मंगळवार, २९ जानेवारी, २०१३

(सेवा)


(कथा क्र. २७)  

गंगेच्या काठी गुरु अभेंद्र यांचा आश्रम होता. एकदा देशात भीषण दुष्काळ पडला, गुरु अभेंद्र यांनी संकटग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्या तीन शिष्यांना बोलावून घेतले. व सांगितले," अशा संकटाच्या वेळी आपण पीडितांची सेवा करायला पाहिजे. तुम्ही तिघे वेगवेगळे जावून उपाशी लोकांना अन्नदान करावे." यावर शिष्य म्हणाले,"गुरुजी! आपण इतक्या लोकांना भोजन कसे काय देवू शकतो? आपल्याजवळ न अन्नाचा साठा आहे ना अन्न खरेदी करण्यासाठी धन." तेंव्हा गुरु अभेंद्र यांनी त्या तिघांना एक थाळी देत म्हणाले," हि दिव्य थाळी आहे. या थाळीजवळ तुम्ही जितके अन्न मागाल तितके ती देईल. तिन्ही शिष्य ती थाळी घेवून निघाले. दोन शिष्य एका ठिकाणी बसले, तिथून जो कोणी जाईल त्याला भोजन देत असत. परंतु तिसरा शिष्य मात्र गप्प बसला नाही तर उपाशी लोकांना शोधून शोधून भोजन नेवून देत राहिला. काही दिवसांनी तिघेही जेंव्हा आश्रमात परतले तेव्हा गुरुनी तिसऱ्या शिष्याची खूप स्तुती केली. पहिल्या दोघांना याचे आश्चर्य वाटले. ते म्हणाले,"गुरुजी! दुष्काळपीडितांची सेवा तर आम्हीपण केली आहे. मग तुम्ही तिसऱ्या शिष्याची विशेष स्तुती का करता आहात?" गुरु म्हणाले," तुम्ही दोघेहि एका जागी बसून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अन्नदान करीत होता. असे केल्याने जे लोक तुमच्यापर्यंत पोहोचण्यास असमर्थ होते त्यांना तुमची सेवा मिळाली नाही. मात्र तिसऱ्याने लोकांना जागेवर जावून भोजन दिले त्याची सेवा किंवा मदत हि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली. त्यामुळे त्याची सेवा हि स्तुतीलायक आहे."



तात्पर्य- खरी सेवा तीच असते जी पुढे होवून केली जाते व सर्व लोकांपर्यंत पोहोचते. 
वर्तमानपत्रातून संग्रहित

सोमवार, २८ जानेवारी, २०१३

(सेनापती आणि मार्गदर्शक)


(कथा क्र.२६) 

एका गावात एक मार्गदर्शक समस्यांचे अत्यंत समाधानकारक निरसन करीत असे. एकदा त्या देशाचा सेनापती त्याच्याकडे गेला व म्हणाला,"महाराज! मला स्वर्ग व नरक यातील फरक समजावून घ्यायचा आहे. आपण कृपया समजावून सांगाल का?" मार्गदर्शकाने त्याच्याकडे पाहिले व त्याला त्याचा परिचय विचारला. सेनापतीने त्याच्या वीरतापूर्ण कार्याच्याबाबतीत सविस्तर सांगितले. त्याची सर्वमाहिती ऐकून मार्गदर्शक म्हणाला,"चेहऱ्याने तर तुम्ही सेनापती नाही तर भिकारी दिसता. माझा विश्वास बसत नाहीये कि तुमच्याकडून तलवारसुद्धा उचलत असेल." हे ऐकून सेनापतीने रागाने म्यानातून तलवार उपसली. सेनापतीच्या या कृतीकडे पाहत मार्गदर्शक म्हणाला,"अरे वा ! तुम्ही तर तलवारही बाळगता, लोखंडाची असती तर तुमच्या हातून गळून पडली असती." हे उद्गार ऐकताच सेनापतीच्या तळपायाची आग मस्तकात गेली, त्याने तीच तलवार घेवून मार्गदर्शकाच्या दिशेने हल्ला करण्यास सुरुवात केली, हातातील तलवारीने तो आता मार्गदर्शकावर घाव घालणार इतक्यात मार्गदर्शक म्हणाले," हे सेनापती ! बस हाच तो नरक! क्रोधाने उन्मत्त होवून आपण विवेक घालवून माझ्यावर हल्ला केला आणि माझी हत्या करण्यास तयार झालात यालाच नरक असे म्हणतात." हे ऐकून सेनापतीने तलवार म्यानात ठेवली. तेंव्हा मार्गदर्शक म्हणाले,"विवेक जागृत झाल्यावर व्यक्तीला आपल्या चुकांची जाणीव होते. विवेक गमावून कोणतेही कार्य केल्यास नाशाला कारणीभूत व्हावे लागते. " सेनापतीला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.



तात्पर्य- आत्मनियंत्रणातून विवेक उपजतो. विवेक जागृत ठेवल्यास अनेक वाईट प्रसंगातून सुटका करून घेता येते. 

वर्तमानपत्रातून संग्रहित