रविवार, ३० डिसेंबर, २०१२

विश्वासघात


(कथा क्र. १०) 

जंगलात एक हरिणीचे पाडस चरत होते. अचानक तेथे एक चित्ता आला. पाडस जीव वाचविण्यासाठी दाट वेलीच्या जाळ्यात घुसले. त्याला पकडण्यासाठी चित्ताही त्या जाळीत घुसला. पाडस छोटे होते ते सहजच जाळीतून पळून गेले. मात्र चित्ता अडकून बसला. त्याच वेळी एक शेतकरी तेथून जात होता. चित्त्याने शेतकऱ्याला त्याला जाळीतून काढण्याची विनंती केली. परंतु शेतकरी म्हणाला," तू जंगली प्राणी ! तुझा काय भरवसा ! तुला सोडल्यावर तू मलाच खावून टाकशील." चित्त्याने तसे करणार नाही असे आश्वासन दिले. शेतकर्याने त्याला मुक्त केले. तेंव्हा चित्त्याने आपला मूळ स्वभाव दाखविला आणि शेतकऱ्याला खाण्याची भाषा सुरु केली. शेतकरी म्हणाला मी तुला मुक्त केले हाच का सहकार्याचा मोबदला का?. चित्त्याने भुकेचे कारण सांगितले. तेवढ्यात तेथे एक लांडगा आला. दोघांची चर्चा ऐकून तो शेतकऱ्याला म्हणाला, " हा एवढा मोठा चित्ता! वाऱ्याच्या वेगाने पळणारा! आणि हा एवढ्याश्या जाळीत कसा अडकून पडेल. तू खोटे बोलतो आहेस. तू एवढ्या मोठ्या चित्त्याला वाचवला हे खोटे आहे, हा संकटात फसू शकत नाही. तो जाळीत कसा काय अडकला हे मला दाखव मग तू खरा का चित्ता ? हे पाहू." हे ऐकून चित्ताही घमेंडीत गेला तो परत जाळीत गेला व पुन्हा जाळीत अडकला. त्याच क्षणी लांडगा शेतकऱ्याला म्हणाला, " अरे मित्रा आता तरी पळ! नाहीतर हा पुन्हा तुला फसवेल !

तात्पर्य - जे नेहमी विश्वासघातक राहिले त्यावर कधीच विश्वास ठेवणे चांगले नाही. ते त्यांचा मूळ स्वभाव सोडत नाहीत.

वर्तमानपत्रातून संग्रहित

शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१२

कोळी आणि मासा


 (कथा क्र. ९)


एका गावात एक कोळी राहत होता. रोज समुद्रात जाऊन मासे पकडायचे आणि बाजारात जाऊन विकायचे हाच त्याचा दिनक्रम होता. पण एके दिवशी काही केल्या त्याच्या जाळ्यात काही मासे सापडेनात. तो हैराण झाला. दुसऱ्या दिवशीही तोच प्रकार झाला. तो कंटाळला. त्याला काही सुचेना. तिसऱ्या दिवशीही हाच प्रकार झाला मग मात्र त्याच्या मनाची घालमेल होवू लागली. मनाशी म्हणाला,''आता जर समुद्रात मासे मिळाले नाहीत तर मी काही समुद्रावर येणार नाही." असे ठरवून त्याने जाळे समुद्रात टाकले. यावेळी त्याच्या नशिबाने त्याला साथ दिली. एक छोटा का होईना मासा त्याच्या जाळ्यात सापडला. कोळ्याने जाळे वर ओढताच मासाही वर आला व मनुष्यवाणीत बोलू लागला. काकुळतीला येवून तो मासा म्हणाला,'' मी तुझ्या पाया पडतो पण मला सोडून दे. मी आत्ता खूप लहान आहे. मी मोठा होईन तेंव्हा तू मला पकड. मला परत समुद्रात जावू दे". कोळी म्हणाला," अरे मत्स्या ! काय माहित तू मला परत सापडशील कि नाही, आणि आज तुला जर नेले नाही तर मी आणि माझ्यावर अवलंबून असलेले लोक मात्र उपाशी मारतील. तेंव्हा तुला सोडून देण्याचा प्रश्नच येत नाही."


तात्पर्य= भविष्यात मोठे घबाड मिळेल या आशेवर आता हाती आलेली संधी सोडणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा होय.
वर्तमानपत्रातून संग्रहित