गुरुवार, २७ जून, २०१३

(आरसा)

(कथा क्र.100) 

एक गुरूंच्‍या घरी एक शिष्‍य मनोभावे गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्‍याच्‍या या सेवेमुळे गुरु त्‍याच्‍यावर प्रसन्न होते. शिक्षण् पूर्ण झाल्‍यावर विद्यार्थी घरी जाण्‍यासाठी निघाला तेव्‍हा गुरुंकडे त्‍याने जाण्‍याची आज्ञा मागितली तेव्‍हा गुरुंनी त्‍याला आशीर्वाद म्‍हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्‍य आरसा (दर्पण) असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला. हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्‍यासाठी त्‍याने लगेच आपल्‍या गुरुंसमोर हा आरसा धरला व गुरुंच्‍या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुंच्‍या समोर आरसा धरताच त्‍याच्‍या चेह-यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुंच्‍या अंतकरणात मोह, अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्‍याला याचे फारच दु:ख झाले की आपण ज्‍या गुरुची मनोभावे पूजा केली, ज्‍यांना पूर्ण ईश्र्वराचा दर्जा दिला त्‍यांच्‍या मनातही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्‍याला वैषम्‍य वाटले. तो गुरुंना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला, रस्‍त्‍यात भेटणा-या प्रत्‍येकाच्‍या मनातील भाव पाहणे हे त्‍याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्‍याने आपल्‍या प्रत्‍येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला. त्‍याला प्रत्‍येकाच्‍या हृदयात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्‍याने आपल्‍या जन्‍मदात्‍या आई वडीलांच्‍या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्‍यातून सुटले नाहीत. त्‍यांच्‍या हृदयात पण त्‍याला काही ना काही दुर्गुण दिसले. शेवटी या गोष्‍टीचा त्‍याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरुंकडे धावला. गुरुंपाशी जाऊन मोठ्या विनम्रपणे तो म्‍हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्‍या या आरशातून प्रत्‍येकाच्‍या मनात, हृदयात, अंत:करणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्‍येकाच्‍याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. एखाद्याच्‍या मनात कमी तर कुणाच्‍या मनात जास्‍त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दु:खी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.’’ गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्‍याच्‍याकडे केला आणि काय आश्र्चर्य त्‍याला त्‍याच्‍या मनाच्‍या प्रत्‍येक कोप-यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्‍हणाले,’’ वत्‍सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्‍यासाठी दिला होता पण तू दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच कालात जर तू जर स्‍वत:चे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते. याच काळात तु एक असामान्‍य व्‍यक्ती झाला असता. मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्‍वत:ला सुधारण्‍याचा प्रयत्‍नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.’’ 


तात्‍पर्य – आपण नेहमीच दुस-या व्‍यक्तीचे दुर्गुण बघतो, त्‍यावर टीका करतो पण आपल्‍यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात नाही. कधीतरी जर आपण आत्‍मनिरीक्षण केले तर आपल्‍यालाही आपले दुर्गुण सापडतीलच.

साभार - इंटरनेटवरून संग्रहीत 

सोमवार, २४ जून, २०१३

(हे ही दिवस जातील)

कथा क्र. ९९ 

एकदा एक राजा आपल्‍या महालात बसला होता. तेवढ्यात त्‍याला प्रधान येताना दिसला. प्रधान राजाजवळ आला, त्‍याने राजाला प्रणाम केला व राज्‍याच्‍या कारभाराविषयी दोघेही चर्चा करू लागले. थोड्यावेळाने एक द्वारपाल तेथे आला व म्‍हणाला,’’महाराज, द्वारावर एक संन्‍याशी आला आहे व तो आपल्‍या भेटीची वेळमागत आहे.’’ राजा संत, महात्‍मे, फकीर यांची कदर करणारा होता. राजाने द्वारपालाला संन्‍याशीमहाराजांना घेवून येण्‍यास सांगितले. द्वारपाल संन्‍याशी महात्‍म्‍याला घेऊन राजाकडे आला. महात्‍मा येताच राजाने स्‍वत: उठून त्‍यांना नमस्‍कार केला. आस्‍थेने विचारपूस केली. त्‍यांचा यथायोग्‍य सत्‍कार केला व त्‍यांना उपदेश करण्‍याविषयी सांगितले. संन्‍याशी महाराज म्‍हणाले,’’राजन, तुम्‍ही तुमचे राज्‍य अतिशय उत्तम पद्धतीने चालवित आहात, सर्व प्रजा सुस्थितीत आहे, सुखी आहे, कोणाचे कोणाशी भांडणतंटा नाही, सर्वधर्माचे लोक आनंदाने राहत आहेत, अन्नधान्‍य, पशूपक्षी सगळयात बरकत आहे. हे पाहून मला आनंद वाटतो’’ राजा म्‍हणाला,’’ महाराज ही स्‍तुती माझी एकटयाची नसून माझ्या सर्व सहका-यांची पण आहे. महाराज, ही स्‍तुती बाजूला ठेवून आपण मला भविष्‍यकाळासाठी काही उपदेश करावा अशी विनंती आहे.’’ संन्‍याशी महाराज म्‍हणाले,’’राजा, सदासर्वकाळ एकच परिस्थिती राहत नसते, त्‍यामुळे तुला फक्त एकच वाक्याचा मी उपदेश करतो. तो म्‍हणजे ‘’ हे ही दिवस जातील’’ एवढेच तु लक्षात ठेव’’ एवढे बोलून ते तेथून निघून गेले. राजा विचारात पडला, प्रधानाने हे पाहिले व तो म्‍हणाला,’’ महाराज, अहो संन्‍याशीमहाराजांनी केलेला उपदेश आपण फक्त लक्षात ठेवा म्‍हणजे झाले.’’ पण राजाची तगमग काही थांबेना, कारण एवढी सुबत्ता, समृद्धी असताना संन्‍याशाने आपल्‍याला हे ही दिवस जातील असे का म्‍हटले याचा त्‍याला उलगडा होईना. राजा रात्रंदिवस याच विचारात गढून गेला. काही दिवसातच दुस-या राजाने या राजाच्‍या राज्‍यावर स्‍वारी केली. राजा युद्धाच्‍या तयारीत कमी पडल्‍याने व परक्या राजाचे सैन्‍य आक्रमणावर आक्रमणे करीत राहिल्‍याने हा राजा हरला व त्‍याला बंदीवान करून त्‍या राजापुढे नेण्‍यात आले. तेथील राजाने या राजाला कारागृहात टाकले. कारागृहात अंधार कोठडीत कोणीच नसे. राजा एकटा निराश, हताश बसून राहत असे व आपल्‍या पूर्वीचे वैभव आठवित असे. त्‍यातच त्‍याला एक दिवशी संन्‍यासी बाबाबरोबर झालेली भेट आठविली व उपदेशही. झाले, त्‍या उपदेशाने राजाला आशा दाखविली, हे ही दिवस जातील, राजा निराशेकडून आशेकडे वळला आणि त्‍या दिवसापासून तो आनंदी राहू लागला. कारागृहाच्‍या सैनिकांना याचे कारण कळेना की कारागृहात कैदी म्‍हणून राहणारा राजा आनंदी कसा काय राहतो, त्‍यांनी त्‍यांच्‍या राजाला कळविले, तो राजाही विचारात पडला हे कसे काय साध्‍य झाले. त्‍याने या राजाला विचारले असता या राजाने संन्‍याशी महाराजांशी झालेली भेट व ‘हे ही दिवस जातील हा उपदेश सांगितला. त्‍याने हा उपदेश ऐकताच त्‍याला ही जाणीव झाली की आपणही एक राजा आहोत व आपल्‍यावरही ही वेळ येऊ शकते. हे जाणून त्‍याने राजाची मुक्तता केली, तसेच त्‍याचे राज्‍य त्‍याला परत दिले व मोठ्या सन्‍मानाने त्‍याला परत पाठविले.


तात्‍पर्य- विचारांमध्‍ये ताकद असते, एखादा विचार मानवाचे आयुष्‍य बदलून टाकू शकतो. 


माहित असलेली कथा