बुधवार, ३० ऑक्टोबर, २०१३

(गरज सरो, वैद्य मरो)

कथा क्र.144

एकदा एका श्रीमंत माणसाचा एकुलता एक मुलगा खूप आजारी पडला. तऱ्हेतऱ्हेचे वैद्य केले. साधू संतांचे उपाय केले, तरी उतार पडेना. शेवटी एक विद्वान वैद्य त्याचेकडे आला. त्याने मुलाला तपासले व बरे करण्याची हमी दिली. तेव्हा त्या श्रीमंताने वैद्यराजांना सांगितले, "वैद्यराज! माझ्या मुलाला काही करून बरे करा. तुम्ही जर माझ्या मुलाला बरे केलेत तर माझी सर्व इस्टेट मी तुम्हाला देईन. वैद्यराजांनी खूप मेहनत करून एका महिन्यात त्याच्या मुलाला पूर्ण बरे केले आणि त्या श्रीमंतास आपले वचन पाळण्यास सांगितले. आता तो गृहस्थ बदलला. वैद्याला म्हणाला, "वैद्यराज! भलतेच काय मागता? आपणाला वेड तर लागले नाही ना! अहो, त्रासलेला माणूस असे बोलून जातो, ते सगळे खरे मानायचे असते का? माझ्या मुलाची स्थिती पाहून मी त्यावेळी वेडा झालो होतो आणि त्या वेडाच्या भरात मी आपणास भलतेच काही कबूल केलेही असेल. पण वेडेपणात दिलेले वचन शहाणपणात पाळायचे नसते'. त्याने त्या वैद्याला काहीही दिले नाही. 

तात्पर्य : जगात माणसे गरजेपुरते काहीही कबूल करतात. गरज सरली, की सोयीस्करपणे बदलतात.

वर्तमानपत्रातून संग्रहित 
______________


अनुकरण

कथा क्र.143


भगवान बुद्ध आपल्‍या सर्व शिष्‍यांवर फार प्रेम करत असत. एकदा त्‍यांचा वक्‍कली नावाचा शिष्‍य आजारी पडला. काही दिवस इतर भिख्‍खूंनी त्‍याची देखभाल केली परंतु तो ठीक झाला नाही. एक दिवस वक्‍कली आपल्‍या एका भिख्‍खू मित्राला म्‍हणाला,''भगवान बुद्धांचे दर्शन करायचे आहे. त्‍यातून माझ्या मनाला शांतता लाभेल आणि मन सुखी होईल. तसेच शरीरालाही ठीक व्‍हायला वेळ लागणार नाही.'' बुद्धांपर्यंत वक्‍कलीच्‍या अवस्‍थेचा आणि इच्‍छेचा संदेश पोहोचला, तेव्‍हा ते ताबडतोब त्‍याला भेटायला आले. भगवान बुद्ध येत असताना दुरुनच वक्‍कलीने पाहिले आणि त्‍यांच्‍या सन्‍मानार्थ तो पलंगावरून उठण्‍याचा प्रयत्‍न करू लागला. बुद्धांनी त्‍याला उठू न देता प्रेमाने म्‍हटले,'' मला खाली बसण्‍यासाठी आसन आहे, तुम्‍ही उठण्‍याची गरज नाही.'' वक्‍कलीने गहिवरून म्‍हटले,'' मला तुमचे दर्शन करण्‍याची मोठी आस लागून राहिली होती. ती इच्‍छा आज पूर्ण झाली.'' बुद्ध म्‍हणाले,''वक्‍कली, जशी वेगवेगळ्या अशुद्धीने भरलेली तुझा देह आहे, तसाच माझाही देह अशुद्धीने भरलेलाच आहे. देहाकडे लक्ष देऊ नका, धर्माकडे लक्ष द्या. आपण समाजासाठी काय करू शकतो याचा विचार करा'' बुद्धांनी यातून व्‍यक्तिपूजेपेक्षा सिद्धांताला महत्‍व दिले आहे.


तात्‍पर्य-व्यक्तिपूजनात केवळ व्यक्तिचेच महत्‍व वाढत जाते, विचारांचे नाही. व्‍यक्ति कितीही मोठी असली तरी तिचे आचार, विचारसरणी यांचे अनुकरण व्‍हावयास हवे. व्‍यक्ती ही कालबद्ध असते, तिच्‍या मृत्‍युनंतरही विचार आचरणात आणणे हेच गरजेचे आहे. 

वर्तमानपत्रातून संग्रहित