गुरुवार, ३१ जुलै, २०१४

एकीचे बळ सर्वश्रेष्‍ठ

कथा क्र.225

एका जातक कथेतील वर्णनानुसार वाराणसीलगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्‍याने खड्ड्यात पडलेल्‍या जंगली कुत्र्याच्‍या पिलाचा जीव वाचवला तेव्‍हापासून त्‍याला त्‍या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्‍याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्‍याच्‍याजवळ येत असत. परंतु त्‍यांना सर्वांना एका वाघाने फार त्रस्‍त करून सोडले होते. तो रोज त्‍यांच्‍यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्‍या माथ्‍यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्‍याच्‍यावर भुंकु लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्‍या कुत्र्याच्‍या मागे असणा-या एका मोठ्या खड्ड्यात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्‍याच्‍यावर धाव घेतली व त्‍याच्‍यावर हल्‍ला करून त्‍याला ठार केले.


तात्‍पर्य :- एकीचे बळ मोठे असते. 

शनिवार, २६ जुलै, २०१४

खरा वेडा कोण

कथा क्र, 224

एका वेड्यांच्‍या हॉस्पिटलमध्‍ये वेड्यांना बाहेर पडेपर्यंत म्‍हणजेच पूर्ण बरा झाला आहे की नाही हे पाहण्‍यासाठी अनेक मानसशास्‍त्रीय चाचण्‍यांना तोंड द्यावे लागत असे. त्‍यातील शेवटच्‍या चाचणीमध्‍ये वेड्यासमोर एक नवे कोरे चकचकीत पाच रूपयांचे नाणे आणि एक मळकट पन्‍नास रूपयांची नोट ठेवली जाई. त्‍यातील फक्त एकच गोष्‍ट त्‍याला उचलण्‍यास सांगितली जाई. वेड्याने पन्‍नास रूपये उचचले की त्‍याला डिसचार्ज दिला जाई व तसे न केल्‍यास त्‍याला पुन्‍हा एकदा चाचण्‍या पार करायला सांगितल्‍या जात. गरज पडल्‍यास पुन्‍हा उपचारासाठीही पाठविले जाई. हॉस्‍पीटलमधील एक वेडा शेवटच्‍या चाचणीपर्यंत सगळ्या चाचण्‍या पटापट पार करत असे मात्र शेवटच्‍या चाचणीला मात्र नापास होत असे. अनेकदा असे घडल्‍यावर चाचणी घेणारे डॉक्‍टर कंटाळले व त्‍यांनी एक युक्ती केली पुढच्‍या वेळेला त्‍या वेड्यासमोर एक पाच रूपयांची जुनी नोट व पन्‍नास रूपयांची कोरी करकरीत नवी नोट ठेवली तरीही त्‍या वेड्याने पाच रूपयांचीच नोट उचचली. हे पाहून डॉक्‍टर आश्‍चर्यचकित झाले व ओरडले,'' अरे मूर्खा, सगळ्या चाचण्‍या आरामात पार करतोस आणि शेवटच्‍या चाचणीत मात्र कायम चुकतोस. तुला पाच आणि पन्‍नास यातील फरक कळत नाही काय'' वेडा शांतपणे म्‍हणाला,'' ते मला चांगलं कळतं डॉक्‍टरसाहेब, पण इथून बाहेर पडलो की, मला रोजचा खर्च स्‍वत:लाच करावा लागणार आहे. त्‍यापेक्षा पाच रूपयांचे नाणे उचचले की, मला इथून बाहेर पडावे लागत नाही, पाच रूपयेही मिळतात आणि खाणेपिणेराहणे सगळे काही फुकटात होते. मग मी पन्‍नास रूपयांची नोट उचलून स्‍वत:च्‍या पायावर धोंडा पाडून का म्‍हणून घेऊ''