरीत नवी नोट ठेवली तरीही त्‍या वेड्याने पाच रूपयांचीच नोट उचचली. हे पाहून डॉक्‍टर आश्‍चर्यचकित झाले व ओरडले,'' अरे मूर्खा, सगळ्या चाचण्‍या आरामात पार करतोस आणि शेवटच्‍या चाचणीत मात्र कायम चुकतोस. तुला पाच आणि पन्‍नास यातील फरक कळत नाही काय'' वेडा शांतपणे म्‍हणाला,'' ते मला चांगलं कळतं डॉक्‍टरसाहेब, पण इथून बाहेर पडलो की, मला रोजचा खर्च स्‍वत:लाच करावा लागणार आहे. त्‍यापेक्षा पाच रूपयांचे नाणे उचचले की, मला इथून बाहेर पडावे लागत नाही, पाच रूपयेही मिळतात आणि खाणेपिणेराहणे सगळे काही फुकटात होते. मग मी पन्‍नास रूपयांची नोट उचलून स्‍वत:च्‍या पायावर धोंडा पाडून का म्‍हणून घेऊ''

शनिवार, १२ जुलै, २०१४

धर्म म्‍हणजे काय ?



कथा क्र. 223

एकदा एका राजाने दवंडी पिटवली की जो कोणी मला सर्वश्रेष्‍ठ धर्माचे महत्‍व समजावून सांगेल त्‍याला मी मोठे बक्षीस देईन व तो धर्म मी स्‍वीकारेन. ही वार्ता ऐकताच सगळीकडे मोठमोठे धर्मगुरु, धर्मोपदेशक, आचार्य राजाला आपल्‍या धर्माचे महत्‍व समजावून सांगण्‍यासाठी येऊ लागले. ते सर्वच जण एकच गोष्‍ट आठवणीने करत होते की स्‍वत:च्‍या धर्माचे महत्‍व सांगताना मात्र दुस-याला धर्माला कमी लेखत होते. दुस-याच्‍या धर्माची निंदानालस्‍ती करत होते. यातून एकच झाले की, राजाला काहीच कळेना की कोणता धर्म सर्वश्रेष्‍ठ आहे व त्‍यामुळे तो दु:खी होत होता. पण त्‍याने शोध सुरुच ठेवला. वर्षानुवर्षे हाच क्रम चालू राहिला. राजा वृद्ध होत चालला. शेवटी राजा एका साधूच्‍या दर्शनास गेला. तेथे गेल्‍यावर त्‍याने साधूला नमस्‍कार केला व म्‍हणाला,''साधूमहाराज, मी सर्वश्रेष्‍ठ धर्माच्‍या शोधात आहे पण आजपर्यंत मला सर्वश्रेष्‍ठ धर्म कोणता हेच कळाले नाही.'' साधूने राजाकडे पाहिले व म्‍हणाले,''सर्वश्रेष्‍ठ धर्म तर जगात अस्तित्‍वातच नाहीत. जगात एकच धर्म आहे आणि बाकी सगळे हे त्‍या धर्माला फुटलेले अहंकार आहेत. धर्म तर तोच असतो जिथे व्‍यक्ती निष्‍पक्ष असतो, पक्षपात करणा-या मनात धर्म राहूच शकत नाही.'' साधूचे हे बोलणे ऐकून राजा प्रभावित झाला. साधू पुढे जाऊन राजाला म्‍हणाला,''राजन, चला आपण नदी पार करून पलीकडे जाऊया'' नदीतीरावर दोघे पोहोचले, त्‍यांनी तिथे अनेक सुंदर नावा (होडया) पाहिल्‍या. साधू राजाला म्‍हणाले,'' राजे, चला आपण एका सर्वश्रेष्‍ठ नावेतून पैलतीर गाठूया'' प्रत्‍येक नावेपाशी जाताच साधू त्‍या नावेबद्दल काही ना काही चुक दाखवित असे व पुढे जात असे. असे करता करता दुपार झाली. राजाला भूक लागली व त्रासून राजाने साधूला म्‍हटले,''महाराज आपल्‍याला नावेतून फक्त पलीकडे जायचे आहे, अहो इतकी छोटी नदी आहे की पोहूनसुद्धा आपण पटकन पलीकडे पोहोचून जाऊ मग त्‍याची इतकी चर्चा कशाला'' साधूने राजाकडे पाहिले व म्‍हणाले,'' राजन, हेच तर मला तुम्‍हाला सांगायचे आहे. धर्माला नाव नसतेच, धर्म आपल्‍याला स्‍वत:ला पोहून पार करायचा असतो. दुसरा कोणी आपल्‍याला धर्मापलिकडे पोहोचवू शकत नाही. आपल्‍यालाच जावे लागते.'' राजा सर्व काही समजून चुकला.

शनिवार, ५ जुलै, २०१४

साधू आणि यक्ष

    कथा क्र.222    


एक साधू तपश्‍चर्येस एका निर्जन स्‍थळी बसले होते. त्‍या ठिकाणी एका यक्षाचे वास्‍तव्‍य होते. या गोष्‍टीची साधूला कल्‍पना नव्‍हती. ते जेव्‍हा तेथे पोहोचले तेव्‍हा निर्जन स्‍थान पाहून त्‍यांनी तेथेच ध्‍यानधारणा सुरु केली. त्‍या वेळी यक्ष तेथे नव्‍हता. रात्री जेव्‍हा यक्ष तेथे आला तेव्‍हा आपल्‍या जागेवर दुस-यास व्‍यक्तीला पाहून त्‍याला राग आला. त्‍याने मोठ्याने आरडाओरड सुरु केली, पण समाधी अवस्‍थेत असलेल्‍या साधूवर त्‍याचा काहीच परिणाम झाला नाही. यक्षाने मग हत्तीचे रूप घेऊन त्‍यांना भीती दाखविण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु ते ध्‍यानस्‍थ असल्‍याने त्‍यांच्‍यावर याचा काहीच परिणाम झाला नाही. मग यक्षाने वेगवेगळी रूपे घेऊन साधूला घाबरविण्‍याचा प्रयत्‍न केला. कधी तो वाघ, सिंह, तरस, कोल्‍हा अशा जंगली प्राण्‍यांची रूपे घेतली तरी साधूच्‍या ध्‍यानात काहीच खंड पडेना. शेवटी त्‍याने विषारी सापाचे रूप धारण करून त्‍यांना दंश केला तरीही त्‍यांच्‍यावर याचा काहीच परिणाम दिसेना. इतक्‍या प्रयत्‍नानंतरही साधूवर कोणताही परिणाम न झाल्‍याने यक्ष झालेल्‍या श्रमाने थकून सर्परूपातच विश्रांती घेऊ लागला. थोड्याच वेळात साधूंची समाधी अवस्‍था पूर्ण झाली व ते जागे झाले व त्‍यांची नजर सर्परूपी यक्षावर पडली. त्‍या नजरेत इतके प्रेमभाव भरलेले होते की त्‍या कृपादृष्‍टीने सापाच्‍या अंगातील विष अमृत बनले. यक्ष साधूंना शरण गेला व त्‍याने त्‍यांना आदरपूर्वक वंदन केले.

तात्‍पर्य एकाग्रता, स्‍नेह आणि प्रेमभावनेने कोणावरही विजय प्राप्त करता येतो. 

आचार्य विनोबा भावे

  कथा क्र. 221    

भूदान चळवळीच्‍या काळातील ही गोष्‍ट आहे. या चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे होते. त्‍यांची पदयात्रा सुरु होती. आपल्‍या काही शिष्‍यांसह विनोबाजी मीराजींच्‍या आश्रमात थांबले होते. अल्‍पशा विश्रांतीनंतर त्‍यांची पदयात्रा पुन्‍हा सुरु झाली. त्यावेळी ते हरिद्वारकडे चालले होते. विनोबाजींची प्रकृती थोडी ठीक नव्‍हती. त्‍यांची कंबर आणि पाय दुखत होते. त्‍यामुळे त्‍यांना खुर्चीत बसवून नेण्‍यात येत होते. मध्‍ये मध्‍ये खुर्चीतून उतरून पायी चालायचे. तेव्‍हा एक शिष्‍य त्‍यांच्‍याजवळ येऊन म्‍हणाला,'' बाबा, मला खूप राग येतो, मी काय करावे'' विनोबाजी म्‍हणाले,'' मी लहान असताना मलाही खूप राग यायचा, मग माझ्याजवळ मिश्री असायची ती मी तोंडात ठेवायचो, परंतु कधीकधी ती ही नसायची'' मग तुम्‍ही काय करत होता असे त्‍या व्‍यक्तीने विचारले. विनोबाजी म्‍हणाले,'' मी यावर खूप विचार केला, मग माझ्या मनात एक गोष्‍ट आली. जेव्‍हा आपल्‍या मनाविरूद्ध एखादी गोष्‍ट आली जेव्‍हा आपल्‍या मनाविरूद्ध गोष्‍ट घडली तर लगेच नाराज होतो जर तो क्षणच आपण टाळला तर रागावर विजय मिळवू शकतो. आनंद आणि नाराजी यावर आपण तेव्‍हाच प्रकट करतो तो पहिलाच क्षण आपल्‍यावर वरचढ ठरू पाहतो. तो क्षण टाळणे कठीण आहे. पण मनन करून तो टाळता येतो. मी यावर खूप मनन केले, यामुळेच जीवनात कितीही मोठी आपत्ती आली तरी मी संयम ढळू दिला नाही.''


तात्‍पर्य :- विचारपूर्वक उचललेले पाऊल आयुष्‍याला योग्‍य दिशा देते. 

सोमवार, ३० जून, २०१४

आत्‍मनियंत्रणाचे महत्‍व

कथा क्र.220

एक जिज्ञासूवृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्‍ट शिकण्‍यास तयार होत असे. त्‍याने धनुष्‍यबाण तयार करण्‍यास ते कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणा-यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इ. प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्‍याच्‍यात अहंकार आला, तो आपल्‍या मित्रांना सांगत असे. या जगात माझ्याइतका प्रतिभावंत अन्‍य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्‍यांनी जेव्‍हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले. तेव्‍हा त्‍यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्‍यावी जी आतापर्यंतच्‍या कलांमध्‍ये श्रेष्‍ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्‍याच्‍याकडे गेले. मुलाने विचारले, तुम्‍ही कोण आहात. बुद्ध म्‍हणाले,''मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे.'' मुलाने यावर त्‍यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्‍हणाले,''जो धनुष्‍यबाण वापरतो त्‍याला त्‍याचा वापर माहित असतो, जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्‍याला ते काम माहित असते. पण जो ज्ञानी आहे तो स्‍वत:वर नियंत्रण ठेवतो,'' मुलाने विचारले, ते कसे काय. बुद्ध म्‍हणाले, '' जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो, अशी व्‍यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्‍य तर स्‍वत:ला नियंत्रणात ठेवण्‍याचे असते.


तात्‍पर्य :- ज्‍यांना स्‍वत:ला नियंत्रणात ठेवता येते त्‍याला समभाव ठेवता येतो. हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परि‍स्थितीत आपल्‍याला आनंदी ठेवतो. 

महिलेचा निर्भीडपणा

कथा क्र.219


एकदा खलिफा उमरला जनतेस मार्गदर्शन करण्‍यासाठी निमंत्रित करण्‍यात आले होते. त्‍यांचे भाषणही प्रभावी झाले. अधूनमधून लोकांनी खलिफांना प्रश्‍नही विचारले. त्‍यांची खलिफानी समाधानकारक उत्तरेही दिली. खलिफाकडून धर्म आणि नीतीबाबत औत्‍स्‍युक्‍य असणा-या लोकांच्‍याही प्रश्‍नांची उत्‍तरे दिली. याच क्रमाने खलिफाने लोकांना प्रश्‍न केले. तो म्‍हणाला,'' जर मी तुम्‍हाला लोकांना काही आदेश दिला तर तो पाळाल काय'' मोठ्या संख्‍येने लोकानी सहमती दर्शविली पण एक महिलेने म्‍हटले,'' नाही, आम्‍ही तुमचा आदेश पाळणार नाही.'' हे ऐकताच गर्दीतूनही राग व्‍यक्‍त झाला. खलिफाने सर्वांना शांत राहण्‍यास सुचविले. त्‍या महिलेला याचे कारण विचारले असताती म्‍हणाली,''तुम्‍ही तुमचा पायजमा खूपच लांब घातला आहे. माझ्या पतीचा पायजमा गुडघ्‍यापर्यंतही येत नाही यावरून असे स्‍पष्‍ट होते की तुमच्‍या शाही भांडारामध्‍ये तुम्‍ही तुमच्‍या हिश्‍श्‍यापेक्षा जास्‍त कपडा घेतला आहे.'' महिलेला यातून असे सुचवायचे होते की खलिफाचे बोलण्‍याप्रमाणे वर्तन नाही. यावर खलिफा म्‍हणाला,''मला याबाबत माहित नाही पण माझा मुलगा याबाबत उत्तर देईल.'' खलिफाचा मुलगा पुढे आला व त्‍याने सांगितले,''माझ्या वडिलांनी शाही भांडारातून कपडा घेतलेला नाही. माझ्या हिश्‍श्‍याचे कापड मी वडिलांना दिले. सगळ्याप्रमाणेच माझे वडीलही कापड घेत होते त्‍यात मी वाढ केली'' महिलेचे या उत्तराने समाधान झाले. यावर खलिफा नाराज न होता त्‍या महिलेला धन्‍यवाद देऊ लागले कारण खलिफाच्‍या मते जोपर्यंत जनतेत प्रामाणिक व निर्भीडपणे बोलणारे लोक असणार नाही तोपर्यंत राज्‍याला किंवा धर्माला धोका नसतो. 

मनाची एकाग्रता

कथा क्र. 218

एकेकाळी एक वृद्ध योद्धा होता. त्‍याच्‍या काळातील तो सर्वत्र प्रसिद्ध असा योद्धा होता. त्‍याला कोणत्‍याही प्रकारच्‍या युद्धात कुणीच हरवू शकत नसे. त्‍याची ख्‍याती सर्वत्र पसरली होती. त्‍याने त्‍याच्‍या शिष्‍यांना व मुलांना युद्धकलेचे शिक्षण देण्‍यास सुरुवात केली होती. त्‍याचवेळी एक तरूण योद्धाही प्रसिद्ध होत होता. दिग्‍गज योद्धेही तरूण योद्ध्यासमोर हार मानत असत. प्रतिस्‍पर्ध्‍याचे कच्‍चे दुवे ओळखून त्‍याला सहज पराभूत करण्‍यात त्‍याचा हातखंडा होता. अतिशय कमी कालावधीत त्‍याने वृद्ध योद्धा सोडल्‍यास सर्व योद्ध्यांना पराभूत केले होते. त्‍याचे नाव सर्वत्र गाजू लागले. मिळणारी प्रसिद्धीचा आता त्‍याच्‍या मनात अहंकार जागृत झाला. त्‍याने विचार केला की या वृद्धालाही हरवून 'अजिंक्‍य' हे बिरूद लावून मिरवू. त्‍याने वृद्ध योद्ध्याला आव्‍हान दिले. शिष्‍यांनी मनाई केली तरी वृद्धाने त्‍याचे आव्‍हान स्‍वीकारले. तरूण योद्धा ठरलेल्‍या दिवशी वेळेवर रणांगणात येऊन उभा राहिला. भविष्‍यातील विजयाची कल्‍पना मनात धरून तो आनंदी होत होता. पण वृद्ध मात्र शांत आणि संयमित स्थितीमध्‍ये त्‍याच्‍यासमोर उभा होता. युद्ध सुरु झाले. तरूणाच्‍या प्रत्‍येक वाराला वृद्धाकडे प्रतिवार तयार होता.तरूण योद्धा हळूहळू का होईना दमू लागला आणि आपण युद्ध हरतो आहे हे लक्षात येताच त्‍याने वृद्धाला अपशब्‍द वापरण्‍यास सुरुवात केली. जेणेकरून वृद्धाचे लक्ष विचलित होईल पण त्‍याचा उपयोग झाला नाही. वृद्ध अविचल राहिला त्‍याचा संयम ढळला नाही. अखेरीस तरूण योद्धा पराजित झाला. त्‍याने स्‍वत:हून हार पत्‍करली व तेथून पराजित होऊन निघून गेला. तो गेल्‍यावर शिष्‍यांनी व वृद्धाच्‍या मुलांनी वृद्धाला विचारले,''बाबा, तो तरूण तुम्‍हाला अपशब्‍द वापरत होता तरी तुम्‍ही शांत कसे राहिलात'' तेव्‍हा वृद्ध गुरु म्‍हणाला,'' मुलांनो कोणत्‍याही युद्धात शारीरिक बळाबरोबरच मनाची एकाग्रता महत्‍वाची असते. कोणत्‍याही परिस्थितीत मन कणखर असेल तर तुमचा विजय निश्चित आहे.''


तात्‍पर्य : मनाची एकाग्रता साधल्‍याने बरेचशी कामे साध्‍य होतात. मन एकाग्र करून कोणतेही काम केल्‍यास हमखास यश मिळतेच.

बुधवार, २५ जून, २०१४

लोभाची शिक्षा

कथा क्र. 217

एक ब्राह्मण यजमानाकडे पूजाअर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने देशात दुष्‍काळ पडला. त्‍यामुळे ब्राह्मणाला रोजच्‍या जेवणाची भ्रांत पडली, यापेक्षा मरण पत्‍करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला. तेथे वाघाला पाहिले. ब्राह्मणाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्‍ले तर तर त्‍याची भूक भागेल व माझीही मृत्‍यूची इच्‍छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला. वाघ मनुष्‍यवाणीत बोलू लागला,''तू असा माझ्यासमोर का उभा आहेस'' ब्राह्मणाने आपली कर्मकहाणी त्‍याला सांगितली. तेव्‍हा वाघाला त्‍याची दया आली. तो प्रत्‍यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती. वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्‍याला एक हजार सुवर्णमुद्रा व धान्‍य दिले व भविष्‍यात कधीही आत्‍महत्‍येचा विचार करू नकोस असे बजावून त्‍याला परत पाठविले. ब्राह्मण अत्‍यानंदाने घरी परतला. दुस-या दिवशी एक सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्‍यासाठी गेला तेव्‍हा दुकानदाराने या सुवर्णमुद्रा तुला कोठे मिळाल्‍या असे विचारले असता भाबडेपणाने ब्राह्मणाने खरेखरे सर्व सांगून टाकले. लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले. त्‍यानेही तसेच वागण्‍याचे ठरविले. दुस-याच दिवशी त्‍याने जंगलात जाऊन त्‍याच ठिकाणी ठिय्या मांडला. वाघ त्‍याच्‍यासमोर प्रगटला. त्‍याला व्‍यापा-याने खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला तत्‍काळ समजले, हा खोटे बोलत आहे, त्‍याने त्‍याच्‍यावर हल्‍ला चढवला आणि जखमी व्‍यापा-याला सुनावले, आज तुला जिवंत सोडत आहे ज्‍यायोगे तू असे धाडस पुन्‍हा करणार नाहीस


तात्‍पर्य लोभाने माणसाच्‍या जीवावरही बेतू शकते, लोभ माणसाचे नुकसान करतो. लोभ टाळणे आवश्‍यक आहे. 

मंगळवार, २४ जून, २०१४

हि-यापेक्षा जनता महत्‍वाची

   कथा क्र. 216   

एक राजा होता. त्‍याचे सुखी व संपन्न राज्‍य होते. दुर्दैवाने एकदा त्‍याच्‍या राज्‍यात पाऊसच पडला नाही. त्‍यामुळे दुष्‍काळाचे संकट उभे ठाकले. गरिबांचे हाल होऊ लागले. बादशहाने आपला खजिना जनतेसाठी खुला केला. एकेदिवशी तो खजिनाही संपला. आता पुढे काय हा प्रश्‍न राजासमोर उभा ठाकला. प्रजाजनांचे पोषण कसे करता येईल ही एकच चिंता राजाला सतत सतावित होती. त्‍याने त्‍याच्‍या बोटातली हि-याची अंगठी नोकरांना दिली व सांगितले,'' ही अंगठी घेऊन शेजारच्‍या देशात जा, तेथील राजाला आपली सर्व परि‍स्थिती सांगा. तो राजा आपली अवस्‍था जाणेल व हा हिरा फार दुर्मिळ आहे. या हि-याच्‍या बदल्‍यात त्‍याच्‍याकडून धान्‍य मागून आणा व जनतेत वाटप करा. '' मंत्र्यांनी राजाला विचारले,''राजन, इतका महागडा, दुर्मिळ हिरा तुम्‍ही का विकत आहात, दुसरी काहीतरी सोय करता येईल.'' राजा म्‍हणाला,''माझे राज्‍य ही माझी संपत्ती आहे. प्रजा उपाशी मरत असताना मी महागडा हिरा का सांभाळत बसू. प्रजा आहे तर मी आहे. असे हिरे पुन्‍हा प्राप्‍त करता येतील पण प्रजा एकदा जर नाराज झाली तर पुन्‍हा अशी प्रजा मला मिळणार नाही.''


तात्‍पर्य :- आपल्‍या हाती जर सत्‍ता असेल तर त्‍याचा योग्‍य विनियोग कसा करता येईल हे पहाणे इष्‍ट ठरते. 

प्रामाणिक मुलगा

        कथा क्र. 215         

एक मुलगा खूपच सरळमार्गी आणि प्रामाणिक होता. त्‍याच्‍यावर त्‍याच्‍या आईवडीलांनी चांगले संस्‍कार केले होते व त्‍या संस्‍कारांना अनुसरुन तो वागत होता. एकदा काही निमित्ताने तो शेजा-याच्‍या घरी गेला. शेजारी कुठेतरी बाहेर गेला होता. शेजा-याच्‍या नोकराने मुलाला बसायला सांगितले आणि नोकर निघून गेला. मुलगा जिथे बसला होता तिथे जवळ एका टोपलीत उत्तम दर्जाची सफरचंदे ठेवली होती. त्‍या मुलालाही सफरचंद खूप आवडत असत पण त्‍याने त्‍यांना हात लावला नाही. तो शेजा-याची वाट पाहात बसला होता. ब-याच वेळाने शेजारी घरी परतला त्‍याने पाहिले की मुलगा बसला आहे व त्‍याच्‍याशेजारी सफरचंदे असूनही तो त्‍यांना हातसुद्धा लावत नाही. मुलाला सफरचंद खूप आवडतात हे शेजा-याला माहित होते. शेजारी येताच मुलाने उठून नमस्‍कार केला, शेजा-याने त्‍याला जवळ घेतले व विचारले,''तुला सफरचंद तर खूप आवडतात ना, मग तरीसुद्धा एकही सफरचंद उचलून का खाल्‍ले नाहीस'' मुलगा म्‍हणाला,'' इथेच कोणीच नव्‍हते, मी दोन तीन सफरचंदे जरी उचलून घेतली असती तरी कुणालाच कळले नसते, कोणीच मला पाहात नव्‍हते पण कोणी पाहत नव्‍हते पण मी स्‍वत:ला ते पाहात होतो. परंतु मी स्‍वत:ला फसवू शकत नाही.'' शेजा-यास त्‍याच्‍या या बोलण्‍याचा आनंद वाटला. त्‍याने त्‍याला शाबासकी दिली व म्‍हणाला,'' आपण करतो ते आपला आत्‍मा पाहात असतो, आपण आपल्‍याला कधीच फसवू शकत नाही. दुस-याला लाख फसवू पण स्‍वत:शी खोटे बोलणे फार अवघड आहे. सर्वांनीच तुझ्यासारखे वर्तन केल्‍यास जग सुखी होईल.''


तात्‍पर्य :- लहानपणीच मुलांना खोटे वागणे, बोलणे यापासून दूर ठेवल्‍यास मुले भविष्‍यात योग्‍य वर्तन करतील. वाईट गुण घेण्‍यास क्षणाचाही विलंब लागत नाही पण चांगले शिकण्‍यास खूप काळ जावा लागतो. मुले वाईट वर्तनाची निघाल्‍यास त्‍याचा दोष आईवडीलांना येतो. 

शनिवार, २१ जून, २०१४

विद्या विनयेन शोभते

  कथा क्र.214  

राजा ज्ञानसेनच्‍या दरबारात दररोज शास्‍त्रार्थ केला जात असे. विद्वान लोक तेथे शास्‍त्रासंबंधी चर्चा करण्‍यासाठी येत असत. जे विद्वान लोक शास्‍त्रात पारंगत किंवा वादविवादात जिंकत असत ते विजयी म्‍हणून घोषित केले जात असत त्‍यांना राजा धन आणि मान देऊन सन्‍मानित करत असे. एक दिवस राजा ज्ञानसेनाच्‍या दरबारात असाच शास्‍त्रार्थ चालला होता. त्‍या सभेत पंडित भारवी याला विजयी घोषित करण्‍यात आले. राजाने त्‍याचा भरसभेत सत्‍कार केला व मान देण्‍यासाठी त्‍याची हत्तीवरून मिरवणूक काढली. त्‍याच्‍या विद्वत्तेच्‍या सन्‍मानार्थ राजा स्‍वत: त्‍याला चव-या ढाळत त्‍याला घरापर्यंत सोडण्‍यास आला. भारवी एवढ्या मोठ्या सन्‍मानाने घरी आला हे पाहून भारवीच्‍या आईवडीलांना आकाश ठेंगणे झाले. घरी आल्‍याबरोबर भारवीने मातेला साष्‍टांग नमस्‍कार केला पण पित्‍याला मात्र उपेक्षेने उभ्‍याउभ्‍याच नमस्‍कार केला. त्‍याच्‍या वर्तनात हे साफ दिसून येत होते की जणू काही पित्‍याला हे सुचवित होता बघा माझा किती सन्‍मान झाला आहे, माझ्या ज्ञानाला किती किंमत मिळते आहे, स्‍वत: राजा हत्तीवर चव-या ढाळत मला सोडायला घरी आला आहे. पित्‍याने त्‍याच्‍या त्‍याही नमस्‍काराचा स्‍वीकार केला आणि त्‍याला चिरंजीवी भव असे म्‍हटले. गोष्‍ट इथेच संपली असे नाही. मात्‍यापित्‍यांला हे भारवीचे वागणे खटकले. ते दोघेही उदास राहू लागले. भारवीच्‍या यशाने ते जेवढे आनंदी राहायला पाहिजे होते तितके ते आनंदी नव्‍हते. याचे कारणही स्‍पष्‍ट होते की भारवीला यश पचविता आले नव्‍हते व तो ते आईवडीलांना दर्शवित होता. तो यशाच्‍या धुंदीत शिष्‍टाचार आणि विनम्रतेला विसरून गेला होता. थोड्या दिवसांनी माता आणि पित्‍याला उदास पाहून भारवीने मातेला याचे कारण विचारले असता माता म्‍हणाली,’’ तू विजयी होऊन आलास हे ठीक आहे, पण तू विजयी होण्‍यासाठी तुझ्या वडीलांनी घेतलेले परिश्रम तू विसरलास. तू शास्‍त्रार्थ करायला जाणार होतास त्‍याआधी दहा दिवस तुझ्यासाठी निर्जळी उपवास केले होते व त्‍या काळात ते परमेश्‍वराकडे एकच मागणे मागत होते माझ्या मुलाला यश मिळवून दे. लहानपणापासून केवळ तुझ्या यशासाठी त्‍यांनी कितीतरी स्‍वत:च्‍या इच्‍छा दाबून ठेवल्‍या व तुला शास्‍त्रपंडीत बनविले आणि केवळ एकाच यशाने उन्‍मत्त होऊन तू त्‍यांची उपेक्षा केलीस हेच आम्‍हा दोघांच्‍या खिन्नतेचे कारण आहे.’’ हे ऐकताच भारवीला आपली चूक समजली त्‍याने मातापित्‍याच्‍या चरणावर अक्षरश: लोळण घेतली. अनेकवेळा क्षमायाचना केली व आयुष्‍यात पुन्‍हा कधीही त्‍याने मातापित्‍यांची सेवा करण्‍यात कसूर केली नाही.


तात्‍पर्य :- आयुष्‍यात आपल्‍याला कितीही मोठी यशाची शिखरे पादाक्रांत करण्‍यास मिळाली तरी त्‍यापाठीमागे आपल्‍या आईवडीलांची पुण्‍याई असते हे प्रत्‍येकानेच समजून घेतले पाहिजे. यश कितीही मिळाले तरी उन्‍मत्त होऊ नये कारण विद्या ही नेहमी विनय असणा-यांकडेच शोभून दिसते. 

राजा जनक आणि ऋषि अष्‍टावक्र

  कथा क्र. 213  

     राजा जनक राजा असूनही त्‍यांना राजवैभवात आसक्ती नव्‍हती. लोभ मोहापासून ते सदैव दूर राहात. विनम्रता त्‍यांच्‍या स्‍वभावात होती. त्‍यामुळे ते आपले दोष दूर करण्‍याचा प्रयत्‍न करत असत. आत्‍मशोध घेण्‍याचा त्‍यांचा सदैव प्रयत्‍न सुरुच असे. 
      एकदा ते नदीकाठावर एकांतात बसून सोऽहम चा जप करत होते. मोठ्या आवाजात त्‍यांचा जप सुरु होता. तेवढ्यात तेथून अष्‍टावक्र ऋषि चालले होते. ते परमज्ञानी असल्‍याने त्‍यांना राजा जनकाचा जप ऐकून ते जागेवरच थांबले व एका हातात छडी घेऊन थोडे दूर अंतरावर उभे राहिले. मग मोठ्या आवाजात तेही बोलू लागले,’’माझ्या हातात कमंडलू आहे आणि माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनकाच्‍या कानात ऋषींच्‍या बोलण्‍याचा आवाज गेला पण त्‍याने आपला जप सुरुच ठेवला. अष्‍टावक्रही ही गोष्‍ट जोरजोरात बोलत राहिले. शेवटी जनकाने जप थांबवून विचारले,’’मुनिवर, हे तुम्‍ही मोठमोठ्याने काय सांगत आहात’’ अष्‍टावक्र जनकाकडे पाहून हसले आणि म्‍हणाले,’’माझ्या हातात पाण्‍याचा कमंडलू आहे, माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनक आश्‍चर्यात पडला व विचारू लागला,’’ महाराज अहो हे तर मलाही दिसत आहे की तुमच्‍याजवळ छडी आणि कमंडलू आहे पण हे दिसत असतानासुद्धा तुम्‍ही मोठ्याने ओरडून का सांगत आहात.’’ तेव्‍हा अष्‍टावक्रांनी जनक राजांना समजाविले,’’ राजन, माझ्याजवळ असणारा कमंडलू आणि छडी दिसत असतानासुद्धा ओरडून सांगणे हे जसे मूर्खपणाचे आहे तसेच तुमचे सोऽहम उंच आवाजात म्‍हणणे आहे. मंत्राला घोकण्‍याने काहीच फळ मिळत नाही. मंत्र आत्‍मसात करणे किंवा त्‍याला आतल्‍या चेतनेशी जोडल्‍यावरच त्‍याचे फळ मिळते.’’


तात्‍पर्य :- कोणतेही ज्ञान घोकंपट्टी करून मिळवण्‍यापेक्षा ते आत्‍मसात करण्‍याचा प्रयत्‍न झाला पाहिजे. कोरडे पाठांतर काहीच कामाचे नसते. 

मंगळवार, १७ जून, २०१४

क्रोध

   कथा क्र. 212   

एकदा भगवान श्रीकृष्‍ण, बलराम आणि सात्‍यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्‍या वेळी काहीच न कळाल्‍याने रस्‍ता चुकले. जंगल घनदाट होते, तेथे न पुढे जाण्‍याचा मार्ग दिसत होता ना मागे येण्‍याचा. तेव्‍हा तिघांनीही असा निर्णय घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्‍थ व्‍हायचे. तिघेही दमलेले होते पण प्रत्‍येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्‍याचे ठरवले. पहिली पाळी सात्‍यकीची होती. सात्‍यकी पहारा करू लागला तेव्‍हाच झाडावरून एका पिशाच्‍चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्‍च झाडावरून खाली उतरले व सात्‍यकीला मल्‍लयुद्धासाठी बोलावू लागले. पिशाच्‍चाने बोलावलेले पाहून सात्‍यकी संतापला व क्रोधाने पिशाच्‍चावर धावून गेला. त्‍याक्षणी पिशाच्‍चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्‍लयुद्ध झाले. पण जेव्‍हा जेव्‍हा सात्‍यकीला क्रोध येई तेव्‍हा तेव्‍हा पिशाच्‍चाचा आकार मोठा होई व ते सात्‍यकीला अजूनच जास्‍त जखमा करत असे. एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व त्‍यांनी सात्‍यकीला झोपण्‍यास सांगितले. सात्‍यकिने त्‍यांना पिशाच्‍चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्‍चाने मल्‍लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्‍चाशी लढायला गेले तर त्‍याचा आकार हा वाढलेला त्‍यांना दिसून आला. ते जितक्‍या क्रोधाने त्‍याला मारायला जात तितका त्‍या पिशाच्‍चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्‍णाची होती. पिशाच्‍चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्‍णांना आव्‍हान दिले पण श्रीकृष्‍ण शांतपणे मंदस्मित करत त्‍याच्‍याकडे पहात राहिले. पिशाच्‍च अजून संतापले व मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्‍णांना बोलावू लागले पण श्रीकृष्‍ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले व एक आश्‍चर्य झाले ते म्‍हणजे जसे जसे पिशाच्‍चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्‍याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट झाली शेवटी आकार लहान होत होत पिशाच्‍चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्‍णांनी अलगद त्‍याला आपल्‍या उपरण्‍यात बांधून ठेवले. सकाळी सात्‍यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्‍णांनी तो किडा त्‍यांना दाखविला व म्‍हणाले,’’ तुम्‍ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्‍हता कारण हे क्रोधाचे पिशाच्‍च होते. त्‍याला शांती हेच औषध आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्‍याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो. मी शांत राहिलो म्‍हणून हे पिशाच्‍च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे.’’


तात्‍पर्य : क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो. क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे, प्रेमानेच कमी करता येते. 

शुक्रवार, १३ जून, २०१४

काका कालेलकर

कथा क्र. 211

काका कालेलकर उच्‍च कोटीचे चिंतक, लेखक होते. त्‍यांची विचारक्षमता प्रत्‍येक विषयात खोल आणि व्‍यापक होती. एकदा काका आजारी पडले. त्‍यांच्‍या आजारपणाची वार्ता प्रसिद्ध होताच अनेक मित्रमंडळी आणि शुभचिंतक त्‍यांना भेटायला आले. काका सर्वांशी मोठ्या आत्‍मीयतेने भेट देत असत. एके दिवशी काकांना भेटायला त्‍यांचे काही मित्र आले होते. चर्चेदरम्‍यान दुस-या एका मित्राचा फोन काकांना आला. त्‍याने काकांना विचारले,’’आपण आजारी असल्‍याचे मी ऐकले आहे, आता कसे वाटते आहे’’ काका म्‍हणाले,’’ होय, थोडा आजारी पडलो होते मात्र जेव्‍हापासून मी नव्‍याने तपासणी केली आहे तेव्‍हापासून मला बरे वाटायला लागले आहे’’ हे ऐकताच मित्राने नव्‍या तपासणीविषयी जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न केला. तेव्‍हा काका म्‍हणाले,’’ मी आजाराबाबत विचार करणेच सोडून दिले आहे आणि हा पर्याय माझ्या आजारावर उपाय म्‍हणून सिद्ध झाला आहे. एखादा पाहुणा चांगला पाहुणचार केल्‍यामुळे जास्‍त दिवस मुक्काम करतो तेच त्‍याच्‍याशी उलटपक्षी वागले असता म्‍हणजेच घरातल्‍यांशी जसे वागतो, तशी साधी वागणूक मिळाली, विशेष पाहुणचार न मिळाल्‍यास तो अशा घराचा रस्‍ता धरतो जिथे चांगले आदरातिथ्‍य केले जाईल. आजाराबाबतीतही माझा हाच विचार आहे.’’ काकांच्‍या नव्‍या उपचार पद्धतीवर मित्रांसह सर्वच लोक सहमत झाले.


तात्‍पर्य :- आजारापेक्षा जास्‍त त्‍याची चिंता तणाव वाढवते. त्‍यामुळे कोणत्‍याही शारीरिक अस्‍वस्‍थतेला सकारात्‍मक विचाराने घेण्‍याचा प्रयत्‍न करा. 

संत राबिया आणि चोर

     क‍था क्र.210     

संत राबियाची ईश्‍वरभक्‍ती प्रसिद्ध आहे. ती मनोभावे ईश्‍वराचे स्‍मरण करत असे. प्राणीमात्रांना ईश्‍वरनिर्मिती मानून त्‍यांची सेवा करत असे. एका रात्री ती निद्रिस्‍त असताना तिच्‍या घरात चोर घुसला. त्‍याला राबियाच्‍या घरी धन तर सापडणार नव्‍हते. त्‍याने खूप शोधाशोध केली. पण हाती काहीच लागले नाही. त्‍याने समोर पडलेली चादर उचचलली. चादर घेऊन तो जात असताना त्‍याला एकाएकी चक्कर आली, डोळ्यांना अंधारी आली, काही दिसेनासे झाले, त्‍याने डोळे चोळून पाहण्‍याचा प्रयत्‍न केला पण त्‍याचा काहीच फायदा झाला नाही. त्‍याने तेथेच बैठक मारली आणि चादर बाजूला ठेवून डोक्‍याला थोपटून पाहिले. तेव्‍हा त्‍याला बरे वाटले. चादर उचलून तो चालू लागला की तेव्‍हा पुन्‍हा त्‍याची तीच अवस्‍थ झाली. चादर खाली ठेवली की त्‍याला बरे वाटत असे. तो हैराण झाला. तेव्‍हा त्‍याला कोणीतरी म्‍हटल्‍याचा भास झाला,’’ तू स्‍वत:ला का अडचणीत टाकतो आहेस, राबियाने स्‍वत:चे अस्तित्‍व माझ्याकडे सोपवून दिले आहे. जेव्‍हा एक मित्र झोपतो तेव्‍हा दुसरा जागा असतो. मग त्‍याची कोणतीही वस्‍तू चोरीला जात असताना मी शांत कसा बसेन’’ चोराने तेथे निद्रिस्‍त असलेल्‍या राबियाचे चरणस्‍पर्श करून दर्शन घेतले व तिची चादर तेथेच टाकून तो निघून गेला.

तात्‍पर्य :-ईश्‍वराशी आपण एकरूप झालो की ईश्‍वरही आपली मनापासून काळजी करतो.

गुरुवार, ५ जून, २०१४

अनुभवाच्‍या जोरावर यश

कथा क्र. 209

एका व्‍यापा-याने दुस-या प्रांतात जाऊन व्‍यापार करण्‍याचा निर्णय घेतला. त्‍याच्‍या शेजा-यानेही तोच निर्णय घेतला. पहिला व्‍यापारी म्‍हणाला, भाई आपण दोघेजण एकत्र जाण्‍याने अडचण निर्माण होईल एक तर तू पहिल्‍यांदा जा किंवा मला तरी जाऊ दे. दुस-या व्‍यापा-याने विचार केला, आपण पहिल्‍यांदा जाण्‍यात फायदा आहे, रस्‍त्‍याने सरळ गेलो तर बैलांना चारापाणी मिळेल. मनाला वाटेल त्‍या किंमतीवर सामान विकेन. त्‍याने पहिल्‍यांदा जाण्‍याचा निर्णय घेतला. पहिल्‍या व्‍यापा-याला वाटले, या व्‍यापा-याच्‍या जाण्‍याने गाडीवाट चांगली तयार होईल. याचे बैल कडक गवत खातील व माझ्या बैलांना चांगले मऊ गवत खायला मिळेल. नव्‍या खोदलेल्‍या विहीरीचे पाणी प्‍यायला मिळेल. शिवाय चांगल्‍या किंमतीवर सौदा करता येईल. दुस-या व्‍यापा-याच्‍या माणसांनी पाण्‍याने भरलेल्‍या घागरी बरोबर घेतल्‍या आणि प्रवासाला सुरुवात केली. वाटेत काही भिजून आलेले लोक त्‍यांना भेटले, त्‍या लोकांनी व्‍यापा-याला सांगितले, पुढे पाऊस खूप आहे, पाणी घेऊन जाण्‍याची गरज नाही. व्‍यापा-याने त्‍यांचा सल्‍ला ऐकला. त्‍या रात्रीच त्‍या व्‍यापा-याचा काफिला लुटला गेला. व्‍यापारीही मारला गेला.एक महिन्‍याने पहिला व्‍यापारी पण प्रवासाला निघाला, तेव्‍हा दरोडेखोराच्‍या माणसांनी त्‍यालाही खोटे बोलून भुलविण्‍याचा प्रयत्‍न केला पण पहिला व्‍यापारी त्‍यांच्‍या बोलण्‍याला भुलला नाही. व्‍यापा-याच्‍या माणसांनी दरोडेखोरांची माणसे कशी काय ओळखली असे व्‍यापा-याला विचारले असता व्‍यापारी म्‍हणाला, अरे या दिवसात या भागात पाऊस कसा पडेल हा साधा विचार मी डोक्‍यात आणला व दरोडेखोरांची माणसे मला कळून आली. व्‍यापारी पुढे गेला व त्‍याच्‍या धंद्यात अशा छोट्याशा गोष्‍टींमुळे तो यशस्‍वी झाला.


तात्‍पर्य : अनुभवाने माणूस यशस्‍वी होतो. 

शुक्रवार, ३० मे, २०१४

राजाची महानता

 कथा क्र.208 

भोजराजा महादानी आणि धार्मिक प्रवृत्तीचा होता. त्‍याच्‍या उदारपणाच्‍या अनेक कथा त्‍याच्‍या राज्‍यापासून अन्‍य राजातही प्रसिद्ध होत्‍या. याच कारणांमुळे तो बहुसंख्‍य लोकांचे श्रद्धास्‍थान बनलेला होता. राजा भोज यांना एकदा अस्‍वस्‍थ वाटू लागले. तेव्‍हा वैद्यांनी हात टेकले. राजा भोजने तत्‍क्षणी आपल्‍या दिवाणास निमंत्रित करून त्‍याला सांगितले, मी आता फार वेळ जगणार नाही. जेव्‍हा माझी अंत्‍ययात्रा स्‍मशानस्‍थळी घेऊन जाल तेव्‍हा माझा एक हात पांढरा व दुसरा हात काळा करा. ते दोन्‍ही हात सर्व लोकांना असे दाखवतच घेऊन जा. भोज राजाची ही इच्‍छा दिवाणास मोठी विचित्र वाटली. त्‍याने विचारले, महाराज असे करण्‍यासाठी तुम्‍ही का सांगता आहात. राजा म्‍हणाला,’’माझे रिकामे हात पाहून सगळ्यांना माहित होईल की राजा असो वा भिकारी सर्वजणच रिकाम्‍या हातानेच जातात. पांढरा आणि काळा रंगांचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे की व्‍यक्तिसोबत जे जाते ते त्‍याचे चांगले किंवा वाईट कर्म. मला यातून सर्वाना हेच सुचवायचे आहे की जन्‍मापासून मृत्‍यूपर्यंत सत्‍कर्म आणि चांगले आचरण ठेवावे.’’

तात्‍पर्य :- जन्‍मापासून मृत्‍यूपर्यंत सत्‍कर्म आणि चांगले आचरण ठेवावे.

मंगळवार, २७ मे, २०१४

दृढनिश्‍चय

   कथा क्र.207  

श्रीपूर येथील राजा यांच्‍या निधनानंतर त्‍यांचा मुलगा राजवीरसिंह याला राज्‍यपदी बसविण्‍यात आले. राजवीर वडिलांसारखाच साहसी होता पण अनुभव पाठीशी कमी असल्‍यामुळे अनेकदा संकटात तो घाबरत असे. अशावेळी त्‍याची माता त्‍याला हिंमत देत असे व योग्‍य मार्गदर्शन करून संकटातून बाहेर काढत असे. शेजारच्‍या राज्‍यातील गंगानगरमधील राजा भीमसेन याची श्रीपूरवर नजर होती. एके दिवशी भीमसेनने श्रीपूरवर आक्रमण केले. दोन्‍ही सैन्‍ये एकमेकांना भिडली, तुंबळ युद्ध झाले. भीमसेनकडे सैनिक खूप प्रमाणात होते. आतापर्यत दिलीपसिंह याने कमी प्रमाणात सैनिक असूनसुद्धा भीमसेनविरोधात केवळ धाडसी व कल्‍पक वृत्‍तीने युद्धे जिंकली होती. परंतु राजवीरसिंह यात आपले सातत्‍य ठेवू शकले नाहीत. दोनच दिवसात भीमसेन यांनी चार मैल भागावर आपला ताबा मिळविला. राजवीरच्‍या तोंडून कमी सैनिकांमुळे आपल्‍याला हार पत्‍करावी लागली हे ऐकले तेव्‍हा राजमातेने मनातल्‍या मनात काही ठरवले. राजवीर झोपण्‍याआधी राजमातेचे दर्शन घेण्‍यासाठी आला तेव्‍हा राजमाता लहान लहान सहा लाकडाच्‍या काड्या एकत्र बांधून लोखंडाच्‍या मोठ्या तुकड्याला तोडण्‍याचा प्रयत्‍न करीत असलेली पाहिली. राजवीरने मातेला विचारले,’’आई, सहा लाकडाच्‍या काड्या एकत्र करूनही लोखंडाला तोडू शकत नाही’’ राजमाता म्‍हणाली,’’खरं बोललास, संख्‍येने मजबुतीला पराजित केले जाऊ शकत नाही त्‍याप्रमाणे आपले वीर सैनिक आणि तू या लोखंडासारखे मजबूत व्‍हा. शत्रूची कितीही संख्‍या तुम्‍हाला तोडू शकणार नाही अशी ताकद तुमच्‍यात आहे ती जागृत करा. तुमच्‍या मजबुतीसमोर शत्रू गुडघे टेकेल.’’ राजवीरने याप्रमाणे केले व त्‍याने भीमसेनाला हरवून युद्धात विजय संपादन केला.

तात्‍पर्य :दृढ मनोबलाने हारलेले युद्धही जिंकता येते. काही काही वेळेला दृढनिश्‍चय, ठाम मनोबल हेच यशाचे इंगित ठरते. 

गुरुवार, २२ मे, २०१४

तेनालीराम आणि स्वप्न महाल

कथा क्र.206

एके रात्री रात्री राजा कृष्‍णदेवराय याला स्‍वप्‍न पडले. त्‍या स्‍वप्‍नामध्‍ये त्‍याने एक सुंदर महाल पाहिला. तो महाल खूप सुंदर होता, महाल अधांतरी तरंगत होता. महालाला सुंदर सुंदर दालने होती, दालनात रंगीबेरंगी रत्‍ने लावली होती. महालात विशेष प्रकाशयोजना केलेली नव्‍हती जेव्‍हा मनाला वाटेल तेव्‍हा आपोआप प्रकाश पडत असे व जेव्‍हा प्रकाश नको वाटे तेव्‍हा अंधार होत असे. सुखसंपन्‍नतेने सजलेला तो महाल म्‍हणजे एक आश्‍चर्य होते. पृथ्‍वीवरच्‍या कोणत्‍याही माणसाला भुरळ पाडेल अशाच प्रकारची त्‍या महालाची रचना होती. हे स्‍वप्‍नात राजाने पाहिले आणि जागा होताच त्‍याने आपल्‍या राज्‍यात दवंडी पिटवली की, जो कोणी मला अशा वर्णनाचा महाल बनवून देईल त्‍याला एक लाख सुवर्णमुद्रा बक्षीस देण्‍यात येतील. सर्व राज्‍यात राजाच्‍या या स्‍वप्‍नाची चर्चा होऊ लागली. जो तो हेच म्‍हणू लागला की अशा प्रकारचा महाल फक्त स्‍वप्‍नात बनू शकतो. राजाला बहुधा हे कळत नसावे अशाच आशयाची चर्चा सर्वत्र होऊ लागली. राजाने आपल्‍या राज्‍यातील सर्व कारागिरांना बोलावले त्‍यांना सूचना दिल्‍या. अंगात विविध कौशल्‍ये असणारे कुशल कारागिर राजाला समजावू लागले,’’महाराज, अशा प्रकारचा महाल कधीच बनू शकत नाही. तुम्‍ही याचा नाद सोडून द्या’’ पण राजाच्‍या डोक्‍यात आता तो महाल बांधण्‍याचे ठरलेच होते. काही स्‍वार्थी लोकांनी मात्र याचा चांगलाच लाभ करून घेतला. त्‍यांनी महाल बांधण्‍यासाठी राजाकडून पैसे घेतले. राजाने महाल बांधून देण्‍याचे आश्‍वासन देऊन ती माणसे गायब झाली होती. मात्र मंत्री लोकांना याचे वाईट वाटत होते की राजाला माणसे फसवित आहेत. कोणीही मंत्री राजाला समजावून सांगायला पुढे जात नव्‍हता. यातून फक्त एकच माणूस राजाला समजावू शकत होता तो म्‍हणजे तेनालीराम आणि तो काही दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता. एक दिवस राजाचा दरबार सुरु झाला आणि एक म्‍हातारा माणूस रडत, मोठ्याने ओरडत दरबारात आला. राजाने त्‍याला न रडण्‍याची विनंती केली व म्‍हणाला,’’ वृद्धबुवा काय झाले, चिंता करू नका, मी काही तुमची मदत करू का. तुम्‍हाला न्‍याय मिळेल याची तुम्‍ही ,खात्री बाळगा.’’ म्‍हातारा रडायचे थांबवून राजाला म्‍हणाला,’’महाराज, मला सर्वानी लुटले, माझ्या जीवनभराची कमाई कुणीतरी चोरी केली. महाराज, मला छोटी छोटी मुले आहेत आता तुम्‍हीच सांगा की मी त्‍यांना कसे जगवू.’’ राजाला हे ऐकून खूप राग आला व संतापाने राजा म्‍हणाला,’’ मला सांगा, कोणी तुम्‍हाला छळले, कोणी तुमची संपत्ती हडप केली. माझा कोणी कर्मचारी तुम्‍हाला जर त्रास देत असेल तर सांगा.’’ म्‍हातारा म्‍हणाला,’’ नाही महाराज तुमचा कोणीही कर्मचारी मला त्रास देत नाहीये’’ राजा म्‍हणाला,’’ मग तुमची संपत्ती कुणी हडप केली अशी तुमची तक्रार आहे’’ म्‍हातारा म्‍हणाला,’’ महाराज, क्षमा असावी पण काल रात्री मला एक स्‍वप्न पडले, त्‍या स्‍वप्नात तुम्‍ही स्‍वत:, तुमचे मंत्री आणि दरबारातले सर्व कर्मचारी सगळे मिळून माझ्या घरी आलात आणि माझ्या घरातील तिजोरी तुम्‍ही सर्वानी मिळून उचलली आणि ती तुम्‍ही तुमच्‍या राजखजिन्यात जमा करून घेतली.’’ राजा अजूनच संतापला व म्‍हणाला,’’ मूर्खासारखे बोलू नको, अरे सत्‍यात तर काय मी स्‍वप्‍नातसुद्धा असा अत्‍याचार करणार नाही आणि मूर्ख माणसा स्‍वप्‍ने कधी सत्‍य होतात काय याची तुला जाणीव आहे की नाही.’’ हे वाक्य संपताक्षणी त्‍या म्‍हाता-याने आपली नकली दाढी व फेटा काढून टाकला व आपल्‍या मूळ अवतारात हजर झाला. तो तेनालीराम होता. तेनालीराम म्‍हणाला,’’ महाराज अशक्‍य स्‍वप्‍ने सत्‍यात येऊ शकत नाहीत हेच मला तुम्‍हाला सांगायचे होते. माणसाने स्‍वप्‍ने सत्‍यात आणण्‍याचा प्रयत्‍न करावा हे योग्‍य आहे पण अशक्‍य असणा-या स्‍वप्‍नांच्‍या मागे कधीच पळू नये असे मला वाटते.’’ राजाला आपली चूक कळून आली. त्‍याने तेनालीरामला चांगला सल्‍ला दिल्‍याबद्दल बक्षीस दिले.

तात्‍पर्य :- योग्‍य माणसांचा सल्‍ला काही वेळेला उपयोगी ठरतो, अशाच माणसांची संगत ठेवणे चांगले ठरते. 

शनिवार, १७ मे, २०१४

दळणाचे जाते आणि खजिना

कथा क्र.205

राजा भीमसेन याला आपल्‍या दौलतीबद्दल प्रचंड घमेंड होती. एके दिवशी त्‍याला त्‍याचा मित्र समशेर भेटण्‍यासाठी म्‍हणून आला. मित्राचे राजाने मनापासून स्‍वागत केले. त्‍याचा यथायोग्‍य पाहुणचार केला. विश्रांतीनंतर राजाने त्‍याला आपला महाल पाहण्‍यासाठी आमंत्रण दिले. दोघेहीजण महालातून फिरत असताना राजाने आपल्‍या श्रीमंतीचा थाट मित्राला दाखविण्‍यास सुरुवात केली. सर्वत्र त्‍याच्‍या श्रीमंतीचे कोंदण कसे आहे याबद्दल राजा मोठ्या गर्वाने सर्व माहिती देत होता. सर्व ठिकाणी फिरून झाल्‍यावर राजाने शेवट त्‍याला आपल्‍या खजिन्‍याच्‍या खोलीकडे नेले. राजाचा प्रचंड मोठा खजिना पाहून समशेरचे डोळे दिपून गेले. तो अचंबित होऊन खजिना पाहतच बसला. राजा खजिन्‍याबद्दल माहिती सांगतच होता की हा खजिना किती किंमती आहे. अनेक दुर्मिळ रत्‍ने, अलंकार, जडजवाहिर, मोती, सोने, चांदी, अनमोल अशा वस्‍तू कशा मी जमा केल्‍या आहेत. या खजिन्‍याच्‍या सुरक्षेसाठी काहीशे सैनिक चोवीस तास पहारा देत असतात. अशी सर्व माहिती राजा देत असतानाच समशेर ऐकत होता पण त्‍याचे राजाच्‍या बोलण्‍याकडे दुर्लक्ष होत होते. काही वेळाने समशेर शेवटी राजाला म्‍हणाला,’’मित्रा हे इतके धन तू जमा केलेले आहेस पण याचा दुस-यांनाही काही फायदा होतो की नाही’’ राजा म्‍हणाला,’’ अरे मित्रा, इतक्‍या बहुमूल्‍य अशा खजिन्‍याचा माझ्याशिवाय दुस-या कोणाला फायदा होणार आहे.’’ यानंतर समशेर राजाला बरोबर घेऊन एका झोपडीकडे गेला. तिथे एक वृद्ध महिला जात्‍यावर धान्‍य दळत बसली होती. समशेरने राजाला ते दळणाचे जाते दाखवून म्‍हणाला,’’ राजा हे जातेही दगडाचे आहे आणि तुझ्या खजिन्‍यात तू जी रत्‍ने ठेवली आहेत ती पण दगडाचीच आहेत. फरक इतकाच आहे की त्‍या रत्‍नांचा तुझ्याशिवाय कुणालाच फायदा नाही आणि या दगडाच्‍या जात्‍याचा मात्र सगळ्या गावाला फायदा होतो. गावकरी मंडळी येथे येतात व धान्‍य दळून घेऊन जातात. तू ज्‍यांना रत्‍नांच्‍या पहा-याला सैनिक उभे केले आहेत त्‍यांच्‍या अंगी शक्ती येते ती सुद्धा या जात्‍यातून निघणा-या पीठामधून. म्‍हणून राजन मला तुझ्या सर्व खजिन्‍यापेक्षा, राज्‍यातील सर्व श्रीमंतीपेक्षा ही दगडाची जाती मला सर्वश्रेष्‍ठ वाटली.’’  राजाला आपली चूक कळाली व त्‍याची घमेंड पूर्ण उतरून गेली.


तात्‍पर्य :- ज्‍या गोष्‍टीने मानव समाजाचे कल्‍याण होत असेल अशा गोष्‍टी करणे हितकर असते. मनुष्‍यजन्‍मात येऊन जर इतरांचे हित पाहता येत नसेल तर असा मनुष्‍यजन्‍म काय कामाचा.

शुक्रवार, ९ मे, २०१४

जीवनाचे रहस्य

  कथा क्र.204  

एकदा एका कसायाकडे त्‍याचा एक मित्र त्‍याला भेटण्‍यासाठी गेला होता. तिथे त्‍याने असे पाहिले की, एका मोठ्या पिंज-यात खूप असे बोकड, मेंढ्या कैद आहेत आणि एकमेकांशी मस्‍ती करत आहेत. मोठ्या आनंदात ते प्राणी आहेत. दुसरीकडे त्‍याने असे पाहिले की त्‍याच पिंज-यातून एकेक बोकड काढून तो कसाई कापत आहे आणि त्‍याचे मांस विकत आहे. कसायाच्‍या मित्राला ही गोष्‍ट पाहून कसेतरी वाटले. तो त्रस्‍त झाला कारण ज्‍यावेळी प्रत्‍येक बोकडाला कसाई बाहेर काढून कापत असे हे जाळीतून पिंज-यातल्‍या प्रत्‍येक बोकडाला दिसत होते पण तरीसुद्धा ते बोकड आपला कुणीतरी मित्र मरतो आहे याची जाणीव न ठेवता आनंदात कसे राहत होते याचे त्‍या मित्राला राहून राहून आश्‍चर्य वाटत होते. ते बोकड आपल्‍याच मस्‍तीत खेळत, बागडत, आनंदात त्‍या पिंज-यात राहतात कसे याचे त्‍या मित्राला कोडे पडले होते. शेवटी न राहवून त्‍याने त्‍या कसाई मित्राला याचे कारण विचारले असता कसाई म्‍हणाला,’’ अरे मित्रा, फार सोपे कारण आहे. मी त्‍या प्रत्‍येक बोकडाच्‍या कानात असे सांगितले आहे की, सगळे बोकड मेले तरी हरकत नाही पण मी तुला काही कापणार नाही. त्‍यामुळे तू आनंदात राहा. तू एकमेव बोकड असा असशील की जो शेवटपर्यंत जिवंत राहशील. त्‍यामुळे ते प्रत्‍येक बोकड हे आपण जिवंत राहणार या आनंदात आहे आणि हे त्‍याचमागचे रहस्‍य आहे.

तात्‍पर्य :- या पिंज-यातल्‍या बोकडासारखीच माणसाची अवस्‍था आहे. प्रत्‍येकालाच असे वाटत राहते की, मी शेवटपर्यंत जिवंत राहणार आहे पण कधी ना कधी आपला नंबर हा येणारच आहे. जीवन जगताना आपण याची निश्चितच जाणीव ठेवली पाहिजे की आपणही कधीतरी मरणार आहोत.

बुधवार, ७ मे, २०१४

प्रामाणिकपणा

     कथा क्र.203      

सऊदी अरब मध्‍ये बुखारी नामक एक विद्वान राहत होते. ते आपल्‍या प्रामाणिकपणासाठी खूप प्रसिद्ध होते. एकदा त्‍यांनी दूरचा समुद्रप्रवास करण्‍याचे ठरविले व त्‍याप्रमाणे ते प्रवासाला निघाले. त्‍यांनी प्रवासात आपल्‍यासोबत खर्चासाठी म्‍हणून एक हजार दिनार एका थैलीत बांधून घेतले होते. प्रवासाला सुरुवात झाली, या प्रवासाला निघालेल्‍या अन्‍य काही जणांबरोबर बुखारी यांची ओळख यानिमित्ताने झाली. बुखारी त्‍यांनी जीवनदर्शनाबद्दल सांगत असत. एक प्रवासी मात्र बुखारीजींच्‍या जास्‍त सहवासात राहिल्‍याने तो त्‍यांचा जवळचा माणूस बनला. बुखारीजी जिकडे जात, खात, हिंडतफिरत तिथे तो माणूस त्‍यांच्‍यासोबत असे. असेच एकदा बुखारीजींनी स्‍वत:जवळची दिनारांची थैली उघडली व त्‍यातील रक्कम काढून ते मोजू लागले. त्‍यावेळीही तो माणूस तिथेच होता. त्‍याने ती पैशांची थैली पाहिली व त्‍याला त्‍या पैशांचा मोह झाला. त्‍याने ती थैली चोरायचा कट मनातल्‍या मनात शिजवला. एकेदिवशी सकाळी तो जोरजोराने ओरडू लागला,’’ या अल्‍ला, या खुदा, मी पुरता लुटलो गेलो, माझे एक हजार दिनार चोरीला गेले. चांगले थैलीत बांधून आणलेले माझे पैसे कुणी हरामखोराने पळविले कुणास ठाऊक मला या संकटात कसे काय अडकावले आहे’’ जहाजावर असणा-या कर्मचा-यांनी त्‍याला धीर देण्‍याचा प्रयत्‍न केला, त्‍याला समजावले की बाबा तुझे पैसे कुठेही जाणार नाहीत या लोकांपैकी जर कुणी घेतले असतील तर आपण त्‍यांना ते परत देण्‍यास सांगू या. जहाजाच्‍या कर्मचा-यांनी सर्वाची झडती घेण्‍यास सुरुवात केली. सर्वात शेवटी नंबर आला तो बुखारीजींचा. त्‍यांच्‍यापाशी जाताच कर्मचारी म्‍हणाले,’’ अरे तुमची कशी बरे आम्‍ही झडती घ्‍यावी. तुमची झडती घेणे म्‍हणजे सुद्धा देवाचा गुन्‍हा ठरेल. इतक्‍या प्रामाणिक आणि सच्‍च्‍या माणसाला आम्‍ही कसे तपासू.’’ हे ऐकून बुखारी म्‍हणाले,’’ नाही, ज्‍याचे पैसे चोरीला गेले आहेत त्‍याच्‍या मनात माझ्याबद्दल शंका राहिल, संशय बळावेल तेव्‍हा तुम्‍ही माझी व माझ्या सर्व सामानाची झडती घ्‍या’’ बुखारींची झडती झाली त्‍यात त्‍यांच्‍याकडे एक दमडासुद्धा मिळाला नाही. हा प्रसंग इथेच संपला. मात्र दोन दिवसांनी न राहवून तो चोरीची बोंब ठोकणारा प्रवासी बुखारींकडे आला व म्‍हणाला,’’ महाराज, तुमच्‍याकडे तर एक हजार दिनार होते हे मला माहित आहे. मी स्‍वत: ते पाहिले आहेत मग ते कुठे गेले’’ बुखारी हसून म्‍हणाले,’’ मित्रा, मी आयुष्‍यात कधीच धनाची चिंता केली नाही. मी फक्त प्रामाणिकपणा जपला. माझ्यावर ज्‍यावेळी झडतीची वेळ आली त्‍याच्‍याआधीच काही क्षण मी ते पैसे समुद्रात फेकून दिले होते. जर माझेच पैसे माझ्याजवळ सापडले असते तर कुठेतरी संशयाची सुई माझ्याभोवती फिरली असती म्‍हणून मी स्‍वत:च्‍या हाताने धन समुद्रात टाकले. तुला खरे वाटणार नाही पण ही गोष्‍ट जहाजावरील ब-याचजणांना माहिती आहे त्‍यामुळे तेच माझा आता खर्च करत आहेत. मी या हाताने धन जरी टाकले असले तरी माझ्या प्रामाणिकपणामुळे मला अनेक हातांनी मदत केली आहे. लोकांचा कायमच प्रामाणिक माणसांवर विश्‍वास बसतो.’’


तात्‍पर्य :- जगात प्रामाणिकपणासारखा चांगला गुण नाही. प्रामाणिक माणसेच जगाला पुढे नेत आहेत हे ही शाश्‍वत सत्‍य आहे. 

क्रोधाला तिलांजली

  कथा क्र.202  

एकदा भगवान महा‍वीरांचे दर्शन घेण्‍यासाठी राजा श्रेणीक आणि राणी चेलना दोघेही गेले होते. त्‍यांना भेटून दोघेही फारच प्रभावित झाले. परतत असताना वाटेत राणीला एक मुनी तपश्‍चर्येत मग्‍न दिसले. त्‍यांच्‍या अंगावर एकच वस्‍त्र होते. कडाक्‍याच्‍या थंडीतसुद्धा ते मुनी कठोर तपश्‍चर्या करत होते. राणीने प्रभावित होऊन मुनींना नमस्‍कार केला. महालात आल्‍यानंतर राणी शयनकक्षात निद्रिस्‍त झाली. रात्रभर तिचा एक हात पलंगाखाली लटकत राहिल्‍याने आखडला व सकाळी तो हात ठणकू लागला. दासींनी तिचा हात शेकून देण्‍यास सुरुवात केली तेव्‍हा राणीला अचानक जंगलातील त्‍या मुनींची आठवण झाली. त्‍याने तर भर थंडीतसुद्धा एका वस्‍त्रात स्‍वत:चे शरीर लपेटले होते. राणीला ह्याची आठवण होऊन तिच्‍या तोंडून अचानक शब्‍द बाहेर पडले,’’अगं बाई गं, त्‍या बिचा-याचे कसे हाल झाले असतील’’ तेवढ्यात राजाचे तेथे आगमन झाले व हे वाक्य ऐकून राजाचा असा समज झाला की राणीचे दुस-या कोणावर तरी प्रेम आहे. राजाला हे ऐकून खूप राग आला. रागाच्‍या भरात त्‍याने मंत्र्याला बोलावून आपल्‍या अंत:पुराला आग लावण्‍याचे आदेश दिले. त्‍यानंतर तो भगवान महावीरांकडे गेला. त्‍यांना सगळी हकिकत सांगितली. महावीर म्‍हणाले,’’राजा श्रेणिका, राणी चेलना पतिव्रता आहे. त्‍यांनी दिव्‍यदृष्‍टीच्‍या सहाय्याने मुनींबाबतचा तो प्रसंग आहे हे स्‍पष्‍ट केले.’’ श्रेणिकाचा राग शांत झाला. तो महालात आला मंत्र्याला विचारले की तू अंत:पुराला आग लावलीस का. मंत्र्याने होकारार्थी मान डोलावली. राजाला खूप दु:ख झाले हे पाहून मंत्री म्‍हणाला, राजन मी जाणून होतो, तुम्‍ही रागात आदेश दिले आहेत त्‍यामुळे मी हत्तीशाळा जाळली, अंत:पूर जाळले नाही. राजाला आपल्‍या चुकीची जाणीव झाली. त्‍याने राग सोडून देण्‍याचा संकल्‍प केला.


 तात्‍पर्य :-क्रोध व अविचार एकत्र राहतात. अविचाराने केलेली कोणतीही कृती नाशास कारणीभूत ठरते. क्षणिक येणारा राग माणसाला आयुष्‍यभराचे नुकसान भोगायला लावतो. राग माणसाचा शत्रू आहे असेच सर्व संतांनी सांगितले आहे. 

शनिवार, ३ मे, २०१४

निरूत्तर

  कथा क्र.201  


अरब देशात हातिमताई हा त्‍याच्‍या उदारपणासाठी प्रसिद्ध होता. हातिमताई मोकळ्या हाताने दान करायचा. त्‍याच्‍या दरवाजातून कोणीही विन्‍मुख होऊन परतत नसे. तो कोणाही गरजूला आपली मौल्‍यवान वस्‍तू देण्‍यास मागे हटत नसे. लोक त्‍याच्‍याकडे बिनधास्‍तपणे येत असत. ते जे काही मागत ते हातिमताई देत होता एकदा हातिमताई मनात विचार आला, आपण मोठी दावत आयोजित करावी. ज्‍यात सर्वच स्‍तरातील व्‍यक्तिंना येण्‍याची मुभा असेल. यासाठी हातिमताईने खुले निमंत्रण दिले. दावतच्‍या दिवशी लोकांचे येणेजाणे सुरु झाले. हातिमताई प्रत्‍येकाचे स्‍नेहपूर्वक स्‍वागत करत होता. जेवल्‍यावर लोक त्‍याला आशिर्वाद देत होते. काही वेळाने हातिमताईने विचार केला. दावतीचे ठिकाण दूर राहणा-या लोकांसाठी अडचणींचे ठरत आहे, त्‍यांना सवारीतून घेऊन यावे. आपल्‍या काही साथीदारांना घेऊन तो दूर राहणा-या लोकांना भेटण्‍यास गेला. वाटेत त्‍याला एक लाकूडतोड्या दिसला. त्‍याच्‍या चेह-यावर थकावट स्‍पष्‍टपणे दिसत होती. हातिमताई म्‍हणाला,’’ मित्रा, जेव्‍हा हातिमताईने दावतचे खुले आमंत्रण दिले तेव्‍हा तू इतकी मेहनत कशासाठी करत आहेस. हे काम सोड, आणि माझ्या दावतमध्‍ये सामील हो. आरामात जेवण कर.’’ हे ऐकून लाकूडतोड्याने उत्तर दिले,’’ जे आपली भाकरी कष्‍टाने कमावितात त्‍यांना हातिमताईच्‍या जेवणाची गरज नाही. हातिमताई उदार असेल पण आमची कष्‍टाने मिळवलेली भाकरी ही त्‍याच्‍या दावतच्‍या जेवणापेक्षा कित्‍येक पटीने गोड आहे. हवे असेल तर तूच ती भाकरी खाऊन बघ’’ हे ऐकून हातिमताई निरूत्तर झाला.


तात्‍पर्य :- आपल्‍या कष्‍टाने जे लोक आपले जीवन जगतात त्‍यांच्‍या गरीबीची किंमत ही सुद्धा श्रीमंतच्‍या धनापेक्षा कित्‍येक पटीने जास्‍त असते. 

बुधवार, ३० एप्रिल, २०१४

देशभक्तीची परीक्षा

कथा क्र.200


ही गोष्‍ट आहे स्‍वातंत्र्यपूर्व काळातील. देशाला लढूनच, प्रसंगी रक्त सांडूनच, हक्कासाठी भांडूनच स्‍वातंत्र्य मिळेल अशा विचारसरणीचे काही क्रांतीकारक होते. तर अहिंसेच्‍या मार्गानेच देश स्‍वतंत्र करता येईल असा काहींना विश्र्वास होता. एक लहान मुलगाही हे सगळे पाहून देशभक्तीची प्रेरणा घेत होता. आपल्‍या मुलामध्‍ये देशभक्ती ठासून भरलेली असल्‍याचे त्‍याच्‍या आईलाही जाणवले तेव्‍हा तिला खूप आनंद झाला. देश गुलामीच्‍या जोखडातून मुक्त झाला तर बरे होईल अशी भावना होती. पण मुलगा जर पोलीसांच्‍या तावडीत कधी सापडला तर जे देशासाठी भूमिगत राहून लढा देत आहेत त्‍यांची नावे व ठिकाणे तो उघड करेल अशी भीती तिला वाटत राहायची. यासाठी तिने त्‍या मुलाची परीक्षा घ्‍यायचे ठरवले. आईने मुलाला जवळ बोलावले व आपल्‍या मनातील ही भावना त्‍याला सांगितली. आईने मुलाला परीक्षा घेणार असल्‍याचेही सांगितले. मुलाने परीक्षेसाठी होकार दिला. आईने दिवा पेटवला व त्‍याच्‍या ज्‍योतीवर त्‍या मुलाला बोट धरायला सांगितले. त्‍या मुलाने जराही न घाबरता त्‍या ज्योतीवर हात धरला. हाताला पोळत असताना आईने त्‍याला क्रांतीकारकांची नावे सांगण्‍यास सांगितले पण मुलाने हुं की चूं सुद्धा केले नाही. मुलाचे हे धाडस पाहून आईने मुलाला कवटाळले. हाच मुलगा मोठेपणी एक महान क्रांतीकारक झाला. त्‍या मुलाचे नाव होते- अशफाक उल्लाह खान


तात्‍पर्य :- असंख्‍य देशभक्तांनी केलेल्‍या त्‍यागामुळे, बलिदानामुळेच देशाला स्‍वातंत्र्य मिळाले याची जाणीव प्रत्‍येकाने ठेवणे गरजेचे आहे.  

सोमवार, २८ एप्रिल, २०१४

मुर्ख राजा आणि बुद्धिमान ऋषी

  कथा क्र.199  

एका राज्‍यात मूर्ख राजाचे शासन होते. त्‍याचे मंत्री, सेनापती, सरदार हे सर्वच्‍या सर्व मूर्ख व चापलुसी करणारे होते. त्‍या राजाच्‍या राज्‍यात व दरबारात विद्वानांचा अनादर केला जाई. एखादी व्‍यक्ती आपल्‍यापेक्षा हुशार आहे असे लक्षात आले त्‍याला राजाचे सहकारी अपमानित करत. या कारणाने कोणीही विद्वान, पंडीत, ज्ञानी मनुष्‍य त्‍या राज्‍यात जात नसत. त्‍यामुळे त्‍या राज्‍यात बौद्धिक चर्चांची परंपरा खंडीत झाली होती. एकदा राजाला माहिती समजली की, एक ऋषी तीर्थाटनासाठी निघाले आहे व ते आपल्‍या राज्‍यातून जाणार आहेत. मंत्र्यांनी सल्‍ला दिला की त्‍या ऋषींना आपल्‍या दरबारात बोलवावे जेणेकरून ते जर विद्वान, पंडीत असतील तर त्‍यांचा अपमान करून आनंद मिळविता येईल आणि जर ते ऋषी मूर्ख असतील तर त्‍यांचा सत्‍कार करावा म्‍हणजे जनतेचा विश्‍वास बसेल की राजा मूर्ख माणसांचाही सत्‍कार करणे जाणतो. राजा व मंत्री नगराच्‍या मुख्‍य दरवाजात जाऊन उभे राहिले. ऋषी नगरापाशी आले. नगराबाहेर काही जीर्ण झालेल्‍या झोपड्या पाहून थांबले व त्‍यांनी विचारले,’’ या कुणाच्‍या झोपड्या आहेत’’ राजाने उत्तर दिले,’’या बुद्धिमान, विद्वान लोकांच्‍या झोपड्या आहेत. बुद्धिमान लोकांना मी हाकलून दिले कारण मला बुद्धिमान लोकांशिवायही शासन चालविता येते हे दाखवून द्यायचे होते. माझ्या राज्‍यातून हाकलून दिलेले विद्वानलोक येथे काही काळ घालवित होते.’’ हे उत्तर ऐकताच ऋषी तात्‍काळ राजाला म्‍हणाले,’’ हे राजा, तर मग तुझ्या राज्‍यात एक पाऊलही न टाकता मी येथूनच मी परत जात आहे कारण जेथे विद्वानांचा आदर केला जात नाही, बुद्धिवंतांची कदर केली जात नाही, पंडीतांचे म्‍हणणे ऐकले जात नाही, बुद्धिवंतांची चर्चासत्रे घडत नाहीत अशाठिकाणी न जाणेच योग्‍य असते. जेथे हे सर्व घडत नाही त्‍याचा सर्वनाश जवळ आला आहे हे निश्र्चित समजावे.’’ हे सांगून ऋषी तेथून निघून गेले. कालांतरांनी मूर्खानी केलेल्‍या उपदेशाने राजाचे राज्‍य लयाला गेले. त्‍याचे पूर्ण पतन झाले. ऋषींची वर्तवलेला अंदाज खरा ठरला.

तात्‍पर्य :- बुद्धी कठीण समस्यांचे निराकरण करते. बुद्धिमानांचा आदर जर समाज करत असेल तर तो समाज पुढे जाऊन विकास करतो. विद्वान लोक जेथे वस्‍ती करतात तेथे ते विकास करतात. जेथे विद्वानांचे म्‍हणणे ऐकले जात नाही तेथे सर्वनाश अटळ आहे. खरे आहे ना,