बुधवार, २९ जानेवारी, २०१४

तीन माशांची गोष्ट

कथा क्र.171


स्वच्छ पाणी असलेल्या एका तळ्याचा एक पाट एका नदीला मिळाला होता. त्या तळ्यात तीन मासे होते. त्यांपैकी एक मासा दूरदर्शी होता, दुसरा शहाणा व तिसरा अगदीच मुर्ख होता. एके दिवशी दोन कोळी त्या तळ्याजवळ आले व आत पाहात असता त्यांना ते तीन लठ्ठ मासे दिसले. तेव्हा त्यांना धरण्यासाठी ते आपली जाळी आणायला गेले. त्या कोळ्यांचा बेत त्या माशांच्या लक्षात येताच ते बिचारे भिऊन गेले. त्यांपैकी जो दूरदर्शी मासा होता तो पाटातून पळून जाऊन नदीत शिरला. थोड्या वेळाने ते कोळी आले व माशांनी पाटातून पळून जाऊ नये म्हणून त्यांनी पाटाचे तोंड बंद केले. ते पाहून त्या शहाण्या माशास आपण पळून न गेल्याबद्दल पश्चात्ताप झाला. पण तितक्यात त्याला एक युक्ती सुचली. मेल्यासारखा उताणा होऊन तो पाण्यावर तरंगू लागला. कोळ्यांनी त्याला वर काढले व तो मेला असे समजून त्याला पुन्हा पाण्यात फेकून दिले. तिसरा मूर्ख मासा पाण्याच्या तळाशी जाऊन इकडूनतिकडे पळत राहिला व शेवटी बिचारा त्या जाळ्यात सापडून कोळ्याच्या हाती सापडला.


तात्पर्य - एखादे संकट येणार असे दिसताच त्याच्या प्रतिकाराची तयारी न करणे मूर्खपणाचे आहे


इंटरनेटवरून संग्रहित 


माणसातील देव

कथा क्र.170


एका गावात एक चर्च होते. एक दिवस नदीला पूर आला. पाणी गावात गुडघ्यापर्यंत आले. चर्चच्या फादरना न्यायला एक जीप आली. माणसे म्हणाली, फादर चला. बहुतेक पाण्याने सगळे वाहून जाईल. फादर म्हणाले, 'मला माझा येशूच येऊन वाचवेल.' जीप निघून गेली. नंतर पाणी वाढल्यानंतर एक बोट आली. बोटीतील लोक फादरना न्यायला आले. फादरनी नकार दिला. पाणी इतके वाढले की फादरना चर्चच्या छप्परावर जावे लागले. मग एक हेलिकॉप्टर वरतून घिरट्या घालू लागले. त्यातून एक दोर आला. हेलिकॉप्टरमधले लोक म्हणाले, 'फादर आता तरी दोर पकडा आणि जीव वाचवा.' फादर म्हणाले, 'माझा येशूच मला येऊन वाचवेल.' यानंतर एकच मोठी लाट आली आणि फादर मृत्यमुखी पडले. स्वर्गात गेल्यावर त्यांनी येशूला विचारले, 'मी इतकी प्रार्थना केली, पण तू मला वाचवले नाहीस.' येशू म्हणाले, 'मी प्रथम जीप घेऊन आलो होतो. नंतर बोट आणि नंतर हेलिकॉप्टर. पण तूच मला काही ओळखले नाहीस.'

तात्पर्य: देव काही प्रत्यक्ष येऊन मदत करत नाही. तो माणसातच शोधावा लागतो.

लेखक- संजय दोबाडे, त्र्यंबकेश्वर.

मूळ कथालेखकाचे आभार