शुक्रवार, ३० मे, २०१४

राजाची महानता

 कथा क्र.208 

भोजराजा महादानी आणि धार्मिक प्रवृत्तीचा होता. त्‍याच्‍या उदारपणाच्‍या अनेक कथा त्‍याच्‍या राज्‍यापासून अन्‍य राजातही प्रसिद्ध होत्‍या. याच कारणांमुळे तो बहुसंख्‍य लोकांचे श्रद्धास्‍थान बनलेला होता. राजा भोज यांना एकदा अस्‍वस्‍थ वाटू लागले. तेव्‍हा वैद्यांनी हात टेकले. राजा भोजने तत्‍क्षणी आपल्‍या दिवाणास निमंत्रित करून त्‍याला सांगितले, मी आता फार वेळ जगणार नाही. जेव्‍हा माझी अंत्‍ययात्रा स्‍मशानस्‍थळी घेऊन जाल तेव्‍हा माझा एक हात पांढरा व दुसरा हात काळा करा. ते दोन्‍ही हात सर्व लोकांना असे दाखवतच घेऊन जा. भोज राजाची ही इच्‍छा दिवाणास मोठी विचित्र वाटली. त्‍याने विचारले, महाराज असे करण्‍यासाठी तुम्‍ही का सांगता आहात. राजा म्‍हणाला,’’माझे रिकामे हात पाहून सगळ्यांना माहित होईल की राजा असो वा भिकारी सर्वजणच रिकाम्‍या हातानेच जातात. पांढरा आणि काळा रंगांचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे की व्‍यक्तिसोबत जे जाते ते त्‍याचे चांगले किंवा वाईट कर्म. मला यातून सर्वाना हेच सुचवायचे आहे की जन्‍मापासून मृत्‍यूपर्यंत सत्‍कर्म आणि चांगले आचरण ठेवावे.’’

तात्‍पर्य :- जन्‍मापासून मृत्‍यूपर्यंत सत्‍कर्म आणि चांगले आचरण ठेवावे.

मंगळवार, २७ मे, २०१४

दृढनिश्‍चय

   कथा क्र.207  

श्रीपूर येथील राजा यांच्‍या निधनानंतर त्‍यांचा मुलगा राजवीरसिंह याला राज्‍यपदी बसविण्‍यात आले. राजवीर वडिलांसारखाच साहसी होता पण अनुभव पाठीशी कमी असल्‍यामुळे अनेकदा संकटात तो घाबरत असे. अशावेळी त्‍याची माता त्‍याला हिंमत देत असे व योग्‍य मार्गदर्शन करून संकटातून बाहेर काढत असे. शेजारच्‍या राज्‍यातील गंगानगरमधील राजा भीमसेन याची श्रीपूरवर नजर होती. एके दिवशी भीमसेनने श्रीपूरवर आक्रमण केले. दोन्‍ही सैन्‍ये एकमेकांना भिडली, तुंबळ युद्ध झाले. भीमसेनकडे सैनिक खूप प्रमाणात होते. आतापर्यत दिलीपसिंह याने कमी प्रमाणात सैनिक असूनसुद्धा भीमसेनविरोधात केवळ धाडसी व कल्‍पक वृत्‍तीने युद्धे जिंकली होती. परंतु राजवीरसिंह यात आपले सातत्‍य ठेवू शकले नाहीत. दोनच दिवसात भीमसेन यांनी चार मैल भागावर आपला ताबा मिळविला. राजवीरच्‍या तोंडून कमी सैनिकांमुळे आपल्‍याला हार पत्‍करावी लागली हे ऐकले तेव्‍हा राजमातेने मनातल्‍या मनात काही ठरवले. राजवीर झोपण्‍याआधी राजमातेचे दर्शन घेण्‍यासाठी आला तेव्‍हा राजमाता लहान लहान सहा लाकडाच्‍या काड्या एकत्र बांधून लोखंडाच्‍या मोठ्या तुकड्याला तोडण्‍याचा प्रयत्‍न करीत असलेली पाहिली. राजवीरने मातेला विचारले,’’आई, सहा लाकडाच्‍या काड्या एकत्र करूनही लोखंडाला तोडू शकत नाही’’ राजमाता म्‍हणाली,’’खरं बोललास, संख्‍येने मजबुतीला पराजित केले जाऊ शकत नाही त्‍याप्रमाणे आपले वीर सैनिक आणि तू या लोखंडासारखे मजबूत व्‍हा. शत्रूची कितीही संख्‍या तुम्‍हाला तोडू शकणार नाही अशी ताकद तुमच्‍यात आहे ती जागृत करा. तुमच्‍या मजबुतीसमोर शत्रू गुडघे टेकेल.’’ राजवीरने याप्रमाणे केले व त्‍याने भीमसेनाला हरवून युद्धात विजय संपादन केला.

तात्‍पर्य :दृढ मनोबलाने हारलेले युद्धही जिंकता येते. काही काही वेळेला दृढनिश्‍चय, ठाम मनोबल हेच यशाचे इंगित ठरते.