बुधवार, ३० एप्रिल, २०१४

देशभक्तीची परीक्षा

कथा क्र.200


ही गोष्‍ट आहे स्‍वातंत्र्यपूर्व काळातील. देशाला लढूनच, प्रसंगी रक्त सांडूनच, हक्कासाठी भांडूनच स्‍वातंत्र्य मिळेल अशा विचारसरणीचे काही क्रांतीकारक होते. तर अहिंसेच्‍या मार्गानेच देश स्‍वतंत्र करता येईल असा काहींना विश्र्वास होता. एक लहान मुलगाही हे सगळे पाहून देशभक्तीची प्रेरणा घेत होता. आपल्‍या मुलामध्‍ये देशभक्ती ठासून भरलेली असल्‍याचे त्‍याच्‍या आईलाही जाणवले तेव्‍हा तिला खूप आनंद झाला. देश गुलामीच्‍या जोखडातून मुक्त झाला तर बरे होईल अशी भावना होती. पण मुलगा जर पोलीसांच्‍या तावडीत कधी सापडला तर जे देशासाठी भूमिगत राहून लढा देत आहेत त्‍यांची नावे व ठिकाणे तो उघड करेल अशी भीती तिला वाटत राहायची. यासाठी तिने त्‍या मुलाची परीक्षा घ्‍यायचे ठरवले. आईने मुलाला जवळ बोलावले व आपल्‍या मनातील ही भावना त्‍याला सांगितली. आईने मुलाला परीक्षा घेणार असल्‍याचेही सांगितले. मुलाने परीक्षेसाठी होकार दिला. आईने दिवा पेटवला व त्‍याच्‍या ज्‍योतीवर त्‍या मुलाला बोट धरायला सांगितले. त्‍या मुलाने जराही न घाबरता त्‍या ज्योतीवर हात धरला. हाताला पोळत असताना आईने त्‍याला क्रांतीकारकांची नावे सांगण्‍यास सांगितले पण मुलाने हुं की चूं सुद्धा केले नाही. मुलाचे हे धाडस पाहून आईने मुलाला कवटाळले. हाच मुलगा मोठेपणी एक महान क्रांतीकारक झाला. त्‍या मुलाचे नाव होते- अशफाक उल्लाह खान


तात्‍पर्य :- असंख्‍य देशभक्तांनी केलेल्‍या त्‍यागामुळे, बलिदानामुळेच देशाला स्‍वातंत्र्य मिळाले याची जाणीव प्रत्‍येकाने ठेवणे गरजेचे आहे.  

सोमवार, २८ एप्रिल, २०१४

मुर्ख राजा आणि बुद्धिमान ऋषी

  कथा क्र.199  

एका राज्‍यात मूर्ख राजाचे शासन होते. त्‍याचे मंत्री, सेनापती, सरदार हे सर्वच्‍या सर्व मूर्ख व चापलुसी करणारे होते. त्‍या राजाच्‍या राज्‍यात व दरबारात विद्वानांचा अनादर केला जाई. एखादी व्‍यक्ती आपल्‍यापेक्षा हुशार आहे असे लक्षात आले त्‍याला राजाचे सहकारी अपमानित करत. या कारणाने कोणीही विद्वान, पंडीत, ज्ञानी मनुष्‍य त्‍या राज्‍यात जात नसत. त्‍यामुळे त्‍या राज्‍यात बौद्धिक चर्चांची परंपरा खंडीत झाली होती. एकदा राजाला माहिती समजली की, एक ऋषी तीर्थाटनासाठी निघाले आहे व ते आपल्‍या राज्‍यातून जाणार आहेत. मंत्र्यांनी सल्‍ला दिला की त्‍या ऋषींना आपल्‍या दरबारात बोलवावे जेणेकरून ते जर विद्वान, पंडीत असतील तर त्‍यांचा अपमान करून आनंद मिळविता येईल आणि जर ते ऋषी मूर्ख असतील तर त्‍यांचा सत्‍कार करावा म्‍हणजे जनतेचा विश्‍वास बसेल की राजा मूर्ख माणसांचाही सत्‍कार करणे जाणतो. राजा व मंत्री नगराच्‍या मुख्‍य दरवाजात जाऊन उभे राहिले. ऋषी नगरापाशी आले. नगराबाहेर काही जीर्ण झालेल्‍या झोपड्या पाहून थांबले व त्‍यांनी विचारले,’’ या कुणाच्‍या झोपड्या आहेत’’ राजाने उत्तर दिले,’’या बुद्धिमान, विद्वान लोकांच्‍या झोपड्या आहेत. बुद्धिमान लोकांना मी हाकलून दिले कारण मला बुद्धिमान लोकांशिवायही शासन चालविता येते हे दाखवून द्यायचे होते. माझ्या राज्‍यातून हाकलून दिलेले विद्वानलोक येथे काही काळ घालवित होते.’’ हे उत्तर ऐकताच ऋषी तात्‍काळ राजाला म्‍हणाले,’’ हे राजा, तर मग तुझ्या राज्‍यात एक पाऊलही न टाकता मी येथूनच मी परत जात आहे कारण जेथे विद्वानांचा आदर केला जात नाही, बुद्धिवंतांची कदर केली जात नाही, पंडीतांचे म्‍हणणे ऐकले जात नाही, बुद्धिवंतांची चर्चासत्रे घडत नाहीत अशाठिकाणी न जाणेच योग्‍य असते. जेथे हे सर्व घडत नाही त्‍याचा सर्वनाश जवळ आला आहे हे निश्र्चित समजावे.’’ हे सांगून ऋषी तेथून निघून गेले. कालांतरांनी मूर्खानी केलेल्‍या उपदेशाने राजाचे राज्‍य लयाला गेले. त्‍याचे पूर्ण पतन झाले. ऋषींची वर्तवलेला अंदाज खरा ठरला.

तात्‍पर्य :- बुद्धी कठीण समस्यांचे निराकरण करते. बुद्धिमानांचा आदर जर समाज करत असेल तर तो समाज पुढे जाऊन विकास करतो. विद्वान लोक जेथे वस्‍ती करतात तेथे ते विकास करतात. जेथे विद्वानांचे म्‍हणणे ऐकले जात नाही तेथे सर्वनाश अटळ आहे. खरे आहे ना, 

बुधवार, २३ एप्रिल, २०१४

खटला

कथा क्र,198

दोघां भावात जमिनीवरून तंटा निर्माण झाला. मामला कोर्टात पोहोचला. त्‍यात एक भाऊ लखपती होता तर दुसरा गरीब होता. त्‍या दोघांना प्रत्‍येकी दहा लाख रूपये वाटणीमध्‍ये आले होते. न्‍यायाधिशांनी एका भावाला विचारले तुझ्या भावाने सात वर्षात दहा लाख रूपये कसे काय खर्च केले. श्रीमंत भाऊ म्‍हणाला, माझा भाऊ प्रत्‍येक काम नोकराकडून करवून घेत असे. कोणतेही काम त्‍याने केले नाही. नोकरही मनमानी करू लागले. एक रूपया खर्च येत असेल तर शंभर रूपये आल्‍याचे दाखवत असत. तो अन्नाला महाग झाला. न्यायाधीशांनी विचारले, तुझी श्रीमंती कशी काय टिकून राहिली. तो म्‍हणाला, माझ्या वाडवडिलांची देणगी दिली म्‍हणजे मी परिश्रम करूच नये की काय, संपत्ती मिळाल्‍यावरही मी परिश्रम करण्‍याचे सोडले नाही. मी नोकरांवर कधीच अवलंबून राहिलो नाही. प्रत्‍येक कामात माझा सहभाग असल्‍याने नोकरांची बोलण्‍याची हिंमत होत नव्‍हती. आता जेव्‍हा याच्‍याकडे फुटकी कवडीही उरली नाही म्‍हणून याने माझ्यावर दावा ठोकला आहे. याला परिश्रम करायला नको आहेत याने स्‍वत:ची संपत्ती तर आळसाने घालविली आता माझ्या संपत्तीवर याचा डोळा आहे.’’ यावर न्‍यायाधीश महोदयांनी इतर साक्षीपुरावे तपासले व श्रीमंत भाऊच खरे असल्‍याचा निर्वाळा दिला.


तात्‍पर्य : मिळालेले धन हे टिकवून ठेवणे हे फार अवघड काम आहे. 

स्‍वप्न आणि सत्‍य

कथा क्र.197

एकदा स्‍वप्‍न आणि सत्‍य यांचे जोरदार भांडण झाले. भांडणाचा विषय होता भविष्‍य घडविण्‍यात सर्वाधिक सहभाग कोणाचा असतो दोघेही खूप भांडले, भरपूर वाद घातला पण निर्णय काही होईना. शेवटी दोघेही आपल्‍या पित्‍याकडे गेले. पित्‍याला वादाचा विषय सांगितला. पिता म्‍हणाला,’’ज्‍या कोणाचे हात आभाळाला टेकतील पण तरीही पाय जमिनीवर असतील त्‍याचा भविष्‍य घडविण्‍यात निर्णायक सहभाग असतो.’’ दोघेही परत आले. सर्वप्रथम स्‍वप्नाने एकाच उडीत त्‍याचे हात आभाळाला टेकले, मात्र पाय जमिनीपासून केव्‍हाच उचलले गेले होते. मग सत्‍याने प्रयत्‍न केला मात्र त्‍याचे पाय कायम जमिनीवर टेकलेले होते पण हात आभाळाला पोहोचू शकले नाहीत. दोघांनीही खूप प्रयत्‍न केले पण दोघेही अयशस्‍वी राहिले. शेवटी थकून ते पुन्‍हा एकदा पित्‍याकडे गेले तेव्‍हा पिता म्‍हणाला,’’ भविष्‍य घडविण्‍यात सत्‍य आणि स्‍वप्‍न या दोघांचाही समान सहभाग असतो.’’


तात्‍पर्य :- ख-या अर्थाने भविष्‍य घडवायचे असेल तर स्‍वप्‍नाला सत्‍याच्‍या खांद्यावर उभे राहायला हवे. 

बुधवार, ९ एप्रिल, २०१४

हरणाची चतुराई

कथा क्र.196

एका जंगलात मोठ्या संख्‍येने हरणांचा वावर होता. परंतु आपल्‍या सहका-यांची संख्‍या कमी होत चालल्‍याचे एका हरणाच्‍या लक्षात आले. त्‍याने आपल्‍या इतर सहका-यांना सावध केले परंतु कोणीच त्‍याच्‍याकडे लक्ष दिले नाही. त्‍या हरणाने आपल्‍या मित्राला सांगितले की डेरेदार व गच्च पानांनी भरलेल्‍या वृक्षांच्‍या फांद्यावर दडून शिकारी मचाण बांधतात. यासाठी आपण या वृक्षाखाली जाणेच न बरे. त्‍याचा मित्र त्‍याची गोष्‍ट ऐकून तेथेच थांबला. तिकडे त्‍या पानाआड दडलेल्‍या शिका-याने दोघांकडे फळे फेकण्‍यास सुरुवात केली. चतुर हरणास समजले की, झाडावर शिकारी बसलेला आहे. त्‍याने मित्राला सावध केले पण मित्र हरीण लोभाच्‍या बळी पडून फळे खाण्‍यासाठी पुढे गेला आणि शिका-याने त्‍याची लगेचच शिकार केली. चतुर हरणाला वाईट वाटले. पण मित्राने त्‍याचे म्‍हणणे ऐकायला हवे होते हे ही खरेच की नाही.


तात्‍पर्य :- आजच्‍या काळात कोणी जर आपल्‍याला प्रलोभन दाखवून जर फसवत असेल तर आपण सावध राहायला हवे किंवा कोणी जर सावध करत असेल तर त्‍याचे ऐकायला हवे.

राक्षसी प्रवृत्ती

कथा क्र.195

एक राक्षस होता. त्‍याला आपल्‍या सर्व कामासाठी एका माणसाची गरज होती. त्‍याने शोधाशोध करून एका माणसाची नियुक्ती केली. तो माणूस खूप सज्जन होता. राक्षस सांगेल ते कोणतेही काम तो पूर्ण करत असे. तो अविरत काम करत असे. मात्र राक्षस आपली वाईट प्रवृत्ती दाखवून द्यायचाच. तो त्‍याला सतत धमकावत असे. कामात त्‍याला विलंब झालेला चालत नसे. माणसाने जरा जरी कामात विलंब केला तरी मी तुला मारून टाकीन असे धमकी वजा राक्षस बोलत असे. माणूस राक्षसाच्‍या भीतीने घाबरून आणखी वेगाने काम करत असे. माणूस विचार करायचा की आपण जर काम नीट केले नाही तर आपल्‍याला हा राक्षस मारून तर टाकायचा नाही ना. एकेदिवशी सकाळपासून संध्‍याकाळपर्यंत तो सतत काम करत होता. तो इतका थकला होता की त्‍याला सुस्‍ती येऊ लागली. त्‍याला एक पाऊलही टाकवेना. थोड्या वेळाने राक्षस आला. माणसाला बसलेला पाहून राक्षस ओरडला,’’ तुझी अशी रिकामे बसून राहण्‍याची हिंमत झालीच कशी, चल उठ कामाला लाग नाही तर मी तुला खाऊन टाकीन.’’ राक्षसाच्‍या धमकीने माणूस घाबरला. त्‍याच्‍या मनात विचार आला की तू माणूस आहे व तो राक्षस आहे. धमकाविणे हे त्‍याचे काम आहे. तू जोपर्यंत याला घाबरशील तोपर्यंत हा तुला घाबरवत राहणार. एकदा का होईना याला प्रत्‍युत्तर दिलेच पाहिजे. शेवटी माणसाने मनाची तयारी केली. आता जे होईल ते होईल पण याला उत्तर हे द्यायलाच हवे हा पुरुषार्थ त्‍याच्‍या मनात जागृत झाला व तो राक्षसाला म्‍हणाला,’’ सारखे सारखे खाऊन टाकण्‍याची भाषा कशाला करतोस, खायचे असेल तर मला खाऊन टाक म्‍हणजे मी पण एकदाचा सुटलो.’’ त्‍याची ही हिंमत पाहून राक्षसाने आपले वागणे बदलले.


तात्‍पर्य :- रोजच्‍या जीवनातही असे राक्षस आपल्‍याला घाबरवत असतातच पण त्‍यांना किती किंमत द्यायची हे आपणच ठरवायचे असते. ज्‍यादिवशी आपल्‍यातील भीती सोडून आपण पुढे चालू तेव्‍हा ही राक्षसीप्रवृत्ती आपोआप गप्प बसते. 

सचोटी

कथा क्र.194

एका साधूला पितळेच्‍या धातूचे सोन्‍यात रूपांतर करण्‍याची कला अवगत होती. पण याचा उपयोग तो गरजुंना करण्‍यासाठीच करत होता. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्‍याच्‍याकडे आला. त्‍याला मुलीच्‍या लग्‍नासाठी पैशांची आवश्‍यकता होती. साधूने त्‍याची अडचण ओळखून त्‍याला एका पितळेच्‍या भांड्याचे रूपांतर सोन्‍यात करून दिले. ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्‍याच्‍याकडे सोन्‍याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला.राजाने त्‍याची चौकशी केली केली तेव्‍हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली. राजाच्‍या मनात लोभाची भावना उत्‍पन्न झाली. त्‍याने साधूला ती विद्या शिकविण्‍याचे फर्मान काढले. साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15‍ दिवसांची मुदत दिली अन्‍यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली. राजा त्‍याच्‍याकडून काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे पण साधू काही होकार देईना. हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्‍या येथे राहून त्‍याची सेवा करू लागला. साधूने राजाच्‍या सेवेवर प्रसन्न होऊन त्‍याला पितळापासून सोने तयार करण्‍याची विद्या शिकविली. राजा महालात परतला. पंधराव्‍या दिवशी साधूला बोलावून त्‍याला विद्या शिकविण्‍याची आज्ञा केली. साधूने परत नकार दिला. तेव्‍हा राजा गर्वाने म्‍हणाला,’’ साधू तू मला कला शिकवली नसती हे मी जाणून होतोच पण मी ही हट्टी आहे. मी पण तुझ्याजवळ राहून ती कला शिकून तयार झालो आहे.’’ साधू म्‍हणाला,’’महाराज तुम्‍ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन नाही. ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते.’’

तात्‍पर्य :- ज्ञान सचोटीने प्राप्त होते, धमकावून नव्‍हे.

सोमवार, ७ एप्रिल, २०१४

दानातून मिळाला धडा

कथा क्र.193

कानपूरमध्‍य़े गंगेच्‍या काठी बसून एक भिकारी भीक मागत होता. भिकेत त्‍याला जे मिळेल ते त्‍यातून तो आपला उदरनिर्वाह चालवित होता. त्‍याच्‍या हातात एक कटोरा असायचा. त्‍याला तो जाणा-या येणा-याच्‍या पुढे करायचा. ज्‍याला त्‍यात काही टाकावयाचे असेल ते टाकत होता. परंतु तो भिकारी तोंडाने काही मागायचा नाही. अन्‍य भिका-याप्रमाणे तो दीनवाणा होत नसे. एके दिवशी तिकडून एक श्रीमंत माणूस जात होता. भिका-याने पाहिले, श्रीमंताच्‍या अंगावर अत्‍यंत भारी कपडे होते, गळ्यात आणि अंगावर सोन्‍याचे दागिने चमकत होते. उंची राहणी ही त्‍याच्‍या वर्तनातून दिसून येत होती. श्रीमंत वाटतो म्‍हणून भिका-याने त्‍याच्‍याकडे कटोरा पुढे केला, ते पाहून त्‍या श्रीमंताच्‍या चेह-यावर तिरस्‍कार उमटला. त्‍याने खिशातून एक रूपायाचे नाणे काढले व त्‍या भिका-याकडे फेकले व छद्मी हसला. तो पुढे निघणार इतक्‍यात भिकारी जागेवरून उठला. त्‍याने त्‍या श्रीमंताचे उद्धट वर्तन व गरीबांसाठी असलेले तिरस्‍करणीय भाव पाहून ते रूपायाचे नाणे श्रीमंताकडे परत फेकले व म्‍हणाला,’’ घे सांभाळ तुझी दौलत, मला तुझ्यासारख्‍या गरीबाचा पैसा नको, ज्‍या दानामध्‍ये तिरस्‍काराचा भाव आहे असे दान स्‍वीकार करू नये असे मला सांगण्‍यात आले आहे. दान करतानासुद्धा शुद्ध मनाने, चांगल्‍या भावाने दान करावे जेणे करून घेणा-याला व देणा-याला समाधान लाभते.परमेश्‍वराने माणूस बनविताना जर काही फरक केला नाही तर तू तिरस्‍कार करून परमेश्‍वराचा अपमान करतो आहेस हे लक्षात ठेव. ’’ हे ऐकताच श्रीमंताला आपली चूक लक्षात आली. त्‍याने तात्‍काळ भिका-याची क्षमा मागितली.

तात्‍पर्य :- दान सत्‍पात्री, प्रेमपूर्वक व नि:स्‍वार्थ भावनेने केल्‍यास त्‍याचे समाधान मिळते./ जगात सर्वजण समान आहेत. श्रीमंती आज आहे तर उद्या श्रीमंती नसेल याची जाणीव ठेवून वागले पाहिजे.

परिश्रमाचा राजहंस

   कथा क्र.192   

एक जमीनदार होता. त्‍याला त्‍याच्‍या वाडवडीलांपासून खूप संपत्ती मिळालेली होती. अतिश्रीमंतीमुळे तो खूप आळशी बनला होता. त्‍याचा दिवस हा टवाळक्या करणे व हुक्का ओढत बाजेवर पडून राहणे यातच जात असे. त्‍याच्‍या या आळशीपणाचा फायदा त्‍याचे नोकरचाकर इमानेइतबारे घेत असत. त्‍याचे नातेवाईकही या आळशी स्‍वभावाला ओळखून होते व तेही त्‍याच्‍या संपत्तीचा गैरफायदा घेत असत, त्‍याची संपत्ती हळूहळू का होईना साफ करण्‍यात ते मश्‍गुल होते. एकदा परगावाहून जमिनदाराचा एक मित्र त्‍याला भेटण्‍यासाठी आला होता. त्‍याने हे सर्व नोकरचाकरांचे, नातेवाईकांचे वर्तन पाहिले व मित्राला कसे लुटले जात आहे हे त्‍याच्‍या लक्षात आले. त्‍याने हे जमिनदाराच्‍या कानावर घातले पण तो इतका आळशी होता की त्‍याने मित्राच्‍या बोलण्‍याकडे लक्षच दिले नाही. शेवटी त्‍याने एक हुकुमी एक्का वापरला. तो जमिनदाराला म्‍हणाला,’’ मित्रा, मला असे एक संतमहात्‍मा माहित आहेत की जे तुझी संपत्ती दुप्‍पट करून देऊ शकतील. फक्त तू त्‍यांच्‍या दर्शनाला चल व ते जसे सांगतील तसे तू वाग. तुझी संपत्ती अजून वाढेल.’’ जमिनदाराला पैशाची हाव सुटली व तो संतांकडे जाण्‍यास तयार झाला. संतांकडे जाऊन दर्शन घेतले व संतांना मार्गदर्शन करण्‍यास सांगितल्‍यावर ते म्‍हणाले,’’ तुझ्या शेतामध्‍ये एक राजहंस रोज पहाटे सूर्योदयापूर्वी येत असतो त्‍याचे दर्शन तू घेतल्‍यास तुझ्या संपत्तीत प्रचंड वाढ होईल. मात्र इतर कोणीही त्‍या राजहंसाला पाहण्‍यापूर्वी तू पाहणे गरजेचे आहे.’’ दुस-याच दिवशी जमिनदार लोभाने का होईना पहाटे उठला व शेतात गेला. त्‍याला तेथे एक आश्‍चर्यकारक दृश्‍य दिसले. त्‍याचा एक नातेवाईक पाठीवर धान्‍याचे भरलेले एक पोते शेतातून चोरून घेऊन चाललेला दिसला. नातेवाईकाला जमिनदाराने विचारले असता तो नातेवाईक ओशाळा झाला व माफी मागू लागला. जमिनदार लवकर उठला असल्‍याने तो दूध पिण्‍यासाठी गोठ्यामध्‍ये गेला तर तेथे अजून एक चकित करणारे दृश्‍य त्‍याला दिसले. त्‍याचे नोकर हे दूधामध्‍ये पाणी मिसळून दूध वाढवित होते व वाढविलेले दूध हे बाजूला ठेवून त्‍याचे पैसे मिळविण्‍यासंबंधी चर्चा करत होते. जमिनदाराने हे ऐकले व नोकरांना कामावरून काढण्‍याची धमकी देताच ते गयावया करू लागले व काम प्रामाणिकपणे करू असे त्‍यांनी सांगितले. जमिनदार आता रोजच लवकर उठू लागला व राजहंसाचे दर्शन घेण्‍यासाठी शेतात जाऊ लागला. यामुळे सगळे नोकरचाकर, नातेवाईक, धान्यचोर यांना मालक शेतात हजर असतो याची जरब बसली व ते चोरी करेनासे झाले. लवकर उठून शेतात फेरफटका मारल्‍याने जमिनादाराची तब्‍येत पण सुधारू लागली. चोरी कमी झाल्‍याने दूधदुभते, धान्‍य, पीक, भाजीपाला यातून जमिनदाराचे धन अजूनच वाढू लागले. पण राजहंस कसा दिसत नाही हा प्रश्‍न घेऊन तो संतांकडे गेला असता महात्‍मा म्‍हणाले,’’ अरे तुला तर तो राजहंस दिसला पण तू त्‍याला ओळखू शकला नाही. परिश्रम नावाचा एक राजहंस तुझ्या आयुष्‍यात आला आणि त्‍याने तुझ्यातल्‍या आळशीपणाला दूर करून तुझ्या धनाची वाढ करून दिली.’’


तात्‍पर्य :- परिश्रमरूपी परिस ज्‍यांच्‍या ज्‍यांच्‍या आयुष्‍याला स्‍पर्श करतो त्‍यांच्‍या जीवनाचे सोने बनते हाच या कथेचा आशय, 

बुधवार, २ एप्रिल, २०१४

50 वर्षाची तप:श्‍चर्या

              कथा क्र.190                 

एक फकीर 50 वर्षे एकाच जागेवर बसून रोज 5 वेळेला नमाज अदा करत असे. एक दिवस आकाशवाणी झाली आणि अल्लाचा आवाज फकीराच्‍या कानी पडला,'' हे फकीरबंदे, तू 50 वर्षापासून नमाज अदा करत आहेस पण तुझी एकही नमाज अजूनपर्यंत कबूल झालेली नाही.'' फकीराच्‍या शेजारी बसणा-या इतर सर्वांनी ही आकाशवाणी ऐकली व ते सर्वजणच दु:खी झाले. 50 वर्षाची तप:श्‍चर्या निष्‍फळ ठरली आणि फकीराची यावर प्रतिक्रिया असेल याचा विचार करत असतानाच एक आश्‍चर्यचकित घडणारी घटना तेथे घडू लागली. ज्‍या फकीराबाबत ही आकाशवाणी घडली होती तो फकीर आनंदाने नाचू लागला होता. तो अल्‍लाचे आभार मानत होता आणि अल्‍ला, अल्‍ला, या खुदा तेरा शुक्रिया करत आनंदाने नाचत होता. हे पाहून इतर सर्वांना वाटले या आकाशवाणीचा या फकीराच्‍या मनावर खूपच परिणाम झाला आहे. हे सर्व तो परिणामात करत आहे असे त्‍यांना वाटले. कोणीतरी त्‍या फकीराला विचारले,''बाबा, तुम्‍हाला खरे तर दु:ख व्‍हायला हवे होते. कारण तुमची 50 वर्षाची तप:श्‍चर्या आताच खुदाने नाकारली आहे. तरी पण तुम्‍ही इतके आनंदात कसे'' फकीर आनंदात उत्तरला,'' अरे गेली ती 50 वर्षाची तप:श्‍चर्या पण खुदाला हे तर माहित आहे की मी 50 वर्षे झाले त्‍याचे स्‍मरण करतो आहे. त्‍याला माझे या निमित्ताने का होईना स्‍मरण झाले हे काय कमी आहे. खुदाने माझी आठवण ठेवली हेच मला खूप आहे.''


तात्‍पर्य :- कोणतीही सेवा ही निष्‍फळ होत नाही, यथायोग्‍य वेळेस त्‍याचे फळ हे मिळतेच. सेवा करताना मनात तर मेवा मिळविण्‍याचा भाव असेल तर सेवेला किंमत राहत नाही

शेती आणि देव

कथा क्र.191
एकदा एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला. नाराजीचे कारणही तसेच होते कारण कधी पाऊस जास्‍त पडत असे तर कधी पूर्ण दुष्‍काळ, कधी ऊन जास्‍त तर कधी ढगाळ वातावरण, कधी गारा पडून पीकाचे नुकसान होई तर कधी वा-याने उभे पीक आडवे होत असे. एक दिवस वैतागून त्‍याने देवाला साद घातली व देवास सांगितले,''तुम्‍ही सर्वव्‍यापी प्रभू परमेश्‍वर असाल इतर सर्व गोष्‍टीतले तुम्‍हाला कळत असेल पण माझ्यामते तरी तुम्‍हाला शेतीतले काहीच कळत नाही. एक प्रार्थना तुम्‍हाला मी करतो की तुम्‍ही फक्त एक वर्षभर निसर्ग माझ्या ताब्‍यात द्या मग बघा शेती कशी फुलते ते. घरोघरी मी धान्‍यांच्‍या राशी कशा घालतो ते पहाच तुम्‍ही.'' देव हसला आणि म्‍हणाला,''तथास्‍तू, तुझ्या म्‍हणण्‍याप्रमाणे आज, आतापासून मी निसर्गाचा लहरीपणा बंद करून तो तुझ्या ताब्‍यात मी देत आहे. तू तुला जसा पाहिजे तसा ऋतु बनवून घे व शेती कर'' इतके बोलून देव निघून गेला. शेतक-याने या वरदानाचा फायदा घेण्‍यासाठी गहू पेरले, जेव्‍हा त्‍याला जेवढे ऊन पाहिजे होते तेव्‍हा त्‍याने ऊन पाडले, जेव्‍हा त्‍याला पाणी द्यायचे होते तेव्‍हा त्‍याने पावसाचा वर्षाव केला. प्रचंड ऊन, गारा, पूर, सोसाट्याचा वारा याचा स्‍पर्शही कधी त्‍याने आपल्‍या पीकांना होऊ दिला नाही. काळ निघून गेला आणि त्‍याची शेती बहरून आली. शेतक-याला मोठा आनंद झाला. कधी नव्‍हे इतके पीक आले होते. शेतक-याने मनातल्‍या मनात विचार केला की आता देवाला कळेल की शेती कशी केली जाते, उगाचच तो शेतक-यांना कसा त्रास होईल ते तो वरून पाहत असतो. पीक कापणीस आले आणि शेतकरी मोठ्या आनंदाने, गर्वात पीक कापणीसाठी शेतात गेला. पीकाला हात लावून पाहिला आणि तो बेशुद्ध होऊनच खाली पडला. कारण गव्‍हाच्‍या त्‍या ओंब्यांमध्‍ये एकही दाणा नव्‍हताच मुळी. पीक नुसते आलेले दिसत होते पण एकही गव्‍हाचा दाणा भरला गेला नव्‍हता. थोड्यावेळाने तो शुद्धीवर आला आणि धाय मोकलून रडू लागला. त्‍याचे काळीज पिळवटणारे रूदन ऐकून परमात्‍मा परमेश्वर तेथे प्रकट झाला आणि म्‍हणाला,'' अरे वेड्या तुला काय वाटले, तू तुझ्या इच्‍छेप्रमाणे जसा पाहिजे तसा वागला म्‍हणून पीक तसे येत नसते. त्‍या पिकाला तू कधीच संघर्ष करू दिला नाही. सोसाट्याच्‍या वा-यातच पिक उभे राहते तेव्‍हाच त्‍याच्‍यात बळ येते. प्रचंड उन्‍हातही त्‍याच्‍यात जगण्‍याची इच्‍छा बळावते. संकटाशी जोपर्यंत सामना करत नाही तोपर्यंत त्‍याला त्‍याची कुवत कळत नाही. सगळे जर मनाप्रमाणे घडले तर कोणत्‍याच गोष्‍टीची किंमत राहत नाही. आव्‍हान मिळाले नाही म्‍हणून तुझ्या पीकात दाणे भरलेच नाहीत. वारा सुटतो, गारा पडतात तेव्‍हाच त्‍या पिकात जगण्‍याची उमेद निर्माण होते आणि ते संघर्ष करून नवीन जीवन निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करते. तू हे कधीच होऊ दिले नाही म्‍हणून तुझे पीक हे पोकळ निघाले. सोन्याला सुद्धा चकाकी येण्‍यासाठी आधी आगीतून जावे लागते तेव्‍हाच ते चकाकते. हातोडीचे मार सोसावे लागतात तेव्‍हाच सोन्‍याचा उत्‍कृष्‍ट दागिना बनतो.'' आता शेतक-याला जीवनाचे सार उमगले होते.

कथासार- जीवनात जर संघर्षच नसेल तर, आव्‍हाने नसतील तर मनुष्‍य अगदी खिळखिळा बनून राहतो. त्‍याच्‍यात कोणतेच गुण येऊ शकत नाहीत. संकटेच माणसाला तलवार किंवा ढाल बनण्‍याची प्रेरणा देतात. कधी तलवार बनून वार करायचा आणि कधी ढाल बनून सामोरे जायचे हे संकटाकडूनच माणूस शिकतो. जीवनात जर कधी यशस्‍वी व्‍हायचे असेल तर संकटांपासून कधीच पळून चालणार नाही. संघर्ष केल्‍यानेच संकटे दूर होतात त्‍याच्‍यापासून दूर पळून नाहीत.